मार्शल आर्टचा अनभिषिक्त सम्राट ब्रुस ली खूप मोठा फिलॉसॉफरही आहे

२० जुलै २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


ब्रुस लीला जाऊन आज ४६ वर्ष झाली. पण त्यांच्या मृत्यूचं गूढ अजून उलगडलं नाही. उणीपुरी ३२ वर्ष जगलेले ली अपघातानेच मार्शल आर्टमधे आले. आर्मीत संधी नाकारल्याने मार्शल आर्टमधे आलेला हा माणूस आता दंतकथा झालाय. आपल्या साध्यासोप्प्या फिलॉसॉफीने त्यांनी जगाला भूरळ घातलीय.

तो एक जगदविख्यात हिरो होता. असंख्य विषयांनी ओळखला जाणारा पूर्वेकडील अतिवेगवान, तडाखेबाज, जगाला हादरून सोडणारा, कुंग फु सम्राट, सुनहरा पंजा असलेला छोटा ड्रॅगन. हा ड्रॅगन एकेकाळचा चिनी वेटर आणि आर्मीत संधी नाकारल्यामुळे निराश झालेला एक सामान्य माणूस होता.

पुढच्या दोनच वर्षांत तो सिनेमा क्षेत्रातला एक जबरदस्त असामी बनला. जगाला त्याने अक्षरशः वेड लावलं. अल्पवधीतच तो लेाकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाला. त्याने सिनेमात कामासाठी चक्क दहा लाख डॉलर्स मागायचाय आणि ही त्याची योग्यता त्याने सिद्ध केली. स्वसंरक्षण युध्दकलेतलं त्याचं नैपुण्य थक्क करणारं होतं. त्याने सर्व प्रकारच्या मार्शल आर्ट्समधे निर्विवाद वर्चस्व संपादन केलं होतं.

त्याच्या कसलेल्या पिळदार शरीरावर, गालावर ओरखड्याच्या खुणा. त्याची भेदक नजर आणि विशिष्ट पवित्रा घेऊन उभा असलेला तो नजरेसमोरून आड होतच नाही. त्याचं मार्शल आर्ट्स पोस्टर घरात लावण्याची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. आजही टीवीवर त्याचा सिनेमा लागला तो बघितल्याशिवाय टीवी बंद होत नाही. जगाला अक्षरशः वेड लावणाऱ्या नायकांचाही नायक बनलेला तो म्हणजे मार्शल आर्ट्सचा ताज ब्रूस ली.

त्याच्या नेत्रदीपक कारकिर्दीला नुकतीच सुरवात झाली असताना २० जुलैला वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी निजधामाला गेला. त्याच्या मृत्यृबद्दल अद्याप गूढच राहिलं. त्याचा रहस्यमय अंताने सारं जग हळहळलं. त्याच्या जीवनाची यशोगाथा सांगणार्‍या खोट्या पण खर्‍या कथांना वारेमाप प्रसिध्द मिळाली.

हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

चिनी लोकांचा असा समज आहे की, कुंग फुची गुप्त रहस्य त्याने उजेडात आणली. पण यातल्याच काही तंत्राचा वापर करून त्याला मारलं गेलं असावं. व्हायब्रेटिंग हॅन्डचा वापर करून ठराविक वेळेनंतर एखाद्याला ठार करण्याचं हे चिनी तंत्र आहे. त्याचा प्रयोग ब्रुसवर झाला असण्याची शक्याता त्याच्या चाहत्यांकडून वर्तवली जाते. हाँगकाँगमधे एक बातमी आली होती की, लीची ब्रॉझ शवपेटी विमानातून नेताना मोडली होती. ही गोष्ट लोकांना अशुभ वाटली.

काही जण तर असंही म्हणतात की त्याच्या बायकोनेच त्याला ठार मारलं, गुरूने मारलं, बेट्टीतिंग पैइ नावाच्या हिरोईनने विष देऊन मारलं. संशय व्यक्त करणार्‍या लोकांना निश्चतच दोष देता येणार नाही. ब्रुस लीच्या मृत्यूविषयी अनेक अफवा आणि कहाण्यांना ऊत आला होता. त्यावरुनच त्यांनी विश्वास ठेवला.

२७ नोव्हेंबर १९४० मधे अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिस्को इथे ब्रुस लीचा जन्म झाला. १९५३ मधे विंग चुन कुंग फु या कलेतल्या विख्यात गुरू यीप मॅन यांच्याकडे मार्शल आर्ट्सचं रीतसर शिक्षण घेतलं. पुढे ब्रुसने वॉशिंग्टन युनिवर्सिटीत प्रवेश घेतला. आणि फिलॉसॉफिचा अभ्यास सुरू केला.

१९६८ मधे फेन्सिंग अर्थात पाश्चात्य पद्धतीची तलवार बाजी या कलेपासून 'जीत कून दो' हा प्रकार प्रचारात आणणारा, मार्शल आर्टसमधील चिनी, जपानी, कोरियन आणि वेस्टर्न या सर्व शैली आत्मसात करून स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारा ब्रूस ली हा मार्शल आर्ट्सचा अनभिषिक्त सम्राट बनला. ब्रुसलीचं तत्त्वज्ञान आणि त्याचा महत्त्वाकांक्षी स्वभाव यात त्याच्या यशाचं रहस्य दडलंय.

हेही वाचा: अंधाधूनसारखा सिनेमा चीनमधे अंधाधुंद कमाई का करतो?

ब्रुसली काय म्हणतो?

१)  कलेद्वारे निसर्गाला किंवा विश्वाला नवा अर्थ आणि नवं स्वरूप देता येतं. त्यासाठी आत्म्याला नियंत्रित, ताब्यात ठेवावं लागेल.
२)  एका कलाकराला त्याचं शिक्षण आत्म्याद्वारे व्यक्त करता येतं. स्पष्ट करता येतं. तसंच त्याचं स्वनियंत्रण व्यक्त करता येतं. प्रत्येक हालचाल, कृतीमागे त्याच्या आत्म्यातलं संगीत प्रगट होतं. तसं झालं नाही तर त्याची प्रत्येक कृती निरर्थक वाटेल.
३)  अस्वच्छ विचारसरणी आणि अस्पष्ट कृती मुळापासून उखडून टाका.
४)  कला ही सजावटीची किंवा शोभेची गोष्ट नाही. ती एक प्रबुध्द, जागृत करणारी कृती आहे. दुसर्‍या शब्दात सांगायचं झालं तर, आर्ट हे स्वातंत्र्य मिळवून देणारं तंत्र आहे.
५)  कलेसाठी तंत्रावर संपूर्ण प्रभुत्व आवश्यक आहे.
६)  कलेतलं प्रावीण्य हे व्यक्तीमधल्या शरीराच्या जडणघडणीला फुलवणारी आहे, ही कला आपल्यात शून्यातून निर्माण होते. पुढे त्याचा परिणाम आत्म्याला प्रगल्भ बनवतो.
७)  कला ही मानवी जीवनाला परिपूर्ण आणि आवश्यक असणारी वाट आहे. तसंच यातून मानसिक गुंता, ताणतणाव कमी होतो. कला हे चैतन्य आहे.
८)  सराव माणसाला परिपूर्ण बनवतो.
९)  माणूस जेव्हा कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यातच खूप वेळ घालवत असेल, तर ती गोष्ट कधीच मिळू शकणार नाही.
१०)  जसा तुम्ही विचार करता तसं तुम्ही बनत जाता.

हेही वाचा: दोस्तांनो, आज सायकल डे, मग पुन्हा एकदा सायकल चालवूया?

ब्रुस लीच्या तत्त्वज्ञानाने जगाला मार्शल आर्ट्स कलेची खरी ओळख करून दिली. त्याच्या याचं तत्त्वज्ञानातून तो आपल्याबरोबर आहे. जसं कच्चा फणस कापताना हाताला तेल लावून घेतलं जातं. नाहीतर त्याचं दुध किंवा चीक हाताला चिकटेल म्हणून आपण सावगिरी बाळगून तेल लावतो. अशाच प्रकारची ब्रुस लीची फिलॉसॉफी आहे. आपण जर त्याची फिलॉसॉफी फॉलो करत असाल तर आपल्याला भीती, नकारात्मक विचार, मानसिक त्रास, अंधश्रध्दा होणार नाही.

२० जुलै १९७३ या दिवशी ब्रुस ली नामक दैदिप्यमान तार्‍याचा अस्त झाला. औद्योगिक क्रांतीनंतर येणारं नवनवीन तंत्रज्ञानामुळे मार्शल आर्ट्ससारखे युद्धप्रकार नष्ट होण्यास सुरवात झाली होती. पण ब्रुस लीने मार्शल आर्टसमधे केलेलं कार्य आणि नवीन संशोधन यामुळे मार्शल आर्ट्सला जणूकाही जीवनदानच मिळालं. त्याच्या सारखंच तरूण वर्गाने व्यसनाधीनतेकडे न वळता आत्मीयतेने आणि कष्टाने अभ्यास करून त्यात पारंगत होणं हीच आपल्या सर्वांच्या लाडक्या ब्रूस लीला श्रध्दांजली ठरेल.

हेही वाचा: 

पावसाळ्यात पुण्या-मुंबईतल्या इमारती पत्त्याच्या डावासारख्या का कोसळतात?

रशियन फेसअॅपवर फोटो एडिट करताय. मग आपण सावध राहिलं पाहिजे

सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणं ही खरंच मिरवण्याची गोष्ट आहे?

क्रिकेटच्या देवानेही विल्यम्सनला कॅप्टन म्हणून निवडलं, कारण