मृत्यूला तटस्थपणे सामोरं जायला शिकवतं बुद्ध तत्त्वज्ञान

२६ मे २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


आपल्या अस्तित्वाबद्दलची जवळची गोष्ट म्हणजे मृत्यू. कोरोनाच्या काळात तर आपण अनेक मृत्यू अनुभवतोय. मृत्यू अटळ आहे, तो निश्चित आहे आणि तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो, असं एका बुद्ध वचनात सांगितलंय. बौद्ध धम्मात मृत्यूविषयी वास्तववादी तत्त्वज्ञान मांडलंय. मृत्यू जागरूकता आणि मृत्यू साक्षरता हे बौद्ध धम्माचं खास वैशिष्ट्य आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी समजून घ्यायलाच हवं.

कोरोनाच्या लाटेनं जगातल्या अनेक महान व्यक्तींबरोबरच सर्वसामान्य लोकही मृत्यूमुखी पडतायत. गरीब मरतायत तसंच प्रचंड पैसा हाती असूनही बेड, ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे श्रीमंत लोकही मरतायत. सगळेच हवालदिल झालेत. उगवणारी सकाळ असो किंवा रणरणती दुपार किंवा अगदी रात्रीची करूण शांतता असू दे. मृत्यूच्या बातम्या लोकांच्या मनात भीती पसरवतायत. अशा कठीण काळात बौद्ध साहित्यातलं मृत्यूविषयक चिंतन निराश मनाला उभारी देणारं आहे.

मृत्यू माणसाने निर्मिलेली गोष्ट. त्यात नैसर्गिक असं काहीच नाहीच या आशयाचं कवी वाय. बी. यिटस् यांचं 'मृत्यू माणसाने बनवलाय' हे वाक्य फारच उद्बोधक आहे. याचा अर्थ आजचं मृत्यूबाबतचं मत मानवनिर्मित आहे, असा होतो. मृत्यूविषयक नैसर्गिक गोष्टींची स्पष्टता आपल्याला नाही. बौध्द धम्मातल्या मृत्यू विषयीच्या संकल्पना मात्र अगदी वेगळ्या आणि विज्ञानाला सुसंगत आहेत. आज बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी हे मांडणं महत्त्वाचंय.

हेही वाचा: वाचा धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण

मृत्यू सुंदर आहे?

धम्मात मृत्यूला मृत्यू म्हटलं जात नाही. तर त्याला ‘परिनिर्वाण’ असा शब्द दिलाय. हे परिनिर्वाण मृत्यूच्या संकल्पनेसारखं अजिबात नाही. मृत्यू विषयीचं आजचं मत ईश्वरवादी लोकांनी आणि पुरोहितांनी धर्मग्रंथांत लिहून आपल्या मनावर बिंबवलंय. त्याचा फार विपर्यासही झालाय. त्यांच्या मते, आपलं पृथ्वीवरचं आयुष्य हे खरं जीवन नाही. आपलं मृत्यूनंतरचं जगणं हे चिरंतन, अमर आहे. असं जीवन मिळवण्यासाठी आपण दानधर्म, तीर्थ पर्यटन, व्रतवैकल्यं आणि देवपुजा यासाठी पृथ्वीवरचं आयुष्य वापरलं पाहिजे.

बौद्ध विचारधारेत मात्र अगदी विरुद्ध दृष्टिकोन सांगितलाय. पृथ्वीवरचं जीवन हेच खरं आणि ते सुंदर करण्यासाठी प्रत्येकाने झटलं पाहिजे, असं बौद्ध तत्त्वज्ञान सांगतं. बौद्धांच्या मते, जन्म सुंदर आहे. आसक्तीमुक्त जीवन जगून, आयुष्य पूर्णत्वाला नेऊन, आपण कृतार्थ जीवन जगू शकलो तर येणारा मृत्यूही सुंदर असतो. ‘जन्म सुखकर आहे! मृत्यू सुंदर आहे!’ हीसुद्धा बुद्ध वचनच आहेत. या दोन्ही वचनात भरपूर भावार्थ दडलाय.

आपण अस्तित्वात येतो ते जन्मामुळे. आपण अस्तित्वातून विलुप्त होतो तो परिनिर्वाणाच्या माध्यमातून. जन्म सुखकर, आनंददायी हे ठीक आहे. पण परिनिर्वाण सुंदर कसं? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. ‘परिनिर्वाण सुंदर आहे!’ हे वचन बुद्धांनी     स्वतःच्या परिनिर्वाणवेळी उच्चारलं होतं. महापरिनिर्वाण सुक्तात त्याचा उल्लेख आलाय. आसक्तीमुक्त, करूणामय, मुक्त हृदय लाभलेली, कृतार्थ आयुष्य जगलेली, आयुष्यात परिपुर्णता मिळवलेली बुद्धांसारखी महासुंदर माणसंच असं म्हणू शकतात.

मृत्यूचं सौंदर्यशास्त्र

परिनिर्वाण हे परिपूर्ण आयुष्य जगलेल्या, आपलं आयुष्य अनेक बाजूंनी सुंदर करणाऱ्या थोर माणसालाच सुंदर वाटतं. सामान्यांना नाही. दुष्टांना तर तसं अजिबात वाटणार नाही.‌ कितीही आयुष्य जगूनही, आयुष्याचे सगळे भोग भोगूनही काही माणसं अतृप्तच राहतात. अशी आसक्तीत अडकलेली माणसं मृत्यूला नाखुशीनेच सामोरी जाणार.

दुसऱ्यांचे श्रम शोषून जगणारे दुष्ट आयुष्य, दोषपूर्ण जीवन जगतात. त्यांना समोर मृत्यू दिसला की दुःख होणारच. आपण अतिशय वाईट आयुष्य जगलो, लोकांना अतोनात त्रास दिला याची बोच लागून अगदी दुःखी मनानं ते मृत्यूच्या भक्षस्थानी पडतात. अशा लोकांचे मृत्यू सुंदर कसे होतील?

जन्म सुंदर आणि परिनिर्वाणही सुंदर हा दृष्टिकोन तेव्हाच येतो जेव्हा या दोन अवस्थांच्या मधे असलेलं आपलं आयुष्य सुंदर असतं. खरंतर, हे आयुष्य कुरूप म्हणावं असंच असतं. ते दुःखांनी भरलेलं असतं. पण त्याला जाणीवपूर्वक आणि प्रयत्नाने सुंदर करायचं अशी जाणीव निर्माण होणं, हीच मानवी सुंदरता आहे. त्यातच खरी उत्कटता आहे.

जन्म आणि मृत्यू यामधलं जगणं सुंदर करण्यासाठी शिस्तबद्धपणे, नाजूकपणे झटावं लागतं. हे जग सुंदर करण्यासाठी झटलं पाहिजे, हे सांगणारी विचारधारा म्हणजे बौद्ध विचारधारा. या जाणिवेत, या सम्यक भानात मृत्यूचं सौंदर्यशास्त्र लपलंय. ते शोधणं, घडवणं आणि तृप्त मनाने या जगाचा निरोप घेणं ही सुंदरताच आहे.

हेही वाचा: बुद्ध विचारात सर्वसामान्यांना आपलंसं वाटणारं लोकशाहीवादी तत्त्वज्ञान

परिनिर्वाण म्हणजे रूपांतरण

बौद्ध असं मानतात की, चार भौतिक स्कंध आणि एक चित्त स्कंध यांचं एकत्र येणं म्हणजे एखाद्या जीवाच्या अस्तित्वाचा जन्म होणं. तर त्या एकत्रित स्कंधांचं एकमेकांपासून विलग होणं म्हणजे परिनिर्वाण.

परिनिर्वाणात सगळंच नष्ट होत नाही. परिनिर्वाणानंतर आपल्या अस्तित्वाचे भौतिक घटक सृष्टीच्या भौतिक घटकामधे मिसळतात आणि चित्ताचे घटक त्यांच्या चैतसिक घटकात, चैतन्याला जाऊन मिळतात. याचा अर्थ ते नष्ट होत नाहीत. तर फक्त रूपांतरित होतात. परिनिर्वाणानंतर काही कालांतराने आपलं अस्तित्व नजरेआड होतं. पण आपलं अस्तित्व ज्या घटकांमुळे अस्तित्वात येतं ते मात्र नष्ट होत नाही.

ईश्वरवादी विचारधारा आपल्या अस्तित्वासाठी ईश्वर आणि आत्म्याची आवश्यकता मान्य करतात. त्याशिवाय जन्म आणि मृत्यू या गोष्टी शक्य नाहीत, असं त्यांचं म्हणणं असतं. पण बौद्ध विचारधारा ईश्वर आणि आत्म्याचं अस्तित्वच नाकारतात. त्यामुळे बौद्ध विचारसरणीत अमर, चिरंतन, अविनाशी असा आत्मा नाही. तिथं आत्म्याचं ईश्वराशी मिलन होत नाही. त्यामुळे आत्म्याची मुक्ती करायला तिथं काहीच कर्मकांड लागत नाही. ईश्वर नाकारला असल्याने ईश्वर पूजा, आराधना, तिर्थयात्रा, व्रतवैकल्यं असं काहीच इथं करायला लागत नाही.

युद्धातले कुरूप मृत्यू

जन्म आणि मृत्यूच्या मधलं जीवन सुंदर करण्यासाठी झटलं पाहिजे ही विचारधारा आणि त्यावर आधारित आचारसंहिता ही बौद्धांनी या जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी आहे. बौद्ध मृत्यूनंतरचं जीवन मानत नाहीत. या पृथ्वीवरचं आपलं जीवन हे खरं जीवन आहे. हे जीवन दुःखाने भरलंय. या जगात असलेलं दुःख माणसामुळेच तयार झालंय. तसंच ते सृष्टीमुळे, समष्टीमुळे आणि समाजामुळेही निर्माण झालंय. त्यामुळे हे दुःख नष्ट करायला एकटा व्यक्ती पुरेसा नाही तर त्यासाठी सगळ्या समाजाने झटलं पाहिजे.

याच न्यायाने मृत्यूचं कारण स्वतः व्यक्तीही असू शकते. किंवा समाजाने निर्माण केलेल्या सदोष व्यवस्थेमुळे किंवा राज्यव्यवस्थेच्या प्रणालीमुळेही मृत्यू होऊ शकतो. लोकांचे अवेळी, अकाली मृत्यू होऊ नयेत म्हणून प्रत्येक व्यक्तीने, समाजाने, राज्याच्या व्यवस्थेने प्रामाणिकपणे आणि प्राणपणाने झटलं पाहिजे. आपलं अस्तित्व निरोगी, चिंतारहीत, आनंदी व्हावं यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले तर जन्म आणि मृत्यू यामधलं सगळ्यांचंच जगणं सुखी होईल, सुंदर होईल! हा शोध महत्वाचा शोध आहे.

त्याप्रमाणे काम करणं, त्यासाठी झटणं हेच बौद्ध विचारधारेचं सौंदर्यशास्त्र आहे. या सौंदर्यशास्त्रात जन्मामुळे अस्तित्व आकाराला येतं म्हणून त्याला सुंदर म्हटलंय, असं नाही. मृत्यूमुळे जीवन संपतं म्हणून त्याबद्दल कटुताही नाही, त्रागा नाही, कलुषित भावना नाही. मृत्यूला सुंदर ठरवणं ही मानवी मनाची सर्वोच्च सुंदरता आहे.

अर्थात खून, युद्धातली हिंसा यांचा धिक्कार बौद्ध विचारधारा करतेच. अशा प्रसंगातून झालेले मृत्यू हे कुरूप मृत्यू आहेत. आत्ताचे कोरोनामुळे झालेले मृत्यूही कुरूप आणि वेदनादायी आहेत. असे मृत्यू टाळण्यासाठी व्यक्ती, समाज आणि सरकारी यंत्रणा यांनी प्रयत्न केलेच पाहिजेत.

हेही वाचा: धम्मदीक्षा समारंभात मध्यरात्री कूठून आणली बुद्धमूर्ती?

मृत्यूच्या जातक कथा

जिवलग व्यक्तीचा मृत्यू झाला की माणसं शोकात बुडून जातात. रात्रंदिवस शोक करत बसतात. अन्नपाण्याचा त्याग करतात किंवा जेवणाची अबाळ करून शरीराला कष्ट देतात. हे करणं पूर्णपणे निष्फळ आहे, असं बौद्ध धम्म बजावतो. तथागत बुद्धांनी मृत्यूनंतरचा शोक हा जन्म आणि मृत्यूच्या अज्ञानातून निपजतो, असं निःसंदिग्धपणे सांगितलंय.

बुद्धांचं परिनिर्वाण होणार आहे हे कळताच भन्ते आनंद अत्यंत दुःखी होतात. त्यावेळी बुद्ध आनंदाजवळ आपली नाराजी व्यक्त करतात आणि वर सांगितलेली भावना व्यक्त करतात. जिथं जन्म आहे तिथं परिनिर्वाण असणारच, असं मार्गदर्शन करतात. याच भावनांचा पुनरुच्चार करणाऱ्या अनेक जातक कथा बौद्ध साहित्यात उपलब्ध आहेत.

'गेलेल्यांचा शोक व्यर्थ आहे' हा संदेश देणारे 'मतरोदक जातक' असो. शोकापासून निवृत्त करणारे उपाय सांगणारे सुजात जातक असो. तसंच 'प्राण खर्ची घालून अनुयायांना सुखी करावं’ म्हणजेच प्रसंगी मृत्यू पत्करून जबाबदार व्यक्तीनं लोकांचं मरण थोपवलं पाहिजे, त्यांना सुखी केलं पाहिजे, हा संदेश देणारे 'महाकपी जातक' असो ही काही कथांची प्रातिनिधिक उदाहरणं आहेत.

शोकाला पर्याय कोणता?

पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे 'दशरथ जातक'. शोक करण्याने काही लाभ होत नाही, हे सांगणारं हे जातक अभ्यासण्यासारखं आहे. या जातकाचं मुख्य पात्र राम आहे. शोक करणं व्यर्थ आहे याबद्दल जागृती करताना राम नावाचं पात्र म्हणतं, ‘माणसाने खूप शोक केला तरी ज्याला वाचवणं शक्य नसतं त्याच्यासाठी जाणत्या मेधावी माणसाने स्वतःला ताप का करून घ्यावा? तरूण असो किंवा वृद्ध, अज्ञानी असो किंवा पंडित, श्रीमंत असो किंवा दरिद्री, सगळे मरण पावतात. पिकलेल्या फळांना खाली पडण्याची सतत भीती असते, त्याप्रमाणे जन्माला आलेल्या प्राण्याला मरणाचं भय नेहमी असतं.’

‘सकाळी पाहिलेल्या अनेकांपैकी काहीजण संध्याकाळी दिसत नाहीत, तर संध्याकाळी पाहिलेल्या अनेक जणांपैकी काहीजण सकाळी दिसत नाहीत. शोक केल्यामुळे काही लाभ होणार असेल, तर शहाण्या माणसाने स्वतःला त्रास देत शोक करावा. पण स्वतःच स्वतःला त्रास दिल्यामुळे माणूस कृश होतो, निस्तेज होतो. पण त्यामुळे मरण पावलेले जगत नाहीत. म्हणून शोक व्यर्थ आहे.' असंही राम पुढे म्हणतो.

एवढं सांगून झाल्यावर शोकाला पर्यायही हे जातक देतं. ते म्हणतं, 'कर्तव्य जाणणारा मी दान देईन, उपभोग घेईन, बांधवांचे भरणपोषण करीन आणि इतरांचे पालन करीन.' मृत्यूबोध हा आवश्यक बोध आहे. मृत्यू निश्चित असेल तर आपल्याला मिळालेलं आयुष्य सुंदरपणे जगता आलं पाहिजे. तरच मृत्यूला तटस्थपणे सामोरं जाता येईल.

हेही वाचा: 

महाड ते वर्साय, फ्रेंच राज्यक्रांती ते भारतीय राज्यघटना, व्हाया ५ मे

गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कूळकथा

पायपीट करत काश्मीरमधला कर्फ्यू टिपणाऱ्या या तिघांना पुलित्झर मिळाला

मराठ्यांना रोखण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या गोळवलकरांना बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं?