धि गोवा हिंदू असोसिएशन यंदा शताब्दी साजरी करतेय. नव्या पिढीला या संस्थेविषयी फारसं माहीत नसेल. पण या संस्थेने मराठी रंगभूमीला, विशेषतः संगीत रंगभूमीला नवी झळाळी दिली. दर्जेदार नाटकं दिली. नवे कलावंत, संगीतकार दिले. गोव्याबाहेर राहणाऱ्या गोव्यातला लोकांना एकत्र करता करता या संस्थेने मराठी रंगभूमीला आकार दिला.
गोमंतक ही कलाकारांची भूमी मानली जाते. या गोमंतकाने कितीतरी चांगले कवी, लेखक, अभिनेते, अभिनेत्री, संगीतकार मराठीला दिले. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेमुळे मराठी रंगभूमीला नवी झळाळी मिळाली. विशेषतः संगीत नाटकांना संजीवनी देण्याचे कार्य या संस्थेनं केलं. ही संस्था यंदा आपलं शताब्दी वर्ष साजरं करत आहे. पण मुळात ही संस्था स्थापन झाली होती ती सामाजिक, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी.
गोव्यामधून दूर राहायला गेलेल्यांना एकत्र आणावं हा या संस्थेच्या निर्मितीमागचा उद्देश होता. गोमंतकवासीयांच्या आरोग्य, शिक्षण यामधल्या गरजा भागवण्यासाठी वाहून घ्यायचा संकल्प संस्थेनं २४ ऑगस्ट १९१९ला सोडला. तिथून पुढे या संस्थेने इतरही क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं. १९५५ मधे कला विभागही सुरु झाला. या कला विभागात अनेक हरहुन्नरी मंडळी सामील झाली. त्यांच्या प्रयत्नांतून अतिशय दर्जेदार अशी मराठी नाटकं सादर केली जाऊ लागली. हा सिलसिला निरंतर टिकवण्यात संस्थेला चांगलं यश मिळालं, हे विशेष.
सुरवातीला राज्य नाट्यस्पर्धेत ही संस्था नाटक बसवून भाग घेत होती आणि हमखास बक्षिसं मिळवत होती. १९५५ मधे संस्थेने ‘खडाष्टक’ हे नाटक मुंबई राज्य म्हणजेच आत्ताच्या महाराष्ट्र वार्षिक नाट्य सोहळ्यात उतरवलं आणि बक्षिसही मिळवलं. नंतरच्या वर्षीचं त्यांचं ‘संशयकल्लोळ’ हे नाटकही स्पर्धांमधून गाजलं. १९५७ मधे ‘करीन ती पूर्व’ नाटकाने त्यांना बक्षिसाची हॅट्ट्रिक साधून दिली. १९५९ मधे ‘शारदा’ नाटकानेही तोच पराक्रम गाजवला.
१९६० मधे शरदचंद्र निफाडकर यांचे ‘युद्धस्य कथा रम्य’ हे नंदकुमार रावते दिग्दर्शित नाटकही रसिकांच्या पसंतीला पडलं. रावतेंनीच मग १९६१ मधे संस्थेसाठी गो.ब. देवल यांचे ‘मृच्छ्कटीक’ दिग्दर्शित केलं आणि प्रतिभाशाली गोपीनाथ सावकार यांनी ‘होनाजी बाळा’ याच वर्षी दिग्दर्शित करून रसिकांना खुश करून टाकलं. संस्थेतर्फे पहिलं व्यावसायिक नाटक रंगभूमीवर आले ते १९६२ मधे. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे ते नाटक. या नाटकात लेखक वसंतराव कानेटकरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पुत्र संभाजी महाराज यांच्यातील संबंध उलगडले होते.
नाटकाचे दिग्दर्शक होते मास्टर दत्ताराम. त्यांनीच शिवाजी महाराजांची भूमिका केली होती आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेत होते डॉ. काशिनाथ घाणेकर. या दोघांमधली अभिनयाची जुगलबंदी तुफान रंगायची. डॉक्टरांनी संभाजी महाराजांना वलयांकित केलं आणि आज संभाजी महाराजांवर संघटनाही निघताहेत. पण तेव्हाच संभाजी महाराजांच्या कथा आणि व्यथा या नाटकाने पुढे आणल्या होत्या.
हेही वाचाः अमेझॉनचं जंगल कसं आहे? आणि तिथले आदिवासी कसे राहतात?
लगेचच म्हणजे १९६४ मधे वसंतराव कानेटकरांनी आणखी एक जबरदस्त नाटक या संस्थेला करायला दिलं. ते म्हणजे ‘मस्त्यगंधा’. या नाटकासाठी त्यांनी गाणीही लिहिली होती. एक गाणं बालकवींचं तर एक कवी गिरीश यांचंही घेतलं होतं. तेव्हा गोपालकृष्ण भोबे यांनी संगीत देण्यासाठी जितेंद्र अभिषेकींचं नाव सुचवलं.
आधी अभिषेकींचं म्हणणं पडलं की या नाटकाला गाण्यांची गरजच नाही. पण कानेटकर आग्रही राहिले आणि अभिषेकींनी अतिशय मेहनत घेऊन नव्या कलाकार गायकांकडून अप्रतिमरित्या गाणी बसवली. रामदास कामत, आशालता वाबगावकर यांच्या गाण्यांनी मग कहर केला. विशेष म्हणजे आपण मैफलीसाठी गाणं गातोय, असं वाटून न घेता नाटकातील व्यक्तिरेखा, प्रसंग याचे भान ठेऊन गाण्यावर भर दिला.
गद्यातून पद्य आणि मद्यातून गद्य येईल असा सगळा बाज त्यांनी ठेवला आणि यातली गाणी लोकप्रिय झाली. ‘गुंतता हृदय हे’, ‘नको विसरू संकेत मिलनाचा’, ‘नव भास अंतरा झाला’, ‘गर्द सभोवती रात साजणी’, ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ ही सगळी गाणी रेकॉर्ड आल्यावर घरोघर पोचली आणि आधी चाळीसेक प्रयोगापर्यंत कसंबसं चालवलेले हे नाटक धडधड पाचशे प्रयोगाची मजल मारून राहिले. या नाटकाने संगीत नाटकांना खऱ्या अर्थाने संजीवनी दिली.
प्रयोगशील आशा काळे - अभिषेकी जोडीने मग १९६६ मधे पुन्हा आपला करिश्मा दाखवला. त्यांच्या ‘लेकुरे उदंड झाली’ नाटकानेही एकच धमाल उडवून दिली. हलकं फुलकं असं हे नाटक. यातली गाणी बसवताना अभिषेकींनी गोवा आणि कोकणी या दोन्हींची मदत घेतली. श्रीकांत मोघे आणि दया डोंगरे यांच्या उत्फुल्ल अभिनयाने या नाटकाला आणखी आनंदी, प्रसन्न केलं. याच वर्षी संस्थेने वेंकटेश वकील यांचे ‘आर्य चाणक्य’सुद्धा रंगभूमीवर आणले होते. याचे दिग्दर्शक होते भिकू पै आंगले.
ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या वेगळ्या पैलूवर नाटकं आणायचा संस्थेनं धडाकाच लावला. १९६९ मधे आलेलं ‘धन्य ते गायनीकला’ हे नाटक संगीतसम्राट तानसेन याच्या जीवनावर आधारित होतं. गोपालकृष्ण भोबे यांचं हे नाटक. विशेष म्हणजे पं. भीमसेन जोशींनीसुद्धा या नाटकाच्या संगीतासाठी सहाय्य केलं होतं. पुढच्याच वर्षी पुन्हा लेखक कानेटकर आणि दिग्दर्शक मास्टर दत्ताराम यांचं ‘तुझा तू वादळी राजा’ या नाटकाचे पदार्पण झाले.
हेही वाचाः ‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!
१९७० मधे संस्थेने आणखी एक अजरामर नाटक निर्माण केले. ते म्हणजे वि.व. शिरवाडकर यांचे ‘नटसम्राट’. त्यातील प्रसंग, संवाद यांचं गारुड आज जवळ जवळ ५० वर्षानंतरही रसिकांच्या मनावर आहे. डॉ. श्रीराम लागू यांचा नटसम्राट आणि शांता जोग यांची त्यांना असलेली साथ यामुळे साडेसातशे प्रयोग या नाटकाने सहज केले. पुढे अन्य कलाकार नटसम्राट साकारत राहिले. याचवर्षी पद्मश्री धुंडीराज हे एक वेगळे नाटकही भाव खाऊन गेले. नलिनी सुकथनकर यांच्या नाटकाचे दिग्दर्शन मंगला संझगिरी यांनी केले होते.
यानंतरही दर्जेदार नाटके देण्यात संस्था यशस्वी ठरली. ‘मीरा मधुरा’, ‘बिऱ्हाड वाजलं’, ‘सभ्य गृहस्थ हो’, ‘संध्याछाया’, ‘अखेरचा सवाल’, ‘दिसता तसा नसता’, ‘बॅरिस्टर’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘मंतरलेली चैत्रवेल’, ‘दुर्गी’, ‘हयवदन’, ‘स्पर्श’, ‘तू तर चाफेकळी’ ही सगळीच नाटके दर्जेदार होती. यापैकी मंतरलेली चैत्रवेल या नाटकाच्या वेळी दौऱ्यावर असताना संस्थेच्या बसला भीषण अपघात झाला आणि त्यात शांत जोग, जयराम हर्डीकर यांचा मृत्यू झाला. तेव्हा मराठी नाट्यरसिकांमधे खूप हळहळ व्यक्त झाली.
या संस्थेने अनेक उमदे दिग्दर्शक, संगीतकार आणि अभिनेते मराठी रंगभूमीला दिले. गोपीनाथ सावकार, वसंतराव कानेटकर, मास्टर दत्ताराम, मो. ग. रांगणेकर, रघुवीर नेवरेकर, रामदास कामत, जितेंद्र अभिषेकी अशी कितीतरी नावे या दृष्टीने घेता येतील. दर्जेदार नाटके देण्याचा वसा घेतलेल्या या संस्थेचे कार्य अफाटच आहे. नाटक हे सुसंस्कृत समाजाचं चिन्ह मानलं जातं. सामाजिक जाणीव जपताना ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ने विविध क्षेत्रांबरोबर मराठी रंगभूमीचंही भलं केलं, यात शंका नाही.