सत्यशोधकीय नियतकालिकेः वाङ्मयेतिहासात मोलाची भर घालणारा संदर्भ ग्रंथ

२९ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक चळवळ उभी केली. या चळवळीचे विचार मांडण्याचं व्यासपीठ म्हणजे सत्यशोधकीय नियतकालिकं. या नियतकालिकांमधून हे विचार लोकांपर्यंत पोचले. याच नियतकालिकांवर डॉ. अरुण शिंदे यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ आलाय. या संदर्भ ग्रंथाचं मुल्यमापन करणारं हे परीक्षण.

इंग्रज राजवटीत सनातन्यांचा अधिक्षेप सुरू झाला. त्रैवर्णिक पुरुषांपुरतंच मर्यादित असलेलं ज्ञान काही प्रमाणात बहुजनांसाठी खुलं झालं. त्यातूनच सामाजिक क्रांतीचे प्रणेते जोतीराव फुल्यांचा उदय झाला. सर्व अनर्थांचे मूळ अविद्या आहे, हे फुल्यांनी सांगितलं. त्यांनी स्त्रीशिक्षण, प्रौढ शिक्षण, रूढीभंजन, धर्मचिकित्सा सुरू केली. यामुळेच हजारो वर्षं गुलामीत खितपत पडलेल्या बहुजनांना समता आणि बंधुतेचा नवा मार्ग मिळाला. आत्मसन्मानाचं नवं पर्व सुरू झालं. त्यातूनच पुढे सत्यशोधक चळवळ आली.

भारतात नेहमीच अभिजनांचं तत्त्वज्ञान, विचार हे मुख्यप्रवाही म्हणूनच गणले गेले. त्यामुळे बहुजनांचे सगळे प्रयत्न, सगळ्या चळवळी दुर्लक्षित आणि वंचित राहिल्या. दैदीप्यमान आणि संघर्षशील सत्यशोधक चळवळसुद्धा खूप काळ अंधारात राहिली. य. दि. फडके, हरी नरके, बाबा आढाव, सीताराम रायकर, धनंजय कीर अशा अभ्यासकांमुळे आणि महात्मा फुले यांच्या अनुयायांमुळे ही चळवळ प्रकाशात आली.

यात नव्या पिढीतले संशोधक डॉ. अरुण शिंदे यांची भर पडलीय. ‘सत्यशोधक केशवराव विचारे’, ‘मुकुंदराव पाटील यांच्या कथा’ आणि ‘सत्यशोधकांचे शेतकरीविषयक विचार’ ही तीन महत्त्वपूर्ण संशोधनं त्यांच्या नावावर आहेत. नुकताच त्यांचा ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ हा बृहद संशोधन ग्रंथ प्रकाशित झाला. ‘Subaltern History of Marathi Periodicals' असं या संशोधनाचं वर्णन करता येईल.

महात्मा फुलेंचा ३ कलमी कार्यक्रम

‘सत्यशोधक चळवळीच्या नियतकालिकांचा वाङ्मयीन अभ्यास: १८७७-१९३०’ हा डॉ. अरुण शिंदे पीएचडी संशोधनाचा विषय. या संशोधनात भर घालून आणि नको असलेला भाग वगळून हा संशोधन ग्रंथ प्रकाशित केलाय. संशोधनातलं पहिलं प्रकरण ‘म. फुले आणि सत्यशोधक चळवळ’ त्यांच्या कार्याचा माहिती यात दिलीय. १९ व्या शतकात खूपशा समाजसुधारणा चळवळी आल्या. १८२८ ला ‘ब्राह्मो समाज’, १८६७ ला ‘प्रार्थना समाज’, १८७५ ला ‘आर्य समाज’. यांचे प्रयत्न थोड्या थोडक्या सुधारणांच्या आणि अभिजनांच्या पलीकडे गेले नाहीत. त्याचं कारण या समाजांना वेदप्रामाण्य मान्य होतं.

महात्मा फुल्यांचा वैचारिक पिंड हा धर्मचिकित्सेवर पोसला. त्यांच्यावर थॉमस पेनच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ या ग्रंथाचा मोठा प्रभाव. फुल्यांनी जगाचा निर्माणकर्ता ‘निर्मिक’ मानला. पण मूर्तिपूजा आणि मध्यस्थ नाकारला. त्यामुळे त्यांचा थेट संघर्ष भटजी आणि शेटजींशी झाला. शेतकरी, कष्टकरी, शूद्र, अस्पृश्य आणि महिला यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचं रुपांतर चळवळीत झालं. महिला शिक्षण, लेखन आणि प्रत्यक्ष चळवळ या सगळ्या कार्याचा प्रमाणसहीत आढावा डॉ. अरुण शिंदे यांनी पहिल्या भागात घेतलाय.

‘एकतर्फी ग्रंथातील मताभिमानाचा दांडगावा’ नाकारणं हे फुल्यांचं म्हणजेच सत्यशोधक समाजाचं ब्रीद होतं. तर ‘एकंदर सर्व मुलीमुलांस त्यांचे अधिकार समजण्यापुरती विद्या देण्यासाठी माझ्याने होईल तितकी मदत करणं’, हा सत्यशोधक समाजाचा नियम होता. त्यामुळेच ग्रंथलेखन, नियतकालिकांच्या माध्यमातून प्रबोधन आणि सभा-संमेलनांतून बहुजन समाजाचं बौद्धिक भरणपोषण असा तीन कलमी कार्यक्रम राबवला.

हेही वाचा: महात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख

खरंच सत्यशोधक चळवळ संपलीय?

महात्मा फुल्यांनंतर ही चळवळ संपल्याचं काही अभ्यासकांनी लिहिलं. मात्र शिंदे यांनी हे मत खोडलं. भास्करराव जाधव, शास्त्री बाबाजी महाधट, शास्त्री धर्माजी रामजी डुंबरे, कृष्णराव भालेकर, भीमराव महामुनी, कृ. क. चौधरी, वि. रा. शिंदे, शाहू महाराज यांचं कार्य सत्यशोधक समाजाला जिवंतपणा देणारं होतं.

यादरम्यान ‘दीनबंधु’, ‘सत्सार’, ‘विश्वबंधु’, ‘जागृति’, ‘जागरूक’, ‘डेक्कन रयत’, ‘विजयी मराठा’, ‘गरिबांचा कैवारी’, ‘सत्यप्रकाश’, ‘राष्ट्रवीर’, ‘तरुण मराठा’, ‘श्री शिवस्मारक’, ‘मजूर’, ‘हंटर’, ‘ब्राह्मणेतर’, ‘नवयुग’, ‘सत्यवादी’, ‘कैवारी’ इत्यादी नियतकालिकं आली. त्याचा धांडोळा शिंदेंनी घेतलाय. सत्यशोधकांचं कार्य शेतकरी, कामगार, अस्पृश्योद्धार आणि महिला मुक्तीविषयक पातळीवर कसं विस्तारलं, शेवटी त्याला राजकीय चळवळीचं स्वरूप कसं आलं, याचाही आढावा घेतलाय.

सत्यशोधकीय नियतकालिकं म्हणजेच बहुजन संपादक, लेखकांनी चालवलेली नियतकालिकं. रूढी-परंपरेच्या जोखडातून समाजाला मुक्त करणं. समता आणि सामाजिक न्यायाचं मूल्य प्रस्थापित करणं या हेतूने ही नियतकालिकं चालवली. आर्थिक विवंचना, वर्गणीदार वाढवण्यात येणार्‍या अडचणी, काही प्रसंगी उमटलेले वादविवाद आणि खटले यांमुळे सत्यशोधकीय नियतकालिकं खूप काळ चालू शकली नाहीत. परंतु त्यामधून येणारं लेखन समाजाला नवी दिशा देणारं ठरलं. मात्र रा. के. लेले यांच्या ‘मराठी वृत्तपत्रांचा इतिहास’ या ग्रंथात या नियतकालिकांचा फारसा उल्लेख नाही. ही उणीव शिंदे यांनी भरून काढलीय.

वर्तनबदलाची पूर्वअट म्हणजे विचार परिवर्तन

फुल्यांचं कार्य आणि विचार यांना तेव्हाच्या ब्राह्मणी वृत्तपत्रांत काहीच स्थान नव्हतं. त्यामुळेच कृष्णराव भालेकर यांनी खटपट करून, पदरमोड करून ‘दीनबंधु’ हे पहिलं सत्यशोधकीय नियतकालिक सुरू केलं. पुढे जोतीराव फुल्यांचं ‘सत्सार’, गणपतराव पाटलांचं ‘दीनमित्र’, गुलाबसिंह कौशल्य यांचं ‘राघवभूषण’, नारायण नवलकरांचं ‘अंबालहरी’, दामोदर यंदे आणि रामजी आवटे यांचं ‘शेतकर्‍यांचा कैवारी’ आदी नियतकालिकं आली.

याशिवाय ‘मराठा दीनबंधु’, ‘विश्वबंधु’, ‘सत्योदय’, ‘जागरूक’, ‘जागृति’, ‘डेक्कन रयत’, ‘सत्यप्रकाश’, ‘विजयी मराठा’, ‘गरिबांचा कैवारी’, ‘भगवा झेंडा’, ‘तरुण मराठा’, ‘राष्ट्रवीर’, ‘प्रबोधन’, ‘संजीवन’, ‘नवयुग’, ‘हंटर’, ‘मजूर’, ‘कर्मवीर’, ‘सत्यवादी’ अशी अनेक पत्रं सुरू झाली. या सर्व नियतकालिकांच्या वैचारिक, वाङ्मयीन आर्थिक आणि संपादकीय स्वरूपाचा आढावा शिंदे यांनी घेतलाय. त्यांचं सामाजिक जडणघडणीतलं योगदानही अधोरेखित केलंय.

‘Ideas moves the society & not the people’, असं म्हटलं जातं. वर्तनबदलाची पूर्वअट म्हणजे विचार परिवर्तन. सत्यशोधक चळवळ ही समाजव्यवस्था बदलाच्या हेतूने गतिमान झाली असल्यामुळे वैचारिक साहित्याची निर्मिती सत्यशोधकांनी प्राधान्यानं केली. स्वतः फुल्यांनी ‘गुलामगिरी’, ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘शेतकर्‍याचा असूड’ या पुस्तिका लिहून ही नवी दिशा स्पष्ट केली. याच मार्गावर खूपसे सत्यशोधक लेखक लिहिते झाले.

हेही वाचा: ग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच

शिंदेंचा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल

शिंदे यांनी ‘सत्यशोधकीय नियतकालिकांतील वैचारिक साहित्य’ या प्रकरणात त्याचा विस्तृत परामर्श घेतलाय. हे लेखन खंडनमंडन आणि तर्कशुद्ध मांडणी यांचा आधार घेणारं होतं. या वैचारिक चर्चेत ग्रामव्यवस्था, रूढिपरंपरा, जत्रा-यात्रा, मूर्तिपूजा, नवस, सोवळं, दान, मंत्रतंत्र, अंगात येणं, विधी, तीर्थयात्रा आणि तीर्थक्षेत्रं, सत्यनारायण, सण, गणेशोत्सव, धर्म, धर्मग्रंथ, पुरोहित, भागवत धर्म, शेती, शेतकरी, शोषण, सावकारी, अज्ञान, महिलांचे प्रश्न यांवर विस्ताराने चर्चा झालीय.

नियतकालिकांमधून बऱ्याचशा लेखक, लेखिकांचा विकास झाला. यात मुकुंदराव पाटील, दिनकरराव जवळकर, रा. ना. चव्हाण, मुक्ता साळवे, तानुबाई बिर्जे, भाई माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे यासारखी नावं सांगता येतील. शिंदे यांनी विविध सामाजिक प्रश्नांना वेगवेगळ्या नियतकालिकांत कसं स्थान मिळालं, त्या प्रश्नांवरची चर्चा कशी विस्तारली हेही मांडलंय, त्यामुळे खरंतर वेगवेगळ्या विषयांवर सत्यशोधकीय नियतकालिकांमधे त्या काळात कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली ते शोधण्याचा आधारग्रंथ म्हणून शिंदे यांचा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल.

शिक्षणाचं महत्त्व, इतिहासाची नवी मांडणी, व्यक्तिवेध, अस्पृश्यता निवारण या महत्त्वाच्या विषयांवरही या नियतकालिकांमधून चर्चा झाली. उदाहरणच द्यायचं झालं, तर वारकरी संप्रदायावरचं आक्षेपाचे खंडन, रामदासी विचारांतील न्युनत्व, पेशवाईचे गुण-दोष यांचा समाचार घेण्यात आलाय. सत्यशोधकीय कवितांचा स्वतंत्र उहापोहही त्यांनी केलाय.

हेही वाचा: महात्मा फुलेः जितके मोठे समाजसुधारक, तितकेच यशस्वी उद्योजकही

वाङ्मयेतिहासकारांनी डोळेझाक केली

मराठी वाङ्मयाच्या इतिहासात अर्वाचीन मराठी कवितेचे जनक म्हणून कवी केशवसुतांचा गौरव होतो. केशवसुतांचं लेखन १८८५ ते १९०७ मधलं. त्यांच्या पूर्वीच फुल्यांनी ‘अखंड’ लिहिलं. अनेक सामाजिक विषय कवितेतून हाताळले. सावित्रीबाई फुल्यांचं काव्यही असंच प्रागतिक आणि भावमधुर आहे. कृष्णराव भालेकरांनी वास्तववादी काव्यलेखन केलं. त्या लेखनाकडे वाङ्मयेतिहासकारांनी डोळेझाक केली.

सत्यशोधक कवींचं वैशिष्ट्य म्हणजे वारकरी, शाहीर. त्यांनी लोकपरंपरेतले छंद स्वीकारून लेखन केलं. अभंगाच्या रचना प्रकारातून व्यक्त होणारा सामाजिक आशय फुल्यांनी ‘अखंड’मधून, तर कृष्णराव भालेकरांनी ‘श्रीखंड’ म्हणून मांडला. त्या शिवाय पोवाडे, लावण्या, उपदेशपर कवन, कटाव यांचाही वापर केला. फुल्यांचा ‘शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा’, भालेकरांचा लोकल फंडाचा पवाडा’ यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. मुकुंदराव पाटलांनी लिहिलेल्या ‘कुलकर्णीलीलामृत’ आणि ‘शेटजीप्रताप’ या दोन खंडकाव्यांवरही शिंदे यांनी सविस्तरपणे लिहिलंय .

मराठीतल्या ग्रामीण कादंबरी लेखनाचा मान कृष्णराव भालेकर यांच्या ‘बळीबा पाटील’ या लेखनास जातो. ही कादंबरी ‘दीनमित्र’मधून १८८८ ला प्रकाशित झाली. मुकुंदराव पाटील यांच्या ‘ढढ्ढाशास्त्री परान्ने’, ‘होळीची पोळी’ या गाजलेल्या कादंबर्‍या ‘दीनमित्र’मधेच छापून आल्या. दत्तात्रय रणदिवे यांची ‘सत्यवादी’मधून क्रमशः प्रकाशित झालेली ‘तेजस्वी तारका’ हीदेखील महत्त्वपूर्ण कादंबरी. यांचा आढावा शिंदे यांच्या लेखनात आलाय.

सत्यशोधकीय नियतकालिकांतून प्रकाशित कथा वेगळाच विषय मांडणार्‍या होत्या. ‘भटजीचं कारस्थान’, ‘ब्राह्मण आणि त्यातून सावकार’, ‘लगीन की धुळवड’, ‘आश्रिताचे फळ’ अशा कथांच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधन झालं. ‘विसुभाऊंची कारवाई’, ‘संपाच्या वावटळीत’, ‘रूढीच्या वणव्यातून’ या कथाही लक्षणीय आहेत. शिंदे यांनी त्या सार्‍या लेखनाचा परिचय करून दिलाय.

बौद्धिक जाणिवा विस्तारणारं लेखन

एका स्वतंत्र प्रकरणात सत्यशोधकीय नाट्यरूप वाङ्मयाचं विवेचन आलंय. मुकुंदराव पाटलांचं ‘राक्षसगण’ हे अपूर्ण नाटक आणि शेतकरी प्रश्न, महिला प्रश्न आणि धार्मिक दंगली यांबद्दलचे संवाद शिंदे यांनी चर्चेस घेतलेत. ‘बोका आणि सत्यनारायण’, ‘शिष्य आणि गुरू’, ‘चांदोबा आणि यात्रेकरू’, ‘महार आणि सोवळा’ अशा अनेक संवादांतून तत्कालीन सामाजिक प्रश्नांना हात घातलाय. आजच्या श्रुतिकांशी नातं सांगू शकतील असेही संवाद यात आहेत.

एकंदर डॉ. अरुण शिंदे यांनी एका दुर्लक्षित विषयावर संशोधन केलं. महत्त्वपूर्ण माहिती आणि पुरोगामी दृष्टी ‘सत्यशोधक नियतकालिके या ग्रंथातून मांडलीय. ग्रंथाच्या शेवटी असणारी संदर्भ ग्रंथसूची, व्यक्तिनाम सूची आणि विषयसूची पाहताच आपणांस सखोल संशोधन वृत्तीचा परिचय होतो. डॉ. अरुण शिंदे यांचं हे लेखन संशोधनाचे नवे विषय खुले करणारं आणि वाचकांच्या बौद्धिक जाणिवा विस्तारणारं आहे.

पुस्तकाचं नाव: सत्यशोधकीय नियतकालिके

लेखक: डॉ. अरुण शिंदे

प्रकाशक: कृष्णा संशोधन व विकास अकादमी, मंगळवेढा, सोलापूर

पानं: ५४०

किंमत: ५०० रु.

हेही वाचा: 

शिवसेना, भाजप युतीचं नेमकं ठरलंय तरी काय?

खरंच, भगतसिंगांची फाशी रोखण्याचा गांधींजींनी प्रयत्नच केला नाही?

माणिकराव जाधवांनी शरद पवारांना ईडीच्या फेऱ्यात कसं अडकवलं?

लग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी

(दक्षिण महाराष्ट्र सहित्य पत्रिकेच्या जुलै ते सप्टेंबर २०१९ च्या अंकात हा मूळ लेख आलाय.)