हापूस झगडतोय अस्तित्वासाठी

१७ मार्च २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आंबा म्हटलं की समोर येतो तो हापूस. अवीट गोडीचा रसाळ आंबा. उन्हाळा सुरु झाल्यावर सगळेजण फळांच्या राजाची अर्थातच हापूस आंब्याची वाट पाहू लागतात. हाच आंबा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. वेगवेगळ्या केमिकलच्या वाढत्या वापराने आंब्याच्या दर्जात आणि किंमतीतही घसरण सुरू आहे. फळांचा राजा हापूस आंब्याला झालंय तरी काय? त्याची शान हरवलीय का? याचा घेतलेला वेध.

उन्हाळ्याच्या कडक गर्मीत मनाला आनंद देणारं केशरी पिवळ्या, मधुर स्वादाचं असं प्राचीन भारतीय फळ  म्हणजे आंबा! ज्याने जगभरातल्या खवय्यांना भुरळ पाडलीय. भारतात साधारण ५ हजार वर्षांपूर्वीपासून आंबा पिकत असल्याचं वेगवेगळ्या संशोधनातून समोर आलंय. १० व्या शतकाच्या पूर्वार्धापासून आंब्याचा परकीय देशांशी व्यापार होऊ लागला.

आता हिवाळ्यातच येतोय बाजारात

लोधी साम्राज्यातले राजे, बाबर, नंदा साम्राज्यातले राजे यांनी संपूर्ण भारतभरात आंब्याला राजेशाही थाट मिळवून दिला. तर पोर्तुगीजांनी कोकणातल्या हापूस आंब्याची चव संपूर्ण जगाला चाखालयला लावली. हापूस हा फळांचा राजा आहे तसा खवय्यांच्या मनाचा ही राजा आहे. पण सध्या या सेलिब्रिटी हापूस आंब्यावर त्याच्या दर्जाला घेऊन बोट ठेवलं जातंय.

पूर्वी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आंबा व्यवसायाची सुरवात व्हायची. गेल्या ८, ९ वर्षांपासून आंबे हिवाळ्यातच शहरांमधे दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या पिकवण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जाताहेत. यंदा तर नवी मुंबईतली कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच एपीएमसी मार्केटमधे गेल्या ५० वर्षांत आंब्याची सर्वात मोठी आवक झालीय.

८५० आंब्याच्या पेट्या २८ जानेवारीलाच दाखल झाल्या. त्यापैकी हापूस आंब्याच्या प्रत्येकी ४ ते ६ डझनाच्या ६०० पेट्या कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेल्या आहेत. याच्या एका पेटीची किंमत २ ते ५ हजार रुपये आहे. हीच पेटी पूर्वी १२ ते ८ हजारांना विकली जायची. हिवाळ्यातला भाव उन्हाळ्यात विशेषत: मे महिन्यात जवळपास निम्मा होतो. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आंब्याचा विशेषत: हापूसचा भाव घसरतोय.

आंब्यांच्या उत्पन्नात वाढ

दमट, उष्ण वातावरणात पिकणाऱ्या हापूस आंब्याचं व्यापारीकरण १९७८ नंतर सुरु झालं. आंब्याला मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे त्याची किंमत जास्त होती. तसंच परदेशातल्या मागणीमुळेही किंमती वधारल्या होत्या. मात्र आता आंब्याचं उत्पन्न वाढलं आणि रसायनांच्या वापरामुळे उत्पन्नाचं प्रमाणही वाढलंय. पूर्वी एका एकरात ३५ आंब्यांची झाडं लावली जायची तिथे १२५ ते १३० झाडं लावली जाताहेत. त्यामुळेही बाजारातली आवक वाढलीय.

सध्या आंब्याचा भाव घसरला असला तरी अॅग्रो टुरीझमसारखे पर्याय उपलब्ध झालेत. त्यामुळे आंब्याच्या बागेची सफर पर्यटकांना घडवून आणली जातेय. हा जोडधंदा कोकणातल्या अनेक बागायतदार शेतकऱ्यांनी सुरु केल्याचं कृषी मार्गदर्शक जयराम काळोखे यांनी सांगितलं.

पारंपरिक आणि व्यावसायिक शेतीतला फरक

आंब्याची शेती ही संकल्पना मूळात व्यापारीकरण वाढल्यामुळे कोकणवासीयांमधे रुजलीय. अमेरिकेत दर १५ वर्षांनी आंब्याच्या झाडाची पुनर्लागवड केली जाते, असं नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संजय पानसरे यांनी सांगितलं. आपल्याकडे मात्र आजोबांनी लावलेल्या झाडांची फळं त्यांची मुलं, नातवंड खात असतात.

कोकणातल्या अनेक कुटुंबांची परंपरागत १०० वर्ष जुनी आंब्याची झाडं आहेत. तरीही ही झाडं त्यांच्या वयाच्या टप्प्यानुसार तेवढ्याच प्रमाणात मधुर फळ देतात. मात्र त्यांचा व्यापार खूप मर्यादीत होतो. झाडाला १०, १५ वर्षानंतर कलम लावण्याची प्रथा आहे. त्यामुळे झाडं अधिक बहरतं. मात्र अशावेळी व्यापारी दृष्टीने केलेली बागायती शेती आणि परंपरागत झाडांच्या फळांमधे फरक पडतो, असं काळोखे सांगतात.

बदलत्या वातावरणाचा परिणाम

सध्या प्रदूषण हे फक्त शहरांपुरते मर्यादीत राहिलेलं नाही. गावागावांमधे जाऊन पोचलंय. बदलत्या वातावरणाचा शेतीवर मोठा परिणाम जाणवतोय. २०११ मधे हापूस आंब्यावर थ्रिप्स नावाचा रोग पडला होता. गेल्यावर्षी अंथरॉक्स नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. या दोन महत्त्वाच्या रोगांमुळे आंब्याचं प्रमाण घटलंय आणि साहजिकच बाजारातली आवक कमी झाली होती.

अशाप्रकारे झाडांवर पसरणाऱ्या वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या रोगराईला रोखण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. यात स्प्रिन्टॉर, कल्टार इत्यादींचा समावेश आहे. कल्टार रसायनामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते, असे देवगड इथले बागायतदार मोहन परशेट्ये यांनी सांगितलं.

कॅल्शिअम कार्बाइड या रसायनाचा वापर करून आंब्यांना आकर्षक तांबूस पिवळा रंग चढवला जातो. यावर राज्य सरकारने बंदी घातलीय. तरीही घसघशीत नफ्यासाठी असे प्रकार सर्रासपणे सुरु आहेत. व्यापारी शेतीमुळे आंब्याचा रंग, आकार, चव, रसाळपणात फरक पडलाय, अशी तक्रार गेल्या तीन-चार वर्षांपासून शहरी ग्राहकांकडून येत असल्याचं आंबा विक्रेते सुमित श्रृंगारे यांनी सांगितलं.

या सगळ्यांचा सर्वात मोठा फटका परदेशात होणाऱ्या निर्यातीवर झालाय. देशी बाजारपेठेतही परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे कोकणातल्या हापूस आंब्याव्यतिरीक्त इतर राज्यांत होणाऱ्या हापूस आंब्यांची विक्री वाढलीय. त्यात हा व्यवसाय एवढा मोठा झालाय की यात मुकेश अंबानींची रिलायन्स कंपनीही गुजरातच्या जामनगरमधे ६०० एकर जागेत १२७ जातीच्या आंब्यांचं उत्पादन घेऊ लागलीय. त्यामुळे कोकणातल्या हापूसला बाजारात खूप मोठ्या स्पर्धेला सामोरे जावं लागतय.

अशातच आता आंब्यावर दव पडल्यामुळे देठाजवळचा भाग काळपट पडू लागलेत. कोकणातल्या हापूस आंब्याला आपलं साम्राज्य टिकवण्यासाठी या सर्व आव्हानांवर मात करावी लागणार आहे. आंब्याचा दर्जा आणि गुणवत्ता टिकली तरच हापूस फळांचा ‘अनभिषिक्त सम्राट’ म्हणून कायम राहील.