सुप्रिया सुळेः लढणाऱ्या लेकीची बुलंद कहाणी

२९ जून २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


सुप्रिया सुळे यांचा रविवारी ३० जूनला पन्नासावा वाढदिवस आहे. आपल्या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं जातं. गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सुप्रिया सुळेंच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख.

श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी
लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी

दासु वैद्य यांच्या कवितेतल्या या दोन ओळी. या ओळी जेव्हा ती लढणारी लेक सांगते तेव्हा उपस्थितांच्या अंगावर शहारा येतो. कारण कवितेच्या ओळी सांगणारी आणि लढणारी ती लेक असते सुप्रिया सुळे.

लढवय्या मुलींचा वारसा महाराष्ट्राला नवा नाही. मुलगी लढवय्यी असली तरीही कुठलाही बाप अख्खं आभाळच छत्र म्हणून तिच्या डोक्यावर धरण्याचं वात्सल्य दाखवतो. पण नारळातला ओलावा म्हणून बघण्यापेक्षा, लढणारी सुप्रिया एक बुलंद कहाणी म्हणून जगासमोर कशी येईल हेच एका बापमाणसाने पाहिलं. म्हणूनच आज सुलाखून सोनं निघावं तशी सुप्रिया सुळेंची कारकीर्द उजळलेली आपण पाहतो.

हेही वाचाः महिला धोरणाने २५ वर्षांत दाखवली प्रगतीची नवी वाट

मुलीचं वय आणि वडिलांची कारकीर्द पन्नाशीची

राजकीय वारसा ही बाब नाजूक असली तरीही नजाकतीने वागणारी फार कमी राजकीय घराणी देशात आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी राजकीय क्षेत्रात वावरत असताना ही नजाकत जपून ठेवली. या बापलेकीचे नातेसंबंध कधीच मेलोड्रॅमॅटिक पद्धतीने सामोरे आले नाहीत. पवारसाहेब सुप्रिया सुळेंचा उल्लेख करताना नाव कमी वेळा घेतात मात्र जिक्र जरूर करतात.

वडील-मुलगी हे नातं घट्ट प्रेमाचं असतंच. पण त्याला लाडाकोडाचं अल्लड रूप येऊ नये म्हणून या दोघांनीही जाणीवपूर्वक दक्षता घेतल्याचं जाणवतं. आज मुलीचं वय आणि वडलांची कारकीर्द पन्नाशीचा टप्पा गाठतेय. पण वडिलांच्याच तळमळीने राजकारण आणि समाजकारण करण्याची आस आणि समरसता सुप्रिया सुळेंच्या ठायी दिसून येते.

शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे ते 'आमची हक्काची ताई... सुप्रियाताई' हा प्रवास तसा सोपा नव्हता. रूढार्थाने पाहायला गेल्यावर आज पन्नाशी पूर्ण करत असताना सुप्रियाताईंनी कोणतंही मंत्रिपद भूषवलेलं नाही. मात्र पक्षातील युवती संघटना तसंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नेहरू सेंटरसारख्या संस्था यशस्वीरीत्या चालवण्याचा अनुभव दांडगा आहे.

संसदेत अभ्यासपूर्ण मांडणी

संसदेत हिरीरीने लोकांचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे आहे. लागोपाठ पाचवेळा संसदरत्न पुरस्कारने त्यांना गौरवलं गेलंय. संसदेतल्या सुप्रियाताईंचा वावर हा अतिशय आत्मविश्वासपूर्ण असतो. राजकीय आणि सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण त्यांच्या भाषणांमधे दिसते. महिलांच्या हक्काविषयी त्यांची भाषणं सातत्याने गाजली. त्याचवेळी सत्ताधाऱ्यांना सडेतोड प्रश्न विचारतानाही त्यांनी करारीपणा दाखवला.

आपला मुद्दा पोहचवण्याचा त्यांचा अंदाज काही न्याराच आहे. आवाजात एक विश्वसनीय जरब, टीका करतानाही स्वर अवमानकारक किंवा खिजवणारा होणार नाही याची घेतलेली पुरेपूर काळजी, अभ्यासपूर्ण सादरीकरण, मुद्दा ठासून सांगण्याची पद्धत हे सारं लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याविषयी आदर वाढवणारं आहे.

महिलांना केवळ एक दिवस नाही तर वर्षाचे ३६५ दिवस सन्मान मिळाला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. नुकतंच त्यांचं 'राइट टु डिसकनेक्ट' हे प्रस्तावित विधेयक खूप गाजलं. संपर्क साधनांमधे तंत्रज्ञान अद्यावत झाल्यानंतर कार्यालय सतत कर्मचाऱ्यांच्या मेंदूचा ताबा घेऊ लागलं. त्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या तसेच वैयक्तिक अवकाश जपण्यासाठी 'राइट टु डिसकनेक्ट' हवा असा त्यांचा आग्रह आहे.

मध्यमवयीन गृहिणीसारखं मल्टिटास्किंग

सुप्रियाताईंना सार्वजनिक वावरताना पाहणं म्हणजे एक धडा असतो. घड्याळ हे त्यांच्या पक्षाचं चिन्ह आहे. पण सुप्रियाताई स्वतःच एक घड्याळ आहेत असं वाटतं. कुठलाही वेळ त्या दवडत नाहीत. व्यासपीठावर त्या बसलेल्या असतानाही त्यांची कामं सुरू असतात. त्यांचे पी.ए. फाइल्स आणून देत असतात. कागदपत्रांचं वाचन तिथेही सुरू असतं. सह्या आणि शेरेही सुरू असतात.

आणि विशेष म्हणजे त्याचवेळी त्यांचं व्यासपीठावरच्या वक्त्याच्या मुद्द्यांकडे अजिबात दुर्लक्ष नसतं. मधेच त्या प्रेक्षकांमधल्या एखाद्या कार्यकर्त्याचा किंवा पदाधिकाऱ्याचा अदमासही घेऊन जातात. वेळ न घालवता झटपट निर्णयक्षमता हा त्यांचा मोठाच गुण. आज मध्यमवयीन गृहिणी जसं मल्टिटास्किंग करण्याचा प्रयत्न करते तशाच प्रकारे सुप्रियाताई राजकीय क्षेत्रात मल्टिटास्किंग करत असतात. त्यांचा कामाचा झपाटा आपल्याला अवाक करतो.

हेही वाचाः महिलांना उमेदवारी देतानाही घराणेशाहीचंच कार्ड

दिंडीमधे फुगड्या घालणारी ताई

सुप्रियाताईंनी सार्वजनिक जीवनातला ड्रेसकोड जाणीवपूर्वक जपलेला आहे. साडी, बांधलेले केस, छोटीशी टिकली. कुठलाही बडेजाव नाही. त्यामुळेच अगदी सर्वसामान्यांशी त्यांचा थेट कनेक्ट असतो. पंढरपूरच्या दिंडीमधे फुगड्या घालणाऱ्या किंवा डोक्यावर तुळस घेतलेल्या सुप्रियाताई आपण पाहिल्या आहेत.

सर्वसामान्य बाईला त्या आपल्यातल्याच वाटतात आणि हा आपलेपणा राजकीय नसतो. तिथली संस्कृती सुप्रिया सुळेंच्या वागण्यात भिनलेली दिसून येते. घरातलीच मुलगी वारीला आलीय या भावनेने आनंदाची उधळण वारीत होते. मग सण वा उत्सव कुठलाही असो. सुप्रियाताईंचा हा सांस्कृतिक कनेक्ट जरा हटके आहे, यात शंकाच नाही.

मुलींच्या शिक्षणासाठीची ‘सायकल’

केवळ सांस्कृतिक नाही तर आरोग्य आघाडीवरही सुप्रियाताई आज सर्वात फिट राजकीय व्यक्तिमत्व म्हणाव्या लागतील. आहारावर उत्तम नियंत्रण आणि व्यायामाची आवड हा त्यांचा गुण अनुकरणीय आहे. 'टु व्हील्स ऑफ होप' हा त्यांचा महाराष्ट्रातल्या किशोरवयीन मुलींना सायकली बहाल करण्याचा उपक्रम स्पृहणीय आहे.

सर्वसामान्य कुटुंबातल्या या वयाच्या मुलींना घरातली आणि शेतातली अनेक कामं करावी लागतात. त्यामुळे त्यांचं शिक्षण मागं पडण्याचा धोका असतो. मात्र सायकल मिळाल्यामुळे घरची कामं झटपट होऊन शाळेत जाऊन शिकण्यासाठी त्या किशोरवयीन मुलीला वेळ मिळतो आणि तिच्या शिक्षणाची आणि पर्यायाने तिच्या प्रगतीची वाट मोकळी होते. या सायकलवाटपाच्या कार्यक्रमांमधे सुप्रियाताई या मुलींसोबत सायकलची रपेट मारायला विसरत नाहीत.

'जागर जाणिवांचा' हा युवतींसाठीचा उपक्रम केवळ सुप्रियाताईंचा उरला नव्हता. तो अवघ्या महाराष्ट्राचा झाला होता. तीच बाब बचतगटातील महिलांच्या ॲक्टिविटीबाबत झाली. आज या ग्रामीण भागातल्या यशस्विनी लघुउद्योजिकांच्या संघटनांमधून एक ग्राहक-उत्पादक चळवळच उभी राहिली. भीमथडी जत्रेचं यश या मूळ चळवळीत आहे.

हेही वाचाः सुप्रिया सुळे का जिंकल्या, पार्थ पवार का हरले?

बारामतीचा गड शाबूत

राजकीय निवडणुकांच्या क्षेत्रात यंदा बड्या बड्या दिग्गज नेत्यांचं पानिपत झालं. सुप्रिया सुळेंच्या पराभवासाठीही मोठा चक्रव्यूह रचला गेला होता. त्याबाबतच्या वल्गना जाहीर आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ मंत्री जातीने आपली कामं सोडून या चक्रव्यूहात लक्ष घालत होते. मात्र बारामतीचा गड शाबूत राहिला. तोही दीड लाखांहून अधिकच्या फरकाने. अखंड मेहनत, सातत्याने मतदारसंघात संपर्क आणि अथकपणे लोकांची केलेली कामं हीच बाब सुप्रियाताईंबद्दलचा विश्वास मतदारांमधे निर्माण करून गेला.

महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात सुप्रिया सुळेंबद्दल एक धाक आहे. 'हल्ला बोल' आंदोलनाच्या निमित्ताने सुप्रियाताईंनी विदर्भातल्या जिल्ह्यांमधे पदयात्रा केली. महिलांचा मोठाच जत्था सुप्रियाताईंसोबत या यात्रेत सामील झाला होता. नागपूरला पोलिसांनी केलेल्या झटापटीत त्यांच्या हाताला दुखापतही झाली. तरीही त्या डगमगल्या नाहीत.

आमदार राम कदम यांनी महिलांविषयी अश्लाघ्य विधान केल्यावर चवताळून उठलेल्या सुप्रियाताई महाराष्ट्राने पाहिल्या. 'सेल्फी वुइथ पॉटहोल्स' हा सार्वजनिक बांधकाम खात्याचा गैरकारभार चव्हाट्यावर आणणारा त्यांचा ऑनलाइन आणि ऑफलाइन उपक्रम तसंच सरकारला ५६ प्रश्न विचारून त्यांनी भंडावून सोडलं होतं. बळीराजाचे प्रश्न असोत, महिलांचे प्रश्न असोत, कोपर्डीच्या घटनेबाबतचा अन्याय असो सुप्रियाताईंनी या मुद्द्यांना व्यापक पातळीवर पोचवत लोकजागरण घडवून आणलं.

वेध नव्या राजकीय भुमिकेचे

राजकीय गगनात विहरणाऱ्या गरुडपंखी सुप्रियाताईचं लक्ष त्यांच्या पिल्लांकडेही बारीक असतं. राजकीय आणि सामाजिक आत्मभानाच्या मुशाफिरीत सुप्रियाताई कौटुंबिक भान जराही विसरल्या नाहीत. पक्षाचं राजकारण, दिल्लीतली संसद, मतदारसंघ, महाराष्ट्रातील विविध संस्थांचा कारभार या सगळ्यात त्या आई-बाबांची काळजी, कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष आणि मुलांच्या जडणघडणीवर त्या बारीक लक्ष ठेवून असतात.

ही परिपूर्णता विरळाच. सुप्रियाताई हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक प्रभावी व्यक्तिमत्व. माध्यमांचंही त्या लाडकं व्यक्तिमत्व आहेत. रोखठोक स्वभाव आणि झटपट निर्णयक्षमता हे स्वभाववैशिष्ट्य आता नव्या राजकीय समीकरणांत महत्त्वाचं ठरू लागलं आहे. पण त्याचवेळी सुप्रियाताईंचा स्वभाव हा मानवी आहे. त्यात राजकीय आविर्भाव किंवा अहंगंड नाही. खोटा दंभ नाही, दर्पोक्ती नाही. 

राजकीय जीवनात त्यांना महत्त्वाच्या भूमिकेत पाहण्याची इच्छा अनेकांना आहे. मात्र केंद्रातल्या राजकीय वाटचालीत नवी आव्हानं आहेत. महाराष्ट्र आणि राष्ट्रीय अशा दोन्ही पातळीवरही प्रभाव टाकणाऱ्या सुप्रियाताई ३० जूनसा वयाची पन्नास वर्षे पूर्ण करताहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला मनःपूर्वक शुभेच्छा!

हेही वाचाः 

धर्म कसला बघताय क्रिकेटपटूंची जिगर बघा

वेगन म्हणजे वेजिटेरीअन नाही, त्यापेक्षा बरंच काही

३० वर्षांपूर्वी हरवलेल्या सुरेश कांबळेंना व्हॉट्सअपने शोधलं

शरद पवारांसाठी बारामतीपेक्षाही मावळ, शिरूर, शिर्डी महत्त्वाची