चला, बदलत्या आईविषयी बोलू काही!

१२ मे २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज वर्ल्ड मदर्स डे. आईला सॉरी मॉमला का काय गिफ्ट द्यायचं किंवा कसं सेलिब्रेट करायचं हे ठरलं असेल ना? आई किती स्पेशल असते आपल्या आयुष्यात. आपण तिच्याशी भांडतो, रागावतो, आपल्या मनातलं सांगतो, तिच्या कुशीत जाऊन सारं जग विसरतो. तिची काळजी, तिचं प्रेम हे कधी नकोस होत नाही. सध्याच्या बदलत्या जीवनशैली सह आपणही बदललो तशी आपली आईसुद्धा बदलली.

आपल्याला शाळेत निबंध लिहायचा असला की हमखास आवडता विषय म्हणजे माझी आई. पहिली ते दहावी हा विषय कधीच बदलला नाही. आणि आपण त्या सर्व निबंधांत एक कवितेची ओळ लिहायचो, आठवतेय का? कवी यशवंत पेंढरकर यांची स्वामि तिन्ही जगाचा आईविना भिकारी.

आई आपल्याला नऊ महिने तिच्या पोटात वाढवते. आपल्या जन्मापासून तिचं आयुष्य फक्त आपल्याभोवती फिरत राहतं. मुलांच्या संगोपनात तिचं असं काही वेगळं आयुष्य उरत नाही. पण काळ बदलतोय, तसा आपल्या आईतही बदल होतोय. असं काय घडलं की आईचं आईपण बदललं?

शिक्षणामुळे महिलांच्या आयुष्यात बदल झाला

आई ही आधी बाई असते. बाई म्हणून तिचं जग वेगळं बनवलं गेलं. म्हणूनच जगभरात महिलांनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला. आजही देत आहेत. पण त्यांनी हळूहळू आपले हक्क मिळवले. विशेषत: महिलांच्या शिक्षणामुळे खूप बदल झाला. सरकारी यंत्रणा, समाजिक कार्यकर्ते, पाश्चात्यांच्या प्राभाव यांमुळे महिला शिक्षणाचं महत्त्व खेडेगावापर्यंत पोहोचलं. शिक्षण, उच्च शिक्षण आणि नोकरी असा एक एक टप्पा महिलांनी पार केला. 

समाजाने ही गोष्ट स्वीकारली आणि पाठिंबाही दिला. त्यामुळे शहरातल्या असो किंवा गावातल्या महिला शिक्षण घेऊन नोकरी करू लागल्या. नोकरी, करिअर याच गोष्टीमुळे महिलांच समाजातलं स्थान ठळक झालं. यामुळे त्यांचं आयुष्य बदलायला सुरवात झाली. त्यांच्या आईला, आजीला जे करता आलं नाही ते त्यांनी केलं. आणि इथुनच आईच स्वरुप बदलायला सुरवात झाली. 

शहरीकरणामुळे देशी, विदेशी कंपन्या आल्या, दळणवळणाचे मार्ग विस्तारले. त्यामुळे रोजच्या जगण्यात बदल झाले. माणसा माणसांतले संबंधांवरही त्याचा परिणाम झाला. पाश्चात्य आणि त्यातही विशेषत: अमेरिकन कल्चरमधल्या गोष्टी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या. हे कल्चर सगळ्यांनी हळूहळू का होईना पण स्वीकारलं. कारण आजूबाजूची परिस्थिती आणि त्याला अनुसरुन राहण्यासाठी या गोष्टींचा स्वीकार झाला.

हेही वाचा : पण मुख्यमंत्री बनलेलं बघायला आई नव्हतीः शरद पवार 

बदलांमुळे आई लांब गेली

आजच्या पिढीतल्या मुलांना नऊवारी साडीतली आई, आजी फक्त समारंभांमधेच बघता येते. आता तर साडीतून महिला जीन्स, पँट शर्ट ते फॅशनेबल टीवीत दिसणारे कपडे घालू लागली. हे कपडे कम्फर्टेबल आहेत म्हणून आपली आई घालते. तिच्या बदलेल्या कामाच्या स्वरुपासाठी तिने स्वीकारलेला हा बदल. 

सध्याची एकूणच परिस्थिती बघता आई आणि बाबा दोघांना नोकरी करावी लागते. त्यामुळे त्यांना आपल्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे आयांना पाळणा घर, बेबी सिटींग, प्ले ग्रुप सारखे पर्याय स्वीकारले. काम संपलं की आया पटापट ऑफिसमधून निघतात. आपली ट्रेन मिस होऊ नये म्हणून कधी कधी तर धावत स्टेशन गाठतात. आपलं बाळ आपली वाट बघतं असेल म्हणून त्या अगदी हिरकणी सारख्या प्रवास करून घरी पोचतात.

हेही वाचा : शेणगोळ्यांची फुलं करणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा

आपल्या बेबी सिटींगमधे वाढलेल्या मुलांना कोणी नावं ठेवू नये, त्यांना सगळं समजावं, त्यांनी शहाण्या बाळासारखं वागावं यासाठी वेळ मिळाला की त्यांना शिकवत असते. घरची आणि ऑफिसच्या जबाबदारीत ती थकते पण आपल्यासाठी नेहमीच फ्रेश असते. कितीही उशिर झाला तरी आपल्या मुलांचा अभ्यास घेते, परिक्षेसाठी खास सुट्टी काढते. सुट्टीत सहल प्लॅन जेणेकरून कामामुळे लांब झालेल्या तिच्या मुलांसाठीसोबत वेळ घालवता यावा. पण तरी यात बॅलंस करताना कुठेतरी कमी राहतेच. त्यामुळे मुलं एकटी पडतात. चुकीची वाटेला जातात, त्यांना लहान वयात नैराश्य येतं.

दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई | नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कोणी नाही | ही संदीप खरेची कविता प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणते. ही गोष्ट खरी असली तरी आई बाबा नेहमीच मुलांना वेळ देण्याचा प्रयत्न करतात, त्यांना अधिकाधिक चांगलं बालपण देण्यासाठी प्रयत्न करत असतात. हे गाणं २०१२ ला रीलीज झालं. आज २०१९ पर्यंत या स्थितीत खूप बदल झालेत. ती आईत बदल होण्याची सुरवात होती. आता आयांनी या अडचीणींवर मात मिळवलीय.

हेही वाचा : मासिक पाळीविषयी आपल्या मुलामुलींशी कसं बोलायचं?

नव्या जमान्यातली स्मार्ट मॉम

नोकरी करणाऱ्या आईला मुलांना कसं समजवायच ते समजलं. त्यासाठी अनेक मानसोपचार तज्ज्ञसुद्धा मदत करत असतात. त्यामुळे मुलं स्वत:हून डेवलप होऊ लागली. आपले छंद जोपासू लागली, त्यात वाढत्या असांग्नेमेंट आणि प्रोजेक्टमुळे ते बिझी झाले. वेळ मिळाल्यावर घरी आईला मदत करू लागले. एकप्रकारे मुलं स्वावलंबी होऊ लागली. मग आई बाबांनीसुद्धा कडक शिस्तीचे रुप बाजूला ठेवून ते फ्रेंड आई बाबा झाले.

आई ही सगळ्यांचीच पहिली मैत्रिण असते. पण आपण मोठे होतो तसे आपल्या मैत्रीत दुरावा येतो. पण आता तसं राहिलं नाही. आपली आई अगदी कुल मॉम बनून प्रत्येकवेळी आपल्या सोबत राहण्याचा प्रयत्न करते. वीडियो गेम खेळते, अॅपवर अभ्यास घेते. तसंच मुव्ही, आऊटींग पासून ते बॉयफ्रेंडच्या गप्पा असो किंवा मग सेक्सवरती चर्चा आई सगळ्यात भाग घेते. आणि या डिजिटल युगात आपली स्मार्ट मॉम आपल्यासोबत वॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रॅमवरसुद्धा अॅक्टीव असते.

हेही वाचा : जेसिंडा अर्डेन, यू आर माय लीडर

आईचा स्वत:चा वेळ, स्वत:च करिअर

मुलं जशी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जातात, अभ्यासातून वेळ काढून छंद जोपासतात. तसंच आता आपली फक्त घर, ऑफिस न करता. स्वत:साठी वेळ देऊ लागली आहे. स्पा, पार्लरपासून ते अगदी विकेंड कोर्स लावणं. मित्र-मैत्रिणींना भेटणं, फिरायला जाणं. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणं. व्यायाम, योग्य आहार स्वत:हून करताना बघितलं की आनंद वाटतो. 

जी बाई पूर्वी स्वत:कडे लक्ष देत नव्हती, तिला फक्त घराच्या मर्यादेत राहावं लागतं होतं. सर्वकाही नवऱ्याला, घरातल्या मोठ्यांना विचारून करावं लागत होतं. ते सर्व ती तिच्या इच्छेने करू लागलीय. ती आता नोकरी फक्त घराला हातभार लावण्यासाठी करत नाही. तर तिच्यातल्या टॅलेंटला वाव देण्यासाठी, तिच्या शिक्षणाचा वापर करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वत:च करिअर घडवण्यासाठी करते. त्यात ती स्वत:ची प्रगती करते. मोठ्या पोस्टवर जाते, आपलं नाव कमावते. हे करत असताना झाशीच्या राणीप्रमाणे घरावरचं संकट झेलून त्यातून मार्ग काढते. अशी सून, अशी बायको आणि अशा आईचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटतो.

हेही वाचा : इस्रायलला घडवणाऱ्या आयर्न लेडी गोल्डा मेयर