भाजपच्या जाहीरनाम्यातून काय समोर आलंय?

०८ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


गेल्यावेळी नवनवी स्वप्नं दाखवणाऱ्या, आश्वासनं देणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची यंदा सगळे जण वाट बघत होते. काँग्रेसचा जाहीरनामा गाजल्यानंतर आता भाजप कुठला मास्टरस्ट्रोक खेळणार याचीच चर्चा सुरू झाली. आता ती प्रतीक्षा संपलीय. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपल्या आश्वासनांचा पेटारा जनतेच्या पुढ्यात सादर केलाय.

भारतीय जनता पक्षाने संकल्पित भारत, सशक्त भारत असा नारा देत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपने या जाहीरनाम्याला संकल्पपत्र असं नाव दिलंय. जाहीरनामा तयार करण्यासाठी पक्षाने गेल्या जानेवारीपासून देशभरात भारत के मन की बात नावाने वेगवेगळे कार्यक्रम घेतले. त्यातल्या तब्बल सहा कोटी सहभागी लोकांकडून आलेल्या सुचनांच्या आधारे हा जाहीरनामा तयार करण्यात आला, अशी माहिती जाहीरनामा समितीचे प्रमुख आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.

राष्ट्रवादाचा मुद्दा अजेंड्यावर

जाहीरनाम्याच्या कवरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लार्ज स्केल फोटो आहे. त्यावरून भाजप यंदाही नरेंद्र मोदी यांच्या नावावरच मतं मागणार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. भाजपने आपल्या जाहीरनाम्याला राष्ट्रवादाच्या मुद्यासोबत लोककल्याणकारी योजनांचा तोंडवळा दिलाय. देशाची सुरक्षा हा भाजपच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार असल्याचंही आजच्या कार्यक्रमातून स्पष्ट झालं.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच पक्षाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचीही भाषणं झाली. भाजपचा जाहीरनामा प्रसिद्धीचा हा कार्यक्रम इतरांहून वेगळा होता. सगळ्यांनी जाहीरनाम्यातल्या गोष्टींवर स्वतःचं भाष्य केलं. पत्रकारांसोबतच्या प्रश्नोत्तरांना फाटा देण्यात आला.पहिल्या टप्प्याचं मतदान तीन दिवसांवर आलं असताना भाजपने हा जाहीरनामा मांडलाय.

हेही वाचाः राहुल गांधी ७२ हजारांत गरिबीवर वार कसा करणार?

भाजपच्या जाहीरनाम्यात काँग्रेससारखी कुठलीही नवीन मोठी घोषणा नाही. पण २०२२चं लक्ष्य निर्धारित करून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याचं आश्वासन पक्षाने दिलंय. २०२२ मधे देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होतात. आपलं सरकार आल्यास देशाचं नाव रोशन होईल, अशी वेगवेगळ्या क्षेत्रात ७५ कामं केली जातील, असं जाहीरनामा समितीचे प्रमुख आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

२०४७ चं नवं स्वप्न

२०२२ च्या या लक्ष्यासोबत भाजपने २०४७ चं नवं टार्गेट ठरवलंय. २०४७ मधे म्हणजे पंचवीसेक वर्षांनी देशाच्या स्वातंत्र्याचं शताब्दी वर्ष साजरं होणार आहे. पुन्हा आपली सत्ता आल्यास २०४७ पर्यंत भारत एक महाशक्ती म्हणून नावारूपाला येईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिलं. त्यामुळे २०४७ चं स्वप्न हेच भाजपचं नवं आश्वासन आहे. आतापर्यंत भाजपकडून २०२२ चं टार्गेट दाखवलं जायचं. ते आता बदललंय.

यावेळी पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी २०१४ मधे दिलेली आश्वासनं कशी पूर्ण केली याचा आढावा सादर केला.वेगवेगळ्या सरकारांकडे देशातले लोक मोठ्या आशेने बघायचे. पण आता लोकांना सरकार काहीतरी करू शकतं हे कळलंय. त्यामुळे ते सरकारकडे मोठ्या अपेक्षेने बघू लागलेत. २०१९ ची निवडणूक लोकांच्या अपेक्षांची निवडणूक असेल. आमचा जाहीरनामा म्हणजे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा जाहीरनामा असल्याचा दावाही शाह यांनी केला.

जुन्या बॉटलमधे नवी दारू?

नरेंद्र मोदींच्या नव्या भारतातल्या १२३ कोटी नागरिकांसाठीचं हे अपेक्षापत्र आहे, असं सांगतानाच राजनाथ सिंह यांनी जाहीरनाम्यातल्या महत्त्वाच्या मुद्यांना अधोरेखित केलं. त्यामधे राष्ट्रवादाशी बांधिलकी, दहशतवादविरोधी धोरण, अवैध घुसखोरी रोखणार, सिटीझनशीप अमेंडमेंट बिल लागू करणार, लवकरात लवकर राम मंदिर उभं राहील यासाठी प्रयत्न करणार, एक देश एक निवडणुकीसाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांचं उत्पन्न दाम दुप्पट करणार यासारख्या गेल्या पाच वर्षांतल्या अजेंड्यावरच येत्या पाच वर्षांतही काम करण्याचं आश्वासन देण्यात आलं.

हेही वाचाः मैं भी चौकीदारला विरोधक काऊंटर कसं करणार?

समान नागरी कायदा आणणार, जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणार, तीन तलाक कायदा बनवणार ही जुनी आश्वासनं यावेळीही जाहीरनाम्यात आहेत. त्यामुळे सोशल मीडियातून भाजपच्या जाहीरनाम्यावर जुन्या बॉटलमधे नवी दारू, अशी टीकाही होतेय.

व्यापारी, शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न

मागच्या काही विधानसभा निवडणुकांत छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांमधे सरकारविरोधात नाराजीचा सूर दिसला होता. जीएसटीमुळे छोटा व्यापारी भाजपपासून दुरावल्याचंही बोललं गेलं. ही नाराजी दूर करण्यासाठी भाजपने आज छोटे शेतकरी, शेतमजूर तसंच छोट्या व्यापाऱ्यांना पेन्शन सुरू करण्याचा आश्वासन दिलंय. पण ही पेन्शन किती रुपयांची असेल हे मात्र स्पष्ट केलं नाही.व्यापाऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रीय व्यापारी आगोय स्थापन करण्याचंही आश्वासन देण्यात आलंय.

हेही वाचाः महाराष्ट्रातली काँग्रेस नेतृत्वहीन होतेय?

तसंच शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर एक लाखापर्यंतच कर्ज पाच वर्षांसाठी शून्य व्याजदरावर उपलब्ध करून दिलं जाईल. गेल्या महिन्यातच लागू झालेल्या किसान सन्मान निधी योजनेत आता छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांसोबतच सगळ्या शेतकऱ्यांना सामील करण्याचंही आश्वासन देण्यात आलंय. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत दिली जाणार आहे. गावांच्या विकासासाठी २५ लाख कोटी रुपये खर्च केले जातील.

राहुल गांधींवर नाव घेऊन टीका

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इंग्रजीत भाषण करताना काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली. आपला जाहीरनामा काही टुकडे टुकडे माईंडसेट ठेऊन तयार करण्यात आला नाही. मजबूत राष्ट्रवादी दृष्टिकोनातून आपलं संकल्पपत्र तयार केल्याचा दावात्यांनी केला. भूतकाळात फेल झालेलेलोक भविष्यासाठी काय नव्या आयडिया देऊ शकतात, असा सवाल करणाऱ्या जेटलींनी आम्ही भूतकाळात चांगलं काम केल्याचं सांगितलं.

सुषमा स्वराज यांनी आमच्या आणि दुसऱ्यांच्या जाहीरनाम्यातला मूलभूत फरक शीर्षकातूनच दिसून येतो. आम्ही घोषणा पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन आलोय, असं सांगत संकल्पपत्रातल्या गोष्टी मांडल्या. राहुल गांधींचं नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली.

हेही वाचाः लोकसभेच्या परीक्षेसाठी भाजप,काँग्रेसची तयारी कुठवर?

जाहीरनामा प्रसिद्धीच्या या कार्यक्रमात पाच जणांची भाषण झाली. शाह, स्वराज्य, सिंह आणि जेटली यांनी विरोधी पक्षांवर थेट टीका केली. त्या तुलनेत पंतप्रधान मोदी यांनी कुणावरही थेट टीकाटिप्पणी करण्याचं टाळलं. पण सगळ्यांच्या म्हणण्याला माझा पाठिंबा असल्याचं त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच स्पष्ट केलं. महत्त्वाचं म्हणजे या चौघांनीही नरेंद्र मोदी यांचा यशस्वी पंतप्रधान असला उल्लेख केला.

विरोधकांची बोलती बंद होणार?

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आमचा जाहीरनामा हा जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षांना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न आहे.राष्ट्रवाद ही प्रेरणा, अंत्योदय हा विचार आणि सुशासन आमचा मंत्र आहे. हे घोषणापत्र २०२४ साठीचं आहे. पण लोकांना मधेच आम्हाला हिशोब विचारता यावा म्हणून २०२२ पर्यंत काही कामं पूर्ण करण्याचा संकल्प घेतलाय. टाईमबाऊंड, वेल डिफाईन्ड असं हे कदाचित पहिलंच घोषणापत्र आहे. आमचं संकल्प पत्र हे सुशासन पत्र, राष्ट्र सुरक्षा पत्र आणि राष्ट्र समृद्धी पत्र आहे.’

वेगवेगळी आश्वासनं देत भाजप गेल्या वेळेसारखं यंदाही विरोधकांची बोलती बंद करणार का, असा विचारलं जात होतं. पण आजच्या जाहीरनाम्यातून असं काही झालं नाही. दुसरीकडे काँग्रेसने भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच पत्रकार परिषद घेऊन टीका केली. रोजगार, नोटाबंदी, जीएसटी आणि काळापैसा या चार मुद्द्यांवर जाहीरनाम्यात कुठलंच नवं किंवा जुनं आश्वासन नाही. तसंच या चार गोष्टींचं गेल्या पाच वर्षांत काय झालं हेही सांगितलं नाही, असा आरोप काँग्रेसने केलाय.

हेही वाचाः राहुल गांधींच्या संवादामुळे मराठी तरुण काँग्रेसकडे वळणार?

गेल्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या विजयात नवमतदार असलेल्या तरुणांचा खूप मोठा वाटा राहील. तसंच महिलांनीही भाजपला भरभरून मतदान केलं. पण भाजपच्या यंदाच्या जाहीरनाम्यात तरुण आणि महिलांबद्दल ठोस आश्वासन नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. जाहीरनामा बघून मतदान झाल्यास भाजपला या दोन वर्गांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

हेही वाचाः महिलांना उमेदवारी देतानाही घराणेशाहीचंच कार्ड