ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा आज वाढदिवस. कोकणात मधु दंडवते यांच्याविरोधात लोकसभा लढवायला काँग्रेसकडे तगडा उमेदवार सापडत नव्हता. नाथ पैंच्या वारसदाराला हरवायचं तर मधु मंगेश कर्णिक हा बेस्ट पर्याय असल्याचं शरद पवारांनी ओळखलं. तसं पवारांनी दिल्लीत बोलून तिकीट कन्फर्मही केलं. पण उमेदवारी भरायला निघालेल्या कर्णिकांना माघारी परतावं लागलं.
ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा आज ८८ वा वाढदिवस. माहीमची खाडी सारखी महत्त्वाची कादंबरी. अनेक रसाळ कथा. कोकण मराठी साहित्य परिषदेतून साहित्याचं प्रेम रुजवणं. केशवसुतांचं स्मारक उभारणं. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून महत्त्वाचं योगदान. हा प्रवास त्यांच्या ‘करुळचा मुलगा’ या आत्मचरित्रात आहे. त्यातच त्यांच्याकडे खासदारकी चालून आली होती, असं एक मस्त प्रकरण आहे. त्याचा हा संपादित अंश.
मी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नव्हतो. सुरवातीपासूनच सरकारी नोकरीत असल्यामुळे ते शक्यही नव्हतं. पण मनानेही माझी कोणत्याही पक्षाशी जवळीक नव्हती. तसे माझे मित्र वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधे पसरलेले. पण व्यक्तिश: मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हतो.
लहानपणी विद्यार्थीदशेमधे कोकणात आम्ही सारेच रा. स्व. संघाचे स्वयंसेवक होतो. नंतर राष्ट्रसेवादलाशी संबंध आल्यामुळे त्याचेही संस्कार माझ्यावर होते. पण नंतर कळत्या वयात मी केवळ साहित्य हेच माझं कार्यक्षेत्र ठरवलं आणि त्या क्षेत्रात मी भरपूर काम करत होतो. राजकारण आणि त्यातून मिळणारे फायदे यांचा मोह मला कधी झाला नाही.
सरकारी नोकरीतल्या नियमामुळे मला राजकारणावर लिहिता येत नव्हतं. पण मी राजकारण जवळून न्याहाळत होतो. कित्येक मित्र राजकारणात सुखेनैव वावरत, तेही पाहत होतो. या निरीक्षणाचा कधीतरी नाटक, कादंवरी लिहिताना उपयोग होईल एवढच मनाशी होतं. शेवटी १९८३ साली सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. मग मी ‘सनद’ ही राजकारणावर कादंबरी लिहिली.
राजकारण, राजकारणी, सत्तेचा प्रभाव, सनदी अधिकाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांशी आणि सत्ताधाऱ्यांचं सनदी अधिकाऱ्यांशी वागणं कादंबरीत लिहिलेलं. माझ्यात तयार झालेली राजकारणातल्या मतलबी प्रवृत्तीबद्दलची घृणाच यात प्रगट झाली आहे.
हेही वाचाः भानू अथैय्याः भारताला पहिला ऑस्कर जिंकून देणारी कोल्हापूरची मुलगी
अनेक वर्षांपूर्वी माझ्या पत्नीनं केलेलं भाकीत खरं ठरलं, मी १९९० साली अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पोचलो. रत्नागिरी इथे होणाऱ्या साहित्यसंमेलनाच्या उद्घाटनापूर्वी होणाऱ्या साहीत्यदिंडीसाठी तेथील आयोजकांनी महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांना निमंत्रित केलं. आधीच्या वर्षी पुणे इथे झालेल्या साहित्य संमेलनामधे त्यांना ऊद्घाटक म्हणून बोलावलं पण विरोधी वादंग माजवला.
राजकारण्यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर यावे की येऊ नये यावर अजूनही वाद चालूच होता. पण तरीही रत्नागिरीच्या मंडळींनी मुख्यमंत्र्यांना दिंडीसाठी बोलावलं आणि शरद पवार आलेही. तेव्हा अनेकांचा भृकुटीभंग झाला.
त्याला पवारांनी उत्तर दिलं, ‘मुळात मी साहित्याचा एक रसिक आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाला आपण जावं असं वाटतं. शिवाय मधु मंगेश कर्णिक हे माझे जुने स्नेही आहेत. ते संमेलनाध्यक्ष झाले याचा मला आनंद वाटतो आणि तो व्यक्त करण्यासाठी मी साहित्यसंमेलनाला जाणार आहे.’
शरद पवारांची आणि माझी ओळख तशी फार जुनी, तीही साहित्याच्या कारणानं झाली. १९६६ मधे ते युवक काँग्रेसचे सरचिटणीस असताना काँग्रेसतर्फे ‘शिदोरी’ नावाची एक पत्रिका ते प्रकाशित करीत. त्या पत्रिकेसाठी साहित्य मागण्याच्या आणि माझी लेखक म्हणून ओळख करून घेण्याच्या निमित्ताने ओळख झाली. ते मी राहत होतो त्या सांताक्रूझच्या कोटक चाळीत मुद्दाम आले.
माझे एक साहित्यप्रेमी स्नेही ना. ग. नांदे जे पुढे आमदारही झाले. यांच्या ओळखीनं ते आले होते. सोबत वीणा मासिकाचे संपादक आणि माझे स्नेही उमाकांत ठोमरे होते. त्यांचा पवारांशी पूर्वीचा परिचय होता. पहिल्याच भेटीत त्या ऐन पंचविशीतल्या उमद्या व्यक्तिमत्वाच्या तरुणानं माझ्या मनावर आपल्या सुसंस्कृत, सौजन्यपूर्ण आणि साहित्यप्रेमी व्यक्तिमत्वानं छाप पाडली. त्यांचं साहित्यप्रेम नंतरही प्रत्ययाला आलं.
‘मॅजेस्टिक बुक स्टॉल‘मधे केशवराव कोठावळ्यांकडे अनेकदा ते स्वत: पुस्तक खरेदीसाठी येत. स्वत: पैसे खर्च करून पुस्तकं घेणारा आणि वाचणारा हा राजकारणातला तरुण वेगळा वाटे. त्यामुळेही त्याचं नाव लक्षात राहिलं आणि भेटीगाठी न होताही त्यांच्या बद्दल आपुलकी वाटत राहिली.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
मी सचिवालयात नोकरीला गेल्यावर त्यांच्या भेटी वरच्यावर होऊ लागल्या आणि त्यातून स्नेह निर्माण झाला. त्या स्नेहामधे मी एक साहित्यिक आणि ते एक साहित्यरसिक, एवढंच नातं होतं. त्यांचा मिस्किल, खेळकरपणा न सोडणारा स्वभावही अन्य राजकारण्यांपेक्षा वेगळा होता.
दरम्यान ते राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री असा प्रवास करीत राजकारणात पुढे जात होते. मी राजकारणात नसल्यामुळे आमचा स्नेह निर्मळ, निरपेक्ष राहिला. त्याचं कारण, मला त्यांच्यापाशी काही मागायचं नव्हतं. पण माझ्याबद्दलच्या स्नेहापोटी ते मला सत्तापदावर नेण्याचा प्रसत्न करतील याची मात्र मुळीच कल्पना नव्हती आणि तशी अपेक्षाही नव्हती.
२४ एप्रिल १९९१च्या दिवशी मी सपत्नीक जागतिक मराठी परिशदेच्या अधिवेशनासाठी मॉरिशसला जाणार होतो. रात्री अडीचचं विमान होतं. मी भारतीय चलनाचं परदेशी चलन घेऊन बँकेतून परतल्यावर पवारांचे सचिव धुवाळी यांचा पुन्हा फोन आला. ते म्हणाले ‘पवारसाहेब नुकतेच दिल्लीहून आलेत. तुमच्याशी त्यांना महत्वाचं बोलायचं आहे.’ आणि त्यांनी फोन शरदरावांना जोडून दिला.
शरद पवार नेहमीसारखे मिस्कीलपणे म्हणाले, ‘तुम्हाला राजकारणात यायला सांगतोय, अनुभव तर घेऊन बघा.’ त्यांना मी कोकणातल्या राजापूर मतदारसंघातून लोकसभेसाठी उभं राहावं असं वाटत होतं, मी ‘हो म्हणालो तर बाकी सर्व खर्चाची, प्रचाराची जबाबदारी ते स्वत: घ्यायला तयार होते. मी खरोखरच संभ्रमीत झालो. ज्या राजकारणाशी कोणताही संबंध आजवर आलेला नाही, त्या क्षेत्रात या वयात प्रवेश करायचा?
त्याचवेळी हाही विचार मनात आला की, जे लोकसभेचं तिकीट मिळावं म्हणून जिवाची शर्थ लावतात, वेळी लक्षावधी रूपये खर्चायची तयारी ठेवतात. ते तिकीट आपल्याला न मागता मिळतं आहे, ते स्वीकारायचं की नाही?
हेही वाचाः नेशन वॉन्ट्स टू नो अर्नब, ये जबां किसकी हैं?
गेली २० वर्ष राजापूर मतदारसंघातून मधु दंडवते लागोपाठ लोकसभेवर निवडून जात आहेत. नाथ पै यांचं निधन झाल्यामुळे दंडवत्यांची राजापूर मतदारसंघात भावी उमेदवारी आणि नाथ पैचे उत्तराधिकारी म्हणून पहिली प्रचारसभा आमच्या करुळ गावी मीच आयोजित केली. ते जेष्ठ आणि आदर्श संसदपटू होते यात शंकाच नव्हती.
नंतरच्या काळात त्यांच्याशी माझं कोकण विकासविषयक भूमिकेबद्दल तात्विक मतभेद झाले असले तरी ते लोकसभेत असू नयेत, असं मानणारा मी नव्हतो. यापुढे त्यांनी दादरसारख्या प्रगत, सुशिक्षित मतदारसंघातून लोकसभेवर जावं, म्हणजे स्थानिक बारीकसारीक प्रश्नांची जबाबदारी त्यांच्यावर राहणार नाही, एवढंच माझं म्हणणं होतं. आता कोकण विकासासाठी काम करण्याचीच संधी अनपेक्षितपणे चालून आली आहे.
दंडवत्यांना विरोध करून त्या ठिकाणी आपण जायचं? ते एवढं सोपं आहे? शरद पवारांचं यामधे कोणतं राजकीय आडाखे असतील? कोणतं राजकीय गणित असेल? दंडवत्यांना पाडायचं? कर्णिकांसारख्या एका स्थानिक साहित्यिकाला निवडून आणायचं?
पत्नीशी बोललो तेव्हा तिचा कल वेगळाच दिसला. पूर्वी एकदा तिने राजकारण हा आपला प्रांत नाही, असं म्हणून मला राजकारणापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला होता. पण आता ती म्हणत होती, ‘तुम्हांला वाटतच असेल तर एकदा अनुभव घेऊन पाहा. पूर्वी तुम्ही कायम अशा सरकारी नोकरीत चांगल्या हुद्द्यावर होता. तुमच्या लिहिण्याचाही जोम होता. त्यात व्यत्यय यावा असं मला वाटत नव्हतं. आपली मुलं लहान होती.’
मित्राचा सल्ला घ्यावा म्हणून मी चटकन माधव गडकऱ्यांना भेटलो नि सारं सांगितलं. तेव्हा तेही आश्चर्यचकित झाल्याचं दिसलं. मी सल्ला विचारला तेव्हा फक्त ‘कठीण आहे’ एवढे दोनच शब्द उच्चारून ते स्वस्थ राहिले. याचा अर्थ, माझा निर्णय मीच घ्यायला हवा होता. नंतर मला समजलं की, स्वत: माधव गडकऱ्यांचीच लोकसभेत जाण्याची सुप्त महत्वकांक्षा होती. मग ते मला कोणता सल्ला देणार?
याबद्दल त्याच रात्री नऊ वाजता वर्षा बंगल्यावर भेटायचं ठरलं. तोपर्यंत मला विचार करण्यासाठी सवड होती. मनात येत होतं, राजकारण असं मला का भेटायला येत आहे? काही दिवसांपूर्वीची गोष्ट मला आठवली. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाचे संपादक अशोक पडबिद्री यांना भेटायला मी सामना कार्यालयात गेलो. काम होताच मी जायला निघालो तेव्हा पडबिद्री म्हणाले, चला, तुमची ओळख करून देतो सुभाष देसाई आणि उद्धव ठाकरे यांच्याशी. आमचे ते विश्वस्त आहेत.
ते दोघेही शेजारच्याच एका केबिनमधे बोलत बसले होते. त्यांनी माझं स्वागत केलं. सुभाष देसाई यांची आणि माझी रत्नागिरीच्या साहित्य संमेलनामधे एका वेगळ्या संदर्भात आधी भेट झालेली होती. त्यांच्या सुसंस्कृत आणि सौजन्यपूर्ण वागणुकीचा तेव्हा मी अनुभव घेतला होता. उद्धव ठाकऱ्यांना मी प्रथमच भेटत होतो. त्यांचंही वागणं नम्र, सुसंस्कृत आणि खानदानी वाटलं.
बोलता बोलता लवकरच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांचा विषय निघाला. मला वाटतं, आम्ही तिथे जाण्यापूर्वी त्या दोघांचं त्याच विषयावर बहुधा बोलणं चाललेलं असावं. मी सहज विचारलं, ‘दक्षिण कोकणातून या खेपेला तुमचा कँडिडेट? कोण आहे?’ यावर सुभाष देसाई यांनी मनाच अनपेक्षितपणे विचारलं, ‘तुम्हीच का नाही होत आमचे कँडिडेट? विचार करून बघा.’
मी तो विषय गांभीर्याने घेतला नाही. तो तिथेच सुरू झाला आणि संपलाही. त्यानंतर काही दिवसांनी माझी सुधाकरराव नाईक यांच्याशी भेट झाली. कै. वसंतराव नाईक यांचा चरित्रग्रंथ मी लिहीत होतो. त्या संबंधातल्या भेटीत त्यांनीही मला विचारलं होतं, ‘निवडणुकीसाठी तुम्ही तयार व्हाल का? परवा आम्ही सगळे बसलो होतो, तेव्हा दक्षिण कोकणातून तुमचं नाव पुढे आलं. विचार करा. तयारी असेल तर आम्ही सगळी मदत करू.’
हेही वाचाः आम्हाला गुजरात ऐवजी केरळ मॉडेलच हवंय!
रात्री पवारांना भेटायला गेलो. ते वाट पाहत होते. बाहेर प्रचंड गर्दी होती. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री अरुण मेहता यांना बोलावून घेतलं. शरद पवार माझं काहीही ऐकून न घेता म्हणाले, ‘माझं राजीव गांधींशी तुमच्याबद्दल बोलणं झालेलं आहे. माझ्यासमोर तुमचंच एकमेव नाव आहे आणि ते मी निवड समितीसमोर ठेवलं. आत्ता दिल्लीला निवड समितीची बैठक चालू आहे. रात्री १२ वाजेपर्यंत तुमचं नाव क्लिअर झालं का ते समजेल. मग सकाळी अरुण मेहतांबरोबर सिंधुदुर्गला जाऊन फॉर्म भरायला. उद्याच शेवटची तारीख आहे.’
शरद पवार त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनुसार भराभर बोलत होते, जणू त्यांनी माझा होकार गृहितच धरला होता. त्यांनी मला बोलायला वावच ठेवला नाही. एक गोष्ट पक्की होती अश वेळी त्यांच्याशी वाद घालणं, त्यांना नकार देणं हेही माझ्यासाठी कठीण होतं. ते माझे चांगले मित्र होते, तरीही मी शेवटचा निर्वाणीचा शब्द म्हणून बोललो, ‘दंडवते याही खेपेला उभे आहेत. तेच याही वेळी निवडून येणार. त्यांना मी विरोध कशासाठी करायचा? राजकारणात कधी नव्हे तो प्रवेश करायचा नि पराभव पत्करायचा, नकोच ते शिवाय दंडवते चांगले उमेदवार आहेत.’
शरदरावांतला मुरब्बी राजकारणी आणि माझ्यातला भाबडा साहित्यिक दोघंही आपआपल्या परीने प्रकट होत होते. शरदराव म्हणाले, “हे राजकारण आहे. इथे सगळेच चांगले असतात. तुम्ही काय वाईट कँडिडेट आहात?’ तुम्ही कसलीही काळजी करू नका. तुम्ही १०० टक्के निवडून येणार याची खात्री बाळगा. मी रात्री बारा वाजता राजीव गांधींशी पुन्हा बोलेन.’
आमची बैठक संपली. मी टॅक्सीतून घरी यायला निघालो. घरी पोचेपर्यंत ११ वाजले. बरोबर १२ वाजता शरदरावांचा फोन आला, ‘राजीव गांधींशी अद्याप बोलणं होऊ शकलं नाही. ते मीटिंगमधेच आहेत. तुमची फ्लाइट कितीची आहे?’
‘अडीचची. एक वाजता तरी निघावं लागेल.’
‘ठीक आहे. मी तुम्हांला पुन्हा एक वाजता फोन करतो.’
बरोबर एक वाजता शरदरावांचा फोन आला. ते रात्रभर जागेच होते. त्यांच्या एकेका उमेदवाराचं भवितव्य तिकडे दिल्लीत ठरत होतं आणि त्यांना जागं राहणं भागच होतं. मी फोन उचलला. शरदराव म्हणाले, ‘राजीव गांधी मीटिंग सोडून गेले आहेत, तेव्हा त्यांच्या मनात काही वेगळंच असावं. तुम्ही आता जायाला निघा.’
आम्ही टॅक्सीतून एअरपोर्टवर जायला निघालो तेव्हा पत्नी मला म्हणाली, ‘आयुष्यात हे राहून गेलं असं वाटण्यासाठीच हे सगळ घडलं. झालं ते ठीकच झालं. तुम्ही नेहमी म्हणता ना, जे आपलं असतं ते आपल्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि जे आपलं नसतं ते प्रत्यक्ष परमेश्वराने दिलं तरी आपल्याला लाभत नाही, याचाच प्रत्यय आला. राजकारण हे तुमच्यासाठी नाहीच.’ नाहीतरी माझा अंतिम निर्णय ठाम नकाराचाच होता, तो मी प्रकट करण्याऐवजी नियतीच्या मार्फत झालं.
मला शरद पवारांनी लोकसभेची सीट देऊ केली होती, हे वृत्त नंतर जगजाहीर झालं. श्री. पु. भागवत यांनी मुद्दाम फोन केला. म्हणाले, ‘तुमचा ‘ललित’ मधील लेख वाचला. तुम्ही राजकारणात गेला नाही, जाऊ शकला नाही, हे वाचून मनावरील ताण कमी झाला.’ दुसऱ्या एका मित्राने विचारलं, ‘शरद पवारांनी नंतर तुमच्या नावाचा राज्यसभेसाठी का विचार केला नाही?’ या बिनतोड प्रश्नावर मी उत्तर दिलं, ‘हा प्रश्न माझ्याऐवजी शरद पवारांनाच विचारायला हवा!’
राजकारणी मंडळींचे हिशेब काही वेगळेच असतात.
हेही वाचाः
कणकवलीत राणेंच्या विजयाचं श्रेय भाजपचंच!
नाथ पै नावाचा झंझावात समजावून सांगणारी पुस्तकं
१९५१ च्या निवडणुकीत कसा होता जवाहरलाल नेहरूंचा प्रचार?
आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय?
आखाती देशांतल्या तन्मय चिन्मयमुळे मोदींच्या अडचणीत होणार वाढ
माणिकराव जाधवांनी शरद पवारांना ईडीच्या फेऱ्यात कसं अडकवलं?
अमित शाहांनी फडणवीसांचा, शरद पवारांनी अजितदादांचा केला गेम?
लोकसभा सदस्यांची संख्या वाढवून प्रतिनिधित्व मिळणार की वाद होणार?
राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही
(आभारः मौज प्रकाशन गृह, मुंबई)