एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

१९ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्ती हॉस्पिटलमधे जातात, औषध घेतात. त्यातले अनेकजण बरं होऊन घरी परतही येतात. पण जपानमधली एक महिला उपचार घेऊन बरी झाली. पण नंतर तिला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे एकदा कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यावर पुन्हा संसर्ग होऊ शकतो का? असा प्रश्न पडलाय. त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत नेणारी ही माहिती.

चीनमधून कोरोनाची सुरवात झाली. पण आता तीन महिन्यांच्या धावपळीनंतर चीनमधे कोरोनाचं संक्रमण कमी होतंय. जवळपास ८० हजार लोकांना संसर्ग होऊन त्यातल्या तीनेक हजार लोकांचे प्राण घेतल्यावर कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणणं चीन सरकारला शक्य झालं. चीनमधली हॉस्पिटल कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना डिस्चार्ज देऊन सुटकेचा श्वास टाकतायत. त्याचवेळी आता बऱ्या झालेल्या रूग्णांना पुन्हा कोरोनाची लागण तर होणार नाही ना अशी भीतीही त्यांना सतावतेय.

कोरोनावर अजून कोणतीही प्रतिबंधात्मक लस आलेली नाही. त्यामुळे कोरोनावर काही ठोस औषधंही नाही. असं असताना कोरोना झालेल्या पेशंटची इम्युनिटी सिस्टिम म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करतात आणि माणसाची रोगप्रतिकारक शक्ती स्वतः कोरोनाशी लढते, अशी उपचारपद्धती सध्या प्रचलित आहे. त्यामुळे माणूस बरा झाला म्हणजे कोरोनापेक्षा त्याची रोगप्रतिकारक शक्ती ताकदवान ठरली, असंच सध्यातरी म्हणावं लागेल. असं असताना एकदा बरं झाल्यावर पुन्हा कोरोना शरीरात आला तर त्याची लागण होते की ताकदवान रोगप्रतिकार शक्ती त्याचा नायनाट करते?

हेही वाचा : सगळ्यांनाच मास्क वापरण्याची गरज आहे का?

परत झाली कोरोनाची लागण?

खरंतर, रोगप्रतिकारक शक्तीला कोरोना वायरसची ओळख पटलेली असते. त्यामुळे कोराना परत शरीरात आला तर त्याला कसं मारायचं याची युक्तिही त्याच्याकडे असली पाहिजे. पण जपानमधल्या एका बाईवर उपचार करून तिला कोरोनामुक्त घोषित करण्यात आल्यानंतर तिला परत कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी ‘फोर्ब्स’ या वेबसाईटवर देण्यात आलीय.

जपानमधे टूर गाईड म्हणून ही महिला काम करते. जानेवारी महिन्यात पहिल्यांदा तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. त्यानंतर उपचार घेऊन ती त्यातून बरी झाली. मात्र, त्यानंतर तिला आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं समोर आलंय.

आता या महिलेच्या प्रकरणात नेमकं काय झालं? ती कोरोनामुक्त झालीय असं सांगण्यात हॉस्पिटल प्रशासनाची चूक झाली का? की त्या महिलेची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यानं तिला परत लागण झाली? की एकदा बरं झालं तरी पुन्हा कोरोनाची लागण होते याचंच हे उदाहरण होतं?

ही तर दुर्मिळ गोष्ट!

‘कोरोनाची दुसऱ्यांदा लागण होऊ शकते की नाही हे कळण्यासाठी आत्ता आपल्याकडे तितकासा डेटा उपलब्ध नाहीय,’ असं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या डॉक्टर निवेदिता गुप्ता यांनी ‘द क्विंट’शी बोलताना सांगितलं. सध्या आपण एका अनोळखी वायरसचा सामना करत आहोत. असा वायरस याआधी कधीही अस्तित्वात नव्हता. त्यामुळे याबाबत काहीही सांगता येणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. पण ‘परत लागण होऊ शकत नाही असं म्हणता येणार नाही,’ असंही डॉक्टर निवेदिता यांनी सांगितलंय.

प्रोफेसर मार्क हॅरिस इंग्लंडमधल्या लिड्स युनिवर्सिटीत वायरॉलॉजी एक्सपर्ट म्हणजेच विषाणू तज्ञ म्हणून काम करतात. ‘कोरोनाची पुन्हा लागण होणं ही खरंतर दुर्मिळ गोष्ट आहे. पण प्राण्यांकडून आलेले असे विषाणू माणसावर परत परत हल्ला करतात हे या आधीही दिसून आलंय,’ असं त्यांचं म्हणणं द गार्डियन या वेबसाईटवर प्रकाशित झालंय.

‘द गार्डियन’च्या याच बातमी सर पॅट्रिक वॅलेन्स या इंग्लंडमधल्या सरकारी वैज्ञानिक सल्लागार आणि इंग्लंडचे राष्ट्राध्यक्ष बॉरिस जॉनसन यांचे वैद्यकीय सल्लागार प्रोफेसर क्रिस विटी यांच्याही प्रतिक्रिया घेण्यात आल्यात. एखाद्याला एकदा वायरस झाला तर त्या वायरसविरोधात लढण्यासाठी त्याची प्रतिकार शक्ती तयार होते आणि मग तसा आजार पुन्हा होण्याची शक्यता फार कमी असते, असं या दोघांचंही म्हणणं आहे.

हेही वाचा : तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

निष्कर्ष काढता येईल, असं संशोधन उपलब्ध नाही

दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झालेल्या जपानी महिलेविषयी वॅलेन्स यांना विचारलं असता, काही लोकांना असे सांसर्गिक आजार परत होऊ शकतात. पण याची शक्यता फार दुर्मिळ आहे असं त्यांनी सांगितलं. कोरोना वायरसची लागण झालेल्या प्रत्येकालाच पुन्हा त्याची लागण होऊ शकते असं ठामपणे सांगण्यासाठी कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असंही ते म्हणाले.

थोडक्यात, कोरोनाची लागण झाल्यावर, त्यातून बरं झाल्यावर आपल्याला पुन्हा त्याची लागण होऊ शकते की नाही हे सांगण्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे. त्यासाठी लागणारी अन्टीबॉडी टेस्टही आपल्याकडे अजून उपलब्ध झालेली नाही. पण लवकरच हे संशोधन पूर्ण होऊन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल.

असं असलं तरी विषाणूंमुळे पसरणाऱ्या इतर आजारांचा अनुभव बघता कोरोनाचा संसर्ग झाला तर आपली प्रतिकार शक्ती वाढून पुन्हा तसा आजार होणार नाही असं म्हणता येईल. यात काही अपवाद नक्की असतील. पण सर्वसामान्यपणे कोरोना पुन्हा पुन्हा कोरोनाची लागण होत नाही.

हेही वाचा : 

कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार 

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, पत्रकार सांगतेय स्वानुभव

कोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा

कोरोना: रँडच्या वधाला कारणीभूत १८९७ चा कायदा पुण्यात पुन्हा लागू

१०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात धुमाकूळ घातलेल्या वायरसचा धडा काय?

कोरोनाने शेअर बाजार पावसासारखा कोसळतोय, १२ वर्षांतला वाईट दिवस