आपल्या आतला विवेकाचा आवाज म्हणजे गुरू

१६ जुलै २०१९

वाचन वेळ : १० मिनिटं


आज १६ जुलै गुरुपौर्णिमा. गुरू हाच सर्वकाही अशी भरपूर लोकांची भावना आहे. गुरू म्हणजे फक्त आपल्याला शाळा, कॉलेजमधे शिकवणारे शिक्षक नाहीत. ही कन्सेप्ट त्याहीपेक्षा वेगळी आहे. लिंगायत धर्मात हा वेगळेपणा दिसतो. त्यामुळे लिंगायत धर्मात गुरू, त्यांची उपासना आणि एकूण गुरुविषयी काय सांगितलंय ते समजून घ्यायला हवं.

संपत्ती अथवा शक्तीने नाही तर ज्ञानाने आपलं जीवन समृद्ध होतं, सुरक्षित राहतं. ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ असून त्याला दुसरा पर्याय असूच शकत नाही. प्रत्येक क्षणी आपल्या सोबत ज्ञानाची साथ असते. सावली आणि संपत्तीसह इतर घटकांना मर्यादा येतात. पण आपल्या श्वासासोबत ज्ञानाची साथ आपल्याला मिळते. यालाच महात्मा बसवण्णा यांनी गुरु मानलं. शरणांच्या शब्दात ‘अरिवे गुरु, आचार वे लिंग, अनुभाववे जंगम’ असं म्हटलं आहे. ज्ञान, आत्मज्ञान, सद्सद्विवेकबुद्धी, विवेक थोडक्यात आतला आवाज हाच गुरु होय.

गुरु म्हणजे काय?

प्रत्येकाचे सत्य - शुद्ध आचार हे लिंग आणि जंगम म्हणजे समाज. जंगम म्हणजे विचार, जंगम म्हणजे मूल्य, जंगम म्हणजे समाज, जंगम म्हणजे आपण सारे असा अर्थ शरणाना अभिप्रेत आहे. आणि प्रत्येकाच्या मनात, शरीरात ‘गुरुलिंग जंगम’ यांची वस्ती आहे. पुन्हा वेगळ्या गुरुची गरज नाही. असायलाही नको. म्हणूनच सनातन गुरु परंपरेला फाटा देत शरणांनी गुरु म्हणजे चेतना, संचारी अशी संकल्पना रुजवली. महात्मा बसवण्णा आपल्या एका वचनात म्हणतात,

भक्ती नावाच्या भूमीमधे,
गुरु नावाचे बी रुजले,
लिंग नावाची पाने फुटली,
विचार नावाची फुले उमलली,
आचार नावाची फळे लगडली,
ती निष्पत्ती नावाने परिपक्व झाली,
अशी फळे कुडलसंगम देवाने स्वत:साठी वेचून घेतली़

श्रेष्ठ कवी चामरस लिखित 'शून्य संपादन' या ग्रंथात मुक्तायक्का यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अल्लंप्रभू देव म्हणतात,

‘तुझी प्रज्ञा हेच गुरु होय इतर व्यक्ती नव्हे’ (वचन क्रमांक २४)
तेच पुढे म्हणतात, गुरु आणि शिष्य असा भेद करणे गैर आहे. ( वचन क्रमांक १०४ )
स्वत:च्या करमणुकीसाठी गुरु शिष्य झाला, स्वत:च्या करमणुकीसाठी शिष्य गुरू झाला, गुरु आणि शिष्य वेगळे नाहीत, गुरु म्हणजे संकल्प, गुरु म्हणजे निर्धार, गुरु म्हणजे आत्मभान, गुरु म्हणजे स्वयंप्रज्ञा, गुरू स्वत: लिंग झाला लिंग स्वत: जंगम झाला पहा असेही अलंप्रभु म्हणतात.
वचनकार हविनाळ कल्लय्या म्हणतात ‘आत्म प्रज्ञा हे गुरु, आचार शिष्य आणि ज्ञान लिंग होय.’

लिंगायत तत्त्वज्ञान जुनंही आणि नवंही

ज्याला भारतीय किंवा वैदीक तत्वज्ञान म्हणतात त्यापेक्षा लिांगायत तत्वज्ञान भिन्न आहे. बसवण्णा आणि अनुभव मंटपातल्या चर्चेतून लिंगायत तत्वज्ञान साकारलं. चन्नबसवण्णांनी या तत्वज्ञानाची सैध्दांतिक मांडणी केली. अष्टावरण, पंचाचार आणि षटस्थल हे लिंगायत तत्वज्ञानातले सूत्र आहेत. ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या, जीवो, ब्रह्मैव नापर। म्हणजे ब्रह्म तेवढेच सत्य असून जग मिथ्या आहे. जीव ब्रह्माचाच अंश आहे. आदी जगद्गुरू शंकराचार्यांनी या अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रसार केला.

१२ व्या शतकातले  बसवादी शरणांच्या काळात या लिंगायत तत्त्वज्ञानाला एक व्यवस्थित स्वरूप देण्यात आलं. त्यापूर्वी ते तुटक आणि त्रोटक स्वरुपात होतं. त्याचा उपयोग करून शरणांनी त्याचा खूप विस्तार केला. विशेषत: चेन्नबसवण्णांनी हे कार्य केलं. अष्टावर्णातील गुरू, लिंग, जंगम, विभूती, रुद्राक्ष, मंत्र, पादोदक, प्रसाद या सगळ्या पूर्वीच्या शब्दांना शरणांनी नवीन आयाम दिला. पांडित्यपूर्ण नाही तर लोकाभिमुख स्वरूपात ते मांडलं. तसंच कायक, दासोह वगैरे काही नवीन शब्द प्रचारात आणले. सत्य, अहिंसा, समानता, भक्ती वगैरे जुन्या शब्दांना नवीन अर्थ देवून त्याचा विस्तार केला. म्हणून लिंगायत तत्त्वज्ञान तसं जुनंच आहे आणि नवीनही आहे.

हेही वाचा: गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

भक्ती: यशाचा मार्ग

या विश्वाचा नियंता शिव म्हणजे परशिव, परमात्मा, परतत्त्व, कैलासपती शिव किंवा कुटुं वत्सल शंकर असून त्याच्या लीलेने हे सारे विश्व निर्माण झाले आहे. म्हणजे निराकार परमात्म्याची साकार अभिव्यक्ती म्हणजेच विश्व होय. निराकार देवच साकार स्वरूपात विश्वाच्या रुपाने प्रकट झाला आहे. म्हणून विश्व किंवा जग मिथ्या नाहीय, तर ते देवाचं एक स्वरूप आहे. हा चैतन्यरूपी देवच इष्टलिंगाच्या स्वरूपात लिंगायतांच्या तळ हातावर आला.

शरणांनी कांचन, कामिनी, जमीन यांना माया मानले नाही. आपलं बोलणं, करणं आणि अंतरंग यामधे एकसुत्रीपणा असावा. त्यासाठी शरणांनी भक्तिमार्ग सांगितला आहे. भक्ती म्हणजे मनाची शुद्धी आणि सदाचरण म्हणजे आपल्या वर्तनाची शुद्धी, अशी अंतर्बाह्य शुद्धी करुन इष्टलिंगोपासनेद्वारा मोक्ष प्राप्त करुन घेतला पाहिजे. या मार्गाने यश हमखास मिळते.

लिंगायत समाजात अष्टावरण महत्त्वाचं

माणसाला आणि इतर प्राण्यांनाही तीन शरीरं असतात. त्यांना स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर म्हणतात. सप्तधातूंनी युक्त, पंचभूतात्मक, डोळ्यांना दिसणारं शरीर म्हणजे स्थूल शरीर. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतकरण चतुष्ट्य, पंचज्ञानेंद्रिये, पंचविषय आणि पंचवायू यांचा समुच्चय म्हणजे सूक्ष्म शरीर होय. तसंच अहंकार-ममकारयुक्त आपल्या अस्तित्त्वाची भावना म्हणजे कारण शरीर होय. त्याचप्रमाणे लिंगायत धर्मपुरूषालाही तीन शरीरं आहेत.

अष्टावरण अंग म्हणजे स्थूल शरीर. पंचाचार प्राण म्हणजे सूक्ष्म शरीर आणि षट्स्थलच आत्मा म्हणजे कारण शरीर. लिंगायत धर्माच्या आचरणाचे हे तीन घटक म्हणजेच तीन शरीरं. त्यांनाच तनुत्रय म्हणतात. ही तीन शरीरं जशी परस्परावलंबी असतात; एकमेकांना सोडून ती राहू शकत नाहीत. तद्वत्च अष्टावरण, पंचाचार आणि षट्स्थल हे तीन घटक परस्परावलंबी असून ते एकमेकांना सोडून राहू शकत नाहीत.

अष्टावरण सामाजिक विभाग असून, पंचाचार म्हणजे नैतिक विभाग आहे आणि षट्स्थल तात्त्विक विभाग होय. अष्टावरण शब्दाची फोड केली असता, अष्ट +आवरण. याचा अर्थ आठ आवरणे किंवा आच्छादने होतो. धर्ममार्गाने चालत असताना ही आठ आवरणं व्यक्ती, कुटुंब आणि समाजचं संरक्षण करते. म्हणून लिंगायत धर्मात याला फार महत्त्व आहे.

हेही वाचा: महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष

गुरू किती प्रकारचे असतात?

लिंगायतांचा देव म्हणजे गुरू, लिंग आणि जंगम. या तीघांना सोडून इतर कोणत्याही देवांची उपासना लिंगायत करत नाहीत. गुरु, उपासना करणाऱ्या भक्तासाठी देव म्हणून गुरू-लिंग-जंगम अवतरलेल्या या त्रिमूर्तींपैकी पहिली मूर्ती म्हणजे गुरू. आमच्या जीवनाला मार्गदर्शक, सहाय्यक, प्रेरक, वळण देणारी कोणतीही व्यक्ती गुरू ठरते. आपला पहिला गुरू म्हणजे माता. नंतर पिता, आचार्य, अतिथी हे सर्व गुरूस्वरुपी आहेत. म्हणूनच मातृदेवो भवं, पितृ देवो भवं, आचार्य देवो भवं, अतिथि देवो भवं असे म्हणून त्यांना देवस्वरुपी गुरू मानलंय. हे सगळे व्यावहारिक गुरू झाले. पण आध्यात्मिक साधनेला मार्गदर्शक गुरू वेगळाच असतो. तो निरपेक्षपणे शिष्याचे कल्याण इच्छितो आणि कल्याण करतो.

शिष्याच्या निरनिराळ्या अवस्थांमधे मार्गदर्शन करत त्याला पुढे पुढे नेणाऱ्या गुरूंचे काही प्रकार सांगितलेत. इष्टलिंगाची दीक्षा देणारा दीक्षागुरू, मार्गदर्शन करत राहणारा शिक्षागुरू, मोक्षमार्ग दाखविणारा मोक्षगुरू, गुरूलाही मार्गदर्शन करणारा गुरूचा गुरू, शरणस्थलात राहून लोककल्याण इच्छिणारा परमगुरू आणि शेवटी ऐक्यस्थलात राहून देवस्वरुपी होणारा परमाराध्यगुरू. परमाराध्य गुरू फक्त बसवण्णांनाच म्हटलं गेलंय. असून अल्लमप्रभू म्हणतात, ‘माझ्या परमाराध्य गुरू संगन बसवण्णांच्या श्रीचरणी नमो नम म्हणे मी’

लिंग आणि जंगम म्हणजे?

लिंग हे निराकार देवाचे प्रतीक आहे. अनादी काळापासून लिंगाचे अस्तित्त्व असून त्याची उपासना चालत आली आहे. वेदपूर्वीच्या मोहेंजोदारो-हरप्पा संस्कृतीमधे लिंग, नंदी आणि पशुपतिनाथ शिवाचे अवशेष सापडलेत. त्या काळी स्थावरलिंगाची उपासना करत. नंतरच्या काळात लहान आकारातील चरलिंगाची उपासना दिसून येते. बसवण्णांनी इष्टलिंगाचा आविष्क़ार करुन प्रत्येकजण आपल्या तळहातावर ठेवून उपासना करण्याची सोय करून दिली.

जंगम हा शब्द जुना असला तरी शरणांनी त्याला नवी संकल्पना दिलीय. जंगम हा समाजाचा प्रतिनिधी असून समाजाच्या प्रगतीसाठी राबणारा महापुरूष. तो सिद्धीच्या शिखरावर पोचला असून केवळ इच्छामात्रे साऱ्या लोकांचं कल्याण करतो. दुसऱ्या अर्थाने तो समाजाचा मार्गदर्शक असून समाजसेवा करण्याऱ्या भक्तांचा आणि गुरुचाही मार्गदर्शक असतो.

जंगम हा नावा प्रमाणेच संचारी असून गावामधे एक रात्र आणि शहरामधे पाच रात्री वस्ती करुन लोकांचे कल्याण करतो. त्यांचा उद्धार करतो. त्यांना संकटांमधून आणि अडचणींमधून पार करून सन्मार्गाला लावतो.

शरिराला भस्म का लावावं?

विभूति हे उपासनेच्या तीन साधनांपैकी एक साधन. म्हणजे विभूति किंवा भस्म होय. ही विभूति प्राचीन काळा पासून ऋषि-मुनी वापरत आलेत. तथापि लिंगायतांमधे या विभूतिला विशेष महत्त्व आहे. परशिवाचे तेज असे प्रतीक असलेले भस्म धारण करून ते तेज प्राप्त करण्याचा उद्देश त्यामागे असतो.

भस्माची बारीक पूड अंगावर उडवण्याला भस्मोध्दूलन म्हणतात. जेव्हा आंघोळ करणं शक्य होत नाही तेव्हा भस्मस्रान करुन लिंगपूजा करतात. सामान्यपणे अंगावरील १५ ठिकाणी भस्मधारण करावं. असा नियम आहे. डोके, कपाळ, मान, दोन खांदे, छाती, दोन कान, बेंबी, पाठ, हाताचे दोन कोपरे, दोन मनगटे, गळा अशा एकूण १५ ठिकाणी भस्मधारण करावे. नाहीतर निदान कपाळावर तरी लावलेच पाहिजे.

भस्मधारणाचे उपयोग सांगायचे तर धार्मिक दृष्ट्या शिवतेजाचे प्रतीक म्हणून भस्म धारण करून आपणही शिवच व्हायचं. शिवाय ते पवित्रतेचंही प्रतीक आहे. व्यवहारात देखील भस्मधारण केलेल्या व्यक्तीबद्दल एक प्रकारचा आदर, पूज्य भावना निर्माण होते. भस्मधारण केलेल्या स्त्रीकडे सामान्यपणे कोणीही वाकड्या नजरेने पाहात नाहीत. अशा स्त्रीबद्दल कामुक भावना निर्माण होत नाही. आयुर्वेदाच्या दृष्टीने भस्म हे शरीर समशीतोष्ण राखण्याचे साधन आहे.

हेही वाचा: एन. डी. पाटील यांचं जीवन, सामाजिक संघर्षाचं एक धगधगतं अग्नीकुंडच

रुद्राक्ष आणि मंत्राविषयी

रुद्राक्ष हे शिवाचं नेत्र. रुद्र+अक्ष त्यातही शिवाचं अग्निनेत्र म्हणजेच ज्ञाननेत्र. जे रुद्राक्ष आहे. शिवाच्या १२ सूर्यकला म्हणजे तपिनी, तापिनी, धूम्रा, मरीची, ज्वालिनी, रूची, सुषुन्मा, भोगदा, विश्वबोधिनी, धरणी, क्षमा आणि प्रभा होत. शिवाच्या सोमनेत्रामधून श्वेत वर्णाचे १६ प्रकारचे रुद्राक्ष निर्माण झाले. शिवाच्या अग्निनेत्रामधून कृष्णवर्णाचे १० प्रकारचे रुद्राक्ष निर्माण झाले. अशा रीतीने ३८ प्रकारचे रुद्राक्ष निर्माण झाले असं सांगण्यात येतं. वास्तविक नेपाळ मधील एका झाडामधे निर्माण होणारे बी म्हणजे रुद्राक्ष होय.

ॐ नम शिवायङ्ख हा षडक्षरी मंत्र फार प्राचीन काळापासून ऋषिमुनी जपत आले आहेत. लिंगायत धर्मामधे याच मंत्राचा स्वीकार करण्यात आला. त्याला धर्ममंत्र म्हटलं गेलं. त्याशिवाय ङ्कॐ श्री गुरूबसवलिंगाय नमङ्ख हा द्वादशाक्षारी मंत्र बसवण्णांच्या काळापासून गुरूमंत्र म्हणून स्वीकारण्यात आलाय. धर्ममंत्र आणि गुरूमंत्र अशी दोन नावे दिली असली तरी दोन्हीचा अर्थ आशय आणि शक्ती एकच आहे. कोणताही मंत्र म्हटला तरी फळ एकच. कारण शिव आणि बसव वेगळे नसून एकच आहेत. म्हणून ङ्कशिवच बसव, बसवच शिवङ्ख अर्थात शिवने बसवा, बसवा शिवने असे कन्नडमधे म्हटले जाते.

अर्पणाशिवाय प्रसाद मिळू शकत नाही

पादोदक म्हणजे उपासनेचे फळ. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे ङ्ककर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचनङ्ख तुला कर्म करण्याचाच फक्त अधिकार आहे, फळ मिळविण्याचा नाही. याचा अर्थ एवढाच की फळाची आशा न करता कर्म करावं. पण हे चूक आहे. फळ मिळण्याची आशा सोडल्यास कर्माची तरी गरज काय? फायदा मिळविण्याची आशा सोडून व्यापार कर असा मूर्खपणाचा सल्ला दिल्यासारखं आहे.

उपासनेमुळे मिळणारे दुसरे फळ म्हणजे प्रसाद असून अष्टावरणातले हे आठवे आणि शेवटचे आवरण आहे. गुरू लिंगजंगमास अर्पण करून नंतर सेवन करणं म्हणजे प्रसाद. पण तात्त्विकदृष्ट्या शिव,जीव,जगत् यांमधे फक्त शिवच प्रसाद असून जीव आणि जगत् हे पदार्थ आहेत. ते जेव्हा शिवस्वरूपी होतात, तेव्हा तेही प्रसाद होतात. जीव जेव्हा भोग्य विषय, भोग्यसाधन शरीर आणि भोक्ता स्वत: गुरू लिंगजंगमांस अर्पण करून त्यांच्या कृपेने प्राप्त झालेला प्रसाद भक्तीनं,पवित्र भावनेनं, पूज्य भावनेनं, आदरपूर्वक सेवन करतो तेव्हा तोही प्रसादस्वरूपी होतो, शिवस्वरूपी होतो. हाच खरा प्रसाद.

प्रसाद याचा खरा अर्थ आहे प्रसन्नता. मनात प्रसन्नता निर्माण झाली तर प्रसाद प्राप्त झाला असं समजावं. मनामधे समाधान, शांती, समचित्त, स्थिरचित्त, प्रसन्नता प्राप्त होणं म्हणजेच प्रसाद होय. ङ्कसौराष्ट सोमेश्वरलिंगाची प्रसन्नताच प्रसादङ्ख असं शरण आदरयाने अगदी स्पष्टपणे सांगितलंय. वचन क्र.६-१०२७ या प्रसन्नतेसाठीच प्रसाद कसा प्राप्त करावा हे जाणून घेतलं पाहिजे. प्रसादामधे अर्पण प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. अर्पणाशिवाय प्रसाद प्राप्त होऊ शकत नाही.

हेही वाचा: कंदील बलुच: पाकिस्तानी महिलांची प्रेरणा

पंचाचरणं कोणती आहेत?

अष्टावरण अंग असल्यास, पंचाचार प्राण आहेत. अष्टावरण सामाजिक विभागात मोडत असल्यास पंचाचार नैतिक विभाग मोडतो. याच पंच+आचार, पाच आचार किंवा आचरणे. पंचाचारामधे लिंगाचार, सदाचार, शिवाचार, गणाचार व भृत्याचार असे पाच आचार सांगितले आहेत.

लिंगाचरण, लिंगदृष्टी, लिंगकळा, लिंगगुण, लिंगरूप प्राप्त करुन घेण्सासाठी हा लिंगाचार सांगितलाय. याचं मुख्य लक्षण म्हणजे एकदेवोपासना. लिंगच देव असून त्याचीच उपासना करावी आणि इतर कोणत्याही देवाची उपासना करू नये. लिंगपूजाध्यानादी उपायाने लिंगांगसामरस्य प्राप्त करण्यासाठी लिंगाचार पहिली पायरी आहे.

स्थूल, सूक्ष्म, कारण या तीन शरीरांमधे त्यागांग, भोगांग, योगांग या तीन अंगानी इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग या तीन लिंगांची स्थापना करून रूप, रूची, तृप्ती हे तीन पदार्थ अर्पण करून सरूप, सुरूची, संतृप्ती हे तीन प्रसाद प्राप्त करण्यासाठी लिंगाचार अवश्य पाहिजे. त्यासाठी त्रिकरणपूर्वक उपासना केली पाहिजे. ती अशी - हस्ताने अष्टविधार्चन करुन, तोंडाने स्तोत्र-गीत-मंत्र पठण करुन,
स्थावरलिंग, देवळांतील मूर्ती, निसर्गातील घटना अशा कोणत्याही गोष्टींची उपासना करु नये. तीर्थयात्रेला जाणे, उपास-तपास करणे, बाह्य पूजाअर्चा वगैरे करु नयेत. फक्त लिंगाची उपासना करावी. याला लिंगाचार म्हणतात.

सदाचार अर्थात सत्+आचार=चांगला आचार, चांगले वागणे. येथे नीती अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे नीतीने वागणे अवश्य आहे. कुटूंबातल्या सर्व सदस्यांशी, सभोवतालच्या शेजारी-मित्रमंडळीशी, समाजातील सर्व लोकांशी नीतीने वागावं. परधर्मीयांशीही आदराने वागावं. परस्त्री परपुरूषसुद्धा, परधन, परदैव म्हणजे लिंगाव्यतिरिक्त इतर देव, परान्न म्हणजे फुकटचे अन्न आणि परनिंदा यांचा सर्वस्वी त्याग करावा.

शिवाचार म्हणजे सद्गुणसंपन्न भक्ताने आपल्या प्रमाणेच इतर लोक आहेत, अस मानून, त्यांना शिवस्वरूपी मानून चांगलं वर्तन करावं. नेहमी सकारात्मक चिंतन करावं. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांशी गुण्यागोविंदाने वागावे. तथापि भावाद्वैत मनामध्ये अद्वैत मानून व्यवहार करावा.

गणाचार म्हणजे धर्म मार्गाचं आचरण करताना येणाऱ्या अडचणी, अडथळ्यांचं निवारण करणं. विरोधकांचा नाश म्हणजे गणाचार नाही. स्वधर्माची निंदा पाहू नये, ऐकू नये. दोन्ही न जमल्यास तेथून दूर निघून जावं. पूर्वीप्रमाणे कायदा हाती घेऊन विधकांचा संहार आता करता येणार नाही. धर्माभिमान असावा पण दुराभिमान असू नये.

भृत्याचार हा शेवटचा, पाचवा आचार. भृत्य+आचार = सेवक भावनेनं वागणं. शिवभक्तांपेक्षा थोर कोणी नाही. बसवण्णांच्या उक्तीप्रमाणे आपण निरहंकारपणे वागलं पाहिजे. गुरू-लिंग-जंगमांना तन-मन-धन अर्पण करून त्रिविध दासोह करावा, असा नियम आहे. त्यावेळी आपल्यातला अहंकार-ममकार-प्रतिकार यांचे निवारण झालं पाहिजं. आपल्यालतल्या मदोन्मत्तता त्याग केला पाहिजे. विनम्रता, विनयशीलता फार महत्त्वाची आहे. याचा अर्थ विनम्रतेनं वागणं म्हणजे बैलाप्रमाणे मुंडी हलवणं नाही.

बसवण्णाचा धर्म झाला हायजॅक

बसवण्णांपासूनच लिंगायत-लिंगवंत धर्माची सुरूवात झाली. स्थावर नाशवंत, जंगम विनाशी असं सांगणाऱ्या बसवण्णानंतर या वीरशैव वाल्यांनी ‘जंगम’ म्हणवून घेत स्वत:च स्थावर झाले. लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणून ओळख निर्माण करण्यात सर्वात मोठी आडकाठी घातली या वैदीकांनी़ वीरशैवांनी़ पंचाचार्य व्यवस्थेने़वृत्ती वा विचार असलेल्या जंगमाचे जातीत परीवर्तन करून पुन्हा वैदीक व्यवस्थेकडे कधी वळले हे लिंगायत समाजाच्या सहज लक्ष्यात आले नाही या जातीच्या जंगम व्यवस्थेने, वैदीक व्यवस्थेने पुरोहितशाही आणि पुजारीपणातून देवाचा बाजार मांडला.

जंगमांच्या मनात जाती श्रेष्ठत्वाचा दंभ शिरला. शरणांना अपेक्षित अविनाशी जंगम आता सत्ताकेंद्र म्हणून मिरवू लागले़या व्यवस्थेने त्यांच्या गुरूपरंपरेचं स्तोम माजवलं. महास्वामी, जगद्गुरू यांचा प्रभाव वाढला. व्यक्तीकेंद्री, स्थावर देवांचा, बहुदैवत पुजेचे, यज्ञ यांचं उदात्तिकरण सुरू झालं. नव्या व्यवस्थेत बसवण्णा केवळ एक भक्त आणि बसवादी शरण त्या त्या जातीचे प्रतिनिधी. श्रेष्ठत्वाचे कॉपीराईट अधिकार त्यांनी स्वत:कडे घेतल्यानं बसवण्णास कमी लेखण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही.

काही पंचाचार्य महास्वामी म्हणवणाऱ्यांनी तर त्यांच्या मठातील बसवराज, बसप्पा, बसलिंग या नावांचा उच्चारही त्यांना वर्ज्य केला. मंत्र आणि श्लोक पाठांतर स्पर्धेत शरण वचनांवर, बसव नामावर अलिखीत बंदीच होती. चुकून एखाद्या विद्यार्थ्याने, बटुने बसव नामाचा उच्चार केलाच तर त्याला ‘कडावाचा प्रसाद’ म्हणजे लाकडी चपला चुकायच्या नाहीत. बसवण्णा केवळ धर्मसुधारक आहे़ धर्म संस्थापक नाहीत. कारण त्यांचा धर्म सनातन आहे. वैदीक आहे. म्हणूनच पूर्णत: अवैदीक, आधुनिक आणि विज्ञानवादी लिंगायत धर्म स्वतंत्र धर्म आहे. मठा मठातील जंगम बटुंना वैदीक पूजा-पाठ, संस्कृत श्लोक पाठांतर असे धडे गिरविले जात असतांना बहुजन लिंगायत समाजात मात्र बसवादी शरणांच्या वचनांची, पारंपारीक जानपद गीतांच्यामाध्यमातून बसवण्णांच्या नावाचा जागर सुरूच राहीला.

कल्याणला वास करणाºया,
बसवा, तु यावे रे दादा,
तु नाही आल्यास,
जगातून माणूसकी नष्ट होईल पहा़

अशी विनवणी करणारी भजन गावा गावात रात्री उशिरापर्यंत कानी पडतात़ अशा भजनांसाठी कोणी कार्यशाळा घेतल्याचं ऐकलं नाही.

हेही वाचा: इंग्लंड जगजेत्ता आणि न्यूझीलंडला चौक्यांचा चकवा

बसवोत्तर काळात मठसंस्कृती आली

बसवण्णांनी लिंगधारणेची कुणाला सक्ती केली नाही. क़ुणाला त्यांनी लिंग दिक्षा दिल्याचाही उल्लेख नाही. त्यांच्या भोवती झालेली शरणांची गर्दी स्वयंप्रेरणेने होती. लोकांनी स्वत:हून बसवतत्वाचा स्विकार केला. धर्मविस्ताराचा कोणताही अजेंडा बसवण्णांनी राबवला नाही. लिंगायत धर्माचा जन्म आणि विस्तार स्वयंप्रेरणेने झाल्याचं दिसून येतं.

बसवण्णा या लोकनेत्याच्या प्रभावाखाली आलेल्यांनी आत्मप्रेरणेने त्यांच्या तत्वांचा स्विकार केला. अग्रज आणि अत्यंज अशा सरळ दोन कुलीन आणि कुलहीन प्रकारात समाज विभागला होता़ अत्यंजांचे माणूसपण व्यवस्थेने नाकारले होते. व्यवस्थेत नगण्य असलेल्या सर्वांना बसवण्णा आपला वाटला. पंडीतांच्या मंत्रोपचारापेक्षाही वचने समाजाला भावली, पटली.

लिंगायत धर्माचा प्रसार सत्ता आणि सामर्थ्याच्या बळावर, राजाश्रयाच्या बळावरही झालेला नाही़ तो लोक सहभागातून, उस्फूर्तपणे झाला आहे़ शरणांच्या गळ्यातील इष्टलिंग लादलेल नाही तर आत्मप्रेरणेन स्विकारलेल आहे़ बसवण्णांनी कोणत्याही स्वरूपातील मठ संस्था निर्माण केली नाही.

चन्नबसवण्णा आपल्या वचनांत म्हणतात,

भक्तांचे घर हीच मठ, या मठांमध्ये भक्तीचे बीज पेरणे, भक्तीचेच भरघोस पीक आणि रासही
अशा भक्ताच्या घरी जाऊन सूतक पाळणाºयांना काय म्हणावे कूडल चन्न संगमदेवा
(सवसं: ३ वक़्र: १४१५)

नंतरच्या काळात वैदीक व्यवस्थने लिंगधारणा एक सोहळा करून टाकला. लिंगधारणा चंद्रीका सारख्या ग्रंथाची रचना करून प्रारंभीचे आराध्य ब्राह्माण असलेले नंतर जंगम स्वामी झालेल्या ‘गुरू परंपरा’ वाल्यांनी लिंगधारणा एक सोहळा एक संस्कार करून टाकलाबसव धर्मात मूल्य असलेला जंगम आता जात म्हणून प्रस्थापित झाला. बसवोत्तर काळात मठ संस्कृती वाढली.

हेही वाचा: 

वर्ल्ड कप फायनलमधे जिंकला तो क्रिकेट हा जेण्टलमन्स गेम

टीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार

(लेखक शरण साहित्याचे अभ्यासक आणि पत्रकार आहेत.)