दोस्तांनो, आज सायकल डे, मग पुन्हा एकदा सायकल चालवूया?

०३ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज ३ जून जागतिक सायकल दिन. कालपरवापर्यंच सायकल चालवणं आउटडेटेड झालं होतं. पण आता सायकल रायडर्सची संख्या वाढतेय. इतके दिवस नजरेआड झालेली सायकल आपल्याला कुठे दिसली की ती पुन्हा हातात घ्यावीशी वाटते. पण आता सायकल चालवायला जागाच कुठंय, असं म्हणत आपण हा विचार मनातल्या मनातच मारून टाकतो. पण असं नाही. सध्या सायकलिंगचेच दिवस आहेत.

आपण सगळ्यांनीच लहानपणी सायकल चालवलेली आहे. म्हणजे अगदी तीन पायांची सायकल ते शाळेत असताना गिअरवाली सायकल आपण वापरली. आपल्याला मित्र मैत्रिणींबरोबर सायकलवरुन हूंदडायला मज्जा येत होती. पण आता मात्र मुलांना नववी, दहावीपासूनच बाईकचं वेड लागतं. आपल्या कोण्या मोठ्या मित्राची, दादाची बाईक शिकताना मुलं, मुली दिसतात.
आणि सायकल आउटडेटेड झाली.

आणि सायकल आउटडेटेड झाली

पूर्वी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरांतले लोक मोठ्या प्रमाणात सायकलचा वापर करायचे. भारतात १९५५ ला पहिल्यांदा ब्रिटिशांमार्फत रॉयल एन्फिल्ड या ब्रिटीश कंपनीची बुलेट भारतात अवतरली. त्यानंतर १९६० पासून लँब्रेटा, वेस्पा या नॉनगिअर बाईकसुद्धा येऊ लागल्या. मग काय, हळूहळू लोकांचा कल गिअर आणि नॉनगिअर बाईक आणि पुढे कारकडे वळला.

बाईक वरच्या स्टेटसची समजली जाऊ लागली. आणि सायकल आऊटडेटेड. सायकल चालवण्यातली मेहनतही नाही. बाईक रायडींगची मज्जाही यात असल्यामुळे मग आपोआपच सायकल आपल्या आयुष्यातून हद्दपार होत गेली. अशावेळी ही सायकल फक्त लहान मुलं आणि सायकलिंग स्पोर्टमन पुरतीच मर्यादीत राहिली.

हेही वाचा: कुणाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला कसं हरवलं?

सायकलचं कमबॅक झालं

पण आता या सायकलचं कमबॅक वेगवेगळ्या पद्धतीने होतंय. आवड, फिटनेस, भटकंती, वेगवेगळे संदेश देणं, करिअर आणि स्पर्धा इत्यादी गोष्टींसाठी सायकलिंग केलं जातंय. सायकलिंगचे अनेक ग्रुप, कट्टे गेल्या दोन ते तीन वर्षांमधे वाढलेत. मुंबई, पुण्यातल्या तरुणांनी पुढाकार घेऊन सायकल पुन्हा ट्रेंडमधे आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत.

२०१७ मधे फिल्म डायरेक्टर प्रकाश कुंटे यांचा सायकल सिनेमा आला होता. सिनेमाच्या लेखिका आदिती कुंटेने यात सायकलचं महत्त्व आणि आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्यालाही आपल्या लहानपणीच्या सायकलचा विचार मनात आला असेल आणि त्याच्या आठवणीत रममाणही झालो असू.

शेवटी भारतात सायकल आली

सायकल या आपल्या लहानपणीच्या दोस्ताचा शोध कधी लागला? सायकल तर १८०० पासून जगात अस्तित्वात आहे. जर्मनीमधे १८१७ मधे बॅरन कार्ल वॉन ड्रॅस यांनी सायकलचा शोध लावला. त्याआधीही सायकलशी निगडीत शोध सुरु होते. पण ही जर्मनीतली सायकल चालवल्याचे पुरावे असल्यामुळे जगातली पहिली सायकल ठरली. 

मात्र सायकलने भारतात यायला खूप उशीर लावला. आपल्या देशात पोचण्यासाठी ६० वर्षांचा काळ जावा लागला. ब्रिटीश सरकारकडून ब्रिटन कंपनीची रॉवर सेफ्टी बायसिकल १८८५ ला भारतात आली. तेव्हापासून आतापर्यंत सायकलची बदललेली अनेक रुपं आपण बघितली. तसंच सायकलेनेही चांगला, वाईट काळ बघितला.

हेही वाचा: पाकच्या टीमचं काय बिनसलंय, ते पुन्हा बाऊन्स बॅक करणार काय?

मुंबईतलं नाईट सायकलिंग

सायकल भारतात उशिरा आली खरी. पण भारतात दळणवळणासाठीचा एक उत्तम पर्याय म्हणून सायकलचा वापर झाला. आता आउटडेटेड सायकल ट्रेंडींग होतेय. त्यात नाईट सायकलिंग हा प्रकार शहरांमधे पॉप्युलर होतोय. सायकलवरुन रात्रीचं मुंबई दर्शन हा प्रकार तर कमर्शिअलही होऊ लागलाय. यात मुंबईतल्या ऐतिहासिक वास्तू दाखवतात तसंच समुद्र किनाऱ्यांवरुन रायडींग करतात. 

सीएसएमटी स्टेशन, हॉर्निमन सर्कल गार्डन, एशियाटीक लायब्ररी, डेविड ससुन लायब्ररी, गेट वे ऑप इंडीया हा फोर्ट रुट झाला. दुसरा रूट म्हणजे नरीमन पॉईंट ते वांद्रे. या मोकळ्या रस्त्यावरुन समुद्राची हवेची मज्जा घेत रायडींग होते. हे रुट पॉप्युलर झाल्यामुळे पावसाळा सोडून दर विकेंडला इथे गर्दी असते. त्यामुळे बाणगंगा ते विधान भवन, कुलाब्याचं अफगाण चर्च ते पवई तलाव, असं नाईट रायडर्स टीमचे टीम लीडर सोमेश पाटकर म्हणाले.

हेही वाचा: आजपासून क्रिकेट वर्ल्डकप, ‘या’ बॅट्समनवर असणार सगळ्यांची नजर

ब्रेकफास्ट सायकल राईड

महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमधे नाईट सायकलिंगचं प्रमाण वाढतंय. याचबरोबर ब्रेकफास्ट ऑन सायकल हा लोकांना आवडणारा प्रकार आहे. यात सायकलिंग आणि खवय्येगिरी केली जाते. या ब्रेकफास्ट सायकल राईड साधारण सकाळी आठला सुरु होते.

शहरातला एक विभाग ठरवून तिथल्या जुन्या इराणी, पारशी, महाराष्ट्रीयन, गुजराती इटरीजमधे भेटी दिल्या जातात. मग तिथल्या प्रसिद्ध पदार्थांची चव चाखली जाते. काहीजण तर घरच्यांसाठी पार्सलही घेतात. जवळजवळची हॉटेलं निवडली जातात. कारण खाल्ल्यावर खूप वेळ सायकल चालवता येत नाही.

सायकलवरून गणपती दर्शन

अनेकजण स्वत:ला रिफ्रेश करण्यासाठी एखादी आवड जोपासतात. त्यात सायकलिंग हीसुद्धा आवड आहे. विकेंडला अर्धा तास, एक तास सायकल चालवतात. त्यासाठी अनेक लोक गोरेगावच्या आरे कॉलनीत, नॅशनल पार्कला जातात. तिथे सायकल तासाच्या हिशेबाने भाड्याने मिळते.

तर फिटनेस म्हणूनही अनेकांनी सायकलिंग सुरु केलंय. रोज सकाळी जुहू बीचला किंवा घराजवळच्या गार्डनमधे सायकल चालवणाऱ्या मंडळींची संख्या वाढलीय. याबद्दल मोहिनी जाधव सांगते, आम्ही रोज इतर व्यायामांबरोबर सायकलही चालवतो. यंदा गणपतीमधे आम्ही आमच्या परिसरातल्या गणपतींना सायकलवरुन भेटी दिल्या.

हेही वाचा: अमिताभलाही न कळालेला अॅवेंजर समजून घेण्यासाठीचा क्रॅश कोर्स

पुण्यातली सायकलिंग स्पर्धा

सायकल प्रेमी, सायकल कट्टा, द सायकलिस्ट, बायसिकल रायडर्स असे एक ना अनेक ग्रुप आहेत. जे सायकलवर आणि निसर्गावर प्रेम करतात. हे ग्रुप विविध सायकल ट्रीप अरेंज करतात. सायकल चालवायला शिकवतात, सायकलिस्टचे चर्चासत्र भरवतात. तसंच सायकल दुरुस्तीचे वर्कशॉपही घेतात. कारण आता सायकल दुरुस्त करणारी दुकानंही जवळपास बंद झालीत, असं मंगेश कुढाळकर यांनी सांगितलं.

आपण भारतीय लोक क्रिकेटप्रेमी असलो तरी सायकलिंग हा जगातला मोठा खेळ आहे. सायकल पीचवरचं सायकलिंग, रोड सायकलिंग, दुर्गम भागतलं सायकलिंग, लांब पल्ल्याचं सायकलिंग असे काही प्रकार आहेत. पुण्यात दरवर्षी इंटरनॅशनल लेवलची इंड्युरोसारखी स्पर्धा होते. डोंगर, दऱ्यातून सायकलिस्ट सायकल चालवतात. यात वयाचं बंधन नसतं. अनेक सायकलिस्ट ही स्पर्धा जिंकण्यासाठी वर्षभर तयारी करत असतात, असं मीनाक्षी देवळेकर म्हणाल्या.

सायकलिंगमधे वेदांगीने रचला विक्रम

लांब पल्ल्याच्या सायकलिंगमधे सायकलिस्ट चक्क देशाला प्रदक्षिणा, राज्याला प्रदक्षिणा घालतात. तसंच दुसऱ्या देशांमधे जातात. आणि वेगवेगळे रेकॉर्ड रचतात, बक्षिसं मिळवतात. नुकतंच २० वर्षांच्या वेदांगी कुलकर्णीने २० हजार किमीचं अंतर कापत चौदा देशांमधे सायकल चालवली. आणि जग प्रदक्षिणा घालून विक्रम रचला.

सर्वधर्म समभाव, पर्यावरण रक्षण, दहशतवादाला विरोध, शांतीचा संदेश इत्यादी सामाजिक संदेश घेऊन अनेक ग्रुप देशातल्या विविध राज्यामधे जाऊन तिथल्या लोकांना संदेश देतात. यामुळे वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांमधे चांगले संबंध प्रस्थापित होतात, एकमेकांना मदत करतात, असं सोहम कामेरकर म्हणाले.

हेही वाचा: डॉ. पायल तडवीः मेडिकल कॅम्पसमधल्या जातीव्यवस्थेचा बळी!