मुंबईचा श्रेयस अय्यर टीम इंडियात चौथ्या नंबरची जागा घेईल?

१३ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


सध्या कॅरेबियन बेटावर भारत आणि वेस्ट विंडीज यांच्यात वनडे मॅच सुरू आहेत. कॅरेबियन बेटावरच्या दुसऱ्याच वनडे मॅचमधे मुंबईकर श्रेयस अय्यरने सगळ्यांचीच मन जिंकली. त्याने एका ओवरमधे ५ फोर आणि १ सिक्स ठोकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पणातच धमाकेदार बॅटिंग करून त्याने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. त्याच्या करिअरवर टाकलेला हा प्रकाश.

क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा संपलीय. पण या स्पर्धेसाठी भारताची टीम निवडण्याआधीच बऱ्याच क्रिकेट पंडितांनी श्रेयस अय्यरला खेळवण्याचं म्हटलं. त्याची बॅटिंग मर्यादित ओवरच्या खेळीसाठी अगदी योग्य असल्याचं मत अनेकांनी मांडलं. पण त्याच्या नावाचा विचार झाला नव्हता. पण आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर वन डे आणि २०-२० मधे श्रेयसची निवड झालीय.

एका ओवरमधे ५ फोर, १ सिक्स

श्रेयसचं २०१७ मधेच पदार्पण झालं. त्यामुळे त्याला इंटरनॅशनल मॅच खेळण्याचा अनुभव होता. पण त्याची जागा पक्की झाली नाही. निवड समितीच्या लहरीपणाची झळ त्याला बसली. आता त्याला मिळालेल्या नामी संधीच तो सोनं करतोय असं म्हणायला हरकत नाही.

सध्या सुरू असलेल्या विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या वन-डे मॅचमधे भारताने ५९ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. यावेळी इंडियन टीमने विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर २७९ रन्सपर्यंत मजल मारली. यात मुंबईकर श्रेयसने विराटला साथ दिली.

या मॅचमधे श्रेयसने ६८ बॉल्समधे ७१ रन्स काढले. त्याने एका ओवरमधे चक्क ५ फोर आणि १ सिक्स ठोकला. त्याचा सध्याचा स्ट्राईकरेट १०० पेक्षा जास्त आहे. त्याच्या या कामगिरीने क्रिकेटप्रेमींनी त्याला डोक्यावर घेतलंय. आणि त्याने टीम इंडियात ४ नंबरची जागा घ्यावी यावरही चर्चा होतेय.

श्रेयस कोणत्या नंबरवर खेळेल

श्रेयसची बॅटिंग आक्रमक आहे. तो फटकेबाज आहे. मोठे, उंच फटके मारण्यात तो वाकबगार आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आणि आयपीएलमधेही त्याची कामगिरी उठावदार आहे. त्याला आत बाहेर ठेवायचे प्रयत्न निवड समितीकडून झाले तर त्याच्या आत्मविश्वासावर याचा वाईट परिणाम घडण्याची शक्यता आहे.

मुंबईने नेहमीच भारताला भक्कम बॅट्समन दिलेत. पण हल्ली तसं होत नव्हतं. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्यानंतर टीम इंडियात मुंबईचा कोणताच बॅट्समन स्थिरावला नाही. म्हणूनच श्रेयसकडून आणखी मोठ्या अपेक्षा आहेत. त्याची खेळी बघून सुनील गावस्कर आणि राहुल द्रविड यांनी श्रेयसला अधिकाधिक संधी द्यावी असं म्हटलंय. आणि तो कोणत्याही नंबर खेळायला तयार असल्याचंही म्हटलंय.

हेही वाचा: रसुलन बीबी या वीरपत्नीने सैनिकांच्या सन्मानासाठी आयुष्य वेचलं

प्रवीण आमरेंनी शोधला श्रेयसमधला स्पार्क

मुंबईचा हा छोकरा लहान वयातच क्रिकेटवेडापायी मैदानावर दिसायचा. आणि आज त्याच्या आतापर्यंतच्या क्रिकेट प्रवासावर एक छोटा सिनेमासुद्धा झालाय. त्याचं घर वरळीला असूनही वडील संतोष यांनी त्याला शिवाजी पार्कवर धाडायचं ठरवलं. वडील केरळचे, आई रोहिणी मंगलोरच्या. वडलांच्या प्रोत्साहनामुळे श्रेयसला बऱ्याच खेळांमधे आवड निर्माण झाली. फुटबॉल, टेनिस हेही त्याचे आवडते खेळ.

श्रेयस क्रिकेट चांगला खेळतोय हे लक्षात आल्यावर संतोष यांनी त्याला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायला लावलं. शिवाजी पार्कवर प्रवीण आमरे आणि पद्माकर शिवलकर या मुरब्बींच्या नजरेत त्याचा खेळ आला. शिवाजी पार्क जिमखान्यावर हे दोघं क्रिकेट अकॅडेमीमार्फत प्रतिभाशोध करत होतेच. त्यांना श्रेयसमधे स्पार्क दिसला.

श्रेयसचं वय लक्षात घेऊन एका वर्षांनी त्याला आपल्या मार्गदर्शनाखाली घेतलं. गुरु आचरेकर सरांच्या मुशीतून तयार झालेला प्रवीण आमरे हा आज अनेकांसाठी मार्गदर्शक बनलाय. मुंबईबाहेरचेसुद्धा आणि कसोटी खेळलेले खेळाडूसुद्धा तंत्रात दोष निर्माण झाला तर प्रवीणकडे येतात आणि आपली समस्या दूर करतात.

हेही वाचा: लोकमान्य टिळक आणि साईबाबा, गजानन महाराज भेट

श्रेयसने मुंबईची खडूसवृत्ती दाखवावी

प्रवीणसारख्यांचे मार्गदर्शन लाभल्याने श्रेयसची प्रगती भराभरा झाली. त्याने मुंबईकडून रणजी स्पर्धेत खेळताना २०१५-१६ च्या दुसऱ्या मोसमात १ हजार ३०० रन काढले. आणि सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं. याचवेळी आयपीएलमधे अडीच कोटीच्या बोलीने त्याची निवड झाली.

दिल्ली डेअरडेविल्ससाठी नेमकं प्रवीण आमरेचं बॅटिंग कोच असल्याने श्रेयसला दुहेरी फायदा झाला. प्रवीण आमरेंचं मार्गदर्शन त्याला सतत लाभलं. प्रवीणबरोबरच काही माजी खेळाडूंकडूनही टिप्स मिळत होत्या. दिल्ली डेअरडेविल्सने गौतम गंभीरकडून नेतृत्व काढून श्रेयसला दिलं. तेव्हा त्याच्या नेतृत्वगुणांनासुद्धा उभारी मिळालीय.

श्रेयस आज अवघा २४ वर्षांचा आहे. त्याला मध्यंतरी फुटबॉलने परत खेचलं होतं. पण वडलांनी वेळीच ध्यान दिल्याने त्याने आता पूर्णपणे क्रिकेटवरच लक्ष केंद्रित केलंय. मौजमजा करण्याकडे त्याचा कल नाही. तो खेळ गंभीरपणे खेळतो ही जमेची बाजू आहे. आजही क्रिकेट पंडितांना वाटतं की त्याने अधिक चिवटपणा दाखवला. मुंबईची ख्यातनाम खडूसवृत्ती म्हणजे विकेट बहाल करायची नाही. ही वृत्ती दाखवली तर तो खूप पुढे जाईल.

डिविलिअर्ससारखा धमाका करावा

चंदू पंडितसारख्या हुशार कोचने यावेळच्या रणजी लढतीत विदर्भाला मार्गदर्शन करताना श्रेयसची विकेट सहज कशी काढता येईल, हे दाखवून दिलं. यावरून श्रेयसने धडा घेणं आवश्यक आहे. केवळ २०-२० ओवरच्या क्रिकेटवर त्याने संतुष्ट राहू नये. वन डेमधे त्याची कसोटी लागणार आहे. कारण इथे ५० ओवरचा खेळ असतो. आणि त्याला परिपूर्ण बॅट्समन व्हायचं असेल तर त्याने टेस्ट मॅचमधे यशस्वी कसं होऊ याचा विचार करायची गरज आहे.

श्रेयसला धाडसी फटके मारण्यावर नियंत्रण आणता आलं तर तो नक्कीच भारतासाठी भरवशाचा बॅट्समन असेल. त्याचा आवडता क्रिकेटपटू आहे दक्षिण आफ्रिकेचा एबी डिविलिअर्स. त्याच्यासारखा धमाका श्रेयसने जरूर करावा हीच त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.

हेही वाचा: 

आज डावखुऱ्यांचं उजवेपण समजून घेण्याचा दिवस

इस्त्रोचे संस्थापक विक्रम साराभाईंना गुगलची डूडल सलामी

रिलायन्स जिओचं गिगा फायबर आपण कसं वापरू शकतो?

आपल्याला वर्षंही मोजता येणार नाहीत एवढा जुना पोपट सापडलाय