हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ. हॉकीतल्या आताच्या खेळाडूंना आपण कदाचित ओळखत नसू. पण या खेळातले जादूगार म्हणजेच मेजर ध्यानचंद यांना आणि त्यांच्या जबरदस्त खेळाला आपण ओळखतो. १९३६ च्या ऑलिम्पिकमधे भारताने जर्मनीला फायनल मॅचमधे हरवलं. मग त्यावर हिटलरने काय केलं माहितीय?
आज गुरुवार, २९ ऑगस्ट. आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. हॉकीचे जादुगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांची जयंती याच दिवशी असते. काही दिवासांपूर्वी ध्यानचंद यांना भारतरत्न मिळणार अशी बातमी होती. खरंच त्यांचा पराक्रमही तेवढाच मोठा होता.
ध्यानचंद यांची हॉकीतली कामगिरी अभूतपूर्व होती, यात काही वादच नाही. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ या दिवशी अलाहाबादला झाला. त्यांचे वडील सोमेश्वर दत्त हे कडक शिस्तीचे होते. ध्यानचंद चक्क वयाच्या १७ व्या वर्षी ब्रिटीश सैन्यात रुजू झाले. त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे ते सैन्यात मेजरपदापर्यंत पोचले. म्हणूनच त्यांचा उल्लेख नेहमी मेजर ध्यानचंद असाच केला जातो.
सुभेदार भोला तिवारी यांनी ध्यानचंद यांच्यामधल्या हॉकीपटूला घडवलं. मुळातच त्यांच्यात चपळाई, कौशल्य असल्याने त्यांनी हॉकीमधे नाव कमावलं. त्यांनी भारताला ऑलिम्पिकमधे तीनवेळा पदक मिळवून दिलं.
१९३६ मधे जर्मनीची राजधानी बर्लिन इथे ऑलिम्पिक स्पर्धा झाली. या स्पर्धेत ध्यानचंद यांनी भारतीय हॉकी टीमचं नेतृत्व केलं. यात फायनल मॅचमधे भारताने यजमान जर्मनीला ८ विरुद्ध १ गोल करत दणदणीत मात दिली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मॅच बघायला जर्मन हुकुमशहा अडॉल्फ हिटलर स्वतः जातीने मैदानावर उपस्थित होता. ध्यानचंद यांच्या कौशल्यपूर्ण खेळीने जर्मन हुकुमशहालाही प्रभावित केलं होतं.
स्वतःच्या वंशाचा मोठा अभिमान असणाऱ्या हिटलरला या पराभवाने चांगलाच धक्का बसला. जगात अव्वल ते आम्हीच असं गर्वाने सांगणाऱ्या जर्मन लोकांना ध्यानचंद यांनी धक्का दिला. पारितोषिक वितरण समारंभावेळी हिटलरने ध्यानचंद यांच्याशी संवाद साधला. यावेळी हिटलरने ध्यानचंद यांना थेट जर्मनीच्या सैन्यात भरती होण्याचा आग्रह धरला. हिटलरचा शब्द म्हणजे अंतिम शब्द, अंतिम आदेश समजला जायचा. जगावर राज्य करायची महत्वाकांक्षा बाळगून असलेल्या हिटलरचा प्रस्ताव मात्र ध्यानचंद यांनी अत्यंत नम्रपणे नाकारला.
हेही वाचा: रिझर्व बँकेने सरकारला पावणे दोन लाख कोटी दिल्यावर मंदी संपेल?
हिटलर धूर्त आणि कपटी होता. त्याने वरकरणी ध्यानचंद यांचं कौतुक केलं असलं तरी मनातून त्याचा जळफळाट होतहोता. आणि संशयी असल्याने त्याने आपल्या गुप्तहेरांना ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिकची गुप्तपणे तपासणी करायला सांगितली. त्याला संशय होता की ध्यानचंद यांच्या स्टिकमधे चुंबक असावं. म्हणून बॉल त्यांच्या स्टिकला जणू चिकटल्यासारखा असतो. असं काही आढळल्यास ध्यानचंद यांना संपवण्याचा हिटलरचा विचार होता.
ध्यानचंद यांची ‘जादू’ संमोहन किंवा ‘गौडबंगाल’ प्रकारातली नव्हती. ती जादू त्यांनी त्यांच्या कौशल्याच्या जोरावर विकसित केली. त्यांच्या स्टिकमधे आक्षेपार्ह काहीच आढळलं नाही आणि हिटलर आपल्या या प्लॅनवर काही काम करता आलं नाही. ध्यानचंद यांच्या जादूपुढे या हुकुमशहाचे काहीच चाललं नाही.
१९२८, १९३२ आणि १९३६ अशा तीन ऑलिम्पिकमधे ध्यानचंद यांनी भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं. पण याच काळात हिटलरच्या हेकेखोर भूमिकेमुळे जग दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत सापडलं. त्यामुळे नंतरच्या काळात ध्यानचंद यांच्या कारकिर्दीला खीळ बसली. पण या मर्यादित कारकिर्दीतही ध्यानचंद यांनी तीन ऑलिम्पिकमधे एकूण ३९ गोल झळकवले.
१९२८ मधे अमस्टरडॅमला आणि १९३६ ला बर्लिन इथे ऑलिम्पिक फायनलमधे ध्यानचंद यांनी प्रत्येकी तीन गोल केले. गोल करण्यात ते एवढे माहीर होते की एकटेच चेंडू खेळवत प्रतिस्पर्ध्याच्या गोलपोस्टमधे घुसायचे. त्यांची आकडेवारी थक्क करणारी आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजाराहून अधिक गोल नोंदवले.
हेही वाचा: संसदीय राजकारणाचा फड गाजवणारे वकील
१९२६च्या ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड दौऱ्यात त्यांनी २०१ गोल झळकवले. १९२७च्या लंडन दौऱ्यात २९, १९३६च्या दौऱ्यात ५९ आणि १९४७च्या पूर्व आफ्रिका दौऱ्यात ६१ गोल केले. त्यांची कारकीर्द जवळपास २५ वर्ष चालली. १९४९ मधे त्यांनी हॉकीतून निवृत्ती घेतली. त्याला आता ७० वर्ष झाली. त्यानंतर १९५६ मधे ते लष्करातूनही निवृत्त झाले.
१९६२ ते १९७८ या काळात ते पटियालातल्या राष्ट्रीय क्रीडा संस्थेत प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. बऱ्याच वेळा ते भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षकही राहिलेत. आणि त्यांनी निवड समितीतही काम केलं.
१९५६ मधे भारत सरकारने ध्यानचंद यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केलं. ३ डिसेंबर १९७९ या दिवशी त्यांचं निधन झालं. उत्तर प्रदेशमधल्या झाशी हिरोज ग्राउंडवर सरकारने त्यांचं स्मारक उभारलंय. भारतीय टपाल खात्यानेही लगेचच त्यांच्यावर पोस्टाचं तिकीट काढलं. पुढे सरकारने त्यांच्या नावाने देशातल्या सर्वोत्तम क्रीडापटूचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करायला सुरवात केली.
इतकंच नाही तर त्यांची जयंती हा भारतीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णयही सरकारने घेतला. नवी दिल्लीत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने नॅशनल स्टेडीयमवर त्यांचा पुतळा उभारलाय. त्यांचंच नाव या स्टेडियमला दिलं. भोपाळमधल्या स्टेडियमलासुद्धा त्यांचं नाव देण्यात आलंय.
तसंच लंडनमधे ऑलिम्पिक झालं तेव्हा आयोजकांनी एका मेट्रो स्टेशनला त्यांचं नाव दिलं होतं. जर्मनीतही त्यांचा एक पुतळा आहे. तो हिंदू देवता विष्णूसारखा चार भुजांचा तयार केलाय. मेजर ध्यानचंद यांचा लोकांवर इतका प्रभाव होता.
क्रिकेटमधलं दैवत समजल्या जाणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांचे उद्गार लक्षवेधक आहेत. त्यांनी एकदा म्हटलं होतं, क्रिकेटमधे जशा धावा आम्ही ठोकतो, त्याच वेगाने ध्यानचंद हॉकीमधे गोल करतात. यापेक्षा मोठी शाबासकी ती कोणती? त्यांची हॉकीवर इतकी हुकमत होती की वयाच्या ५४व्या वर्षीसुद्धा तेव्हाच्या तरुण खेळाडूंसमोर खेळताना त्यांनी आपल्या ताब्यात चेंडू आल्यावर तो कुणाला हिसकावू दिला नाही.
पद्मभूषण वितरणाच्या समारंभावा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची उपस्थिती होती. त्यावेळी ध्यानचंद यांच्या छातीवर असलेली असंख्य पदकं पाहून नेहरु म्हणाले, 'अहो, मला एक द्या ना, म्हणजे मी कोटावर लावीन आणि खेळाडूसारखा दिसेन!'
हेही वाचा:
झाशीची राणी आता हॉलिवूडही गाजवणार
सर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं!
कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश
नवनीतभाई शहाः संयुक्त महाराष्ट्र लढ्याला पाठिंबा देणारे गुजराती आमदार