कॅन म्हणजे आपल्या कान्स फेस्टिवलच्या ए टू झेड प्रश्नांची उत्तरं

१६ मे २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


जगप्रसिद्ध कॅन सिनेमा फेस्टिवल सोमवारी, १४ मेला सुरू झाला. आता न्यूजपेपर, टीवी, सोशल मीडिया सगळीकडे कान्सच्या रेड कार्पेटवरचे ग्लॅमरस फोटो येताहेत. दहाएक दिवस हा ट्रेंड असाच सुरू असतो. हे दरवर्षीच ठरलेलं. ही एक प्रथाच होऊन बसलीय. पण कॅन फेस्टिवलला एवढं ग्लॅमर कशामुळे मिळालं? यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांचा मयूर देवकर यांनी वेध घेतलाय. त्यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित अंश.

पहिलं तर या फिल्म फेस्टिवलच नाव कसं घ्यायचं हा प्रश्न आहे. तुम्हाला पण हा प्रश्न जर पडत असेल आणि बॉलिवूड नट्या दरवर्षी इथल्या रेड कार्पेटवर का जातात हे जाणून घेण्याची तसूभरदेखील इच्छा असेल तर हे वाचा.

नेमका उच्चार काय?

Cannes हा फ्रेंच शब्द आहे. आपल्याकडे याला कान्स किंवा ज्यांना एस सायलंट वगैरे कळतं ते कान म्हणतात. हे दोन्ही उच्चार चूक आहेत. फ्रेंचवासी याचा उच्चार कॅन्न किंवा याच्याशी मिळताजुळता असा करतात. मात्र इंग्लिशमधे याचा उच्चार ‘कॅन’ असा करता येतो. कान किंवा कान्स नाही.

हा महोत्सव कुठे भरतो?

फ्रान्समधील कॅन शहरात दरवर्षी मे महिन्याच्या मध्यावर हा महोत्सव भरवला जातो. भूमध्य सागराच्या म्हणजे फ्रेंच रिवेराच्या किनारी निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं हे शहर पर्यटक आणि गर्भश्रीमंतांच्या आवडीचं ठिकाण. इथल्या पॅलेस ऑफ फेस्टिवल्स अँड कॉन्फरन्सेसमधे महोत्सव भरतो. पहिला महोत्सव १९४६ मधे झाला. यंदाचा हा ७२ वा महोत्सव आहे.

हेही वाचाः लॅक्मेचा फॅशन वीक किती दिवस बघायचा, आता आपणही उतरलं पाहिजे

फेस्टिवलचे आठ विभाग

भाषेचे कोणतेही बंधन न पाळता जगभरातले दर्जेदार सिनेमे कॅनमधे दाखवले जातात. याआधी कॅनमधे सहभागी झालेल्या प्रतिभावान डायरेक्टर्ससह नवख्यांसुद्धा पुरेपूर संधी मिळते. एकूण आठ विभागांमधे हा महोत्सव पार पडतो.

१) महोत्सवाचा मुख्य भाग

इन कम्पिटिशन हा महोत्सवाचा मुख्य विभाग आहे. यामधे निवड होण्याला ऑफिशियल सिलेक्शन असंही म्हणता येईल. सुमारे २० सिनेमांची आयोजकांतर्फे निवड केली जाते. यापैकी एका सिनेमाची विजेता किंवा गोल्ड पाल्म या पुरस्कारासाठी परीक्षक निवड करतात. कॅनमधे सर्वोत्कृष्ट सिनेमाचा सन्मान मिळाला म्हणजे तो डायरेक्टर धन्य पावला, त्याच्या जीवनाचं सार्थक झालं असं मानतात.

२) कलात्मकदृष्ट्या वेगळ्या धाटणीचे सिनेमा

अन सर्टेन रिगार्ड या विभागात कलात्मकदृष्ट्या वेगळ्या धाटणीचे सिनेमे दाखवले जातात. व्यावसायिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रिलिज होण्याची शक्यता नसते, अशा सिनेमांना इथे संधी मिळते. अशा सिनेमांना या गटात समाविष्ट करून आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिलं जातं.

३) स्पर्धेबाहेरच्या सिनेमांना संधी

आऊट ऑफ कम्पिटिशन हा आणखी एक गट. निवड समितीला जे सिनेमे मनापासून आवडतात, पण मुख्य स्पर्धेत म्हणजेच इन कम्पिटिशनमधे समाविष्ट केले जाऊ शकत नाहीत ते सिनेमा या गटात दाखवले जातात.

४) डायरेक्टर्सना संधी

डायरेक्टर्स फोर्टनाईट या ग्रुपमधल्या सिनेमांची निवड फ्रेंच डिरेक्टर्स गिल्डतर्फे केली जाते. या विभागात नावारुपास आलेले आणि उदयास येत असलेल्या डायरेक्टर्सचे सिनेमा दाखवले जातात.

५) नव्या फिल्ममेकरचा शोध

इंटरनॅशनल क्रिटिक विक हा १९६२ मधे सुरू झालेला नवा विभाग आहे. यामधे जगभरातल्या नवोन्मेषी आणि उदयास येणारे फिल्ममेकर शोधून त्यांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या सिनेमाची निवड केली जाते.

६) शॉर्टफिल्म

महोत्सवात शॉर्टफिल्मलाही संधी दिली जाते. पण सहभागी होण्यासाठी शॉर्टफिल्म दहा मिनिटांपेक्षा कमी वेळेची असण्याची अट असते. सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्मला शॉर्टफिल्म गोल्डन पाल्म पुरस्कार दिला जातो.

७) विद्यार्थ्यांनी तयार केलेले सिनेमे

फिल्म स्कूलमधे शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले सिनेमे सिनेफाऊंडेशन विभागात दाखवले जातात. अट फक्त एवढीच की, ते एका तासापेक्षा जास्त लांबीचे असू नये.

८) इतरमधेही संधी

कॅन क्लासिक्स, स्पेशल स्क्रीनिंग, मिडनाईट स्क्रीनिंग, ट्रिब्युट यासह फेस्टिवलच्या बाहेरही इतर अनेक उपक्रमांतर्गत सिनेमा दाखवले जातात. थोडक्यात काय तर कॅन महोत्सवात मुख्य स्पर्धेव्यतिरिक्तही इतर अनेक गटांत सिनेमांची निवड करून ते दाखवले जातात. अलीकडे मराठीसोबतच वेगवेगळे भारतीय सिनेमे कॅनमधे निवडल्याची बरीच चर्चा होते. परंतु नेमक्या कोणत्या गटामधे त्यांची निवड झाली हे तपासून बघायला पाहिजे. कारण कॅनमधे दाखवला म्हणजे त्याची मुख्य स्पर्धेत निवड झाली असं नाही.

हेही वाचाः भारताच्या शास्त्रीय योगचं रुपांतर मॉडर्न योगात करणाऱ्या इंद्रा देवी

परीक्षकांच्या समिती कोण असतं?

सिनेमा क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करून आपला ठसा उमटवण्याऱ्या मातब्बर चित्रकर्मींची परीक्षण समितीमधे निवड करण्यात येते. गटनिहाय दरवर्षी नवी परीक्षण समिती तयार केली जाते. मुख्य स्पर्धेतला विजेता निवडणाऱ्या नऊ सदस्यीय परीक्षण समितीचा अध्यक्ष होण्याचा मान यंदा प्रसिद्ध मेक्सिकन दिग्दर्शक अलाहांद्रो जी. इनारितू यांना मिळालाय. बर्डमॅन, द रेवनंट हे त्यांचे सिनेमे गाजले. विद्या बालन २०१३ मधे ज्युरी होती.

पुरस्कारांचं स्वरूप काय?

महोत्सवातल्या सर्वोत्कृष्ट सिनेमाला गोल्डन पाल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. सिनेजगतातला हा सर्वात मानाचा पुरस्कार मानला जातो. मुख्य स्पर्धेमधे दुसऱ्या क्रमांकाचा ग्रँड प्रिक्स आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ज्युरी प्राईझ पुरस्कार दिले जातात. त्याचबरोबर बेस्ट एक्टर, एक्ट्रेस, डायरेक्टर आणि स्क्रीप्ट निवडली जाते. हे झालं मुख्य पुरस्काराचं. 

या व्यतिरिक्तही कॅनमधे अनेक पुरस्कार दिले जातात. त्यात महत्त्वाचा म्हणजे नवख्या डायरेक्टरच्या पहिल्या सिनेमासाठी गोल्डन कॅमेरा हा पुरस्कार दिला जातो.

हेही वाचाः टू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट

कॅनची एवढी चर्चा का?

कॅनकडे जगातला सर्वात महत्त्वाचा सिनेमा महोत्सव म्हणून बघितलं जातं. त्याला कारणंही तशीच आहेत. गेल्या सात दशकांपासून जगभरातल्या सर्वोत्तम डायरेक्टर्सचे सिनेमे सर्वप्रथम दाखवण्याची परंपरा या महोत्सवाने टिकवून ठेवलीय. आज आपण ज्यांना ओटर Auteur किंवा महत्त्वाचे फिल्ममेकर म्हणतो त्यापैकी अनेकांना जगासमोर आणण्यात या महोत्सवाचा मोठा हात आहे.

'पल्प फिक्शन'ने १९९४ मधे गोल्डन पाल्म पटकावल्यानंतर क्वेटिंन टॅरॅन्टिनो हे नाव जगभरातल्या सिनेरसिकांच्या मनावर कायमच कोरलं गेलं.

दर्जेदार सिनेमांची निवड, व्यावसायिकतेपेक्षा गुणवत्तेला महत्त्व, भाषा आणि विषयाचं बंधन नसणं, सिनेमाकर्त्याची सृजनशीलता, अभिरुची आणि अभिव्यक्तीला अमर्याद स्वातंत्र्य आदींमुळे जगभरातल्या फिल्ममेकर्सच्या लेखी कॅनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कॅनमधला पुरस्कार म्हणजे सिनेविश्वात नावासमोर कायमची मोहोर उमटण्यासारखं आहे.

महोत्सवाला आंतरराष्ट्रीय मीडियाकडून दिली जाणारी प्रसिद्धी हे एक लोकप्रियतेमागचं महत्त्वाचं कारण आहे. कॅनमधे निवडलं जाणं किंवा जिंकणं यामुळे व्यावसायिक यशाची खात्री मिळत नसली तरी, प्रसिद्धी झोतात येण्याची संधी मिळते. जगभरातली दैनिकं, वेबसाईटवर नाव, फोटो झळकतात. म्हणून तर कॅनच्या रेड कार्पेटवर उपस्थिती लावण्यासाठी आपल्या बॉलिवूडमधले हीरोईन्स एवढी मरमर करतात.

कॅनमधलं फिल्म मार्केट हे आणखी एक कारण. सिनेमा रिलिज करणं ही काही सोपी गोष्ट नसते. प्रायोगिक आणि वेगळ्या धाटणीच्या सिनेमांना वितरक मिळवणं एक आव्हानच असतं. कॅनचं फिल्म मार्केट अशाच सिनेमांना नावाजलेल्या आणि सक्षम वितरकांपर्यंत नेण्याचं काम करतं. त्यामुळेच तर तुर्कस्तानातल्या एखाद्या नवख्या डायरेक्टरने तुर्की भाषेत तयार केलेला सिनेमाही अमेरिकेत किंवा युरोपमधे रिलीज होऊ शकतो. म्हणून जगभरातले फिल्म मेकर्स, निर्माते, आणि वितरक कॅन महोत्सवात सहभागी होतात. काय सांगता कोणता हिरा हाताला लागेल.

हेही वाचाः अमिताभलाही न कळालेला अॅवेंजर समजून घेण्यासाठीचा क्रॅश कोर्स

आपल्याला तिथे जाता येतं का?

एवढं वाचून आणि रेड कार्पेटवरचं सौंदर्य पाहून कॅनला चक्कर टाकण्याची इच्छा होऊ शकते. पण एक प्रॉब्लेम आहे. कॅन सिनेमा महोत्सव आपल्यासारख्या सामान्य प्रेक्षकांसाठी नाही. तो केवळ फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या आमंत्रितांसाठी असतो. म्हणजे महोत्सवाला तिकिट वगैरे लावलं जात नाही. डायरेक्टर, प्रोड्यूसर, एक्टर, वितरक आणि अर्ज स्वीकारलेले पत्रकार यांना आयोजकांतर्फे बॅज बिल्ला दिला जातो. फिल्म स्क्रीनिंगमधे प्रवेश करण्याआधी हा बिल्ला दाखवावा लागतो. त्यामुळे मुख्य महोत्सवात आपल्यासारख्याला एंट्री मिळणं तसा कठिणच आहे.

पण निराश होण्याचं कारण नाही. खूपच इच्छा असेल जाण्याची तर एक पर्याय आहे. कॅन सिनेफाईलतर्फे फिल्म अँप्रिसिएशन क्लबच्या सदस्यांना काही बॅज दिले जातात. आपण तसा एखादा क्लब जॉईन करू शकतो. कॅनमधले मुख्य सिनेमे बघायला मिळत नसले तरी, क्रिटिक्स वीकमधे दाखवले जाणारे नवख्या डायरेक्टर्सचे सिनेमे आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यांच्या स्क्रीनिंगपूर्वी तिकिट विक्री केली जाते.

पण इथेही बॅजधारकांना प्राधान्याने प्रवेश दिला जातो. जागा उरल्यातर रांगेतल्या सामान्य प्रेक्षकांना तिकिटाद्वारे आत सोडलं जातं. एवढंही नाही जमलं तर शेवटचा मार्ग आहे. महोत्सवाच्या सर्व दहा दिवशी रात्री नऊला सामान्य प्रेक्षकांसाठी समुद्रकिनारी उघड्यावर सिनेमे दाखवले जातात.

भारताचा सिनेमा आहे का यंदा?

यंदा भारताचा एकही सिनेमा कॅनमधे निवडलेला नाही. अलीकडे कॅनमधे रिलिज होणाऱ्या भारतीय सिनेमांचं प्रमाण तुलनेने वाढलं असलं तरी त्यांची मुख्य स्पर्धेसाठी निवड झाली नाही. भारत सरकारतर्फे कॅन फिल्म मार्केटमधे इंडियन पॅवेलियनअंतर्गत सिनेमे दाखवले जातात. त्याला कॅनमधे निवड झाली असा दावा करणं सयुक्तिक ठरत नाही. त्यामुळे बॉलिवूडची धाव रेड कार्पेटपर्यंत, असं म्हणावं लागेल.

मग काय विशेष?

गोल्डन पाल्मसाठी यंदा २१ सिनेमे स्पर्धेत आहेत. यामधे जिम जारमुश दिग्दर्शित द डेड डोन्ड डाय ही ओपनिंग फिल्म आहे. यंदा अनेक गोल्डन पाल्म विजेत्यांची कॅन वापसी होतेय. जसं की, टेरेन्स मलिक यांचा अ हिडन लाईफ, क्वेंटिन टॅरॅन्टिनो यांचा वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड, अ‍ॅब्देलतिफ केशिशचा मकतूब माय लव इंटरमेझो, पेद्रो अ‍ॅल्मोदोवार यांचा पेन अँड ग्लोरी, डार्डेन ब्रदर्स यांचा द यंग अहमद, केन लोचचा सॉरी वुई मिस्ड यू.

कॅनडाचा तरुण डायरेक्टर झेविएर डोलन हा केवळ ३० वर्षांचा आहे. २००९ पासून त्याचे ८ सिनेमे कॅनमधे निवडले गेलेत. आतापर्यंत त्याला २०१६ मधे दुसऱ्या क्रमांकाचा आणि २०१४ मधे तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळालाय. यंदा त्याचा मॅथिएस अँड मॅक्झिम सिनेमा स्पर्धेत आहे.

हेही वाचाः 

ऑस्करच्या आयचा घो!

अंधाधूनसारखा सिनेमा चीनमधे अंधाधुंद कमाई का करतो?

कोल्हापूर ते ऑस्करः भानू अथैय्या यांचा आज ९० वा वाढदिवस

मॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला?