भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचं विश्लेषण

२४ मे २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


भाजपला मिळालेल्या यशाला कितीही शब्दांच्या उपमा दिल्या तरीही लोकसभा निव़डणुकीचा निकाल एकतर्फी लागला आहे. हा निकाल सगळ्यांसाठी आर्श्चयकारकच आहे. या निकालामागची कारणं काय आहेत. हा मोदींचा चमत्कार आहे की भाजप पक्षाने ग्राऊंड लेवलला केलेलं काम? मोदींची लाट नसतानाही सौम्य लाट कशी तयार झाली? याची उत्तर देणारा हा लेख.

लोकसभा निवडणूक निकालांनी संपूर्ण देशभरामधे सुप्त स्वरूपात मोदी लाट किंवा स्वतः पंतप्रधान म्हणत असत त्याप्रमाणे ‘प्रो-इन्कम्बन्सी वेव’ होती, हे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला मिळालेल्या घवघवीत यशामुळे स्पष्ट झालं. 

सतराव्या लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकांचे ऐतिहासिक निकाल, हे भारतीय राजकारणाला नवे वळण देणारे ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षावर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर देशाच्या सर्व भागांतील आणि स्तरांतील मतदारांनी दाखवलेला विश्‍वास हा अनेक राजकीय निरीक्षकांना, अभ्यासकांना आणि विश्लेीषकांना अचंबित करणारा ठरला.

जनतेच्या मनात मोदीच

मतदानोत्तर चाचण्यांमधून या निकालाचा अंदाज पुरेसा स्पष्ट झाला होता. मात्र गेली पाच वर्षं जनतेच्या मनात सातत्याने संभ्रम आणि भीती करणाऱ्या विरोधी पक्षांनी एक्झिट पोलवर संशय व्यक्तय करतानाच पुन्हा एकदा इवीएमचा मुद्दा उकरून काढला. इतकंच नाही, तर सरकार स्थापनेसाठीच्या हालचालीही सुरू केल्या होत्या. 

पण निकालानंतर विरोधी पक्षांना सणसणीत चपराक बसली आहे. कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल आदी राज्यांमधे भाजपला मिळालेला विजय आणि एकंदरीतच भाजपची वाढलेली मतांची टक्केवारी ही या पक्षाविषयी आणि पक्षनेतृत्वाविषयी जनमानसात असणाऱ्या विश्वातसाची पोचपावती आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचं समर्थ नेतृत्व पाहून लोकांनी भरभरून मतं दिली. आणि दोन तृतीयांश मतांनी भारतीय जनता पक्ष सहकारी पक्षांसह निवडून आला. इतर पक्षांनाही भाजपने सत्तेत सामावून घेतलं. भाजप स्वतःच्या क्षमतेवर दोन तृतीयांश मतांनी सत्तेत येईल, यावर कोणाचाही विश्वाास नव्हता पण असा इतिहास घडला.

हेही वाचा: नव्याने उभं राहण्यासाठी कॉंग्रेसने भाजपकडून शिकाव्यात अशा गोष्टी

पुन्हा दिसला, मोदींचा करिष्मा

दोन वर्षांपूर्वीच ‘मिशन ३५०’ घेऊन अमित शहा यांनी २०१९ च्या निवडणुकीसाठी संघटनेला दिशा देण्यास सुरुवात केली होती. या प्रयत्नांना अभूतपूर्व यश आल्याचं ताज्या निवडणूक निकालांमधून दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून केंद्रात शून्य भ्रष्टाचार हे धोरण राबवलं. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्स्फॉर्म म्हणजेच सुधारणा, कृती आणि परिवर्तन घडवा, या त्रिसूत्रीचं पालन करून त्यांनी सुशासनाला नवी दृष्टी दिली. म्हणूनच मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने लोकांमधे एक विश्वालस निर्माण केला.

जनसंघाची जी पर्यायी राजकीय संस्कृती होती, ती त्यांनी कृतीत आणली. नरेंद्र मोदी यांचं प्रभावशाली नेतृत्वाने एनडीएची शक्तीय वाढली. नितीशकुमार यांनी त्यांना दिलेला पाठिंबा, उत्तर प्रदेश विधानसभेत मिळवलेले दोन तृतीयांश बहुमत आणि सर्वच राज्यांतील लोकांनी दिलेला मतरूपी प्रतिसाद. यावरून मोदींचा करिष्मा सतत वाढत असल्याचं दिसून येतं. आता लोकसभा निवडणूक निकालांनी मोदी करिष्म्यावर पुन्हा शिक्कामोर्तब केलं. 

गेल्या पाच वर्षांत परराष्ट्र धोरणाला एक वेगळी दिशा देऊन जगभरात भारताची मान समर्थपणाने उंचावण्यामधे मोदी यशस्वी ठरले. नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिसमत्त्वाचा प्रभाव आणि त्यांच्या क्षमतेतून २०१९ मधे जबरदस्त विजय मिळणार, हा आत्मविश्वाीस अमित शहा यांना होताच आणि तो सार्थ ठरला.

हेही वाचा: नरेंद्र मोदींना इतकं मोठं यश मिळालं, याची सर्वात महत्त्वाची ५ कारणं

भाजप नुसता पक्ष नाही, केडर पक्ष आहे

सत्तेत आल्यानंतर बऱ्याचदा पक्ष ढेपाळतात, पक्ष कार्यालये बंद होतात आणि पोटपूजा सुरू होते. पण भाजपने एक पक्ष म्हणून संघटित करण्यासाठी जनसंघाच्या पद्धतीनेच काम करायला सुरवात केली. पक्षांचे मेळावे, संघटन, कार्यकर्त्यांवर संस्कार या कोणत्याही बाबतीत पक्ष थांबला नाही. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या संघटन चातुर्यामुळे आणि पक्षबांधणीमुळे भारतीय जनता पक्ष फक्तक कागदावर नसून, केडर पक्ष म्हणून प्रभावशाली आहे, ही गोष्ट सिद्ध झाली.

काँग्रेस पक्षाने सत्ता मिळवल्यानंतर केडर आणि कार्यकर्ते या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. अलीकडे कम्युनिस्ट पक्षाचेही या गोष्टीकडे दुर्लक्ष होत गेलं. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळातही भारतातले राजकीय पक्ष पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. मोदी यांनी जनसंघाचा नेता म्हणून भारतीय जनता पक्षाला एक प्रभावी अशी नवी राजकीय संस्कृती दिलीय. या संस्कृतीतून नव्या कार्यकर्त्यांचा, नव्या नेत्यांचा संच भारतीय जनता पक्षात तयार झाला आहे. 

हेही वाचा: येणार तर मोदीच हे कळाल्यावर उंचावलेला सेन्सेक्स खाली का गेला?

संघटनेअभावी राजकीय पक्षांची वाताहत

२०२२ मधे भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षं पूर्ण होतील आणि महात्मा गांधीजींच्या १२५ वी जयंती असेल. यावेळी मोदी भारताला एक बलशाली राष्ट्र बनवण्याचा संकल्प करून एक नवभारताच्या निर्मितीच्या दिशेने वाटचाल करत असतील. भारतीय स्वातंत्र्योत्तर काळातल्या राजकीय पक्षांची वाताहत पाहता भाजपने टिकवलेलं ऐक्य आणि वाढवलेलं संघटन, याला तोड नाही. समाजवादी पक्षाची आणि जनता दलाची एवढी शकलं झाली, की शब्दही अपुरे पडतील. हीच गोष्ट साम्यवादी पक्षाची झाली. त्यांचीही तीन, चार शकलं झाली.

भाजपच्या घोडदौडीच्या तुलनेत काँग्रेस, डावे पक्ष आणि साम्यवादी पक्ष गलितगात्र झाले. त्याचं विश्लेषण करताना असं दिसतं, की काँग्रेस पक्षाकडे संघटित कार्यकर्त्यांचा वर्ग नाही. संस्कारित कार्यकर्त्यांची  १९६० पर्यंतची पिढी काँग्रेसमधे होती, ती हळूहळू निस्तेज होत गेली. तीच अवस्था समाजवादी पक्षाची. राममनोहर लोहिया यांचा आदर्श घेऊन त्यांच्या वैचारिक सिद्धांतावर आणि ध्येयधोरणावर निखळ श्रद्धा ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात होता. पण पक्षात नेते अधिक कार्यकर्ते कमी अशी अवस्था झाली. 

त्यामुळे पक्षाची शकले झाली. छोट्या कारणांवरून मतभेद होऊन परस्परांमधे विभाजन आणि सिद्धान्ताचा अभाव, या कारणांमुळे समाजवादी पक्षाचे तुकडे झाले. हीच गोष्ट भारतातील साम्यवादी पक्षाचीही. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डांगेवादी आणि माकप असे दोन गट पडले. त्यानंतर माओवादी, लेनिनवादी वेगळे झाले. म्हणजे, साम्यवादाचे तत्त्वज्ञान घेऊन निष्ठेने काम करणार्या  कार्यकर्त्यांचा गट या पक्षातून हळूहळू दूर होत गेला आणि आज त्या पक्षाला केवळ पुढाऱ्मयांचा पक्ष म्हणावे, अशी अवस्था झाली आहे.

भाजपपुढचं आव्हान काय असेल?

स्वातंत्र्योत्तर काळात सर्व प्रकारची संकटं आणि आव्हानं स्वीकारलं. आपलं पक्षसामर्थ्य आणि वैचारिक आणि नैतिक आचरण जास्तीत जास्त चांगलं ठेवून लोकांच्या विश्वावसास पात्र राहण्याचा प्रयत्न भाजपने केला. मोदींच्या विकास धोरणामुळे, सर्वसमावेशक तंत्रामुळे दक्षिणेकडील राज्यांमधेसुद्धा भारतीय जनता पक्ष नजीकच्या दशकात वाढेल, हे या निकालांनी दाखवून दिलं. त्रिपुरा, पश्चिम बंगाल यासारख्या प्रांतांतही भाजपने केलेली कामगिरी ही विरोधी पक्षांना धक्काुदायक ठरणारी ठरली. 

नजीकच्या वर्षांत भाजपला प्रभावी अशी राजकीय रचना करावी लागणार आहे. त्यासाठी तालुकापातळीपर्यंत पक्ष कार्यालये, गावोगावी पक्ष संघटन, अनुशासित कार्यकर्त्यांचा चमू आणि शुद्ध, स्वच्छ चारित्र्यावर आधारलेला पक्ष याचा विचार करता त्यांच्या वैशिष्ट्यांचे जतन करण्याचं आव्हान असणार आहे.

हेही वाचा: जागतिक कासव दिनी लोकसभेच्या स्पर्धेत राहुलचं कासव जिंकलंच नाही

भारतात राजकीय असमतोल

उत्तर प्रदेशात बुवा-भतिजा यांनी एकत्र येत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला पण त्याला अत्यल्प यश आलं. रथातल्या इतर छोट्या पक्षांचीही अशीच अवस्था झाली. काही राज्यांमधे तर प्रादेशिक पक्षांची वाटचाल सुरळीत होऊ शकली नाही. काहींची अखिल भारतीय वाटचाल प्रश्नासर्थक आहे. त्यामुळे एकीकडे सर्वदूर पसरत असलेला भाजप आणि दुसरीकडे ध्येयधोरणं आणि समान कार्यक्रम, विचारसरणी आणि केवळ मोदीविरोधाने ग्रासलेले विरोधी पक्ष, असं विषम चित्र आहे. हे चित्र राजकीय असमतोलाचं आहे. 

कुठल्याही देशात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात रथचक्रासारखी अवस्था असली पाहिजे. इंग्लंडमधे मजूर आणि हुजूर किंवा अमेरिकेतल्या रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्ष यांची वाटचाल पाहता भारतामधेही काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांनी अमेरिकेप्रमाणे प्रभावशाली आणि राजकीय परिणाम घेऊन आपलं कार्य केलं पाहिजे. एकमेकांना समजून राजकीय व्यवस्था कायम ठेवली पाहिजे. मग भारतात लोकशाही व्यवस्था मजबूत होईल. आणि राजकीय पक्ष शेवटी देशाचे कल्याण साधणारे असतात, ही गोष्ट विसरता कामा नये.

हेही वाचा: सुप्रिया सुळे का जिंकल्या, पार्थ पवार का हरले?

(लेखक त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. मूळ लेख दैनिक पुढारीत आला असून त्याचा हा संपादित भाग आहे.)