कामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित

२५ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळासह २६-२७ नोव्हेंबरला पुन्हा एकदा गुवाहटीला जाणार आहेत. मातृपक्ष शिवसेनेतून केलेली बंडखोरी यशस्वी झाल्याबद्दल, माता कामाख्यादेवीचा नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री जातायत. कामाख्यादेवीचं हे मंदिर योनीरूपात देवीची पूजा करणारं महत्त्वाचं शक्तीपीठ आहे. त्याबद्दल समजून घेणं, स्वतःला समृ्द्ध करणारं ठरू शकेल.

गेले काही महिने बातम्या पाहणाऱ्या मराठी माणसानं, आसाममधल्या गुवाहटी या शहराचं नाव अनेकदा ऐकलं असेल. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्रातून गुवाहटीत पोचले. तिथं त्यांच्या पंचताराकिंत वास्तव्याबद्दल जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा त्यांच्या देवीदर्शनाचीही झाली. गुवाहटीतल्या प्रसिद्ध माता कामाख्यादेवीला त्यांनी साकडं घातलं होतं.

आता हा नवस फेडण्यासाठी ते सर्व आमदार पुन्हा एकदा देवीदर्शनाला जाणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कामाख्यादेवी चर्चेत आली आहे. सत्तेचं गणित साधणारी ही देवी, हे भारतातलं अनोखं तीर्थस्थान आहे. कारण, लज्जागौरीच्या रुपात म्हणजे स्त्रीयोनीच्या रुपात इथं देवीची पूजा होते. एकीकडे लैंगिकतेबद्दल अजूनही झापडबंद दृष्टिकोन असलेल्या आपल्या देशात हे स्थान समजून घेणं, खूप महत्त्वाचं आहे.

हेही वाचा: मुलीच्या मासिक पाळीने देवाचं ब्रम्हचर्य भ्रष्ट होईल?

स्त्रीयोनीची पूजा कशासाठी?

आसामच्या नीलांचल टेकडीवर कामाख्या देवीचं मंदिर असून, राजधानी दिसपूरपासून साधरणतः १४ किलोमीटर अंतरावर आहे. देशभर असलेल्या देवीस्थानापेक्षा हे स्थान वेगळं यासाठी की, इथं गाभाऱ्यात देवीची कोणतीच मूर्ती स्थापित केलेली नाही. त्याऐवजी मधोमध छेद असलेला सपाट दगड देवीच्या योनीचं प्रतिनिधित्व करतो.

स्त्रीच्या योनीला जीवनाचं प्रवेशद्वार मानलं जातं, यामुळेच कामाख्याला सर्व सृष्टीचं केंद्र मानलं जातं. एवढंच नाही तर स्त्रीयोनीरुपात हे स्थान असल्यानं, इथं स्त्रीच्या सृजनशीलतेची ओळख असलेली मासिक पाळीही देवीला येते. जगाची आई, जगज्जननी स्वरूपात मांडलेली ही देवीपूजा म्हणूनच महत्त्वाची आहे. देशात जी ५१ शक्तिपीठं मानली जातात. त्यात कामाख्यादेवी हे महापीठ म्हणून ओळखलं जातं.

दक्ष प्रजापतीच्या वागण्याने क्रोधित होऊन देवी सतीने आपलं शरीर अग्नीला अर्पण केलं. त्यामुळे भगवान शंकर इतके क्रोधित झाले की, देवी सतीचा मृतदेह खांद्यावर घेऊन तांडव केलं. या तांडवात विश्वाचा संहार होऊ नये म्हणून, श्रीविष्णूंनी सुदर्शनचक्रानं सतीचे तुकडे केले. त्यातला सतीचा योनीभाग कामाख्यात पडला, अशी आख्यायिका सांगितली जाते.

पाळीचा उत्सव करणारं देवस्थान

कामाख्या देवीच्या मंदिरातला आंबुवाची उत्सव हा सर्वात मोठा उत्सव आहे. हा देवीच्या मासिक पाळीचा उत्सव आहे. दरवर्षी २२ ते २६ जून या काळात देवीला पाळी येते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या काळात देवीला सुट्टी असते. देवीदर्शन बंद असतं. २६ तारखेला स्नान झाल्यावर देवीदर्शन पुन्हा सुरू होतं. पण, तेव्हा दिला जाणारा प्रसाद फार वेगळा आणि दृष्टिकोन बदलणारा आहे.

साधारणतः आपल्याकडे स्त्रियांच्या मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावाकडे चांगल्या भावनेनं पाहिलं जात नाही. पण, कामाख्या देवीच्या मासिक पाळी दरम्यान तिथं ठेवलेल्या वस्त्राचा रंग लाल होतो, असा समज आहे. या कपड्याचे तुकडे प्रसाद म्हणून वाटले जातात. या वस्त्राची पूजा केली तर घरात भरभराट होते, अशी भाविकांची भावना आहे.

दरवर्षी जून महिन्यात होणाऱ्या या उत्सवासाठी देशभरातून आणि आता जगभरातूनही लाखो लोक येतात. बंगाल आणि बिहार या भागातून आलेल्या आंब्यांनी आणि टपोऱ्या झेंडूच्या फुलांनी परिसर सजवला जातो. देवीची गाणी, वाद्यांचा आवाज सगळ्या वातावरणात भरलेला असतो. मंदिराला कुलूप लागलं की बाहेर देवीची मासिक पाळी सेलिब्रेट करण्यासाठी अंबुवाची उत्सव सुरू होतो.

हेही वाचा: मासिक पाळीविषयी आपल्या मुलामुलींशी कसं बोलायचं?

लज्जागौरी आणि कामाख्या

'लज्जागौरी' रुपात देवीची पूजा भारतात आणि जगभरात अनेक ठिकाणी होते, असा अभ्यास अनेकांनी केला आहे. लोकसंस्कृतीचे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांनी लिहिलेल्या 'लज्जागौरी' या पुस्तकामुळे मराठीतही या विषयी खूप चांगली माहिती लोकापर्यंत पोचली. आदिवासी जमातीपासून ते नागरी लोकांपर्यंतच्या पूजापद्धतीमधे शक्तिपूजा कशी होते, याचा आलेख त्यांनी मांडलाय.

'लज्जागौरी' या प्रतिकाचा उलगडा हाच या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. शिरोविहीन नग्न स्त्री म्हणजे ‘लज्जागौरी’. निर्मितीशी संबंधित तिच्या स्तन आणि योनी या दोन मुख्य अवयवांची पूजा प्राचीन मानव शेकडो वर्ष करत आला आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात ठिकठिकाणी अशा मूर्ती आढळल्या आहेत. भारतीय संदर्भात या मूर्तींची आणि त्यांच्या उपासनेतली प्रतीकात्मकता ढेरे यांनी अत्यंत सूक्ष्मतेनं उलगडली आहे.

पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची महामाता ही आपल्या पूर्वजांना कशी दिसली, तिची उपासना त्यांनी कशी केली याचा हा शोध आहे. त्यात त्यांनी आसाममधल्या ‘कामाख्या’ या योनीरूप देवीचा उल्लेख केला आहे. साधरणतः नागर संस्कृतीला न शोभणारी ही देवी, तिच्या उपासनेमुळे सर्वमान्य ठरते. तसंच ती त्यातून नवा दृष्टिकोन कसा देते, हे त्यांनी फार अभ्यासाने मांडलंय.

आंबुवाची उत्सव सृजनाचा सोहळा

'लज्जागौरी' या पुस्तकात ढेरे म्हणतात की,  'कामाख्या देवीची मासिक पाळी म्हणजे खरंतर पृथ्वीची, धरणीची मासिक पाळी असल्याचं म्हटलंय. पाऊस पडू लागला की पृथ्वीला नवी पालवी फुटत असते. अन्नाचा गर्भ वाहण्याची क्षमता तिच्यात विकसित होते. त्यामुळे आंबुवाची सणाचा शेती संस्कृतीशीच संबंध आहे.'

आंबुवाचीचा शेतीशी असणारा संबंध दाखवून देताना कृषीशास्त्रीय ग्रंथातला एक श्लोक ढेरेंनी उदाहरण म्हणून दिलाय. मूळ संस्कृत श्लोकाचा अर्थ असा की, द्यौ म्हणजे सूर्य हा पुरुष आहे. धरणी ही नारी आहे. या द्यौकडून आलेले पावसाचे थेंब हे बीज आहे. द्यौ, धरणी आणि पावसाचे थेंब यांच्या संयोगातून धान्य येतं.

ढेरे लिहितात, ‘वर्षाच्या प्रारंभकाळात अंतरी ओलावलेल्या धरणीचे रूप रजस्वलावस्थेच्या धारणेने स्वीकारले जाणे स्वाभाविक आहे. मृगाच्या धारांत चिंब झालेली धरणी आद्रेच्या प्रारंभकाळात अंतरी पुरेशी आर्द्र होते आणि त्यानंतच ती नवसर्जनाचा गर्भ वाहू शते. धरणीची ही गर्भधारणक्षम आर्द्रता आंबुवाची या संज्ञेने अभिव्यक्त झाली आहे.’ म्हणूनच आसाममधे आंबुवाची उत्सव सुरू असताना जमिनीवरुन नांगर फिरवणं, बीज लावणं पाप मानलं गेलंय. बीज लावलंच तरी चांगलं पीक येत नाही, अशी तिथल्या लोकांची धारणा आहे.

हेही वाचा: साथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते!

पाळीबद्दलचा दृष्टिकोन बदलायला हवा

स्त्रियांच्या पाळीबद्दल एवढी उदात्त परंपरा असतानाही, आपल्याकडे आजही या दिवसांबद्दल फारच विकृत दृष्टिकोन आहे. सृजनाचा सोहळा असलेल्या या दिवसांकडे अनेक सुशिक्षित घरात, परंपरेच्या नावाखाली अस्पृश्यतेच्या दृष्टिनं पाहिलं जातं. हा दृष्टिकोन बदलण्याची प्रेरणा तरी कामाख्यासारख्या मंदिरातून प्रत्येकानं घ्यायला हवी.

एकतर मासिक पाळी येते म्हणजे आपल्या शरीरात काही वेगळं घडतंय या भावनांनी मुलगी गोंधळून गेलेली असते. त्यातच एकीकडे पहिल्या मासिक पाळीचा उत्सव करुन, सण साजरा करून तिचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. तरीही मासिक पाळी मुलींना शाप वाटतो. स्वतःच्याच शरीराविषयी घाणेरडेपणाची भावना निर्माण करणारी बंधनं या काळात मुलींना पाळावी लागतात.

या प्रक्रिेयेकडे फक्त एक शारीरिक प्रक्रिया म्हणून पाहायला शिकलं पाहिजे. त्यासाठी सॅनिटरी पॅडपासून मॅन्स्ट्रुएशन कपपर्यंतच्या अनेक साधनांबद्दल खुलेपणानं बोललं गेलं पाहिजे. अशा दिवसात होणाऱ्या मूड स्विंगकडे संवेदनशीलपणे पाहता आलं पाहिजे. हे जेवढं महिलांसाठी आहे, तेवढंच ते पुरुषांसाठीही आहे, याची जाणीव होणं, हाच कामाख्यादेवीच्या रक्तवर्णी कपड्याच्या प्रसादाचा अर्थ आहे.

सत्तेचं गणित साधणारं शक्तीपीठ

कामाख्या मंदिर तंत्रविद्येसाठीचंही स्थान प्रख्यात असून, तांत्रिकांची काशी म्हणूनही हे स्थान ओळखलं जातं. आंबुवाची उत्सवकाळात देशाततले तसंच बांगलादेश, तिबेट, आफ्रिका इथूनही अनेक तांत्रिक इथं तंत्रविद्येची दीक्षा घेण्यासाठी येतात. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, लोनाचमारी, इस्माईल जोगी या सगळ्यांनी याच कामाख्यामधून सिद्धी प्राप्त केली असं सांगतात. या ख्यातीमुळेच तांत्रिक सिद्धीसाठीही इथं येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे.

या सिद्धी मिळण्याच्या खात्रीमुळेच अनेक आशा आकांक्षा घेऊन भाविक इथं येतात. दरवर्षी करोडो लोक  माता कामाख्यादेवीच्या दर्शनाला येतात. आंबुवाची उत्सवाच्या वेळी तर होणाऱ्या गर्दीचे आकडे वाढतच आहेत. देवीचं हे अनोखं रुप, इथल्या परंपरा यामुळे या देवीबद्दल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही लेखन होत आहे. त्यामुळेच ज्ञानवंतांपासून श्रद्धावंतापर्यंत आणि सामान्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनाच सिद्धी देणारी देवता म्हणून कामाख्यादेवी ओळखली जाऊ लागलीय.

अशा सिद्धी देणाऱ्या देवीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा जाणार आहेत. त्यांच्या या जाण्यानं महाराष्ट्रातल्या आयाबहिणींना महिन्यातून चार दिवस भोगावं लागणारं दुःख कमी झालं, तरी खूप काही साध्य होईल. नाहीतर, राजकीय यात्रा तर पेपरमधला फोटो रद्दीमधे गेला की संपून जाते. त्यानिमित्तानं का होईना, महाराष्ट्राला 'कामाख्या' कळावी एवढीच तिच्या चरणी प्रार्थना.

हेही वाचा: 

लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?

मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याच्या निर्णयाचं आपण स्वागत करायला हवं?

राधिका सुभेदार सांगते, मासिक पाळीविषयी गुप्तता नको स्वच्छता बाळगा

बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार