पर्यावरण दिनः संवेदनशील कृती करण्यासाठी पावलं उचलुया

०५ जून २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज जागतिक पर्यावरण दिन. शाळेत असताना झाडं लावा, झाडं जगवा, पाणी वाचवा अशा बऱ्याच घोषणा दिल्या. पण मोठं झाल्यावर लक्षात आलं की आपण माणसं निसर्गातली कोणतीच गोष्ट टिकवणार नाही आहोत. आपल्यालाही त्याची गरज असल्यामुळे फक्त बोलीबच्चन देण्यापुरतंच स्वत:ला पर्यावरणवादी म्हणवतो. मग शाश्वत विकासासाठी नेमकं काय केलं पाहिजे?

'मिया अँड द व्हाईट लायन' हा २०१८ मधे रिलिज झालेला गिल्स ड् मेयस्ट्री दिग्दर्शित सिनेमा. यात मिया या मुलीची पांढऱ्या सिंहाबरोबर असलेल्या अनोख्या मैत्रीची गोष्ट आहे. या सिनेमाची कंसेप्ट भारी असली तरी, हा सिनेमा मनोरंजनाच्या पुढे जाऊन आपल्याला काहितरी सांगतो.

मिया चार्ली सिंहाला वाचवेल?

मियाचं कुटुंब लंडन सोडून ‘लायन फार्म’ सांभाळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या गावात राहू लागले. तिची शाळा, मित्र मैत्रीणी लंडनला असल्यामुळे आफ्रिकेत येणं तिला अजिबात आवडलेलं नव्हतं. पण एकेदिवशी या फार्मवर चार्ली नावाचा एक पांढरा छावा येतो. मियाची त्याच्याशी मैत्री होते आणि तिचं आयुष्यच बदलून जातं.

या फार्मवर वेगवेगळे प्राणी असतात. आणि या प्राण्यांना नियमितपणे कुठेतरी पाठवलं जातं. मियाला वाटत असतं की, हे प्राणी सुरक्षित ठिकाणी पाठवले जातं आहेत. पण या प्राण्यांची नेमकी कुठे पाठवणी होते हे मात्र माहिती नसतं. हेच शोधण्यासाठी एक दिवस ती गुपचूप प्राण्यांना घेऊन जाणाऱ्या गाडीच्या टपावर बसून जाते. तिथे गेल्यावर तिला धक्कादायक चित्र दिसतं. ते बघून ती ती पेटून उठते. 

त्या फार्ममधले प्राणी बंद पिंजऱ्यातल्या शिकारीसाठी म्हणजेच केज्ड हंटींगसाठी पाठवलं जात होतं. कॅन्ड किंवा ट्रॉफी हंट सारखाच शिकारीचा प्रकार आहे. मियाला समजलं की या शिकारीतून खूप पैसे कमवले जात होते. शिवाय हे कायदेशीर आहे. त्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली.

माणूस जग बदलू शकतो?

यानंतर तिच्या मित्राचा म्हणजे चार्लीचा नंबर असतो. मग ती लवकरात लवकर त्याला यातून वाचवण्याचा प्रयत्न करू लागते. मिया ही एक संवेदनशील पण तितकीच बंडखोर मुलगी असते. कमालीची हुशार आणि धाडसी मिया चार्लीला मुक्त आयुष्य देण्यासाठी योजना बनवते. ती चार्लीला पांढऱ्या सिंहांच्या अभयारण्यात पोचवण्याचा निर्णय घेते. 

सारे अडथळे पार करताना तिला आपल्या बापाविरुद्धही उभं राहवं लागतं. ती त्यांच्याशी भांडते आणि प्रसंगी त्याच्यावर बेशुद्ध करण्याची गोळीसुद्धा झाडते. ते तिला ओरडून सांगतो, ‘यू कान्ट चेंज द वर्ल्ड.’ आणि ती त्यांना म्हणते, ‘यू कॅन, इफ यू वॉन्ट.’ हे बोलताना तिच्या डोळ्यांतील रोख खूप काही सांगून जातो.

हेही वाचाः फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टीकोन

आणि चार्ली सिंह वाचतो

पुढचा थरारपट अनुभवण्यासाठी सिनेमाच बघावा लागेल. पण शेवटी चार्लीला मारण्यासाठी हेलिकॉफ्टर आणि गाड्या येतात तेव्हा मिया ओरडून ओरडून सांगते, ‘प्लीज, त्याला मारू नका.’ तिचे वडील परत तेच हतबलतेनं उत्तर देतात, ‘आय अॅम सॉरी. आय टोल्डू यू, यू कान्ट चेंज द वर्ल्ड.’ मिया चिडून, मोठ्याने ओरडून म्हणते, ‘यू कॅन, प्लीज सेव हिम.’ 

त्यानंतर तिचे वडील सिंहाच्या बाजूने हात पसरवून त्याच्यासोबत चालत जातात. ज्यामुळे शूटरला गोळी झाडता येत नाही. तोपर्यंत चार्लीने अभयारण्याच्या गेटमधून आत प्रवेश करतो. जिथे त्याला पोहचवण्याचं मियाचं स्वप्न असतं. अभयारण्याच्या हद्दीत हत्या करण्याला परवानगी नसल्यामुळे चार्ली वाचतो. हा झाला चित्रपट. पण खऱ्या आयुष्यात काय होतं? 
अवनी वाघीणीचं पुनर्वसन झालं असतं?

प्रत्यक्षात आपण मात्र वन्यजीवांच्या हद्दीत जाऊन त्यांना मारतो. कारण जेव्हा अवनी या वाघिणीची हत्या होते तेव्हा तिला वाचवण्यासाठी आपल्या एका कृतीने कोणाचं आयुष्य वाचू शकतं, ही कृतियुक्त संवेदनशीलता असणारी कोणी मिया तिथे नसते. हे फक्त सिनेमातच होतं. 

आपण कायदेही आपल्याच सोयीने बनवतो आणि त्यांची अंमलबजावणीही आपल्याच सोयीने करतो. अवनीची हत्या होऊ नये म्हणून याचिका दाखल केली होती, तेव्हा त्यात महत्वाच्या गोष्टी नोंदवल्या होत्या त्या अशा-
१. ही वाघीण नरभक्षक नाही. मनुष्यप्राणी हे वाघाचे नैसर्गिक भक्ष्य नाही. 
२. या जंगलात ठार झालेल्यांपैकी बहुतेक गुरे चारण्यासाठी आलेले गुराखी होते. या जंगलात मुक्त वावराचा वाघिणीचा परवाना बिनशर्त आहे आणि याउलट गुरे चारण्याचा गुराख्यांचा परवाना सशर्त आहे. 
३. या वाघिणीने आसपासच्या गावांमध्ये घुसून माणसांचा संहार केलेला नाही. झालेले हल्ले हे जंगलातील आहेत, जे तिचे क्षेत्र आहे. 
४. बछडे घेऊन जंगलात वावरणारी कोणतीही वाघीण ही नेहमीच संशयी, सावध आणि आक्रमकही असते. त्यामुळे जंगलातील हल्ले हे संरक्षणासाठी झाले आहेत.

वाघ, बिबटय़ा, अस्वल, हत्ती यासारख्या प्राण्यांकडून त्यांच्या हद्दीत गेल्यावर स्वबचावासाठी माणसांवर हल्ले होण्याचे प्रकार होत असतात. अशा प्रसंगामधे खूपदा माणसाचा मृत्यू अटळ असतो. म्हणून त्यांना नरभक्षक ठरवणं चुकीचं आहे. वन खातं, सरकार, प्रशासन, न्यायपालिका यांची संवेदनशील भूमिका अपेक्षित होती. अवनीचे तिच्या बछड्यांसह पुनर्वसन करता येईल का किंवा इतर कोणते उपाय करता येतील का याचा विचारही केला नाही. आपण मियासारखे संवेदनशील होऊ शकलो नाही.

हेही वाचाः दोस्तांनो, आज सायकल डे, मग पुन्हा एकदा सायकल चालवूया?

आपल्यातली संवेदनशीलता कुठेय?

कोणताही पर्याय न शोधता तिची हत्या करणारे आपण परत परत आपली असंवेदानाशीलताच दाखवतो. त्यामुळे तिच्या क्षेत्रात मानवी हस्तक्षेप थांबावा म्हणून काही उपाय न करणं किंवा केवळ पकडण्याचा परवाना असताना तिची हत्या करणं म्हणजे आपली निष्क्रियताच आहे. कारण कोणताही वाघ किंवा वाघीण न्याय मागणार नाहीत. तसंच ते तुमचे मतदारही नाहीत. 

त्यामुळे कोणकोणते प्राणी आणि त्यांच्या प्रजाती धोक्यात आहेत. आणि त्याचे पर्यावरणीय परिणाम काय आहेत हे समजूनही आपल्यात खरंच काही फरक पडतो का? जर प्राणी नष्ट झाले मानवी संस्कृती सोडा, मानवच नष्ट होऊ लागतील. हा निसर्गही राहणार नाही. तरिही आपल्या नकळत पर्यावरणाला धोकादायक असणाऱ्या कितीतरी प्रकल्पांना सहज क्लिअरन्स मिळतो.

शाश्वत विकासासाठी, संवेदनशील कृती

त्या प्रकल्पांसाठी अनेक हेक्टर जमिनीवर वृक्षतोड होतो. ज्या ठिकाणी किनारा जैविविधता संवर्धनासाठी किनाऱ्यांवर बांधकाम न करण्याची तरतूद भरतीच्या लाटेच्या रेषेपासून २०० मीटर होती, ती आता आपल्या सोयीने ५० मीटरवर आणली. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचे पर्यावरणावर आणि आपल्यावर दूरगामी परिणाम होणार आहेत.

विकास म्हणजे बेसुमार झाडांची तोड आणि निसर्गाचा ऱ्हास होतो. ही गोष्ट आपल्या मनावर पक्की बिंबवली गेली आहे. त्यामुळे आपण ही गोष्ट गृहीत धरून विकास करत आहोत. म्हणूनच आपण पर्यायी गोष्टींचा विचार करायला आणि विध्वंसक प्रकल्पांना विरोध करायलाच विसरलो आहोत. कारण आपण मूळात विकासाची संकल्पना विसरलोय.

पर्यावरण दिनानिमित्त शाश्वत विकासासाठी आपल्या व्यापक जबाबदाऱ्यांवर विचार करायला हवा. म्हणजे झाडे लावण्याचे आणि पाणी जपून वापरण्याचे सल्ले देणं, इथपर्यंतच आपली जबाबदारी मर्यादित राहणार नाही. केवळ संवेदनशील असणं पुरेसं नाही. त्याला कृतीची जोड देणंही तितकंच गरजेचं आहे. शाश्वत विकासासाठी आपल्याला संवेदनशील कृतीची गरज आहे.

हेही वाचाः 

पाण्याचीही साहित्य संमेलनं होऊ शकतात!

ट्रम्पतात्यांचा दोस्त नरेंद्र मोदींना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी झटका

निर्मला सीतारामन देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत, खरंच?