काँग्रेस गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष निवडण्याची रिस्क का घेत नाही?

१३ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


काँग्रेसने पुन्हा एकदा ७२ वर्षांच्या सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रं दिलीत. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसने सोनिया गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. या निवडीतून काँग्रेसने रिस्क न घेण्याचा मध्यममार्गी तोडगा काढलाय.

शेवटी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा तोडगा निघाला. पण या तोडग्याने ना टाळ्या वाजल्या ना कुणाला धक्का बसला. कारण काँग्रेसमधल्या जुन्या जाणत्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना हंगामी अध्यक्ष करून ठंडा कर के खाओ हा मध्यम मार्ग काढलाय. गांधी घराण्याबद्दल नाराजीचा सूर असल्याचं बोललं जाताना काँग्रेसने मात्र सध्यातरी गांधी हाच आपला पर्याय असल्याचं स्पष्ट केलंय. या निवडीबद्दल काहीजण आश्चर्यही व्यक्त करताहेत.

कशी झाली ही निवड?

दहा ऑगस्टला काँग्रेस वर्किंग कमिटी अर्थात सीडब्ल्यूसीची दोनदा मिटिंग झाली. सकाळच्या मिटिंगनंतर सीडब्ल्यूसीने सल्लामसलतीसाठी पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि ईशान्य असे पाच गट केले. यामधे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय सचिव, विधिमंडळ नेते, खासदार आणि अन्य पदाधिकारी यांची प्रदेशवार विभागणी करण्यात आली. या गटांनी पुन्हा एकदा राहुल गांधींनीच अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारावीत, असा आग्रह केला. त्यांनी पुन्हा नकार दिला. त्यामुळे सोनिया गांधींकडे तात्पुरत्या काळासाठी अध्यक्षपदाची सूत्रं देण्यात आली.

याआधी १४ मार्च १९९८ ते १६ डिसेंबर २०१७ अशी २० वर्षे सोनिया गांधी यांनी अध्यक्ष म्हणून काम केलंय. अंतर्गत लाथाळ्यांनी संकटात सापडलेल्या काँग्रेसला सोनिया गांधींमुळे नवी दिशा मिळाली. दोन दशकांच्या त्यांच्या कारकीर्दीत पक्षाने १० वर्षे केंद्रात सत्ता उपभोगलीय. 

अध्यक्षपदासाठी मुकुल वासनिक, सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जून खर्गे, अशोक गेहलोत, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट यासारख्या ज्येष्ठ तसंच तरुण नेत्यांची नावं चर्चेत आली. काहींनी प्रियंका गांधींचंही नाव घेतलं. लोकसभेतल्या पराभवानंतर २५ मेला काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली. त्यावेळी राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण अडीच महिन्यांनी १० ऑगस्टला त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला.

हेही वाचाः राहुल गांधींचा अख्खा राजीनामा समजून घ्या ८ पॉईंटमधे

सोनियांची निवड कशामुळे?

नवा अध्यक्ष निवडण्यासाठी दोन प्रकारची नावं चर्चेत आली. एका प्रकारात होते ज्येष्ठ तर दुसऱ्यात होते तरुण. या दोन गटांमुळे काँग्रेसमधले अंतर्गत हेवेदावे समोर आले. हे दोन गट सोनिया काँग्रेस आणि राहुल काँग्रेस म्हणूनही दिल्लीच्या वर्तुळात ओळखले जातात. या दोन्ही गटांना मान्य होईल, असा चेहरा अध्यक्षपदासाठी देणं शक्य नाही, ही गोष्ट सोनिया गांधींच्या निवडीतून स्पष्ट झालीय.

आता सोनिया गांधींसमोर तरुण आणि अनुभवी नेत्यांमधे समन्वय साधण्याचं मोठं आव्हान आहे. त्यासाठीच काँग्रेसने हे पाऊल उचललंय, असं द क्विंटने आपल्या रिपोर्टमधे म्हटलंय. राहुल गांधींच्या नेतृत्वात काम करणाऱ्या तरुणतुर्कांना सोनिया गांधींसोबत काम करण्यात कुठली अडचण असणार नाही. आणि अनुभवी नेत्यांना सोनिया यांच्या नेतृत्वात काम करण्याचा मोठा अनुभव आहे.

सीडब्ल्यूसीच्या बैठकीला उपस्थित असलेल्या एका नेत्याने द क्विंटशी बोलताना सांगितलं, 'खूप विचारांती सोनिया गांधींना अध्यक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पक्षातल्या नेत्यांसोबतच विरोधी पक्षांनाही एका छत्राखाली आणण्याची क्षमता असलेल्या त्या एकमेव लीडर आहेत.'

शेवटी गांधीच का?

द फ्री प्रेस जर्नलचे राजकीय संपादक प्रमोद चुंचूवार म्हणाले, ‘माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळातच काँग्रेसमधे उभी फूट पडली. काँग्रेस आय आणि काँग्रेस एस असे दोन भाग झाले. काँग्रेस आयचं नेतृत्व स्वतः इंदिरा गांधींकडे होतं, तर दुसऱ्या गटामधे यशवंतराव चव्हाणांसारखे देशभरातले बडे नेते होते. यानंतरच्या निवडणुकीत केंद्रात आय काँग्रेसची सत्ता आली. यातून लोकांनी एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं. ते म्हणजे, गांधी घराण्याची काँग्रेसच खरी काँग्रेस आहे.’

सध्या मात्र याउलट परिस्थिती आहे. गांधी घराणं काँग्रेसला सोडू पाहतंय पण काँग्रेसला गांधी घराणं हवंय. कारण आता काँग्रेसमधे स्वतःचा प्रभाव असलेला कुणी नेता नाही. सगळं खुज्या लोकांचं संघटन आहे. त्यामुळे कुणीही कुणाच्या नेतृत्वात काम करायला तयार नाही. हे सगळे जण गांधी घराण्याच्या नेतृत्वातच एकवटू शकतात. गेल्या अडीच महिन्यातल्या घडामोडी बघितल्यास गांधी घराणं नेतृत्वाच्या ठिकाणी नसेल तर आपण एकत्र राहू शकत नाही, या वास्तवाचं भान त्यांना आहे, असंही चुंचूवार सांगतात.

हेही वाचाः गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचं चांगभलं होईल?

गांधी घराणं मजबुरीही आणि मजबुतीही

सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना आजही गांधी घराण्यातला माणूसच अध्यक्ष हवाय. गांधी घराण्याशिवाय काँग्रेस अशी कल्पनाच ते करू शकत नाहीत. देवळात देव पाहिजे, बाकीचं काय करायचं, ते आम्ही ठरवू तसंच गांधी घराण्याची अवस्था काँग्रेसमधे झालीय. गांधी घराण्यामुळेच काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांना स्फुरण चढतं.

चुंचूवार सांगतात, राहुल गांधींनी राजीनामा देऊन मी नसेल तर काँग्रेस संघटनेचं काय होऊ शकतं, हे दाखवून दिलंय. राहुलला काँग्रेसची जेवढी गरज आहे, त्यापेक्षा जास्त काँग्रेसला राहुलची गरज आहे. गांधी घराणं ही काँग्रेसची मजबुरीही आहे आणि मजबुतीही आहे. गांधी घराणं हा काँग्रेसचा डीएनए आहे. दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या करता येत नाहीत, हे सोनिया गांधींच्या निवडीवरून स्पष्ट झालंय.

काँग्रेस पक्ष सध्या अनंत अडचणींच्या चक्रव्यूहात अडकलाय. या चक्रव्यूहातून गांधी घराणचं काँग्रेसमधल्या नेतेमंडळींना एकत्र ठेऊ शकतं. हाणामाऱ्या होण्यापासून रोखू शकतं. गांधी मायनस झाले की काँग्रेस संपून जाईल. गांधी घराणं हीच आमची शक्ती आहे, हे काँग्रेसने दाखवून द्यायला हवं.

ऐकणार कुणाचं, लोकांचं की संघटनेचं?

लोकांमधे गांधी घराण्याबद्दल नाराजीचा सूर आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मीडियातही वेळोवेळी तसे रिपोर्ट आलेत. लोकांना काँग्रेसमधली गांधी घराणेशाही आवडत नाही, असं राजकीय विश्लेषकांनीही सांगितलंय. एवढंच नाही तर प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी गांधी घराण्यापासून मुक्त झाल्याशिवाय काँग्रेस जिवंत राहू शकणार नाही, अशी मांडणी केलीय. 

पण काँग्रेससाठी लोक महत्त्वाचे की संघटना हे ठरवण्याची वेळ आता आलीय. संघटनाच नसेल तर लोक काय कामाचे? कार्यकर्ते काम करणार आहेत. काम करणारे कार्यकर्तेच नसतील, संघटनाच नसेल तर पक्ष म्हणून उभं कसं राहणार, असा सवाल चुंचूवार यांनी उपस्थित केला.

लोकांमधे गांधी घराण्याबद्दल नाराजी आहे, हे पर्सेप्शन घडवण्यात आलंय. लोकांमधे नाराजी असती तर काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत १२ कोटी मतं कसं मिळाली? २०१४ च्या तुलनेत २०१९ मधे काँग्रेसच्या जागांमधे आठने वाढ झालीय, या आकडेवारीकडेही चुंचूवार यांनी लक्ष वेधलं.

वर्षअखेरीस महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांमधे विधानसभेची निवडणूक होणार आहे. कमीत कमी या निवडणुकीपर्यंत सोनिया गांधींकडे अध्यक्षपदाची सुत्रं असतील. त्यानंतर नवा, कायमचा अध्यक्ष ठरवण्याची प्रक्रिया सुरू होईल, असं दिल्लीतले पत्रकार सांगतात. सोनिया गांधींची निवड हा तात्पुरता तोडगा आहे. त्यामुळे सोनिया गांधी यावेळी हंगामी अध्यक्ष असणार आहेत. पद हंगामी असलं तरी काम मात्र स्थायी अध्यक्षासारखंच करावं लागणार आहे. यातूनच काँग्रेसला पुढच्या काळातली दिशा मिळणार आहे.

हेही वाचाः 

रिलायन्स जिओचं गिगा फायबर आपण कसं वापरू शकतो?

इस्त्रोचे संस्थापक विक्रम साराभाईंना गुगलची डूडल सलामी

अशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं

पंडित नेहरूंनी ३७० कलम आधीच कमजोर कसं केलं होतं?