बड्डे गर्ल हरमनप्रीत: बदलत्या इंडियाची डॅशिंग कॅप्टन

०८ मार्च २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


८ मार्च हा जागतिक महिला दिन. याच दिवशी टी २० वर्ल्ड कपची फायनल आहे. त्यात ऑस्ट्रेलियाशी लढणाऱ्या टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा वाढदिवसही आला आहे. टीम इंडिया फायनल जिंकून कॅप्टनला बड्डेचं गिफ्ट देणार का? हे कुतूहल आहे. हरमनप्रीत आणि तिच्या टीमच्या खेळाने जगाला आधीच जिंकून घेतलंय.

महिलांच्या सन्मानासाठी ८ मार्च जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी पंजाबमधल्या मोगा शहरात हरमंदर सिंग भुल्लर आणि सतविंदर कौर यांना मुलगी झाली. तीस वर्षांपूर्वी महिला दिनाला झालेली ही मुलगी एक दिवस देशातल्या प्रभावशाली आणि सेलिब्रेटी महिलांमधे गणली जाईल, असं त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं.

पण त्या मुलीनं म्हणजे हरमनप्रीत कौरने आज भारतीय महिला क्रिकेटचा चेहरा बदलला आहे. ती सध्या नव्या भारताचं प्रतिनिधित्व करतेय. आज सामान्य क्रिकेटरसिकच नाही तर मैदान गाजवणारे पुरुष क्रिकेटरही तिचे फॅन झालेत. 

हेही वाचा : लेडी सेहवाग शफालीचा सिक्सर पुरुषांनाही तोंडात बोट घालायला लावतो!

मैदानात पाय ठेवल्यावर बनणार रेकॉर्ड

हरमनप्रीतचा जन्म ८ मार्च १९८९चा. रविवारी भारतीय महिला संघ टी-२० वर्ल्डकपमधे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच मायदेशात 'विश्वविजेता' पदासाठी भिडणार आहे, त्याच दिवशी हरमन ३१व्या वर्षात पदार्पण करेल. विशेष म्हणजे त्या दिवशी फक्त मैदानात उतरूनही ती एक वेगळाच विक्रम नोंदवेल. वाढदिवशी वर्ल्डकपची फायनल खेळणारी ती पुरुष आणि महिलांमधली ती पहिली कॅप्टन ठरणार आहे. तिचा हा वाढदिवस भारताने पहिला महिला वर्ल्डकप उंचावून साजरा करावा, अशी सर्वच चाहत्यांची अपेक्षा असणार आहे. 

भारताने टी-२० वर्ल्डकप उंचावला, तर हरमनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनपेक्षा महिला दिनाचे खास सेलिब्रेशन ठरेल. कारण ही भारतीय महिला क्रिकेट टीम भारतातील नव्या पिढीच्या महिलांचं चपखल प्रतिनिधित्व करते. या संघात भारताच्या कोनाकोपऱ्यातून आलेल्या मध्यम वर्गातल्या, गरीब घरातल्या पोरी खेळत आहेत. प्रत्येक पोरीनं मर्दानगीच्या रूढ मानसिकतेचा वेगवेगळ्या पद्धतीने सामना करत इथपर्यंत मजल मारलीय. त्या आता तरुणींसाठी इन्स्पिरेशन बनल्या आहेत. त्यांच्या या स्फूर्तीला महिला दिनी वर्ल्ड चॅम्पियनशिपची झालर मिळाली तर मजाच येईल.

यशाचा मार्ग सोपा नव्हताच

या नव्या टीम इंडियाची धुरा सांभाळली आहे ती डॅशिंग हरमनप्रीत कौरने. तिचा आजवरचा प्रवासही एका टॉमबॉयसारखाच आहे. तिच्या खेळाची सुरवातच मुलांसोबत झाली. ती आपल्या घरासमोरच्या मैदानावर मुलांसोबतच सगळे खेळ खेळत असे. त्याचवेळी तिला कमलेशसिंग सोधींनी हेरलं, ते हरमनच्या शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांनी हरमनला खेळाविषयी गंभीर बनवलं.

हरमन मुलांसोबत सर्वच खेळ खेळत असल्याने पहिल्यांदा सोधींना तिचा गेम पक्का करावा लागला. त्यावेळी हरमनने क्रिकेटचे नाव घेतलं. कारणही स्वाभाविकच होते. क्रिकेट हा प्रसिद्ध खेळ होता. सर्वचजण क्रिकेटलाच डोक्यावर घेत होते. टीवीवर क्रिकेटच दिसायचे म्हणून हरमनप्रीतने क्रिकेटला पसंती दिली. 

यानंतर तिचा क्रिकेटर बनण्याचा खडतर प्रवास सुरू झाला. क्रिकेटसाठी निवडलेली तिची शाळा तिच्या घरापासून ३० किलोमीटरवर होती. पण तिने क्रिकेट खेळण्याच्या जिद्दीने हा प्रवासही हसत हसत केला. या सुरवातीच्या प्रवासात तिच्या पालकांनी तिला साथ दिली नसती, तर आताची हरमनप्रीत आपल्याला दिसली नसती. म्हणून हरमन प्रमाणे तिचे आई वडीलही नव्या भारताच्या पालकांचं प्रतिनिधित्व करतात.

हेही वाचा : जागतिक महिला दिन ८ मार्चलाच का साजरा केला जातो?

क्वीन ऑफ वर्ल्डकप 

हरमनने कमी वयातच क्रिकेटमधील अनेक टप्पे पार केले आहेत. तिने वयाच्या विसाव्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केलं. सहसा एखाद्या खेळाडूचे पदार्पण हे एखाद्या संघाविरुद्धच्या मालिकेत होते. पण हरमनप्रीतने पदार्पण केलं ते डायरेक्ट २००९च्या वनडे वर्ल्डकपमधे आणि तेही पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध.

फक्त तिने एका वर्ल्डकपमधे पदार्पण केलं असेल तर ठीक पण, तिने आपली टी- २० कारकीर्दही वर्ल्डकपमधून सुरू केली. २००९ मधेच झालेल्या टी-२० वर्ल्डकपमधे इंग्लंडविरुद्ध तिने टी-२० पदार्पणही केलं. पदार्पणाच्या वर्षात हरमनला फारशी चमक दाखवता आली नसली, तरी तिने आपल्या उत्तुंग सिक्सरनी सर्वांनाच प्रभावित केलं.

क्रिकेट जगात टी-२० च्या उदयाला अवघी काही वर्षेच लोटली होती. त्यावेळी महिला क्रिकेटमधे बदल झाले. कसोटी बंद झाली आणि टी-२० ला महत्व देण्याचा व्यावसायिक निर्णय घेण्यात आला. त्या काळातील भारतीय संघातील सिक्सर किंग युवराज सिंग प्रमाणेच हरमनप्रीत लीलया षटकार मारण्यात तरबेज असल्याने तिचे महिला संघातील महत्व आणि प्रसिद्धीही वाढत गेली. 

लेडी युवराजचच्या पलीकडचं कर्तृत्व

पण, हरमनप्रीत ही फक्त महिला संघातील युवराज अशी 'पुरुष प्रधान' कौतुकाची धनी नव्हती. तिचेही स्वतंत्र अस्तित्व होते, आहे. येत्या काळात तिने ते दाखवून दिलं. २०१७ ला इंग्लंडमधे झालेल्या वनडे वर्ल्डकपमधे बुजूर्ग खेळाडू मिताली राज भारताचे नेतृत्व करत होती. मितालीचा हा शेवटचा विश्वचषक असल्याने सचिनप्रमाणे तिलाही वर्ल्डकप जिंकून ग्रँड निरोप देण्यात यावा अशी चर्चा सर्वत्र होती.

माध्यमांनीही भारतीय संघ वर्ल्डकपमधे चांगली कामगिरी करत असल्याने लक्ष ठेवून होती. वर्ल्डकप फायनलमधे आणि भारताच्या मधे उभा होता तो कांगारूंचा संघ. भारताचा सेमी फायनलचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी होता. सहा वेळचे वर्ल्ड चॅम्पियन आणि गतवर्षीचे विजेते असणाऱ्या या तगड्या संघाविरुद्ध भारतीय संघाचा टिकाव लागणार का? अशी हुरहुर भारतीय चाहत्यांच्या मनात होती. पण, हरमनच्या वादळी खेळीने ही हुरहुर नाहीशी केली.

तिने ११५ चेंडूत नाबाद १७१ धावा ठोकून काढल्या. या खेळीमुळे हरमनप्रीत भारतीय क्रिकेट वेड्यांच्या मनात कायमचं घर करुन गेली. ही तिची १७१ धावांची खेळी जर भारतीय महिला संघाकडून एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरी सर्वात मोठी खेळी ठरली. सर्वात मोठी खेळी दीप्ती शर्माची १८८ रनची. तर वनडे वर्ल्ड कप इतिहातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी वैयक्तिक खेळी ठरली. तिने केरन रोलटोनचे नाबाद १०७ धावांचे रेकॉर्ड मोडले.

हेही वाचा : क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका

नव्या संघाची नवी कर्णधार 

हरमनप्रीतने फायनमधेही अर्धशतक ठोकत विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. भारताला वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी फक्त नऊ धावा कमी पडल्या. पण, भारताच्या हातातून पहिला वहिला महिला वर्ल्डकप निसटला असला तरी या वर्ल्डकपनंतर भारतीय महिला संघाचं रुपडेच पालटलं. आता भारतीय जनमानसात संघातली प्रत्येक खेळाडू नावानिशी ओळखली जाऊ लागली. हरमनप्रीत, स्मृती मानधना हे भारतीय महिला क्रिकेटचे ग्लॅमरस चेहरे बनले. 

त्यातच २०१८ च्या वेस्ट इंडिजमधे झालेल्या टी - २० वर्ल्डकपसाठी हरमनप्रीतची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. तिने वर्ल्डकपमधील पहिल्याच सामन्यात ५१ चेंडूत १०३ धावांची आतषबाजी केली. ती भारताकडून टी-२० वर्ल्डकपमधे शतक ठोकणारी पहिली फलंदाज ठरली. हरमनने वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत कायमच आपले नाणं खणखणीत वाजवून दाखवलं.

या वर्ल्डकपमधे भारताने आपल्या गटातील चारही सामने जिंकून अव्वल स्थान पटकावलं. भारताने या गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान सारख्या तुल्यबळ संघांचं आव्हान मोडीत काढलं होतं. पण सेमी फायनलमधे इंग्लंडने भारताचा पराभव केला आणि पुन्हा एकदा भारताच्या हातून वर्ल्डकप निसटला. या सेमी फायनलनंतर भारतीय महिला क्रिकेट वर्तुळात दुफळीचं वादळ उठलं.

 हरमनप्रीतने सेमी फायनलमधे सिनिअर खेळाडू आणि माजी कर्णधार मिताली राजला संघातून वगळलं. त्यामुळे मिताली राजची मॅनेजर अनिशा गुप्ताने हरमनप्रीतवर टीका करत तिला खोटारडी, अपरिपक्व आणि लायकी नसलेली कर्णधार म्हटलं. या वादामुळे आता कुठे चांगले दिवस आलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाची प्रतिमा बरीच मलीन झाली. मितालीला वगळल्यानंतर सौरभ गांगुली सारख्या मोठ्या खेळाडूनेही खोचक टीका केली होती. पण, हरमन आपल्या निर्णयावर ठाम होती. 

यंग इंडियाचे हक्काचे आयकॉन

त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. भारतीय संघ हरमनच्याच नेतृत्वात २०२०चा टी-२० वर्ल्डकप जिंकण्यासाठी महिला दिनी जिवाचं रान करणार आहे. या संघावर हरमनची पूर्णपणे छाप आहे. आताचा संघ तिच्यासारखाच आक्रमक आहे. यंदाच्या वर्ल्डकपने शेफाली वर्मासारख्या हिऱ्याला जन्म दिलाय. भारतीय महिला संघाने आता कात टाकली आहे.

त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या एका फास्ट बॉलरला या आक्रमक भारतीय संघाची भीती वाटते. याच्यातच संघातील बदलाची जाणीव होते. अर्जुन पुरस्कारप्राप्त हरमनप्रीतच्या संघाच्या डोळ्यासमोर आता फक्त महिला दिनाला होणारी वर्ल्डकपची फायनल आहे.

महिला दिनी भारतीय संघ जिंकेल किंवा हरेल. पण भारतीय समाजावर या सामन्याचा एक सकारात्मक परिणाम नक्की होईल. देशातल्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक मुलींना एक नवी आयडॉल मिळेल, कोणाला हरमनप्रीत, कोणाला शेफाली तर कोणाला, स्मृती तर कोणाला राधा, पूनम यादव बनायचे असेल. हरमनसारखे त्यांना सेहवागचे पोस्टर लावून प्रेरणा मिळवण्याची गरज लागणार नाही. कारण त्यांच्याकडे आता त्यांच्या हक्काच्या आयकॉन असणार आहे.

हेही वाचा : 

आपले आमदार महिलांविषयी सात तास काय बोलत होते?

स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

दिल्लीवाली आतिशी: सावित्रीमाईलाही वाटलं असतं हीच माझी लेक

टी२० महिला क्रिकेट वर्ल्डकपमधे भारताची सारी भिस्त या पाच जणींवर

फारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय?