चला, आज तरी मासिक पाळीवर चर्चा करूया

२८ मे २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज २८ मे. मासिक पाळी स्वच्छता दिन. मासिक पाळी हा एक महिलेच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पण त्याबद्दल गुप्तताच जास्त बाळगण्यात आलीय. या गोपनीयतेमुळेच महिलांना अनेक गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे आपण आता मासिक पाळीबद्दलचं मौन सोडायला पाहिजे. पुरुषांनीही यावर आता मोकळंढाकळं होऊन चर्चा करायला पाहिजे.

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने २८ मे हा दिवस मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून जाहीर केलाय. यानिमित्ताने मासिक पाळीसंबंधीची माहिती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम होतात. मासिक पाळीच्या स्वच्छतेबाबत बोललं जातं आणि मासिक पाळीबाबत लोकांची समज वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात.

पाळी ही एक नैसर्गिक क्रिया आहे, विटाळ नाही. ही गोष्ट आता हळूहळू का होईना पण भारतात मान्य होतेय. तरी पाळीसारख्या विषयावर चर्चा होणं आणि त्यातही खुलेपणाने चर्चा होणं दुर्मिळच. म्हणून मासिक पाळीला टॅबू समजून सार्वजनिक मौन बाळगणाऱ्या देशात या दिवसाला विशेष महत्व आहे.

तेरी भी चूप, मेरी भी चूप

आपल्याकडे पूर्वीपासूनच मासिक पाळीकडे धर्माच्या, संस्कृतिच्या चष्म्यातून बघितलं जातं. हा बाईच्या आरोग्याशी संबंधित विषय आहे याकडे आपण अजून अजूनपर्यंत दुर्लक्ष करत आलोय. सेक्स हा विषय सार्वजनिक वर्तुळात बोलायला जितका वर्ज्य आहे तितकाच किंबहुना त्याहून जास्त मासिक पाळीबाबत आपण चुप्पी साधतो. बऱ्याचदा या चुप्पीचा परिणाम म्हणून मुलींना पाळी येण्याच्या आधी त्याविषयी काहीच माहिती नसतं. आणि अचानक आपल्या शरीरातून रक्त वाहतंय हे कळल्यावर तिची भयंकर भांबेरी उडते.

ऐनवेळी झालेल्या या घडामोडींमुळे मग मासिक पाळीच्या काळात घ्यायची काळजी, त्याविषयीचं शास्त्रीय ज्ञान याबाबत माहिती मिळायला कुठली जागाच नसते. आता या गोष्टी इंटरनेट, सोशल मीडियामुळे एका क्लिकवर उपलब्ध झाल्यात. तरी काही वर्षांपूर्वी हे अवघड होतं. हेच अज्ञान जसंच्या तसं पुढच्या पिढ्यांकडे पास ऑन केलं जायचं आणि अजूनही केलं जातंय. याच अज्ञानातून मग ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ वातावरण तयार होतं.

हेही वाचा: मासिक पाळीविषयी आपल्या मुलामुलींशी कसं बोलायचं?

मासिक पाळीचं मौन सुटलं

अजूनही कावळा शिवणं, बाजूला बसणं, करायचं नसणं अशा दबक्या आवाजात आपल्या आजूबाजूला मासिक पाळीचा उल्लेख होतो. तरी गेल्या काही वर्षांमधे आपण मागे वळून पाहिलं तर असं दिसतं की, मासिक पाळीबाबत आजूबाजूला असलेली ‘शांततेची संस्कृती’ भेदायला आपण किमान सुरवात केलीय. वर्षानुवर्षांपासून ‘न बोलण्याचा विषय’ ठरलेल्या विषयावर आता बोलायला सुरवात झालीय.

शबरीमाला मंदिरप्रवेशासाठी महिलांनी लढा उभारला. अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या आयुष्यावर ‘पॅडमॅन’ हा सिनेमा आला. या सगळ्यांचा परिणाम म्हणून मासिक पाळीकडे आरोग्याचा प्रश्न म्हणून बघितलं जाऊ लागलं. याचबरोबर सॅनिटरी पॅडवर जीएसटी आकारला गेला. त्या विरोधात महिलांनी ‘राईट टू ब्लीड’ कॅम्पेन उभं केलं. गर्ल्स राईटस आणि युथ प्लॅन इंटरनॅशनल यांनी मासिक पाळीचे इमोजी आपल्या मोबाईलच्या कीपॅडवर येण्यासाठी कॅम्पेन केलं आणि त्याला यशही मिळालं.

सिनिटरी पॅडला आता बाजारात टॅम्पून, कप किंवा क्लोथ पॅड असे पर्यायही आलेत. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना पगारी रजा मिळावी यासाठी अनेक अंगांनी चर्चा छेडण्यात आली. आणि नुकताच गुणित मोंगा यांच्या ‘पिरिअड एन्ड ऑफ सेंटेन्स’ या डॉक्युमेंट्रीला सर्वोच्च मानाचा असा ऑस्कर पुरस्कार मिळाला. या सगळ्यातून आपण पिरिअडबद्दलचं पोसलेलं निरर्थक मौन संपवत एका आश्वासक संवादाच्या प्रवासाची सुरवात केलीय. या प्रवासातलं हे वळण काही वर्षांनी ‘पिरिअड एन्ड ऑफ सायलेन्स’ म्हणूनसुद्धा ओळखलं जाईल.

हेही वाचा: महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष

मासिक पाळीवरची खुली चर्चा मर्यादीतच

आता मासिक पाळी हा गप्प बसण्याचा विषय राहिला नाही तर तो सिनेमांचा विषय बनतोय. यावर कविता केल्या जाताहेत, लेख लिहिले जाताहेत. जगभरात ढिगाने संशोधनं होतं. मासिक पाळीसंबंधित हक्कांसाठी बायका आता मोहिम राबवतात आणि आंदोलनंसुद्धा करतात.

इतकंच काय तर मासिक पाळी ही आता नैसर्गिक आणि अपरिहार्य गोष्ट न राहता त्याकडे ‘पर्याय’ म्हणून बघू शकण्याचा पर्याय उपलब्ध करून देणारी संशोधनं आता पुढे येताहेत. मासिक पाळी हा सार्वजनिक मौनाचा विषय न राहता चर्चांचा, संशोधनांचा, अभिव्यक्तिचा आणि सामाजिक आंदोलनांचा विषय होऊ लागलाय.

मासिक पाळीबद्दल बोलायला सुरवात झालीय हे खरं असलं तरी आपल्याला अजून मोठा पल्ला गाठायचाय. शिक्षण घेऊ शकणाऱ्या, मीडियाशी संपर्क असलेल्या किंवा स्वतःच्या आयुष्याचा ताबा स्वत:कडे असलेल्या काही ठराविक वर्गात मासिक पाळीबाबत लोक खुलेपणाने बोलू लागलेत. तरी हे परिवर्तन हॉरिझोंटल आहे, वर्टिकल नाही.

हेही वाचा: राधिका सुभेदार सांगत्येय, मासिक पाळीविषयी गुप्तता नको स्वच्छता बाळगा

मासिक पाळी मुलींचा विषय, मुलांचा नाही

मी ग्रामीण भागातल्या आदिवासी मुलींबरोबर संशोधनाचं काम करते. त्यात मासिक पाळी हाही एक विषय आहे. तेव्हा मुलींशी बोलताना कळलं की २५% मुली मासिक पाळीविषयी कुणाशीच बोलत नाहीत आणि २०% मुलींनी तर मासिक पाळीविषयीच्या प्रश्नांची उत्तरं देणंच टाळलं. स्वतःहून तर नाहीच पण काही कारणांसाठीही मुली या विषयवार बोलणं टाळतात.

मासिक पाळीविषयी ग्रामीण भागातील १६ ते २२ वयोगटातल्या मुलांशी बोलताना कळलं की कितीतरी मुलांनी याआधी हा शब्दच कधी ऐकला नव्हता. आणि ज्यांनी ऐकला त्यांनी हा शब्द कधी चारचौघात बोलायचा नाही या सुचनेसकटच ऐकलेला. मासिक पाळी हा फक्त मुलींचा विषय, मुलांचा त्यात काय संबंध? आणि मुलांनी कशाला त्यावर बोलायचं? हा विचार इतका पक्का होता की मुलांशी या विषयावर चर्चा करणंही अवघडच होतं.

शिक्षण, धर्म, लग्न अशा सगळ्या सामाजिक संस्था मासिक पाळी ही महिलांची खासगी बाब आहे हा विचार खोलवर रुजवायचं काम नेटानं करतात. शाळा, कॉलेजमधे मानवी प्रजननाचा विषय शिकवताना मुलामुलींसाठी वेगवेगळे क्लास घेतले जातात. यामधूनच मासिक पाळी म्हणजे निव्वळ बायकांचीच गोष्ट ही मानसिकता पक्की होते.

हेही वाचा: मुलीच्या मासिक पाळीने देवाचं ब्रम्हचर्य भ्रष्ट होईल?

मासिक पाळी की मानसिक पाळी?

शहरी मध्यमवर्गाचीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. मासिक पाळीबाबत बोलताना तिथेही जीभ चावलीच जाते किंवा त्यासाठी काहीतरी सांकेतिक भाषा वापरतात. गेल्या दोन-अडीच दशकांपूर्वी अशा चुप्पीचं कारण मासिक पाळीविषयीचं अज्ञान आणि माहितीची अनुपलब्धता असं असू शकत होतं. पण जागतिकीनंतरच्या काळात इंटरनेट इतकं वेगात पसरलं की ही सगळी माहिती आता सगळ्यांच्याच मोबाईलवर आलीय.

वेगवेगळ्या स्वरूपातून आपण सारंच मासिक पाळीविषयी ऐकतो, पाहतो. कधीतरी नजरेआड करतो. पण स्पष्टपणे बोलत नाही. पुरुषांमधे याविषयी सर्रास जोक्स केले जातात. पण हेच पुरुष आपल्या घरात आईशी, बहिणीशी, मुलीशी किंवा कधीतरी बायकोशी सुद्धा या विषयावर बोलणं टाळतात.

बऱ्याचदा पाळीविषयी बोलताना मासिक पाळी असं न म्हणता त्याला ‘प्रॉब्लेम’ म्हटलं जातं. पण आता तो प्रॉब्लेम नसून ती एक नैसर्गिक क्रिया आहे ही समज हळूहळू समाजात येऊ लागलीय. आणि टीवीवरच्या जाहिरातींमधून ही गोष्ट जास्त ठळक केली जाताहे. मी ज्या आदिवासी मुलींसोबत काम करते, त्या मासिक पाळीला ‘मानसिक पाळी’ म्हणतात. खरंच पाळी शारीरिक कमी आणि मानसिकच जास्त आहे.

मासिक पाळी: सार्वजनिक चर्चेचा विषय

मासिक पाळीचं आरोग्य म्हणत पाळीच्या शारीरिक अंगाविषयी बोलायला काहीशी सुरवात होतेय. पण तिच्या मानसिक आणि सामाजिक बाजूंविषयी बोलणं अजूनही टाळलंच जातं. पाळीला केंद्रस्थानी ठेऊन अनेक मानसिक आणि सामाजिक समज-गैरसमजांचे मोठ्ठेच्या मोठ्ठे वर्तुळ आपण आखलेत. आणि वर्षानुवर्ष त्याच्या परिघावरच आपण रेंगाळत आहोत.

आता जरा आपल्याला केंद्राला तपासून पाहण्याची आणि त्याला परिघाशी जोडणारी त्रिज्या नव्याने आखण्याची गरज आहे. त्यासाठीचे प्रयत्न गेल्या काही वर्षात सुरु झालेत. आता आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन या न बोलल्या गेलेल्या विषयावर मनसोक्त बोलायचंय, लिहायचंय. जेणेकरून एक दिवस राजकारण, क्रिकेट आणि चित्रपटांइतकाच मासिक पाळीसुद्धा सार्वजनिक चर्चांचा विषय होईल. आमेन!

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

थायरॉइडविषयी हे समजून घ्यायला हवंच

महाराष्ट्राला सेक्स शिकवणाऱ्या पुस्तकाची गोष्ट

आईचं बदललेलं रुप: चार भिंतीतली आई ते स्मार्ट मॉम

बरं झालं, आमच्या देवाला मासिक पाळीचं वावडं नव्हतं