छत्रपती शिवाजी महाराजांची आजवर अनेक चरित्रं लिहिली गेलीत. पण त्यातल्या अनेक चरित्रांत लेखकाने काल्पनिक गोष्टी लिहिल्याचं म्हटलं जातं. पण महाराजांचं चरित्र वस्तुनिष्ठपणे सांगणारं एक छोटेखानी पुस्तक बाजारात आहे. आणि ते म्हणजे सेतुमाधवराव पगडी यांचं ‘छत्रपती शिवाजी’. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण या पुस्तकाची ओळख करून घ्यायला हवी.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न साकारणारे आणि लोकशाहीला अभिप्रेत असणाऱ्या कल्याणकारी राजवटीचं अधिष्ठान राजेशाहीला देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या इतिहासातलं एक अलौकिक व्यक्तिमत्व होते. त्यांना समजून घेण्याचा आणि त्यांच्या ऐतिहासिक कार्याची चिकित्सा करण्याचा प्रयत्न सातत्याने जगभरातल्या प्रज्ञावंतांनी केलाय. प्रत्येक संशोधनातून शिवाजी महाराजांचे नवनवे पैलू समोर येत गेलेत.
शिवाजी महाराजांवर जगभरात शेकडो ग्रंथ लिहिले गेलेत. मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, उर्दू, पारसीसह अनेक भाषेत शिवचरित्र विखुरलेलं आहे. अगदी सतराव्या शतकातल्या बखरीपासून ते गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' हे आधुनिक काळातलं पुस्तक आपल्या हातात आहे. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेल्या 'शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ’ अशी मोठी साहित्य आणि संशोधनसंपदाही आपल्याकडे उपलब्ध आहे.
हेही वाचा : महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही
छत्रपतींच्या युद्धकार्याची चिकित्सा आणि थोरपण संशोधकांनी वेळोवेळी अधोरेखित केलंय. त्यांचं चरित्र, त्यांची रणनीती, त्यांची धर्मनिरपेक्षता, त्यांचं दुर्गप्रेम, त्यांची विद्वत्ता अशा कितीतरी बाबींवर इतिहास संशोधकांनी प्रकाश टाकलाय. ते रयतेत ऐक्याची भावना निर्माण करणारे युगनिर्माते होते, तसंच ते स्वाभिमानी, सुसंस्कृत आणि कर्तबगार राजे होते. त्यांच्या कर्तृत्वाने भारतीय इतिहास उजळून निघाला.
कोणत्याही छळ कपटाचं कुटील कारस्थान त्यांनी केलं नाही. अत्यंत प्रामाणिकपणाने, जिद्दीने आणि नैतिक तत्त्वांचा अंगीकार करून त्यांनी आपलं राज्य कल्याणकारी होण्यासाठी प्रयत्न केले. अशा एक महान सामर्थ्यशाली नेत्याचं वस्तुनिष्ठ, खरंखुरं चरित्र समजून घेणं ही आपल्या सर्वांचीच गरज आहे. विशेषतः सध्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला प्राधान्य न देता प्रजा हितासाठी सदैव दक्ष असणारा राजा कसा असतो? हे समजून घेण्यासाठी आपण शिवचरित्र वाचायलाच हवं.
आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त छत्रपतींच्या अशाच एका चरित्र ग्रंथाविषयी बोलायला हवं. या पुस्तकाचं नाव आहे 'छत्रपती शिवाजी.' शिवाजी महाराजांचं वस्तुनिष्ठ चरित्र समोर ठेवणाऱ्या, कोणत्याही भावनिक वा कल्पित घटनांचं उदात्तीकरण न करता अत्यंत साध्या सोप्या भाषेत लिहिल्या गेलेल्या या पुस्तकाचे लेखक आहेत सेतुमाधवराव पगडी.
सेतुमाधवराव पगडी हे मराठीतले अत्यंत नावाजलेले संशोधक आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. सेतुमाधवराव पगडी हे उर्दू आणि फारशीचे फार मोठे अभ्यासक होते. भारतीय प्रशासकीय सेवेत ते दीर्घकाळ कार्यरत होते. पगडींचे 'लाइफ ऑफ शिवाजी', 'स्टडिज इन मराठा हिस्ट्री' हे महत्त्वाचे ग्रंथही प्रसिद्ध आहेत. 'छत्रपती शिवाजी' हे त्यांचं पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया या दिल्लीतल्या सरकारी प्रकाशन संस्थेने १९८९ मधे प्रकाशित केलंय. वेगवेगळ्या भाषेतल्या शेकडो ग्रंथांचा, बखर आणि इतिहासाचा संदर्भ घेऊन पगडी यांनी हे पुस्तक साकारलंय.
यापूर्वीच्या अनेक चरित्रग्रंथापेक्षा या ग्रंथाचं वेगळेपण म्हणजे पगडी यांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या घटनांना समोर ठेवून त्या त्या घटनांचा ऐतिहासिक मागोवा घेतलाय. तो घेत असताना त्यांनी संशोधक म्हणून स्वतःला तटस्थ ठेवलंय. अनुकूल प्रतिकूल मत मतांतराचा आढावा घेऊन स्वतःची निरीक्षणं नोंदवलीत. एकूण दहा प्रकरणात विभागलेला हा छोटेखानी ग्रंथ म्हणजे शिवचरित्र मालिकेतला एक मोठा ऐवज आहे.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
अफजलखान, शाहिस्तेखान, जयसिंग, महाराजांची आग्रा भेट आणि सुटका, मोगलांशी युद्ध, १६७३ मधलं युद्ध, राज्याभिषेक अशा महत्त्वाच्या घटनांचा शोध सेतुमाधवराव पगडी घेतात. 'प्रारंभीची वर्षे' या पहिल्या प्रकरणात पगडी यांनी शिवजन्मपूर्व काळाची अभ्यासपूर्ण पार्श्वभूमी सांगितलीय. ही सगळी पार्श्वभूमी वाचल्याशिवाय शिवाजी महाराजांच्या कार्याचं थोरपण आपल्या लक्षात येणार नाही.
'शेवटची दोन वर्षे' हे प्रकरण राजांच्या आयुष्यातला एक खडतर टप्पा होता. संभाजी राजांचे मोगलांना येऊन मिळण्यासारखा प्रसंग राजांच्या शेवटच्या दोन वर्षात घडला. ही घटना म्हणजे शिवाजी महाराजांवर खूप मोठा आघात होता. पण त्यांनी संयम सोडला नाही. याच काळात शिवाजी महाराज आणि ब्रिटिश यांच्यातला आरमारी संघर्ष समाप्त झाला. पण मोगलांशी युद्ध चालूच होतं. दरम्यान पितापुत्रांची दिलजमाई झाली.
त्यानंतर धाकटा पुत्र राजारामची मुंज आणि लग्नानंतर ३ एप्रिल १६८० ला अल्पकालीन आजारानंतर म्हणजे साधारण वयाच्या पन्नासाव्या वर्षी शिवाजी महाराजांचं निधन झालं. ब्रिटिशांच्या मते त्यांचा मृत्यू रक्तस्रावामुळे झाला. पोर्तुगिजांच्या मते, गळू किंवा भेंडे यामुळे झाला. मोगलांच्या मते, रक्ताच्या उलट्या होऊन झाला. तर पगडी म्हणतात, महाराजांचा मृत्यू ज्वर आणि रक्ताची आव यामुळे झाला असण्याचा संभव आहे.
अर्थात महाराजांच्या मृत्यूच्या कारणासंबंधी अनेक अफवा, वदंता असल्या तरी यात काहीच तथ्य नसल्याचं आणि महाराजांचा मृत्यू हा नैसर्गिक कारणाने झाल्याचं पगडी सांगतात. 'उपसंहारात' त्यांनी महाराजांच्या समग्र कर्तृत्वाचं अत्यंत नेटकं विश्लेषण केलंय. ३० वर्षाच्या काळात मोगल साम्राज्याला आव्हान देऊन स्वतंत्र राज्याची स्थापना करणाऱ्या एका अत्यंत असाधारण व्यक्तिमत्वाचा शेवट कसा झाला हे वाचताना आपण अस्वस्थ होतो. पगडींच्याच शब्दात सांगायचं तर ‘पुढील पिढ्यांना कधीही उणे न पडणारे स्फूर्तिदायक असे आपले नाव मागे ठेवून ते गेले.'
हेही वाचा : फरीद झकेरिया सांगतात, लॉकडाऊनची संधी न हेरल्यास भारतचा अमेरिका होईल
हे चरित्र छोटेखानी असलं तरी महाराजांच्या उत्तुंग कार्याचा भव्य पट उलगडून दाखवणारं आहे. हे चरित्र वाचताना वाचक म्हणून आपण थक्क होऊन जातो. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी एक मुलगा स्वराज्याचं स्वप्न बघतो.
केवळ स्वप्नच बघतो असे नाही, तर त्या दिशेनं पावलं टाकतो आणि एक दिवस 'एतद्देशीय, स्वतंत्र आणि कल्याणकारी राज्याचा पाया घालतो. हे राज्य संपूर्ण अर्थाने राष्ट्रीय होते आणि याचा विस्तार सार्यार देशभर होण्याची क्षमता होती. महाराजांनी राष्ट्रीय वृत्ती जागृत केली. उदासीन वृत्तीच्या लोकात आत्मविश्वास जागृत केला. आपल्या शत्रूचा गर्व, त्याची आक्रमकवृत्ती आणि त्याचा असहिष्णूपणा यांच्याविरुद्ध महाराजांनी झुंज दिली.’ असं पगडी लिहितात.
या चरित्राचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बिनबुडाच्या आणि काल्पनिक कथांना यात जराही स्थान नाही. प्रत्येक घटनेचा सारासार विचार करूनच त्यांनी मांडणी केलीय. लोकचर्चेत रूढ असलेल्या कथांना काही लिखित पुरावा असेल तरच त्याला ते महत्त्व देतात. संदर्भ ग्रंथांचा हवाला देऊन हे चरित्र साकारलंय. शिवाजी महाराजांचं युद्धकौशल्य, राजकीय मुत्सद्देगिरी, सर्व धर्माबद्दल आदरभाव या सगळ्या बाबींचा नेमका अन्वयार्थ ते लावतात.
व्यापारउदिमांबरोबरच सज्जन, साधुसंत, विद्वान, कवी आदींना त्यांनी मोठा राजाश्रय दिला होता. आज आपल्याभोवती घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एका आदर्श राजानं कसं असायला हवं? याचा वस्तुपाठ म्हणजे शिवछत्रपतींचं हे चरित्र आहे. त्यांच्या प्रेरणेनेच इसवी सन १६७९ मधे राज्यव्यवहार कोश निर्माण झाला. हा कोश शासकीय व्यवहारातील वापरले जाणारे दक्षिणी उर्दूतले शब्द आणि त्यांचा संस्कृत पर्याय असा होता. एका अर्थाने हा उर्दूचा पहिला कोश आहे.
हेही वाचा : गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ
आदर्श राजा, न्यायिक प्रशासक असलेल्या राजाचं हे चरित्र स्फूर्तिदायक आहे. जाती आणि पंथभेद यावर राष्ट्रभावनेने मात करणारा हा सामर्थ्यशाली राजा होता. चातुर्याने योजना आखून चिकाटीने पूर्णत्वास नेणाऱ्या या राष्ट्रपुरूषाचं स्मरण करणं ही काळाची गरज आहे.
खरंतर आज आपल्या देशात विविध जाती धर्माच्या अस्मितांचे अहंकार टोकाला गेलेत. सुमार वक्ते आणि विखारी अभ्यासक आपल्या प्रक्षोभक भाषणाने आणि लेखनाने समाजात दुही पसरवत आहेत. अशावेळी सुमारे साडेतीनशे वर्षाहून अधिक काळापासून लोकांच्या अंतःकरणावर अधिराज्य गाजवणाऱ्या या लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष राजाला लोकांपर्यंत पोचवायला हवं.
छत्रपती शिवाजी महाराज अलौकिक पराक्रम करणारे युगपुरुष होते. त्यांचं शौर्य, त्यांचं साहस आणि त्यांची बुद्धिमत्ता नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणारी आहे. म्हणून अशा ग्रंथाचं वाचन वारंवार व्हायला हवं.
हेही वाचा :
वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?
या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा
मनातल्या, व्यवहारातल्या जातीला मारण्याची दिशा दाखवणारं पुस्तक
शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?
पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!
शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!
शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!
(लेखक प्रसिद्ध कवी असून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा संकुलात प्राध्यापक आहेत.)