ब्राझीलमधलं सत्तांतर जगासाठी किती महत्वाचं?

०८ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


ब्राझीलमधे बोलसानारो विरुद्ध लुला या लढतीला हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची जागृती अशी झालर प्राप्त झाली होती. लुला यांच्या विजयाने ब्राझीलमधे पुन्हा एकदा लोकशाहीला समृद्ध करू पाहणारा आणि समाजात पुरोगामी विचारांना चालना देणारा राष्ट्राध्यक्ष मिळाला आहे. लुला यांचा विजय हा पृथ्वीचा विजय म्हणून साजरा होतोय. त्यामागची कारणंही तशीच आहेत.

ब्राझील या लॅटिन अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत लुइस इनॅसिओ लुला डासिल्वा या कामगार पक्षाच्या नेत्याने विद्यमान राष्ट्राध्यक्ष जैर बोलसानारो यांचा केलेला पराभव ही लक्षणीय घडामोड आहे. ब्राझीलच्या ३४ वर्षांच्या लोकशाही निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान राष्ट्राध्यक्षाला पराभवाची चव चाखावयास मिळतेय.

पर्यावरणवादी खुश कारण

माजी लष्करी अधिकारी असलेले बोलसानारो हे ३४ वर्षांपूर्वीच्या ब्राझीलमधल्या लष्करी सत्तेचे प्रशंसक आहेत, तर लुला डासिल्वा यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवातच कामगारांना लष्करी सत्तेविरुद्ध संघटित करण्यातून झाली होती. त्यामुळे बोलसानारो विरुद्ध लुला या लढतीला हुकूमशाही प्रवृत्ती विरुद्ध लोकशाहीची जागृती अशी झालर प्राप्त झाली होती.

लुला यांच्या विजयाने ब्राझीलला पुन्हा एकदा लोकशाहीला समृद्ध करू पाहणारा आणि समाजात पुरोगामी विचारांना चालना देणारा राष्ट्राध्यक्ष मिळाला आहे. लुला यांच्या विजयाने केवळ ब्राझीलच नाही तर जगभरातल्या पर्यावरणवाद्यांना बळ मिळणार आहे.

लुला यांनी नेहमीच हवामान बदलाच्या प्रक्रियेला अत्यंत गांभीर्याने घेतलं आहे, तर बोलसानारो यांच्या काळात अमॅझॉन खोर्‍यातल्या जंगलाची बेफाम कत्तल झाली आहे. या जंगलतोडीचा जगभरातून निषेध झाल्यानंतरही बोलसानारो सरकारने त्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे पर्यावरणवादी संतप्त होते. आता या निवडणुकीत लुला यांचा विजय हा पृथ्वीचा विजय म्हणून साजरा होतोय.

हेही वाचा: अमेझॉनच्या जंगलातली आग विझवण्यासाठी ब्राझीलने चक्क मिलिट्री पाठवली

भ्रष्टाचाराचे आरोप, सुटका

२००३ ते २०१० या काळात लुला हे ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदी होते. त्यांची ही ७ वर्षांची कारकीर्द गरिबी निर्मूलन कार्यक्रम, समाजातल्या वंचित घटकांना आणि महिलांना न्याय, पर्यावरण रक्षणाची धडाडी आणि जागतिक राजकारणात अमेरिकेच्या एकाधिकारशाहीविरुद्धची भूमिका यामुळे दैदीप्यमान ठरली होती.

पुढे जनतेच्या वाढत्या आकांक्षा, उच्चमध्यमवर्गीय आणि श्रीमंतांची त्यांच्या विरोधातली आघाडी, अत्याधिक धार्मिक घटकांचा उफाळून आलेला विरोध आणि त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप या कारणांनी लुला यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं होतं.

या प्रकारानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली लुला यांना कारावासाची शिक्षासुद्धा ठोठावण्यात आली होती. पण अलीकडेच ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधातल्या खटल्यांत सरकारी पक्ष आणि न्यायालयाने संगनमत केल्याचं मान्य करत लुला यांची तुरुंगातून सुटका केली होती.

बोलसानारोंचा डाव फसला

लुला यांच्या राष्ट्राध्यक्षीय कारकिर्दीची तीन ठळक वैशिष्ट्यं होती, ज्याची परिणामकारकता त्यांच्या येत्या कारकिर्दीत पणाला लागणार आहे. एक, लुला हे अत्यंत लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष असूनही त्यांनी लोकशाही संस्थांचं खच्चीकरण न करता त्यांचं सक्षमीकरणच केलं होतं. सरकारी संस्थांची स्वायत्तता तसंच न्याय यंत्रणेची आणि निवडणूक आयोगासारख्या संस्थांची स्वतंत्रता सुदृढ करण्यावर लुला यांचा भर होता.

विद्यमान राष्ट्राध्यक्ष बोलसानारो यांनी मात्र लोकशाही संस्थांची तमा न बाळगता स्वत:चा करिश्मा निर्माण करत देशाचा गाडा हाकण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्यांना यशही आलं. त्यातून ब्राझीलमधे हुकूमशाही व्यवस्थेचे समर्थक आणि लोकशाहीवादी असे दोन उभे तट तयार झाले आहेत.

या निवडणुकीत बोलसानारो यांचा विजय झाला असता तर ब्राझीलच्या लोकशाहीचं अस्तित्वच धोक्यात आलं असतं यात शंका नाही. या निवडणूक प्रचारात बोलसानारो यांनी स्वत: सत्ताधीश असूनही निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेवर सातत्याने शंका उपस्थित केल्या होत्या.

निवडणूक निकाल विरोधात गेला तर निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह लावायचं आणि लष्कराच्या मदतीने सत्तेत कायम राहायचं इतपत बोलसानारो यांची तयारी होती, असं त्यांच्या टीकाकारांचं मत आहे. पण निवडणूक निकालात ब्राझीलच्या संसदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यामुळे आणि काही राज्यांच्या गवर्नरपदी बोलसानारोच्या पक्षाचे उमेदवार विजयी झाल्याने निवडणूक निकालाला नाकारणं त्यांना कठीण झालं आहे.

हेही वाचा: पर्यावरण दिनः संवेदनशील कृती करण्यासाठी पावलं उचलूया

लुला वेगळे का ठरतात?

लुला यांच्या पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षीय कारकिर्दीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची संघर्षाऐवजी संवाद आणि सहकार्याची कार्यशैली! ब्राझीलच्या बाहेर लुला यांची ओळख ही डाव्या विचारांचे कडवे ट्रेड युनियनिस्ट अशी असली तरी ब्राझीलच्या राजकारणात त्यांनी नेहमीच विरोधकांशी संवाद आणि नवनव्या घटकांना राजकीय आघाडीत समाविष्ट करण्याला प्राधान्य दिलंय.

१९८९ पासून आजपर्यंत ब्राझीलमधे झालेल्या प्रत्येक निवडणुकीत लुला हे उमेदवार म्हणून लोकांना सामोरे गेलेत. केवळ मागच्या निवडणुकीत न्यायालयाने त्यांना निवडणुकीत सहभागी व्हायला अपात्र ठरवल्यामुळे ऐन प्रचाराच्या काळात त्यांना राजकीय रणांगणातून दूर व्हावं लागलं होतं. यंदाच्या निवडणूक निकालानंतर लुला यांनी तत्काळ स्पष्ट केलं आहे की, त्यांचं सरकार हे ब्राझीलच्या सर्व नागरिकांचं आहे आणि केवळ त्यांना मतदान करणार्‍या समाजघटकांचं नाही.

ज्याप्रकारे बोलसानारो यांनी ब्राझीलमधे ध्रुवीकरणाचं राजकारण करत स्वत:ची लोकप्रियता निर्माण केली त्या पार्श्वभूमीवर लुला यांचं प्रतिपादन आश्वासक असलं तरी कितपत प्रभावी ठरेल याबाबत शंका आहेत. स्वत:च्या मतदार वर्गासाठीचा पुरोगामी आणि गरिबी निर्मूलनाचा अजेंडा अंमलात आणण्यासाठी लुला यांची सर्व समाजघटकांशी चर्चेची आणि त्यांना विश्वासात घ्यायची तयारी असली तरी लुला यांच्या विरोधात असलेल्या मतदारांची आज तरी संवादाची मन:स्थिती नाही.

संयमाची परीक्षाच

महिलांना बरोबरीचं आणि विशेषत: गर्भपाताचे अधिकार आणि तृतीय लैंगिकांना समान अधिकार या मुद्द्यांवर ब्राझीलचं एवेंजिकल चर्च लुला यांच्या विरोधात आहे. सर्व वंशीयांना आणि त्यातही देशातल्या आदिवासी जनजातींना मुख्य प्रवाहात सहभागी करण्यासाठीचं प्रक्रिया-निर्माण यावर लुला यांच्या राजकारणाचा भर आहे, तर या विरोधात श्वेतवर्णीयांची प्रचंड मोठी फळी बोलसानारो यांच्या पाठीशी आहे.

गरिबी निर्मूलनासाठी आणि निम्न मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना राबवणं लुला यांच्यासाठी आवश्यक असलं तरी देशातले भांडवलदार, श्रीमंत शेतकरी वर्ग आणि लष्करातला मोठा गट यांना हे फारसं रुचणारं नाही. या गटातल्या अनेकांना बोलसानारो सरकारच्या आर्थिक धोरणांनी मोठा लाभ झालेला आहे, तर इतरांना लुला यांच्या तुलनेत बोलसानारो आर्थिकदृष्ट्या कमी अपायकारक वाटतात. या सर्वांचा लुला यांना असणारा विरोध पराकोटीचा आहे, ज्याचा लुला यांना संयमाने सामना करायचा आहे.

हेही वाचा: ‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!

लुला यांच्यासमोरचं आव्हान

लुला यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षीय कारकिर्दीची सर्वात मोठी उपलब्धी ही ब्राझीलचा आर्थिक विकासाचा दर वाढता ठेवत दोन कोटींहून अधिक लोकांना गरिबी रेषेच्यावर आणण्यात त्यांना मिळालेलं यश ही होती. याउलट विद्यमान राष्ट्राध्यक्ष बोलसानारो यांच्या २०१८ पासूनच्या कार्यकाळात अंदाजे एक कोटी लोक दारिद्य्ररेषेखाली फेकले गेले आहेत.

कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत या महामारीने ब्राझीलमधे ७० लाख बळी घेतले आहेत. बोलसानारो यांच्या पराभवामागचं हे एक प्रमुख कारण आहे. कोरोनाचा फटका बसलेली ही सर्व कुटुंबं लुला यांच्याकडे आशेने बघत आहेत, जे लुला यांच्यापुढचं सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे.

यापूर्वीचा लुला यांचा कार्यकाळ हा ब्राझील आणि जगातल्या अनेक देशांसाठीचा आर्थिक विकास आणि भरभराटीचा काळ होता. या काळात आलेल्या संपन्नतेचा लुला यांनी देशातल्या गरिबांना कौशल्याने फायदा करून दिला होता. जागतिक अर्थव्यवस्थेत आणि विशेषत: ब्राझीलचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असलेल्या चीनमधे आर्थिक विकासाचा दर जोपर्यंत पूर्ववत होत नाही, तोवर देशातल्या गरजूंना दीर्घकालीन आर्थिक दिलासा देणं लुला यांना शक्य होणार नाही.

लॅटिन जनतेचं डावं वळण

ब्राझीलमधे लुला यांच्या समोरचं आव्हान हे कमी-अधिक प्रमाणात लॅटिन अमेरिकेतल्या सर्वच डाव्या विचारसरणीची सरकारं असलेल्या देशांपुढे आहे. लॅटिन अमेरिकेत सध्या दुसरी गुलाबी लाट आलेली आहे, ज्यामधे बहुतांश देशांमधे डाव्या विचारसरणीचं नेतृत्व सरकारमधे पुनरागमन करत आहे किंवा पहिल्यांदाच सरकार स्थापन करत आहे.

२१ व्या शतकाच्या सुरवातीला लॅटिन अमेरिकेत लोकशाहीची पहिली गुलाबी पहाट अवतरली होती. कालांतराने डाव्या सरकारांची जागा कडव्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी घेतली होती. आता पुन्हा एकदा लॅटिन जनता डावीकडे झुकली आहे. या प्रक्रियेत निश्चितपणे लॅटिन अमेरिकेतली लोकशाही मजबूत होतेय.

हेही वाचा: 

फाईव जीचा पाळणा कोण हलवणार?

सोन्याचांदीच्या किंमती वरखाली का होत आहेत?

ऑनलाईन रिव्यू वाचून फिरायला चाललात, मग सांभाळून

आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट

(लेखक एमआयटी स्कूल ऑफ गवर्नमेंटचे विभागप्रमुख असून लेख दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)