युती झाली, पण मतं ट्रान्सफर होणार का?

२० फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


नाही, नाही म्हणत शेवटी शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली. आता दोघांच्याही समर्थकांकडून हा आमचा विजय असल्याचं दाव्याने सांगितलं जातंय. शिवसैनिक आणि भाजप समर्थक अजूनही तुमचाच पराभव झालाय अशा पद्धतीने वागताना दिसतोय. तशा रिएक्शनही तो देतोय. त्यामुळे दुंभगलेली मनं मतातून तरी ट्रान्स्फर होणार हा प्रश्न निर्माण झालाय. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना खूप काम करावं लागणार आहे.

स्युडो सेक्युलर लोकांपासून महाराष्ट्रातल्या जनतेला वाचवण्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र येतोय, असं नेहमीचं तुणतुण वाजवण्याऐवजी ‘सत्तेसाठी नाही तर व्यापक जनहितासाठी आम्ही एकत्र आलोय’ असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबतच्या ओपन सिक्रेट असलेल्या युतीची घोषणा केलीय.

युतीची घोषणा होताच सोशल मीडियावर चर्चांना ऊत यायला सुरवात झाली. शिवसेना, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची यथेच्च मस्करी करणाऱ्या आणि काही अंशी छी थू करणाऱ्या पोस्टने फेसबुकच्या वॉल रंगायला लागल्यात.

एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले असताना शिवसेना-भाजप युती होणारच होती, हे सांगण्यासाठी कुठल्याही भविष्यवेत्त्याची गरजच नाही. कारण एकत्र येणं ही शिवसेना आणि भाजप या दोन्हीही पक्षांची राजकीय अपरिहार्यता होती. वेगवेगळं लढणं दोघांनाही राजकीयदृष्ट्या परवडणारं नव्हतं. असं असतानाही भाजप आणि सेनेत गेल्या साडेचार वर्षात ज्या काही घडामोडी घडल्या त्यात शिवसेनेने मात्र स्वतःचं हसं करून घेतलं.

नुसत्याच पोकळ गप्पा

एकत्र यायलाच लागणार याची पुरेपूर जाणीव असूनही शिवसेनेने भाजपला आपल्या टीकेचं लक्ष बनवलं. पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादक संजय राऊत यांनी भाजपला सामनातून आणि ग्राऊंडवरही फटकारलं. भाजप-सेनेकडून एकमेकांसाठी ज्या काही उपमा वापरल्या गेल्या, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पॉप्यूलर केलेला ‘चौकीदार ही चोर है’ हाच सूर दस्तरखुद्द उद्धव ठाकरेंनीच आळवायला सुरवात केली. त्यानंतर तर आता या दोघांचं फाटणारच असंही चित्र निर्माण झालं.

संजय राऊत ज्यावेळी चंद्राबाबू नायडू यांच्या दिल्लीतल्या धरणं आंदोलनाला जाऊन आले, त्यावेळी तर आता काय फक्त शिवसेना स्वबळावर लोकसभेच्या उमेदवारांची औपचारिक घोषणाच करेल की काय अशी परिस्थिती होती. मात्र प्रत्येकवेळी सेना शाब्दिक तोंडस्फोट करून बॅकफुटवर जात राहिली आणि स्वाभिमानाची टिमकी मिरवणाऱ्या सेनेला मग ‘लाचारसेना’ किंवा ‘फशिवसेना’ म्हणून हिणवलं जाऊ लागलं. सेनेच्या मंत्र्यांच्या खिशातले राजीनामे खिशातच राहिले आणि या खिशातल्या राजीनाम्यांचीही ‘नाराजीनामे’ म्हणून संभावना झाली.

युती झाल्याच्या बातमीवर तर एक फेसबुक युजरने कमेंट केली, ‘कुणासमोरही इतकं लाचार होऊ नका की लोक तुम्हाला ‘उद्धव’ नावाने ओळखायला लागतील.’

हा तर शिवसैनिकांच्या कसोटीचा काळ

या सगळ्या घडामोडीत सामान्य शिवसैनिक मात्र चांगलाच भरडला गेला. दिशाहीन नेतृत्वाच्या दररोजच बदलत जाणाऱ्या भुमिकांमुळे आपण नेमकी काय भुमिका घ्यायची, हाच मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. उद्या जेव्हा एखाद्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे भाजपच्या उमेदवारासाठी मतं मागायला जातील, तेव्हा एखाद्या कट्टर शिवसैनिकाने त्यांना ‘साहेब, चौकीदार तर चोर होता ना, मग आम्ही चोराला मतदान का करायचं?’ असा प्रश्न विचारायचं धाडस दाखवलं, तर त्याला उद्धव ठाकरे नेमकं कसं सामोरं जातील, हाही प्रश्न आहे.

भाजप-सेना युतीचं तोरण बांधलं गेल्यानंतर युतीचा फायदा नेमका कुणाला आणि किती प्रमाणात होणार या प्रश्नावर राजकीय जाणकारांमधे खल सुरु झालाय. ही चर्चा पुढे घेऊन जाताना आपल्याला अजूनही एका मुद्द्यावर लक्ष दिलं पाहिजे. ते म्हणजे युती तर झाली पण तिचा अपेक्षित फायदा खरंच शिवसेनेला होणार काय?

मन दुभंगली त्याचं काय?

ही शंका घेताना आपल्याला उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींकडे थोडसं लक्ष दिलं पाहिजे. यूपीत काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्यात होऊ घातलेलं संभाव्य महागठबंधन मायावतींच्या राजकीय चालींमुळे आकारास येऊ शकलं नाही. काँग्रेसला या आघाडीपासून दूर सारून बीएसपीच्या सुप्रिमो बहन मायावती यांनी असा तर्क दिला की उत्तर प्रदेशातलं काँग्रेसचं नेतृत्व काँग्रेसचं मत बसपाच्या उमेदवारांना ट्रान्सफर करण्यात वारंवार अपयशी ठरलंय. बीएसपीचं मत मात्र काँग्रेसला ट्रान्सफर होतं आणि आघाडीचा फक्त काँग्रेसलाच फायदा मिळतो.

उत्तर प्रदेशातला हाच संदर्भ आपण महाराष्ट्रातल्या युतीशी जोडून घटना घडामोडींचा विचार केला पाहिजे. त्यातून एक गोष्ट लक्षात येईल, की राजकीय अपरिहार्यता म्हणून युती झाली तरी सेनेने ज्या पद्धतीने गेल्या साडेचार वर्षात सत्तेत असूनही विरोधी पक्षाची भूमिका निभावलीये आणि पंतप्रधान मोदींवर जळजळीत टीका केलीये, त्यामुळे कट्टर भाजपायी मतदार प्रचंड दुखावला गेलाय. दोन्हीही पक्षांनी एकमेकांची टांग खेचण्याची एकही संधी गमावलेली नाही. अशा स्थितीत हे दोन्हीही पक्ष एकमेकांसाठी झटतील?

शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई

भाजपचा हार्ड कोर मतदार मोदींविषयी प्रचंड भावनिक आहे आणि त्याला मोदी म्हणजे साक्षात परमेश्वराचे अवतार वगैरे वाटतात. अशा स्थितीत मोदींना चोर ठरवणाऱ्या ठाकरेंच्या पक्षाला हा वोटर मतदान करेल का, असाही एक प्रश्न आहे. दुसरं असं की भाजपचा इतिहास मित्रपक्षांना संपवण्याचा राहिलाय, अशा परिस्थितीत आपलं वोट सेनेला किती प्रमाणात ट्रान्स्फर होऊ द्यायचं आणि सेनेला कितपत मजबूत होऊ द्यायचं याबाबतीतही भाजप ‘दक्ष’ नसणार असं कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही.

कार्यकर्त्यांच्या पातळीवर कुठेही ही युतीची घोषणा साजरी केली गेली नाही. उलट जालन्यातून  शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी या निर्णयाविरोधात आपलं रणशिंग फुकलंय. दानवेविरोधात आपण लढणार असल्याचं निर्धार बोलून दाखवलाय. अर्थात खोतकरांना मातोश्रीहून पाचारण करण्यात आलंय. खोतकरांनीही या निर्णयाचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंना असल्याचे सांगत थोडासा मवाळ पवित्रा घेतलाय. पण मातोश्रीहून खोतकरांना काहीही आदेश मिळू द्यात, ते दानवेंसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची शक्यता तशी कमीच. त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश टोपे यांच्याशी असलेल्या साट्यालोट्याबद्दल संपूर्ण जालना जिल्ह्याला माहितेय. सोबत गेल्या साडेचार वर्षांत दानवेंसोबतच्या त्यांच्या संबंधात खूप कटूता आलीय. असे प्रसंग येत्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघायला मिळाले, तर त्यात फारसं आश्चर्य वाटायला नको.

उद्धव ठाकरेंचं ‘स्वबळ’ स्वाभिमान तारेल का?

२०१४ च्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवून त्यात पक्षाला चांगलं यश मिळवून देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व गुणांचं निवडणूक निकालानंतर खूप कौतुक झालं होतं. उद्धव ठाकरेंच्या रूपाने सेनेला एक वेगळा तोंडवळा मिळालाय, जो पक्षाला वेगळ्या धाटणीच्या राजकीय संस्कृतीत घडवू बघतोय, असं त्यावेळी बोललं गेलं. पण विधानसभा निकालानंतर सत्तेसाठी शिवबांच्या तथाकथित मावळ्यांनी तथाकथित अफजल फौजांशी शय्यासोबत करायचा निर्णय घेतला आणि तिथूनच उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या नेतृत्वाचा देखील डाउनफॉल सुरु झाला.

उद्धव ठाकरे वेगळ्या धाटणीचं राजकारण करण्यात तर सपशेल अपयशी ठरलेच. पण शिवसेनेची म्हणून जी काही राजकीय स्टाईल आहे. अर्थात ती चांगली किंवा वाईट, हा मुद्दा इथे तूर्तास बाजूला ठेऊयात. ती देखील त्यांना फॉलो करता आली नाही. त्यामुळेच ‘कमळाबाई तेच करेल, जे मी सांगेन’ असं म्हणणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला आपला तथाकथित स्वाभिमान गुंडाळून वारंवार कमळाबाईच्या तालावर नाचायचा मार्ग स्वीकारावा लागला.

या सगळ्या प्रकारात शिवसेनेचं आणि त्यातही प्रामुख्याने उद्धव ठाकरे याचं जे काही हसू झालंय, त्यामुळे शिवसैनिकांचा पक्ष नेतृत्वावरचा विश्वास उडत चाललाय. आता युती झाल्यावरच्या घडामोडीनंतर या संभ्रमावस्थेत असलेल्या आणि काहीशा मनातून तुटलेल्या शिवसैनिकाला ऊर्जा पुरवणं आणि २०१९ च्या राजकीय अस्तित्वाच्या लढाईसाठी त्याला तयार करणं, हेच उद्धव ठाकरे यांच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे.

(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत.)