ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य

२३ जुलै २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चांद्रयान २. १५ जुलैचं उड्डाण रद्द झाल्यानंतर काल २२ जुलैला यानानं उड्डाण घेतलं. हे रोमांचकारी दृष्य आपण टीवीवर, ऑनलाईन पाहिलं. जगातून इस्त्रोच्या या मोहिमेचं आणि अर्थातचं भारताचं कौतुक होतंय. पुढे ४० पेक्षा जास्त दिवस चंद्रावर पोचण्यासाठी लागतील. पण या ३.८ टन वजनाच्या यानाचा प्रवास नेमका कसा होणार आहे?

चांद्रयान २ या भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळयानाचं प्रक्षेपण झालंय.२२ जुलैला श्रीहरीकोटाहून सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान २ ने दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी उड्डाण घेतलं. ही मोहीम इस्रोच्या आणि भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ३.८ टन वजनाच्या यानात अवकाशात सोडण्यासाठी १३ उपग्रह आहेत. चंद्रावर पोचण्यासाठी यानाला ५४ दिवसांच्या कालावधी लागणार आहे. चंद्रावर उतरण्यापूर्वीची १५ मिनिटं यानासाठी सर्वाधिक तणावाची असणार आहेत.

भारत पहिल्यांदा सॉफ्ट लँडिंग करणार

प्रक्षेपण झाल्यानंतर पृथ्वीपासून १८१.६ किलो मीटर अंतरावर गेल्यानंतर चांद्रयान २ प्रक्षेपकांपासून वेगळं झालं. यानंतर २३ दिवस चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेत राहिल. ३० ते ४२ दिवसांत चांद्रयान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. जीएसएलव्ही एमके ३ अवकाशात चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर विक्रम हे ऑर्बिटरपासून विलग होईल. आणि ते अत्यंत सावकाश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ठरवलेल्या प्रदेशात उतरेल. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत हा अमेरिका, रशिया, चीननंतर जगातील चौथा देश बनेल. तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरेल. ६ सप्टेंबरला चंद्रावर सॉफ्ट लॅण्डिंग होईल.

चंद्रापासून ३० किलोमीटर इतक्या अंतरावर गेल्यानंतर चांद्रयान २ ची गती कमी करण्यात येईल. विक्रमला चंद्राच्या भूमीवर उतरवणं अतिशय आव्हानात्मक असेल. भारत पहिल्यांदाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. चंद्रावर उतरण्यापूर्वीच्या कालावधीत आम्ही असं काही करू जे यापूर्वी कधीही केलं नाही. म्हणूनच केवळ इस्रोसाठीच नाही, तर संपूर्ण भारतीयांसाठीच ही १५ मिनिटं तणावाची असतील. असं इस्त्रोचे प्रमुख के. शिवन यांनी मीडियाला सांगितलं.

हेही वाचा: चांद्रयान २ : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारं पहिलं अंतराळयान

लँडींगचे फोटो कधी मिळणार?

पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचं अंतर ३ लाख ८४ हजार किलोमीटर इतकं आहे. चंद्रयान २ मार्फत लँडर 'विक्रम' आणि रोवर 'प्रज्ञान' चंद्रापर्यंत जातील. चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी रोवर 'विक्रम' उतरण्याच्या जागेची पाहणी करणं सुरू करेल. त्यानंतर लँडर यानापासून डिबूस्ट होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोचेल. जिथे उतरायचे आहे त्या जागेचे स्कॅनिंग सुरू होईल.

स्कॅनिंग झाल्यावर ६ ते ७ सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर रोवर प्रज्ञान बाहेर येईल. रोवर बाहेर येण्यासाठी सुमारे ४ तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परीक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागतीलल. नंतर पुढील १५ मिनिटांच्या आत इस्रोला लँडिगचे फोटो मिळणं सुरू होईल. तसंच भारत स्वत:चं अवकाश स्थानक उभं करणार असून हा प्रकल्प प्रस्तावित ‘गगनयान’ मोहिमेचा भाग असेल असंही के. शिवन म्हणाले.

हेही वाचा: चंद्रावर पहिलं कोण पाऊल ठेवणार यावरुन वाद झाला होता

नवा इतिहास घडवण्यासाठी चांद्रयान २ सज्ज

स्वदेशी निर्मिती असलेल्या चांद्रयान २ मधे एकूण १३ पेलोड आहेत. आठ ऑर्बिटरमधे ३ पेलोड लँडर विक्रम आणि २ पेलोड रोवर प्रज्ञानमधे आहेत. यात ५ भारताचे, ३ युरोपचे, २ अमेरिकेचे आणि एक बुल्गारियाचा पेलोड आहे. लाँचिंगनंतर सुमारे १६ मिनिटांनी जीएसएलव्ही एमके ३ चांद्रयान २ ला पृथ्वीच्या कक्षेत सोडेल. लँडर विक्रमचे नाव भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम ए. साराभाई यांच्या नावावरून ठेवण्यात आलंय. तर २७ किलो वजनाचा रोवर प्रज्ञान याचा अर्थ आहे बुद्धिमत्ता.

चांद्रयान १, मंगलयान १ नंतर इस्रोची चांद्रयान २ ही तिसरी महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. तिचा खर्च ९७८ कोटी रुपये आहे. आणि या प्रकल्पाची रक्कम जगातल्या इतर अंतराळ प्रकल्पांच्या तुलनेत स्वस्त आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर भारताकडे सगळ्यात स्वस्त आणि यशस्वी तंत्रज्ञान विकसित करणारा देश म्हणून बघितलं जाईल. कारण नासाने मागच्या वर्षी चंद्रावर ऑर्बिटर पाठवलं होतं ज्याचा खर्च चांद्रयान २ मोहिमेच्या दुप्पट होता. या प्रकल्पांमधे खूप खर्च होतो. ज्याचा निश्चितच देशावर भार पडतो. त्यात इतर देशांना आपले ग्रह पाठवण्यासाठी जास्त पैसे नासाला मोजावे लागतात. अशा देशांसाठी आणि नासासाठीसुद्धा भारताचं तंत्रज्ञान किफायतशीर ठरणार आहे. 

चंद्रापर्यंतच अंतर पार करण्यासाठी या यानाला द्रवयुक्त इंधन पुरवठा केला जाईल. भारताच्या अवकाश इतिहासात पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा भेदून पहिल्यांदा २००८ मधे चांद्रयान १ चंद्राच्या कक्षेत झेपावलं. आता ही दुसरी किमया साधण्यासाठी चांद्रयान २ सज्ज झालं.

हेही वाचा: 

पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी

स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ

गोल्डन गर्ल हिमा दासकडे धावण्यासाठी शूज नव्हते, आज तिच्या नावाची शूज रेंज आहे