सौरव गांगुली बीसीसीआयमधे दादागिरी करू शकेल?

१६ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची सर्वानुमते निवड झालीय. अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुलीने माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन गटाच्या ब्रिजेश पटेल यांना ओवरटेक करत बाजी मारली. अर्थात त्याबदल्यात ब्रिजेश पटेल यांच्याकडे आयपीएलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलीय. गांगुलीने बीसीसीआयचा कारभार पारदर्शक करण्यावर भर देणार असल्याचं आश्वासन दिलंय.

रविवारी रात्री उशिरा अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्या. त्या घडामोडींमधेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी टीम इंडियाचा ‘दादा’ सौरव गांगुलीच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आलं. अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुलीने माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन गटाच्या ब्रिजेश पटेल यांना ओवरटेक करत बाजी मारली. अर्थात त्याबदल्यात ब्रिजेश पटेल यांच्याकडे आयपीएलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलीय.

गादीवर बसण्याची औपचारिकता शिल्लक

सगळी प्रक्रिया पार पडून गांगुलीला अध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी अजून २३ ऑक्टोबरपर्यंत वाट बघावी लागणार आहे. असं असली तरी आता ती केवळ एक औपचारिकता आहे. गांगुलीच्या कॅप्टनशिपखालील नवी टीम बीसीसीआय आता तयार झालीय.

गांगुलीच्या टीम बीसीसीआयमधे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांच्यापासून ते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमल यांच्यासारख्या बड्या प्लेअर्सचा भरणा आहे. शाह आणि धुमल यांच्याकडे अनुक्रमे सचिव आणि खजिनदार पदाच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या असणार आहेत. याचाच दुसरा अर्थ असा की खऱ्या अर्थाने बॅटिंग तर हे दोघंच करणार आहेत.

हेही वाचाः निवड समिती रोहित शर्माला टेस्ट क्रिकेटमधे नारळ देणार?

गांगुली भाजपचा स्टार प्रचारक?

जागतिक क्रिकेटमधे अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बीसीसीआय अध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी गांगुलीने थेट भाजपाध्यक्ष शाह यांचीच मदत घेतल्याच्या चर्चांना गेल्या दोन दिवसांत ऊत आलाय. गांगुलीकडे पुढच्या १० महिन्यांसाठीच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा असणार आहे.

कारण बीसीसीआयशी संलग्न संस्थांमधे सलग सहा वर्षांहून अधिक काळ अधिकाराच्या पदावर राहता येत नाही. काही काळ ब्रेक घेतल्यावरच पुन्हा अशा संस्थांमधे अधिकाराच्या पदांवर नेमणूक किंवा निवड होऊ शकते. या भाकड काळाला काहीजण कुलिंग ऑफ पिरियड असंही म्हणतात. गांगुली २०१५ पासून बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या बॉडीवर आहे. येत्या दहा महिन्यांमधे त्याला या बॉडीवर येऊन सहा वर्ष होतील. सहा वर्षाच्या अटीमुळे त्याला बीसीसीआयचं अध्यक्षपद सोडावं लागणार आहे.

गांगुलीने दहा महिने बीसीसीआयचं अध्यक्षपद सांभाळायचं. आणि त्याबदल्यात आगामी विधानसभा निवडणुकीत बंगालमधे भगवा फडकावण्यासाठी भाजपचा स्टार प्रचारक म्हणून कंट्रिब्यूट करून या मदतीची परतफेड करायची, असं डील फिक्स झाल्याच्या बातम्या आहेत. गांगुली आणि अमित शाह या दोघांनीही असं काही ठरलं असल्याचं नाकारलंय. असं असलं तरी गांगुलीची निवड झाल्यापासून सर्वाधिक चर्चा आहे ती याच बातमीची.

पुढाऱ्यांना लाजवणारं क्रिकेटचं राजकारण

गांगुलीचा आतापर्यंतचा पश्चिम बंगालच्या राजकारणातला वावर, सद्यस्थितीत बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याशी असलेली त्याची जवळीक आणि ममता दीदींच्याही संपर्कात येण्याआधी माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासोबतची केमिस्ट्री बघता या चर्चा प्रत्यक्षात उतरतील का हे बघणं रंजक ठरेल. गांगुलीचा इतिहास असं होण्याची शक्यता नाकारतो.

पण जगातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदाची लॉटरी ‘अशीच’ इतक्या सहजासहजी लागते, असं समजण्याचं काहीही कारण नाही. कारण मैदान क्रिकेटच्या प्रशासनाचं असलं, तरी या पिचवर मेनस्ट्रीम राजकारणालाही लाजवेल अशा पद्धतीच्या राजकीय खेळ्या इथे याआधीही खेळल्या गेल्यात. बीसीसीआयचा इतिहास माहीत असणाऱ्यांना हे चांगलं ठाऊक आहे.

गेल्या दोन दिवसात मीडियाला दिलेल्या मुलाखतींमधे गांगुली बीसीसीआयच्या कारभारात पारदर्शकता आणणार असून गेल्या तीन वर्षात डागाळलेली बीसीसीसीची प्रतिष्ठा सुधारण्याविषयी बोलतोय. पण हेच त्याच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. दहा महिन्यांच्या कारकिर्दीत दादा हे आव्हान कसं पेलतो हे बघावं लागेल.

हेही वाचाः काँग्रेसला न्याय, केजरीवालांना चुनौती देणाऱ्या बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल

गांगुलीच्या निवडीतला विरोधाभास

गांगुलीच्या निवडीमधे एक विरोधाभास आहे. त्याच्या निवडीपासूनच बीसीसीआयची सूत्रं पुन्हा एकदा त्याच प्लेअर्सच्या हाती जाताहेत, ज्यांच्यामुळे गेली जवळपास तीन वर्ष बीसीसीआयचा कारभार कोर्टाने नेमलेल्या प्रशासकीय समितीमार्फत चालवण्यात आला. गांगुलीच्या निवडीच्या निमित्ताने त्या सगळ्या मंडळींची बीसीसीआयमधे बॅकडोअर एंट्री होताना बघायला मिळतेय. एका अर्थाने, हे गेल्या तीन वर्षातल्या सुधारणांवर वरवंटा फिरवण्यासारखंच आहे.

गांगुलीच्या निवडीचं क्रिकेट जगतातून मोठ्या प्रमाणात स्वागत होतंय. बऱ्याच वर्षांनी क्रिकेटच्या प्रशासनाची सूत्रं एका क्रिकेटपटूकडे येताहेत. क्रिकेट रसिकांसाठीसुद्धा ही आनंदाची बाब ठरलीय. मात्र गांगुलीची निवड अतिशय नाट्यमयरीत्या झालीय, हेही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल.

गेल्या शनिवारपर्यंत गांगुली अध्यक्षपदाच्या शर्यतीत फार मागं होता. पण आपल्या लौकिकास जागत बीसीसीआयमधे एका रात्रीत सूत्रं हलली. वेगवेगळ्या गटांमधे विखुरलेल्या बीसीसीआयच्या कर्त्याधर्त्यांनी सर्वानुमते आपल्या पसंतीची मोहर गांगुलीच्या नावावर उमटवली. त्यामुळे अध्यक्षपदासाठीच्या बॅक सीटवरचा गांगुली एकदमच फ्रंटवर आला.

गांगुलीही कच्च्या गुरूचा चेला नाही!

गांगुलीच्या निवडीसंदर्भातील या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करता बीसीसीआयच्या गाडीच्या ‘स्टीअरिंग’वरचा गांगुलीचा मुक्त वावर तसा कठीणच दिसतोय. साहजिकच क्रिकेटच्या पिचवर  भल्याभल्यांना पुरून उरलेल्या  गांगुलीला क्रिकेट प्रशासनाच्या या नव्या इनिंगमधे आपली ‘दादागिरी’ कायम राखण्यासाठी काट्यावरची कसरत करावी लागणार आहे. पण गांगुलीही काही तसा कच्च्या गुरूचा चेला नाही.

क्रिकेट प्रशासनाचे धडे त्याने जगमोहन दालमिया नावाच्या माणसाकडून गिरवलेत. दालमियांनी बीसीसीआय अध्यक्षपदाच्या लढतीत दस्तरखुद्द शरद पवारांसारख्या कसलेल्या राजकीय पैलवानाला पराभवाची चव चाखायला लावलीय. त्यामुळे गांगुलीकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. आणि म्हणूनच भारतीय क्रिकेट प्रशासनासाठी पुढचे काही महिने तितकेच वादळीदेखील असणार आहेत.

हेही वाचाः 

कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?

टीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार

अमोल मुझुमदारच्या वाट्याला आव्हानांशिवाय दुसरं काय?

अथर्व अंकोलेकरः शेवटच्या ओवरमधेही विकेट काढणारा जिद्दी बॉलर

टीम इंडियाच्या कोचसाठी दोन हजार अर्जांतून सहा नावं शॉर्टलिस्टमधे