राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड

१२ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या जिजाऊमातांची आज जयंती. जिजाऊ करारी, स्वाभिमानी, न्यायनिष्ठूर, लढवय्या होत्या. तशाच त्या संवेदनशील आणि कनवाळू मनाच्या होत्या. आपल्या राज्यातली प्रजा सुखी असली पाहिजे, याची त्यांनी काळजी घेतली. जिजाऊंच्या चरित्रातून आज आपण निर्भीडपणा, कणखरपणा, शौर्य, समता, न्यायीवृत्ती, बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा.  

राजमाता जिजाऊमाँसाहेब यांची ओळख केवळ शिवरायांच्या माता एवढीच मर्यादित नाही. जसं त्यांनी शिवरायांना घडवलं तसेच नातू संभाजीराजांनादेखील घडवलं. त्यांचे क्रांतिकारक पती शहाजीराजे यांच्या महत्त्वाकांक्षी आणि शौर्यशाली कार्यकर्तृत्वाला त्यांनी तशीच खंबीरपणे साथ दिली.  त्या प्रजेला अत्यंत मायेने वागवणार्याल, स्वराज्याच्या आधारवड होत्या.

जिजामाता या हिंमतवान, कर्तृत्ववान आणि बुद्धिमान होत्या. लहानपणापासूनच त्या तलवारबाजी, प्रशासन, घोडेस्वारी आणि युद्धकलेत निपुण होत्या. वडील लखुजीराजे आणि आई म्हाळसादेवी यांनी त्यांना कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव न करता वाढवलं.

जिजाऊंचं स्वतःचं गुप्तहेर खातं होतं

जिजाऊंनी आपल्या जीवनात अनेक दु:खद घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या. वडील आणि भावांची देवगिरीच्या भरदरबारातली हत्या त्यांनी अनुभवली. दीर, पुत्र यांनी रणांगणावर लढता-लढता सोडलेले प्राण त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. जिजाऊ या संकटसमयी लढणार्या- होत्या, रडणार्याा नव्हत्या. अनेक संकटे आली, तरी त्या नाउमेद झाल्या नाहीत, हतबल झाल्या नाहीत, खचल्या नाहीत. तर त्या संकटाला सामोरे जाणार्याा धैर्यशाली होत्या.
 
त्यांनी बालशिवबाला मांडीवर बसवून खेड शिवापूर इथं न्यायनिवाडा केला. अन्यायग्रस्त शेतकर्यांाना न्याय दिला. महिलांवर अन्याय, अत्याचार करणार्याा नराधमांना शिक्षा ठोठावल्या. जिजाऊ करारी, स्वाभिमानी, न्यायनिष्ठूर, लढवय्या होत्या. तशाच त्या संवेदनशील आणि कनवाळू मनाच्या होत्या.

आपल्या राज्यातली प्रजा सुखी असली पाहिजे याची त्यांनी काळजी घेतली. त्यांचं स्वत:चं गुप्तहेर खातं होतं. त्यामार्फत त्या शिवबांना सतत सतर्क करत असत. तसंच त्या उत्तम न्यायाधीश होत्या. पूर्वी दिलेले अन्यायी निवाडे फिरवून पुन्हा योग्य न्याय देण्याचं कार्य त्यांनी केलं.

हेही वाचा : मध्यरात्री नझरुल काझींनी जन्मस्थळी बसवला जिजाऊंचा पुतळा

जिजाऊंचे आपल्यावर अनंत उपकार आहेत

शिवाजीराजे पन्हाळगडावर सिद्दी जोहरच्या वेढ्यात अडकले होते तेव्हा जिजाऊंनी हातात तलवार घेतली. घोड्यावर बसल्या आणि राजगडावरून पन्हाळगडाकडे निघाल्या. त्याप्रसंगी त्या म्हणतात, ‘आता जाते आणि त्या सिद्दीला ठार करून शिवबाला सोडवून आणते.’ या प्रसंगाचे रसभरीत वर्णन समकालीन कविंद्र परमानंदाने ‘शिवभारत’ या ग्रंथात केलंय. 

यावरून स्पष्ट होतं की, जीवघेण्याप्रसंगी जिजाऊ जपमाळ ओढत बसणार्यात नव्हत्या. तर हातात तलवार घेऊन रणांगण गाजवणार्या  शूरवीर होत्या. त्यांना आपल्या परंपरेचा अभिमान होता. पण भाबडेपणाने पूजाअर्चा करण्यात त्यांनी संकटसमयी वेळ दवडला नाही. 

शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. पण स्वराज्याच्या आधारवड, प्रेरणा जिजामाता होत्या. त्यामुळेच शाहीर अमर शेख जिजाऊंबद्दल लिहितात, 

आला आला शिवाजी आला।
योग्य समयाला। जिजाऊन दिला॥
थोर त्या आईचे उपकार।
थोर त्या मातेचे उपकार॥
मराठ्यांनो तुमच्याने नाही फिटणार जी जी जी॥

जिजाऊंचे अनंत उपकार आपल्यावर आहेत, असे शाहीर अमर शेख लिहितात.

कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेशी केलेली तुलना विसंगत

जिजाऊंनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. सर्व जाती-धर्मांतील लोकांना अत्यंत मायेनं, ममतेनं, आपुलकीनं वाढवलं. त्या काळात स्वराज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला ‘मावळा’ म्हटलं जात असे. मावळाई या इंद्रायणी खोर्याशतल्या प्राचीन काळातल्या मातृसत्ताक महामातेच्या नावावरून ‘मावळा’ हा शब्द आला, असं प्राच्यविद्या पंडित डी. डी. कोसंबी म्हणतात. मावळा हा शब्द स्त्रीप्रधान संस्कृतीचा आदर करतो. तसाच तो शब्द भेदभाव बाळगत नाही. मावळा म्हणजे आपण सर्वजण. जिजाऊंनी मावळ्यांना आपुलकी, जिव्हाळा, आधार दिला. 

शिवाजीराजे आग्रा कैदेत असताना स्वराज्य हिमतीने राखण्याचं कार्य जिजाऊंनी केलं. पती निधनानंतर सती न जाता, पुत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्या ग्रंथप्रामाण्यवादी किंवा अंधश्रद्धाळू नव्हत्या. म्हणूनच त्यांनी सती प्रथा लाथाडली. ही मध्ययुगीन काळातली क्रांतिकारक घटना आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाला झालेला विरोध मोडून राज्याभिषेक पार पाडणं यात जिजाऊंची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्या जशा राजकीय विरोधकांच्या विरुद्ध लढल्या, तशाच त्या सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरुद्धदेखील लढल्या.
 
जिजाऊ शूर, पराक्रमी, बुद्धिमान, निर्भीड, बुद्धिप्रामाण्यवादी, धैर्यशाली, महत्त्वाकांक्षी होत्या. तशाच त्या सुंदर होत्या, असं परमानंद लिहितात. त्या कुरूप असत्या, तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला कमीपणा येत नाही. त्या रूपवान होत्या, असं समकालीन जयराम पिंडे म्हणतात. त्यामुळे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या सौंदर्याशी जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाशी आधुनिक कवींनी केलेली तुलना अनैतिहासिक आणि विसंगत आहे, हे स्पष्ट होतं.

हेही वाचा : शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश

जिजाऊंकडून बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा

शहाजीराजांच्या पदरी असणारा जयराम पिंडे जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन पुढीलप्रमाणे करतो, 

जशी पंपकेशी खुले फुलजाई।
भली शोभली ज्यास जाया जिजाई॥
जिचे कीर्तीचा चंबु जंबुद्विपाला।
करी साऊली माऊली मुलाला।

जिजाऊ शहाजीराजांसारख्या पराक्रमी परुषाला पत्नी म्हणून शोभून दिसतात. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांची कीर्ती सर्व भरतखंडावर पसरलेली आहे. त्यांच्या कीर्तीच्या सावलीखाली सर्व सज्जन लोक आश्रयाला येतात, असा वरच्या ओळींचा अर्थ होतो. म्हणजेच सर्वांना मायेची सावली देणार्याय जिजाऊ होत्या. जिजाऊंच्या चरित्रातून आज आपण निर्भीडपणा, कणखरपणा, शौर्य, समता, न्यायीवृत्ती, बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा. वंशाला दिवा फक्त मुलगाच असतो असे नाही, तर मुलगीदेखील वंशाला दिवा असते. घराघरांत शिवाजीराजे, संभाजीराजांसारख्या विचारांची पिढी निर्माण करावयाची असेल, तर घरोघरी जिजाऊंसारख्या माता निर्माण होणे, गरजेचे आहे.

हेही वाचा : 

शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी

शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?

लोकशाही मुल्यांमुळेच रयतेला शिवशाही हवीहवीशी

शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्यावर यशवंतराव चव्हाण काय म्हणाले होते?

(हा लेख दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीत पूर्वप्रकाशित झाला आहे.)