सचिन, आम्ही तुला हृदयातून रिटायर्ड करू शकत नाही

२४ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


आज २४ एप्रिल. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा ४६वा बड्डे. रात्री बारा वाजल्यापासून सोशल मीडियातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सचिन क्रिकेटमधून रिटायर्ड झाला असला तरी सर्व क्रिकेटप्रेमींसाठी तो क्रिकेटचा देव आहे. त्याची खेळी आजही आपल्या लक्षात आहे. सचिनच्या बड्डेनिमित्त त्याच्या क्रिकेटच्या आठवणी पुन्हा जागवूया.

आजही सचिन कुठल्याही स्टेडिअमवर दिसला की सचिन... सचिन... सचिन... अशा घोषणांनी आसमंत दुमदुमन जातो. त्याच्या एकाहून एक अफलातून इनिंग आजच्या पिढीच्या क्रिकेटर्सना प्रेरणा देतात. क्रिकेट खेळताना त्याचा मैदानातला वावर अनेकांसाठी आदर्शच. जंटलमन्स गेम असलेल्या क्रिकेटचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर.

सचिन आहे म्हणजे मॅच जिंकणारच

क्रिकेटचा देव, विक्रमादित्य, मास्टर ब्लास्टर, वंडरबॉय, बॉलर्सचा कर्दनकाळ अशी कितीतरी विशेषणं त्याला कमी पडतील. आपल्या बहारदार आणि तितक्याच तुफान खेळीनं सचिन क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला. १५ नोव्हेंबर १९८९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केल्यानंतर एकामागून एक तुफान खेळी करत सचिननं अनेक विक्रम रचले.

१६ नोव्हेंबर २०१३ रोजी क्रिकटमधून निवृत्त होईपर्यंत त्याने आपल्या २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमधे ४६३ वनडे सामन्यात ४९ शतकांच्या मदतीने १८,४२६ रन्स केले. टेस्ट क्रिकेटमधे २०० सामन्यात सचिनने ५१ शतकांच्या मदतीने १५,९२१ रन्स काढले.

हेही वाचाः ऋषभ पंतचं वर्ल्डकपचं तिकीट का कापलं? ते कार्तिकला कसं मिळालं?

सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी क्रिकेट रसिकांच्या मनात सचिनविषयी असलेलं प्रेम आणि आदर कायम आहे. क्रिकेटच्या मैदानातील सचिनच्या तुफानी खेळी पाहू शकलो याचा तितकाच अभिमान वाटतो. सचिन खेळत असताना टीवीसमोर तासनतास बसून राहणं, त्यांच्या प्रत्येक खेळीचा मनमुराद आनंद लुटणं हे कित्येक वर्षे अनुभवलं.

शेन वॉर्नच्या स्वप्नात दिसणारा सचिन

सचिन मैदानात उभा आहे म्हणजे भारत हमखास मॅच जिंकणारच असा विश्वास असायचा आणि हा विश्वास हमखास सार्थ ठरायचा. केवळ बँटिंगचं नाहीतर त्याच्या बॉलिंगमधेही जादू होती. लेगस्पिन, ऑफस्पिन, गुगली असं मिश्रण करत तो बॅटसमन्सला चकवायचा.

मात्र खरी जादू सचिनच्या बॅटिंगमधे होती. त्यामुळेच की काय सचिन माझ्यासारखा खेळतो असं प्रशस्तीपत्र सर डॉन ब्रॅडमन यांनी दिलं होतं. पहिल्याच मॅचमधे नाकावर बॉल लागल्यानंतरही रक्तबंबाळ झालेल्या सचिनने मैदान न सोडता वकार, वसिम अशा तोफखान्यांचा नेटानं सामना केला.

हेही वाचाः विजय शंकर अंबाती रायुडूची ४ नंबरची जागा घेऊ शकेल?

इंग्लंडविरूद्ध भारत संकटात असताना सहाव्या क्रमांकावर आलेल्या सचिननं करियरमधलं पहिलं शतक ठोकलं. त्याच्या खेळीनं भारताचा पराभव टळला. पाकिस्तानविरूद्ध चेन्नई टेस्टमधे १३६ रन्सची त्याची एकाकी झुंज, शारजाच्या मैदानात धुळीच्या वादळानंतर आलेलं सचिन वादळ आणि त्या खेळीनंतर शेन वॉर्नला स्वप्नात दिसणारा सचिन आजही मनात घर करून आहे.

वर्ल्डकपमधली अविस्मरणीय खेळी

वर्ल्डकप १९९९मधे वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून पुन्हा इंग्लंडमधे जाऊन १४० रन्सची इनिंग वडिलांना समर्पित करणारा सचिन, २००३च्या वर्ल्डकपमधे ९८ रन्सची इनिंग खेळत पाकिस्तानी गोलंदाजीची पिसं काढणाऱ्या सचिनवर सारेच फिदा. २००३-०४ ऑस्टेलिया दौऱ्यात कवर ड्राइव मारताना सचिन आऊट होत होता. मात्र अखेरच्या सिडनी टेस्टमधे एकही कवर ड्राइव न मारता सचिनने केलेली नाबाद २४१ रन्सची खेळी सर्वोत्तम खेळी म्हणून गणली जाते.

२००८ मधे वनडे क्रिकेटमधे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नाबाद २०० रन्सची इनिंग सचिननं खेळली होती. या काही सचिनच्या कारकिर्दीतील मोजक्या खेळी ज्या कधीही विसरणं शक्यच नाही. अशा कितीतरी खेळी खेळून सचिननं तमाम भारतीयांना जगण्याचा वेगळा आनंद मिळवून दिला.

हेही वाचाः विनू मंकड महान क्रिकेटर, त्यांना फक्त मंकडिंगसाठी लक्षात ठेवणार?

क्रिकेट बघणं आणि खेळणं सोडलं

सचिनच्या खेळीनं अनेकांना त्यांच्या आयुष्यातली दुःख विसरायला लावलीत. भारताने क्रिकेट विश्वचषक २०११ जिंकण्यातही सचिनच्या मार्गदर्शनाचा आणि सल्ल्याचा तितकाच सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच वर्ल्डकप जिंकल्यानंतर सगळ्या क्रिकेटर्सनी सचिनला उचलून घेत मैदानात फेऱ्या मारल्या.

हेही वाचाः गौतम गंभीर: यशाचं श्रेय त्याला कधीच मिळालं नाही

सचिनचं मोठं स्वप्न साकार झालं, ज्याचा आनंद साऱ्या देशाला झाला. हे सारं घडून काही वर्षे उलटली आहेत, तरी सारं काही काल परवा घडल्यासारखंच वाटतंय. सचिनबद्दल असलेलं प्रेम, त्याच्या खेळाबद्दलचा आदर सारं काही तसंच आहे. त्यामुळेच की काय सचिननं खेळणं सोडल्यापासून अनेकांनी क्रिकेट पाहणं आणि खेळणंच सोडून दिलं आहे.

आजही सचिनचे जुने वीडिओ आणि चॅनेल्सवर दाखवल्या जाणाऱ्या मॅचेस सचिनप्रेमींसाठी पर्वणीच. आजघडीला क्रिकेटमधे विराट कोहलीला रनमशीन असं म्हटलं जातं. कोहली आपल्या खेळीनं नवनवे विराट विक्रम करतोय. कमी कालावधीतच कोहलीने वनडे क्रिकेटमधे ४१ शतकांसह १० हजार रन्सचा पल्ला ओलांडलाय तर टेस्टमधे २५ शतकांसह साडेसहा हजारांहून अधिक रन्स केलेत. त्यामुळे विराट लवकरच सचिनचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढेल असं बोललं जातंय.

सचिन आणि विराटची तुलना योग्य नाही

इंग्रजीमधे एक वाक्य आहे, रेकॉर्ड्स मेन्ट टू बी ब्रोकन. त्यामुळे सचिनचे रेकॉर्ड तुटल्यास त्यात काही चुकीचं नाही. मात्र सचिन आणि कोहलीची होणारी तुलना योग्य नाही. कारण सचिन आणि कोहली ज्या नियमांतर्गत खेळले, ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बॉलर्सचा दोघांनी सामना केला यांत कमालीचा फरक आहे. त्यामुळे दोघांची तुलना होणं योग्य नाही.

दोघंही आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. सचिन क्रिकेटच्या विश्वातला अढळ असा ध्रुव तारा, ज्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही.

हेही वाचाः क्रिकेटची पिढी घडवणाऱ्या आचरेकर स्कूलची स्टोरी

नवोदित क्रिकेटर्सचा प्रेरणास्त्रोत

आज सचिन भारतीय टीममधे नाही तरीही तो टीममधेच आहे असं अनेकांना वाटतं. २०१९ वर्ल्डकप मोहिमेवर जाणाऱ्या १५ भारतीय क्रिकेटर्सच्या नावातील एकेक इंग्रजी लेटर घेऊन सचिनप्रेमींनी सचिन तेंडुलकर हे इंग्रजी नाव तयार केलं. सचिन तेंडुलकर भारतीय वर्ल्डकप टीममधे अशा मथळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत. 

पाकिस्तानचा युवा क्रिकेटर आबिद अलीला वर्ल्ड कप खेळण्याआधी सचिनला भेटायचंय, त्याचा सल्ला घ्यायचाय आणि मिठी मारायची आहे. हीच सचिनच्या खेळाची खासियत. साऱ्या सीमा ओलांडून तो अनेकांसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत आहे.‘झाले बहु, होतील बहु परंतु या सम हा’ या ओळी आपल्या लाडक्या तेंडल्या, सचिनसाठी चपखल बसतात. आजही सचिन, तू आम्हाला आठवतोस.

हेही वाचाः 

रोहित विराटच्या पुढं जाऊ शकत नाही, कारण…

द्रविडच्या फॅन्ससाठी खुशखबर, वारसदाराचा शोध संपतोय

हिरवाणी आणि शोधन : वाढदिवस सारखा आणि नशीबही

मदतीला धावून येणाऱ्या टीम मॅनेजमेंटकडून नंतर वासीम जाफरने पैसेही घेतले नाहीत

पुरे झाली आता विराट कोहलीची कॅप्टनशिप?