मराठीतले प्रतिभावान डायरेक्टर, अॅक्टर नागराज मंजुळे यांचा आज बर्थडे. त्यांचा सैराट सिनेमा अनेक भाषांमधे पोचला. फँड्री, पिस्तुल्या या सिनेमा, शॉर्टफिल्मचंही खूप कौतुक झालं. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास हासुद्धा एका सिनेमाच्या स्टोरीसारखाच आहे. २०१५ मधे साप्ताहिक साधनाच्या युवा दिवाळी अंकात त्यांनी स्वतःची गोष्ट सांगितलीय. किशोर रक्ताटे यांनी शब्दांकन केलेल्या या स्टोरीचा हा संपादित अंश.
मी लहान असताना मला चुलत्यांना दत्तक दिलं होतं. त्यांना मुलगा नव्हता म्हणून. मला तीन भाऊ. मी त्यातला मोठा. माझे चुलते करमाळ्याला रहायचे आणि जन्मदाते वडील जेऊरला. मी दोन्ही घरी असायचो. पण जास्त काळ चुलत्यांकडेच. म्हणतात ना, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. तसा मी होतो. पण असा दुर्लक्षित असल्यानं मला स्वातंत्र्य जास्त मिळालं आणि त्या स्वातंत्र्याचा फारच गैरफायदा मी लहानपणापासूनच घ्यायला लागलो.
मला सिनेमा पाहण्याचा नाद लागला. त्या वेळी करमाळ्यात ‘सागर’ आणि ‘योगेश’ नावाची दोन थिएटरं होती. या दोन्ही थिएटरमधे मी खूप जुने सिनेमा पाहिले. मायाबाजार, माहेरची साडी, शोले असे अनेकानेक सिनेमा; त्याचबरोबर पौराणिक सिनेमादेखील. इतरांचं आयुष्य कसं घडत गेलं, ते सनावळ्यांमधे सांगितलं जातं; तसं माझं आयुष्य त्या वेळच्या मी पाहिलेल्या चित्रपटांच्या आधारे सांगता येईल.
प्रत्येक सिनेमा पाहिल्यावर मला काही तरी वेगळं वाटायचं. मी सिनेमावर खूप विचार करायचो. त्या वेळी पाहिलेल्या कुठल्या सिनेमावर मी विचार केला होता, ते मी आजही सांगू शकतो. एखादी गोष्ट माझ्या डोक्यात घुसली की, ती डोक्यातून सहजासहजी बाहेर जातच नाही. तेव्हा मी जे सिनेमा पाहायचो, ते मनावर फार परिणाम करून जायचे. म्हणजे कराटेची फिल्म पाहून मी कराटे शिकलो. ‘रामायण’ मालिका पाहून रामायण सादर करायला लागलो. माझ्याभोवती जी मुलं होती, त्यांना रामायणातील कॅरेक्टर्स वाटून द्यायचो.
त्याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायची सवय लागली. शाखेत जायचं कारण तिथं खेळायला मिळत असे. संघाची शाखा हे काय प्रकरण आहे, ते तेव्हा कळलेलं नव्हतं. शाखेत जाण्यापूर्वी आम्ही जे खेळ खेळायचो, ते फार रानटी असायचं. त्यांत स्पर्धा नसायची. जिंकणं-हरणं नसायचं; फक्त हाणामारी असायची. विना लॉजिक, विना नियम आमचे खेळ असायचं. शाखेतल्या खेळांना नियम होते.
त्यात लॉजिक असायचं. त्यामुळे तिथल्या खेळांत मजा यायला लागली. त्या वेळी आम्ही शाखेत चुळ-चुळ मुंगळा, पळी पळी तेल, शिवाजी म्हणतोय किंवा चोरपोलीस असे खेळ खेळायचो. शाखेतल्या खेळांनी जिंकण्या-हरण्याचं महत्त्व आमच्या मनावर बिंबवलं गेलं. त्यामुळे शाखेची गोडी वाढत गेली. त्या निमित्ताने शाखेतल्या इतर संस्कारांचा प्रभाव आमच्यावर होत गेला.
पण शाखा हे विष पसरवणारं ठिकाण आहे, हे तेव्हा कळलं नाही. शाखेतून माझ्यात मुस्लिमद्वेषसुद्धा आला. त्या वेळी आपण नेमके कोण आहोत, याची काहीच कल्पना नव्हती. स्वत:ची काहीच ओळख नसल्याने चुकीच्या गोष्टींचा प्रभाव माझ्यावर शाखेतून पडला होता. आता वाचनानं ज्या व्यापक जगाची ओळख करून दिली, त्यातून जी विचारांची बांधणी झाली; त्यामुळे शाखेची खरी ओळख लक्षात आली.
माझ्या शालेय शिक्षणाच्या वयातली घरची परिस्थिती सगळ्याच बाजूंनी बिकट होती. घरात आर्थिक गरिबीसोबतच सामाजिक-शैक्षणिक-सांस्कृतिक गरिबी होती. माझं सारंच कुटुंब देवाला प्रचंड मानणारं होतं. अंधश्रद्धेला चांगलाच वाव होता. घरात देवपूजेला महत्त्व होतं. मलादेखील देवांच्या पूजेची त्या वेळी सवय लागली. त्यातच घरच्यांच्या सोबत आराध्यांच्या मेळ्यात जायची सवय लागली.
मेळ्याबरोबर जोगवा मागायची सवय लागली. जोगवा मागून आणायचा, मग बिड्या प्यायच्या. सिगारेट प्यायची. अगदी बिड्या-सिगारेटचे तुकडे गोळा करून प्यायचे. त्या वेळी मी साधारण पाचवीत शिकत असेन. चुलत्यांकडे होतो. त्या वेळी आम्हाला चुलते दारूची बाटली आणायला सांगायचे. मी अन् माझा आतेभाऊ परश्या दारूची बाटली आणायचो. सुरुवातीला त्यातलीच थोडीशी दारू झाकण उघडून प्यायचो अन् त्यात पाणी भरून चुलत्याला द्यायचो. त्यांच्यासमोर दाटूनच जोरात झाकण उघडण्याचं सोंग आणायचो
पुढे-पुढे थोड्या दारूनं आमचं काही भागेना आणि चुलत्यांच्याही लक्षात आलं की, दारू फारच पांचट लागतेय. मग आम्ही दोन बाटल्या आणून एक त्यांना द्यायचो अन् एक आम्ही प्यायचो. त्यात दारू कशी पितात, हे आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही कोरीच प्यायचो. दारू प्यायलो की, काही तरी निराळीच मजा येते, असं वाटायचं. दारू पिऊन बसल्यावर कधी चांदण्या चमकल्यासारखं वाटायचं, तर कधी संमोहित झाल्यासारखं वाटायचं. कधी फार चांगलं कॉन्सन्ट्रेशन झाल्यासारखं वाटायचं. दारूत पार बुडून गेलेलो असताना आमच्यातल्या काही मोठ्या मुलांनी मला पानातून भांगदेखील खाऊ घातली होती. अशा प्रकारे एका बाजूला व्यसनांनी मी अध:पतित झालो होतो.
हेही वाचा: दारिद्र्याची शोधयात्राः आपल्या अवतीभवतीच्या छळछावण्यांचं कथन
‘फँड्री’मधील काळ्या चिमणीचं प्रकरण हे असंच माझ्या अनुभवातूनच आलेलं आहे. त्या वेळी कामसूत्र आणि इंद्रजाल ही दोन पुस्तकं मला मिळाली. माझा चंक्या नावाचा मित्र आम्हाला पुस्तकं द्यायचा. भारी-भारी गोष्टी सांगायचा. त्याच्याकडे मी कॅरम खेळायला जायचो. तो मला बर्याच आतल्या गोष्टी सांगायचा. तो काही सर्वज्ञ नव्हता, पण माझ्या मर्यादित विश्वातला तो एक भारी माणूस होता. त्या चंक्यानं आम्हाला बरीच पुस्तकं पुरवली.
त्यानं पुरवलेली पुस्तकं ही ब्लू फिल्मच्या कथा सांगणारी असायची. त्या पुस्तकातील गोष्टींना थिअरॉटिकल बेस असायचा. त्या पुस्तकात स्त्रियांचे प्रकार, पुरुषांचे प्रकार अशी प्रकरणं असायची. त्यातील स्त्रियांच्या प्रकरणात स्त्रियांच्या योनीचे प्रकार, स्तनांचे प्रकार, स्त्रियांच्या अंगकाठीचे प्रकार याबाबत वर्णनं असायची. त्याचबरोबर कुठल्या स्त्रीला कसं पटवायचं. असंच काळ्या चिमणीचं प्रकरण मी इंद्रजाल पुस्तकात वाचलं होतं.
म्हणजे- काळी चिमणी मारायची, त्या चिमणीची राख आवडत्या मुलीच्या अंगावर टाकायची. या प्रकरणावर माझी जवळपास दोन वर्षे खर्च झाली. चिमणी पकडण्यासाठी मी खूप पायपीट करायचो आणि कधी ती दिसली की, २०,२५ किलोमीटरपर्यंत सायकलवरून तिचा पाठलाग करायचो. शाळा सुटली की, काळी चिमणी शोधणं हे माझं नित्याचं कामच होऊन गेलं होतं. असं करत-करत शेवटी चिमणी मारली, तिची राख केली अन् माझ्या आवडत्या पोरीवर ती टाकली.
मी राख टाकली, हे त्या पोरीला कळलंच नाही. तिला वाटलं, मी वेड्यासारखी माती का टाकतोय? अन् मी माती उधळली, म्हणून मग तिची एक मस्त थोबाडीत खाल्ली.
मी व्यसनांपासून हळूहळू दूर गेलो. जेऊरच्या सभ्य पोरा-पोरींत मला व्यसनं मनापासून सोडावी वाटली आणि मग मी शाळेत रमलो. तसाच दहावीपर्यंत पुढे गेलो. दहावीला मात्र गणित, इंग्रजीत नापास झालो. नापास झाल्यावर एक फार छान गोष्ट घडली. ती म्हणजे, मी स्वत:सोबत राहिलो. एकटेपण चांगलं अनुभवलं. त्या एकटेपणानं मला अवांतर वाचनाकडे वळवलं.
त्या वेळी जेऊरमधे करमणुकीचं दुसरं काहीच साधन नव्हतं. त्यामुळे वाचनात मन चांगलंच रमलं. चांदोबापासून इतर अनेक गोष्टी वाचल्या. पण बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे फार पुस्तकं मिळवता आली नाहीत. घरची परिस्थिती इतकी वाईट होती की, आम्हा चार भावांना मिळून दोन स्लीपरचे जोड होते. म्हणजे दोघे बाहेर गेले असतील, तर दोघे कम्पलसरी घरी असायचो. पण जी पुस्तकं सहजपणे मिळतील, ती वाचून संपवायची सवय लागली.
हेही वाचा: आधुनिक जगात प्रबोधन हेच समाजाला नवी दिशा देईल
आंबेडकरांच्या साहित्याने आपण दलित आहोत आणि त्यातच आपण वडार आहोत, याची जाणीव करून दिली. आंबेडकरांबद्दल मनात खूप आदर निर्माण झाला. मग मी आमच्या घरात आंबेडकरांचा एक छान फोटो लावला. तो माझ्या वडिलांना अजिबातच आवडला नाही.
ते म्हणाले, ‘हा महाराचा फोटो घरात का लावलास? लोक काय म्हणतील? काढून टाक ताबडतोब हा फोटो-‘ मी त्यांना सांगितलं ‘मी तर हा फोटो काढणार नाहीच; पण जर तुम्ही काढलात, तर तुमचे हे सारे देव मी बाहेर फेकून देईन. ह्या देवांनी तुम्हाला जे दिलं नाही आणि देऊ शकत नाहीत, अशा गोष्टी आंबेडकरांनी आपल्या समाजाला दिल्या आहेत.’ माझं हे उत्तर ऐकून वडिलांचं समाधान झालेलं दिसलं नाही.
मग मी त्यांना म्हणालो, ‘आंबेडकर महार आहेत आणि तुम्ही कोण आहात? तुम्ही या प्रचलित समाजव्यवस्थेनुसार कोणी मोठे लागून गेलात का? तुम्ही हे विसरू नका की, तुम्ही वडार आहात. आणि महार असणं आणि वडार असणं वेगवेगळं नाही. आपण सगळेच दलित आहोत. आंबेडकरांमुळे जी सन्मानाची वागणूक मिळायला लागली, ती विसरू नका.’ या सर्व प्रक्रियेत मी स्वत:चा शोध घेत होतो आणि मला बर्यापैकी कळलं होतं की- आपण कोण आहोत, आपलं समाजात काय स्थान आहे.
बी.ए.ला असल्यापासून मी पुणे विद्यापीठाबद्दल आणि विद्यापीठातील मराठी विभागाबद्दल खूप ऐकलं होतं. त्यामुळे अभ्यासदेखील खूप केला. पण सुमार उत्तर लिहिण्याच्या शैलीमुळे मला मार्क कमीच पडले. मात्र योगायोगाने माझा विद्यापीठात एम.ए.साठी नंबर लागला. या संधीने माझ्या श्रीमंतीत भर टाकली. पुणे विद्यापीठात मी शिकलो. त्या वेळी मराठी विभागात आनंद यादव, नागनाथ कोत्तापल्ले, मनोहर जाधव अशी दिग्गज मंडळी होती.
त्यातच जयकर ग्रंथालय नावाचा खजिना माझ्या आयुष्यात आला. जयकरमधे इतकी मजा यायला लागली की, मला पूर्वी ब्लू फिल्म बघून जेवढी मजा येत नव्हती त्यापेक्षा अधिकच मजा तेथील पुस्तकवाचनाने दिली. मी तिथून पुस्तकं नावावर घेऊन येत नव्हतो, तर तिथेच बसून पुस्तकं वाचून काढायचो. जयकरमधे मला एखादं छोटंसं पुस्तक दिसलं, तर मी उभा राहूनच वाचून संपवायचो.
विशेषत: तेंडुलकरांची नाटकांची पुस्तकं मी उभ्या-उभ्याच वाचली. मला वाचनाची कक्षा खूप रुंदावता आली ती जयकरच्या पुस्तक दालनामुळे. अगदी महात्मा फुले, र. धों. कर्वे आणि आगरकरांच्या साहित्यापासून असंख्य गोष्टी मी वाचल्या.
माझी ओळख शोधण्याच्या प्रक्रियेत मला माझं फिल्मचं शिक्षण सापडलं. त्यामुळे मी मिथुनची ‘कम्पलसरी हेल्मेट’ किंवा उमेश कुलकर्णीची ‘गिरणी’ याबाबत आस्वाद घेतला. या सर्व प्रक्रियेतून मला माझ्या फिल्मच्या विचारांचा भावार्थ काढता आला. त्यातूनच मी सुरवातीला अगदी आंतरिक उर्मीने ‘पिस्तुल्या’ ही शॉर्टफिल्म केली. ती केल्यावर माझी ओळख मला अधिकच पटली.
माझा फिल्मचा प्रवास फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार घेऊन जाणारा असेल, हे व्यवस्थित स्पष्ट झालं. आपल्या विचारपरंपरेची दिशा सुस्पष्ट झाल्यावर ती आपण नेमकी कशी घेऊन जाणार आहोत, हेदेखील अधोरेखित होत गेलं. विशेष म्हणजे जाती-धर्मांच्या संकुचित विषयांकडे आपल्याला जायचंच नाही; किंबहुना, त्याच्या विरोधात उभं राह्यचं, हेदेखील स्पष्ट झालं. पिस्तुल्या केल्याने दुसरी एक गोष्ट स्पष्ट झाली. ती म्हणजे, आपण आपल्या शिक्षणाचा अध्याय सांगू पाहत आहोत.
हेही वाचा: वाफाळलेले दिवसः वयात येणाऱ्या पाल्यांसोबत पालकांनी बघावा असा अभिवाचनाचा प्रयोग
फँड्रीची कथा आणि माझा लहानपणीचा प्रवास, ही एकच गोष्ट. हे जग माझं नाही, असं सारखं वाटायचं अन् अधोरेखित व्हायचं. सिनेमातली सजावट, सादरीकरण, शब्द, भाषा यांसारख्या प्रत्येक गोष्टीत मी स्वत:ला शोधायचो; पण कुठेच नसायचो. आणि दिसलोच, तर व्हिलन म्हणून दिसायचो.
रामायणातलं माकडं आपण आहोत, महाभारतातले राक्षस आपण आहोत, कुठल्या तरी दंतकथेतील शापित दगड आपण आहोत. यात आपण नायक कुठेच नाही आहोत. म्हणून मी माकडाची गोष्ट सांगायची ठरवली. मग जाबुवंत अर्थात जब्या आला, पिर्या आला, पिस्तुल्या आला. हे सर्व पाहताना-करताना आपण दुसर्या बाजूचे प्रतिनिधी आहोत, असं कटाक्षानं लक्षात येत गेलं.
फँड्रीची कथा माझ्या मनात अशीच एकदम घट्ट तयार झालेली होती. आम्ही एकदा मुंबईच्या पोलीस ग्राऊंडवर फिरत होतो. त्या वेळी मी गार्गीला अन् भावाला म्हटलं, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तर, ते म्हणाले, हो. मग मी अवघ्या २० मिनिटांत त्यांना फँड्रीची सुरवातीपासून तो जब्या शेवटी दगड मारतो तिथपर्यंतची सर्व गोष्ट सांगितली. गार्गीनं सांगितलं की- ‘अरे नागराज, ह्यात काहीच करायचं नाही. ही पूर्ण फिल्म आहे. तू फक्त लिहून काढ.’
शूटिंगच्या दरम्यान पॅकअपच्या वेळी ‘गणपतीच्या नावानं चांगभलं’ म्हटलं जायचं. आम्ही ‘फँड्रीच्या नावानं चांगभलं’ अशी सवय करून घेतली. मला वाटतं, गणपतीच्या जागेवर फँड्रीचं नाव येण्याची सिनेमा इतिहासातील ती पहिलीच वेळ असावी. फँड्री हे एक असं औषध किंवा दारू झालीय, जी तुम्हाला एक प्रकारच्या नशेतून ‘जात’ सांगायला प्रेरणा देते. त्याचबरोबर ती अस्तित्वाचा विचार आणि स्वीकार करायला उभारी देते. फँड्रीचा दगड लोकांच्या काळजाला लागलाय.
फँड्रीचं प्रकरण अजूनही सुरूच आहे. तो माझ्यासाठी सिनेमा नाही. मी ग्लॅमरसाठी दिग्दर्शन केलेलं नाही. एक कथा सांगण्याची उबळ माझ्या मनात होती, तीव्रतेने सांगावंसं वाटत होतं, म्हणून मी कथा सांगितली. आता जग फिरून आल्यावर माझ्या अकलेत रोज भर पडतेय. कधी शहाणपण जागं होतं, तर कधी मूर्खपणाची जाणीव होते. त्यामुळे आपण अजून काही तरी चांगलं करू शकतो, हा विश्वास वाटायला लागलाय.
हेही वाचा: