ग्लोव्ज घातल्याने कोरोनापासून आपलं संपूर्ण संरक्षण होतं?

१८ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


मेडीकलवाल्यापासून ते किराणा मालातल्या दुकानदारापर्यंत सगळेच आजकाल मास्क आणि ग्लोव्ज घालताना दिसतात. देशोदेशीच्या सरकारांनी मास्क घालणं बंधनकारक केलंय. त्यामुळे बाजारात सध्या ग्लोव्ज आणि मास्कचा तुटवडा जाणवतोय. पण खरोखर ग्लोव्ज घातल्याने आपलं कोरोना वायरसपासून संपूर्णपणे संरक्षण होऊ शकतं का?

कोरोना वायरसचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सगळीकडे लोक मास्क आणि ग्लोव्ज घालून फिरताना दिसतायत. हॉस्पिटलमधले डॉक्टर आणि नर्स तर ठीक आहेत पण  मेडीकल, सुपर मार्केट आणि अगदी किराणा मालाचे दुकानदारही ग्लोव्ज आणि मास्क घालूनच रोजचे व्यवहार करतायत.

इतकंच नाही, तर सामान्य नागरिकही ग्लोव्ज आणि मास्क वापरतात. फक्त भारतातच नाही तर परदेशातही या ग्लोव्ज आणि मास्कना खूप मागणी आहे. पण ग्लोव्ज आणि मास्क घालून आपण खरोखर कोरोना वायरसपासून सुरक्षित राहू शकतो का हा प्रश्न मात्र कुणालाच पडत नाही.

कोरोना वायरस दोन प्रकारे पसरतो. या वायरसची लागण झालेल्या माणसाच्या संपर्कात आलो तर त्याची लागण दुसऱ्यालाही होऊ शकते. आणि दुसरं म्हणजे कोरोनाचे वायरस असलेल्या वस्तूला हात लागला आणि त्याच हाताने आपण नाकाला, तोंडाला किंवा डोळ्याला स्पर्श केला तर कोरोना वायरसची लागण होते. आता यातला पहिल्या प्रकारचा संसर्ग मास्क घालून आणि सोशल डिस्टसिंग पाळून टाळता येऊ शकतो. पण दुसऱ्या प्रकारचा संसर्ग रोखण्यासाठी ग्लोव्ज वापरूनही काहीही उपयोग होणार नाही, असं आता निदर्शनास आलंय.

हेही वाचा : लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

ग्लोव्ज घातल्यावर काय होतं?

याबद्दलची माहिती देणारा एका नर्सचा वीडियो सध्या सोशल मीडियावर भयंकर वायरल होतोय. अमेरिकेतल्या मिशिगन राज्यातल्या सागिनाऊ या शहरात ही नर्स इमरजन्सी रूममधे काम करत असे. मोली लिक्सी असं या नर्सचं नाव असून आता आऊट पेशंट विभागात काम करते. आऊट पेशंट म्हणजे हॉस्पिटलमधे उपचार घेणारे पण इतर पेशंटप्रमाणे तिथे न राहणारे पेशंट.

ग्लोव्ज घातल्यावरही वायरस, जंतु किंवा बॅक्टेरिया कसे परसतात याचं प्रात्यक्षिकच मोली सोशल मीडियावर वायरल झालेल्या वीडियोत करून दाखवतात. वीडियोमधे मोली ग्लोव्ज घालतात आणि एका बशीला हात लावतात. मोली या बशीला हात लावतात तेव्हा त्यावर असणारा निळा रंग त्यांच्या ग्लोव्ज घातलेल्या हातांना लागतो. त्यांना वाटतं, आपण ग्लोव्ज घातलेत म्हणजे सुरक्षित आहोत.

कोरोना वायरस म्हणजे निळा रंग

आपल्या हाताला वायरसचा संसर्ग झालेला नाहीय. म्हणून तेच हात त्या आपल्या मोबाईलला लावतात. आणि ग्लोव्जरचा निळा रंग मोबाईलला लागतो. त्याच हाताने त्या नाकाला स्पर्श करतात. निळा रंग नाकालाही लागतो. त्याच हाताने त्या घरातल्या इतर वस्तूंना हात लावतात, घरातली कामं करतात. इतकंच नाही तर आईचा फोन येतो म्हणून त्या फोन उचलतात आणि कानाला लावतात. फोन ठेवल्यावर कानापासून गालापर्यंत सगळा भाग निळा झालेला असतो.

मोलींच्या ग्लोव्जवरचा हा निळा रंग म्हणजे कोरोनाचे वायरस आहेत. एरवी हे वायरस किंवा बॅक्टेरिया इतके छोटे असतात की साध्या डोळ्यांना दिसतंही नाहीत. म्हणूनच वायरसचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी मोली यांनी निळा रंग वापरलाय. ‘ग्लोव्ज घातल्यावर तुम्ही कुठल्याही गोष्टीला स्पर्श केल्यानंतर लगेच हात धुणार नसाल तर ग्लोव्ज घालण्याचा काहीही उपयोग नाही,’ असं मोली या वीडियोत सांगगतात.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

ग्लोव्जचा आपल्याला खोटा दिलासा

आपण साध्या हातांनी गोष्टींना स्पर्श केल्यावर वायरस हातावर येतो तसंच ग्लोव्ज घातल्यावरही होतं. ग्लोव्ज घालून आपण मोबाईल, पर्स अशा गोष्टींना स्पर्श करतोच. अशावेळी त्यावरचे जंतु ग्लोव्जवर येतातच. अशाप्रकारचं क्रॉस कंटॅमिनेशन ग्लोव्ज, मास्क घालताना सर्रास होतं, असं साथरोगतज्ञ डॉ. मेरी स्मिड्ट यांनी सीएनबीसीशी बोलताना सांगितलं. ग्लोव्ज घालण्याआधी हात साबणाने धुवावे लागतात किंवा सॅनिटायझर लावावं लागतं. पण हे शक्यतो कुणाच्याही लक्षात येत नाही. त्यामुळे ग्लोव्ज घालतानाच आपण त्यांना संसर्ग करून ठेवतो. शिवाय अनेक लोक ग्लोव्ज घालून मास्क घालतात. त्याने ग्लोव्जवरचे जंतु मास्कवर येतात.

ग्लोव्ज आणि मास्क घालण्याची आणि काढण्याची पद्धत असते. ती सामान्यपणे कुणीही लक्षात घेत नाही. ग्लोव्ज घालताना ते नुसतेच तळहातावर घालून चालत नाहीत तर आपलं मनगटही झाकलं जाईल अशा पद्धतीनं घालावे लागतात. शिवाय काढताना त्याच्या बाहेरच्या बाजुला हात न लावता काढायला हवेत. बाहेरची बाजु आत जाईल म्हणजे सुलटीसुलटी होईल अशा पद्धतीने काढून सरळ फेकून द्यायला हवेत. पण ग्लोव्जचा खर्च नको म्हणून एकच ग्लोव्ज अनेकदा वापरला जातो.

म्हणूनच ‘ग्लोव्ज सुरक्षेची खोटी भावना देतात,’ असं मेरी म्हणतात. ग्लोव्ज सुरक्षेचा खोटा आविर्भाव निर्माण करतात. म्हणजे ग्लोव्ज घालून आपण सुरक्षित झालोत असं आपल्याला वाटू लागतं. पण प्रत्यक्षात ग्लोव्जमुळे संपूर्ण संरक्षण मिळतंच नाही, असंही त्या पुढे म्हणाल्या.

हेही वाचा : बाहेरून आणलेलं सामान वायरस फ्री करण्याचं साधंसोप्पं प्रॅक्टिकल

ग्लोव्जमुळे संसर्गाचा धोका वाढतो

ग्लोव्ज आणि मास्क मेडीकल क्षेत्रात फार वापरले जातात. पेशंटचं ऑपरेशन करताना, अनेकदा तपासणी करतानाही डॉक्टर मास्क आणि ग्लोव्ज वापरतात. पेशंटची सेवा सुश्रुषा करणाऱ्या नर्सही नियमितपणे ग्लोव्ज वापरतात. पेशंटच्या आसपास असणाऱ्या जंतुंचा संसर्ग होऊ नये हाच त्यामागचा उद्देश असतो. मेडीकल क्षेत्रासाठी ग्लोव्जचा वापर करणं उपयोगी असलं तरी रोजच्या वापरात ग्लोव्जचा काहीही उपयोग होत नाही, असं डीडब्लू न्यूजच्या एका बातमीत सांगण्यात आलंय.

याचं कारण म्हणजे ग्लोव्ज विनायल, लॅटेक्स किंवा नाइट्राइल या मटेरियलपासून बनलेले असतात. हे मटेरियल बॅक्टेरियापासून आपलं फार काळ संरक्षण करू शकत नाही. कारण ग्लोव्जवर छोटे छोटे पोअर म्हणजे छिद्र असतात. ग्लोव्ज खूप काळ घालून ठेवले की हळूहळू हे वायरस या छिद्रातून आत जाऊन हातावर बसतात. जितक्या वेळ ग्लोव्ज घालू तितकं हे संक्रमण वाढत जातं. शिवाय, ग्लोव्ज घातल्यावर हाताला घाम येतो. आणि वायरसला नेमकं हेच हवं असतं.

म्हणूनच हॉस्पिटलमधे काम करणारे कर्मचारीही अनेकदा ग्लोव्ज बदलत राहतात. ग्लोव्ज आणि मास्क कसा वापरायचं याचं शिक्षण त्यांना दिलेलं असतं. शिवाय, ग्लोव्ज काढल्यावरही हात धुवावे लागतात. पण ग्लोव्ज घातलेत म्हणजे आपले हात सुरक्षित आहेत असं वाटल्यामुळे आपण हात धुणं टाळतो. म्हणूनच ग्लोव्ज कोरोना वायरसपासून संपूर्ण संरक्षण देऊ शकत नाहीत असं म्हणावं लागतं.

हेही वाचा : 

महिनाभराच्या लॉकडाऊनपासून या देशांनी घेतला मोकळा श्वास

क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती खाण्याची अक्कल कुठून येते?

बेरोजगारीतंही भारतातल्या मध्यमवर्गानं सांप्रदायिकतेला रोजगार बनवलं

हमीद पर उम्मीद : कोरोनाचं औषध सिप्ला शोधेल असं जगाला का वाटतं?