आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

१७ जुलै २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


जागतिकीकरणानंतर जसा शहरांमधे मोठ्या प्रमाणात बदल झाला. तसा गावांमधेही झाला. गावातून नोकरीसाठी आलेली लोकं शहरातच राहतात पण त्यांची ओढ गावाकडेच लागलेली असते. महेंद्र कदम लिखित 'आगळ' या कादंबरीत एकाच पिढीचा आणि वेगवेगळ्या पिढ्यांचा संघर्ष दाखवलाय. त्यामुळे ही कादंबरी वाचायलाच हवी.

एखाद्या चांगल्या कादंबरीचं यश हे तिच्या किती वर्षात किती आवृत्त्या निघाल्या आणि संपल्या यावर मुळीच अवलंबून नसतं. त्या कादंबरीमधे असलेल्या वाङ्मयीन मूल्याबरोबरच सामाजिक मूल्य किती आहे आणि तिच्या वाचनातून वाचकाची वैचारिक आणि मानसिक घुसळण होते आहे का? त्याच्या मनोभूमीतून विधायक असं काही उगवून त्याचा वर्तनावर सकारात्मक परिणाम होतोय का? यावर अवलंबून असतं असं मला वाटतं. मी बोलतेय ते महेंद्र कदम यांच्या आगळ कादंबरीबद्दल. ती वाचून संपल्यानंतर जे काही मनात उरलंय त्याबद्दल.

अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेला

गावातल्या मातीत लहानाचा मोठा झालेल्या परंतु नोकरीसाठी शहरात स्थायिक झालेल्या संवेदनाशील तरूणाचं. आणि सोबतच गावाच्या बदललेल्या इतिहासाचं भुगोलाचं, जागतिकीरणामुळे विस्कटलेल्या, विखुरलेल्या अशा अनेक गावाचं आगळ ही कादंबरी प्रतिनिधित्व करते. मकरंद सराटे हा शिकून शहरी भागात स्थायिक झालेला. पण अभावग्रस्त शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला नायक आहे. त्याच्या आयुष्यावर त्याची स्वतःचीही मालकी नाही.

शहरी सुखासीन कुटुंबातल्या शिकलेल्या मुलीशी लग्न होऊन, संपूर्णपणे तिच्या कह्यात गेला. हा महाविद्यालयात सोशल सायन्सचा प्राध्यापक आहे. पण त्याच्या स्वतःच्या आयुष्याचं समाजशास्त्र पूर्णपणे बिघडून बसलेलं. बायकोसमोर नंदीबैलासारखी मान डोलावणं हेच केवळ त्याचं प्राक्तन होऊन बसलं. गाव, गावाकडची माणसं आणि त्याचं स्वतःचं चौकोनी कुटुंब यांच्या अपेक्षांखाली दबून जाऊन मकरंदच्या स्वतःच्या आत्मविश्वासाच्याही चिथड्या उडालेल्या.

नातेसंबंधांमधला दुरावा

एकीकडे बायकोचं गावाकडच्या माणसांपासूनचं म्हणजे मकरंदच्या भाऊ, भाऊजय आणि वडिलांपासूनचं तुटलेपण. आणि दुसरीकडे गावाकडच्या माणसांच्या ठायी असणारी बायकोविषयीची कटुता त्याला छळत राहते. प्रयत्न करूनही तो या सगळ्यांची एकत्र मोट बांधू शकत नाही. दोन भिन्न पार्श्वभूमी लाभलेल्या एकाच पिढीचा आणि सोबतच भिन्न काळातल्या वेगवेगळ्या दोन पिढ्यांचा संघर्ष म्हणूनही आपण मकरंदच्या कहाणीकडे आणि एकूण जगण्याकडे बघू शकतो.

मुलगी तरूण होत असताना तिच्या राहणीमानाबरोबर बदलणारं बायकोचं राहणीमान, बायकोकडून भावाच्या मुलाला दिली जाणारी दुय्यम वागणूक, सासरच्या लोकांचा दुस्वास करून आपल्या माहेरच्या माणसांना बायकोचं कायम पाठीशी घालणं, नवऱ्याला कायम घालून पाडून बोलणं या सगळ्या गोष्टी मकरंदला सारख्या खटकत. पण या सगळ्याला दुबळा विरोध करण्याशिवाय त्याला दुसरं काहीच करता येत नाही. लोकांच्या आपमतलबीपणामुळेआणि भौतिक सुखाच्या अधीन वृत्तीमुळे आजच्या काळात नातेसंबंधांमधे जो दुरावा निर्माण होत आहे त्याचाच धागा चिमटीत पकडून त्याभोवतीच कथानक गुंफण्याचा प्रयत्न कादंबरीकाराने केलाय.

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

मकरंदचा भकासपणा वाढतो

कादंबरीच्या केंद्रस्थानी फक्त तुटत चाललेल्या नातेसंबंधांचंच चित्र नाही. तर भारतीय समाजाच्या घटीत इतिहासावर, वर्तमानकालीन मानसिकतेवर आणि भविष्यकालीन अस्थिरतेवर सर्वांगानं होणाऱ्या मकरंदच्या महाविद्यातल्या स्टाफरूमल्या चर्चा आणि या सगळ्यांत मकरंदची होणारी तगमग, तडफड आणि नाइलाजही निवेदक आपल्यासमोर मांडत राहतो. घरातल्या राजकारणासोबतच महाविद्यालयातल्या राजकारणाचा, सहकारी प्राध्यापकांच्या तोंडदेखल्या दांभिकतेचा मकरंद बळी पडत राहतो. महाविद्यालयाच्या खिडकीतून बाहेरचा माळ न्याहाळत भकासपणे विचार करत राहणं हाच त्याचा एकमेव विरंगुळा बनतो.

स्वतःचा भावनिक गुंता, मानसिक गोंधळ पोटतिडकीने मांडणारा मी म्हणजेच नायक, 'मी' मधल्या निवेदकाचं ओघवतं निवेदन आणि या दोघांवर नियंत्रण ठेवू पाहणारा पण त्यातही कित्येकदा अपयशी ठरणारा लेखक या रूपबंधातून साकारलेली ही कादंबरी वाचकाची विलक्षण पकड घेते.

मकरंद अभावग्रस्ताचं जगणं जगला. तरी सगळे अभाव समूळ संपूनही, आनंदी राहू शकत नाही. प्रत्येक क्षणी त्याला आपल्या कुटुंबातली माणसं आणि त्यांच्या कमतरता आठवत राहतात. त्यांच्या आणि आपल्या जगण्याच्या परिभाषेची, सुखसोयीमधल्या तफावतीची तो सतत तुलना करत राहतो. ही तुलनाच त्याच्या भकास, अस्वस्थ होण्यामागचं मूळ कारण आहे. ही तफावत संपवण्याच्या त्याच्या प्रयत्नांना त्याच्या बायकोची काडीमात्र साथ नाही. केवळ आणि केवळ विरोधच. यामुळे मकरंदच्या भकासपणात अधिकच भर पडत जाते.

हेही वाचा: आधुनिक जगात प्रबोधन हेच समाजाला नवी दिशा देईल

आगळ म्हणजे?

आम्ही मकरंदला लहानाचा मोठा केलेला. शेतीवाडी गहाण टाकून नोकरीला चिटकवला. पण हा मात्र बायकोच्या कह्यात गेला, असं गावस्थित कुटुंबियांना वाटतं. तर आपला नवरा तिन्हीत्रिकाळ गावाची जपमाळ जपतो असा बायकोचा दृढ गैरसमज झाला. अशा दुहेरी कात्रीत सापडून रोज नव्याने आतूनबाहेरून सोलला जात होता. आपल्याला मकरंद फक्त आगळ मधेच भेटत नाही तर प्रत्येक गावात, घरातही दिसतात. असे बरेच मकरंद आजच्या काळाने जन्माला घातलेत.

पूर्वीच्या काळी जुन्या वाड्यांच्या दिंडी दरवाज्यांना आतून बंद करण्यासाठी दाराच्या पाठीमागे आडव्या टाकल्या जाणाऱ्या लांबलचक पण अरूंद फळीला आगळ म्हणतात. कादंबरीला दिलेले आगळ हे शीर्षक अत्यंत समर्पक आणि प्रतिकात्मक आहे. आपल्या आखलेल्या सुखासीन वर्तुळात दुसरा कुणी प्रवेशू नये म्हणून आजच्या वेगवान जागतिकीकरणाच्या युगात भौतिक सुखाच्या अधीन झालेल्या प्रत्येकाने मनाच्या दरवाज्याला बाहेरून कुणालाही काढता येणार नाही, अशी आगळ घातलेली आहे.

निवेदनाच्या ओघात मकरंद आपल्या शालेय जीवणातल्या दुखऱ्या आठवणीही सांगतो. बालपणापासूनच वस्तीला आलेलं दुय्यमत्व पुढेही त्याची पाठ सोडत नाही. भोवतीच्या लोकांनी वारंवार गृहीत धरणं, मांडलेल्या कुठल्याच मताला फारशी किंमत न देणं, बायकोने प्रत्येकवेळी संसार मोडून आयुष्यातून उठवण्याची धमकी देणं. अशा सगळ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आत्मविश्वास रसातळाला जावून वर्तमानातील व्यवहारात पिचून गेलेला नायक वाचकांसमोर आपली घुसमट व्यक्त करतो.

हेही वाचा: 'लाल श्याम शाह' हे पुस्तक मी का लिहिलं?

जागतिकीकरणानंतरचं गाव

आजीच्या गोष्टीतून सुरू होणारं कादंबरीचं कथानक 'मी' च्या दैनंदिन जगण्याचं अनेकविध संदर्भ देत पुढे पुढे सरकतं. निवेदक केवळ मी मधेच घुटमळत नाही तर 'मी' च्या आजूबाजूचा भोवताल, भोवतालातल्या लोकांची जगण्यासाठी होणारी कुत्तर ओढ ही विलक्षण पोटतिडकीनं मांडत राहतो. 'मी' चं म्हणजे कादंबरीच्या नायकाचं संपूर्ण बालपण गावात गेल्यामुळे गावापासून तो मनाने दूर जात नाही. देहाने शहरात वास्तव्यास असलेला तो शहरी बेगडीपणाशी एकरूप होवू शकत नाही. त्याचं मन सारखं गावाभोवतीच पिंगा घालत राहतं.

जागतिकीकरणाच्या रेट्यात बदललेला गावाचा चेहरामोहरा, काळाच्या ओघात गावाच्या गावपणाची झालेली पडझड 'मी'तल्या निवेदकानं कादंबरीकाराला अधोरेखीत करायला भाग पाडली. नव्वदनंतर जागतिकीकरणाच्या रेट्याने बदललेल्या कुठल्याही गावाचं रूप नायकाच्या गावापेक्षा वेगळं नाही.

हेही वाचा: इस्लामविषयी साध्यासोप्या मराठीत ए टू झेड माहिती देणारं पुस्तक बाजारात

कादंबरीचं यश कशात आहे?

कादंबरीच्या भाषेचा विचार करता असं लक्षात येतं की तीत उपयोजिलेली भाषा ही लेखकाने कुठलीही पोज घेऊन वापरली नाही. सोलापूरी बोलीभाषेचा लहजा जसाच्या तसा तिने पकडलाय. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वापरल्या जाणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार यांचा चपखल आणि सयुक्तिक वापर लेखकाने कादंबरीत केला आहे.

निवेदकाचं निवेदन 'मी'च्या कोंडमाऱ्याशी एकरूप होत. पुढे पुढे जात असताना आपणही आतल्या आत आपल्याशी संवाद साधू लागतो. ही कादंबरी हे काही केवळ फिक्शन नाहीय. अनेक ठिकाणी अनेकांच्या जीवणात घडलेल्या, घडत असलेल्या विभिन्न घडामोडींचं हे एक प्रतिनिधीक रूप आहे. ज्यामुळे वाचक म्हणून आपल्यालाही त्यांची धग लागते. आणि मला वाटतं हेच कादंबरीचं यश आहे.

बदलत्या ग्रामजीवनाचा सुक्ष्मतर वेध लेखकाने घेतलाय. त्याशिवाय शहरी लोकांच्या आपमतलबी, संकुचित वृत्तीवरही नेमकं बोट ठेवलंय. मी मधल्या निवेदकाला, कादंबरीकाराला शहर आणि गाव यांमधे पडलेली दरी बुजवून त्या दोहोंमधे एक निकोप संवादसेतू उभा करायचा आहे. आणि हीच त्याची प्रामाणिक धडपड आहे. ही कादंबरीकाराची धडपड वाचकांशी संवादी बनलीये हेच या कादंबरीचं मूल्य ठरतं.

हेही वाचा: 

माझ्या अस्मितेच्या आणि असहिष्णुतेच्या नायकाला अखेरचा जयभीम! 

मी बंडखोर कसा झालो, सांगतायत राजा ढाले

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’