प्रभाकर सिनारीः गोव्यात क्रांतीला मुक्तीकडे नेणारा नायक

२० डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ९ मिनिटं


आज गोवा मुक्तीसंग्राम दिवस. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १४ वर्षांनी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला. त्यामागे अनेक क्रांतीकारकांचा त्याग आणि पराक्रम होता. त्यामधे गोव्याचे चे गव्हेरा म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर सिनारी आघाडीवर होते. गोव्यातल्या पोर्तुगीजविरोधी क्रांतीचं त्यांनी नेतृत्व केलं. गोवा मुक्तीसंग्रामातले स्वातंत्र्ययोद्धे प्रभाकर सिनारी यांचं हे व्यक्तिचित्र.

डॉ. राममनोहर लोहिया यांनी १८ जून १९४६ला मडगावच्या आझाद मैदानात क्रांतीचं रणशिंग फुंकलं. लोखंडाच्या थंड गोळ्यागत असलेला गोवा तापू लागला. पणजी चर्चजवळ जुनं मॉडर्न स्कूल. मनपत आडनावाचे राष्ट्रवादी विचारांचे एक शिक्षक होते. लोहियांच्या अटकेचा निषेध झालाच पाहिजे. त्यावर जनजागृती व्हायलाच हवी. आपण मोर्चा काढू. देशभक्ती, स्वातंत्र्य, निषेध, मोर्चा असे शब्दही त्या मुलांच्या इतक्या जवळ कधी पोचले नव्हते. तरीही मुलं जमली. इतरही अनेकजण होते.

आणि क्रांतीची ठिणगी पेटली

पाऊस सुरू होता. मोर्चा नॅशनल थिएटरसमोर आला. अचानक पोलिसांची एक मोठी तुकडी आली. त्यांनी झोडपून काढायला सुरवात केली. हातात तिरंगा घेतलेले शुभ्र खादीतले मनपत सर मोर्चाचे नेते आहेत हे कळणं कठीण नव्हतंच. पोलिस मिळून त्यांच्यावर तुटून पडले. मारत मारत गटारात ढकललं. बुटांनी तुडवलं. दंडुक्यांचा वर्षाव झाला. पट्टयांनी मारलं. एक विद्यार्थी ते सगळं बघत होता. गुरांसारखं मारलं जातंय पण सरांच्या डोळ्यांमधला खंबीरपणा एक तसूभरही कमी झालेला नाही. त्या जिगरबाज नजरेनं जी ठिणगी पेटवली ती विझणारी नव्हती.
 
मनपत सरांना पोलिस उचलून घेऊन गेले. तिथे असलेल्या लोकांनी पुन्हा मोर्चा काढायचा ठरवला. पुन्हा मोर्चा निघाला. त्यावर पोलिसांनी पुन्हा हल्ला केला. मोर्चेकर्यां ना पुन्हा मारलं. हे सगळं पाहणार्याु त्या १४ वर्षांच्या मुलाच्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू झालं. आपल्या गुरुला का मारलं? काय गुन्हा आहे त्यांचा? लोहियांच्या सुटकेची मागणी करण्यात आमचं काय चुकलं? तो मुलगा म्हणजे गोवा मुक्तिलढ्यातले एक अग्रगण्य स्वातंत्र्ययोद्धे. गोव्याचे पहिले आयपीएस अधिकारी प्रभाकर सिनारी.

त्या घटनेला ७२ वर्षं झालीत. पण आजही ८६ वर्षांच्या सिनारीसाहेबांकडून ती घटना काल परवा झाल्यासारखी ऐकता येते. पणजीतल्या करंजाळे इथे एका कॉलनीत ते राहतात. भक्कम पिळदार शरीर आणि पांढर्याा पिळदार मिशा. पोलिसी शिस्तीतला कडक चेहरा. पण माणूस मोठा उबदार. ‘माझ्याकडे काही नाही फारसं सांगण्यासारखं. माझं काम मी केलं’, त्यांची नम्रता लख्ख उठून दिसते. विचारल्यावर ते सांगू लागतात. समृद्ध व्यक्तिमत्त्वाचे समृद्ध अनुभव.

अस्वस्थ मुलांचा सेवादल ग्रुप

‘आता शिक्षकांना किंमत नाही. पण आम्हाला आमचे शिक्षक देवासारखेच होते. मी हादरलोच. महात्मा गांधींविषयी, सुभाषबाबूंविषयी ऐकलं होतं. प्रतिसरकार उभारून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणार्याी सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटलांविषयीही कानावर आलं होतं. देशात इतका मोठा लढा सुरू आहे. तर आपण का नाही लढायचं? असे प्रश्नं डोक्यातून जात नव्हते.’ अशी इतरही अस्वस्थ मुलं होती. अशांचा एक ग्रुप तयार झाला. 

सांतिनेझला तांबाच्या चाळीत व्यायामशाळा सुरू झाली. पोर्तुगीजांच्या विरोधात थोडी थोडी चळवळ सुरू झाली. त्यात असायचं ते पोस्टर चिकटवणं. पत्रकं वाटणं. मिरवणुका काढणं. ‘मोर्रा सालाझार’, ‘वासिम्बॉर’ अशा घोषणा रस्त्यावर, भिंतींवर डांबराने लिहिणं. डांबरानेच, कारण त्या लवकर निघायच्या नाहीत. जुंता हाऊस जवळच्या मैदानात व्हॉलीबॉल खेळणं. कवायती करणंही होतं. लक्ष्मीदास बोरकर, माधव बीर, सिंगबाळ अशी ज्येष्ठ मंडळी बौद्धिकं घ्यायची. या सगळ्याला ‘सेवादल’ म्हटलं जायचं. 

बारा तेरा वर्षांचा मोर्चाचा लीडर

‘अल्तिनोला पाण्याची टाकी आहे तिथे आम्ही चाळीसेक मुलं जमा झालो होतो. वेंगुर्ल्याहून वासुदेव देशपांडे आले होते. मी मुळातच थोडा चौकस. साध्या कपड्यातले पोलिस चारही बाजूंनी आम्हाला घेरायला जवळ येतायत असं मला दिसलं. धावा, धावा मी ओरडलोच. पण पळून जाणं देशपांडेंच्या तत्त्वात बसत नव्हतं. पोलिस आम्हाला मारायला लागले. पोलिसांचा प्रश्ना एकच होता, तुमचा लीडर कोण. बारा तेरा वर्षांच्या मुलांना मारणं मला सहन होत नव्हतं. मी काही नेता नव्हतो. पण मला राहवत नव्हतं. मी पोर्तुगीजमध्ये सांगितलं, ‘सो शेफ’. मी आहे नेता. वय लहान त्यामुळे पोलिसांनी दुर्लक्ष केलं.

हजारो गोवेकर पाखल्यांच्या दहशतीखाली बूट चाटणं पसंत करत होते. तेव्हा एक चौदा वर्षांचा मुलगा त्या दहशतीला सिंहाच्या छातीनं सामोरं जात होता.

क्रांतिसिंह नाना पाटलांचा गटही सक्रीय

बौद्धिकांच्या पुढची पायरी होती ती प्रत्यक्ष कृतीची. टेलिफोनच्या तारा कापून सरकारला हैराण करून सोडायला सुरवात झाली. कधी गवर्नरच्या, कधी पोलिस स्टेशनच्या तारा कापल्यात म्हणून सरकार हतबल होऊन जायचं. क्रांतिसिंह नाना पाटलांचे काही सहकारी या गटाच्या संपर्कात आले होते. अधूनमधून भेट घेऊन ते तिथल्या कहाण्या ऐकवायचे.

असंच त्यांनी एकदा एक बॉम्ब दिला. एका रात्री तो मडगावच्या पोलिस स्टेशनच्या आवारात नेऊन टाकला. बॉम्ब फुटला की इमारती कोसळतील अशी अपेक्षा त्यांना होती. पण तो छोटा गावठी बॉम्ब होता. बॉम्ब फुटल्यावर थोडीच हालचाल झाली आणि आवाजही विशेष आला नाही.
 
यातूनच स्वातंत्र्याची अनिवार ओढ निर्माण झालेले सात जण फोंड्याजवळ कुंकळ्ये इथे एकत्र आले. विश्वनाथ लवंदे, बेतू नाईक, तुकाराम काणकोणकर, नारायण नाईक, जयवंत कुंदे, कोल्हापूरचे दत्तात्रय देशपांडे आणि कसेबसे १५ वर्षांचे प्रभाकर सिनारी. ठरलं, हत्यारं जमवायची आणि हल्लाबोल. लवंदे आणि नारायण नाईक यांनी काही बंदुकी विकत घेतल्या. मरण्याची तयारी होती, त्यामुळे ट्रेनिंगची गरज नाही म्हणाले.

तारीख होती २२ जुलै १९४७

लक्ष्य ठरलं म्हापशाचं रेवेन्यू ऑफिस आणि तारीख ठरली २२ जुलै १९४७. आजगावला तयारी झाली. ऑफिस पेटवण्यासाठी म्हापशाच्या स्मशानभूमीत पेट्रोल लपवून ठेवलं. ऑफिसावर अर्थातच सैनिकांचा बंदोबस्त होता. एकाने एका सैनिकाकडे जाऊन माचिस मागितलं. दुसर्यानने मागून येऊन त्या सैनिकावर हल्ला केला.

सैनिक बेसावध होते. पण त्या झटापटीने दुसरा सैनिक धावत आला. त्याच्यावरही हल्ला केला. चकमक झाली. बंदुकीच्या आवाजाने बाकीचे सैनिक धावत येऊ लागले. अंधाराचा फायदा घेऊन आठही जण पळून गेले. एक सैनिक मेला. दुसरा जखमी झाला. 

पोर्तुगीजांच्या एखाद्या ऑफिसवर आजवर असा हल्ला कधीच झाला नव्हता. ते नखशिखांत हादरले. वर हल्लेखोरही सापडले नाहीत. ‘गोव्यात राष्ट्रवाद असा नव्हताच. अर्थातच राण्यांच्या किंवा कुंकळीच्या बंडाचा इतिहास होता. गोवा छोटा प्रांत असल्यामुळे असे विचार थोपवणं सहज शक्यही होतं. तेव्हा अधूनमधून होणाऱ्या सत्याग्रहांव्यतिरिक्त फारसा विरोध होत नव्हता. असा क्रांतिकारक प्रयत्न तर नव्हताच. पोर्तुगीज खडबडून जागे झाले. त्यांनी हिटलरच्या जर्मनीकडून प्रशिक्षित झालेले खास पोलिस गोव्यात पाठवले’, प्रभाकरराव सांगतात.

बँक लुटीची धाडसी योजना

सरकार जागं झालं होतं. पण त्यामुळे यांना काही फरक पडला नाही. उलट मुकुंद धाकणकर, महाबळेश्वर थिवकर, महाबळेश्वर नाईक असे आणखी काही मित्र सोबत आले. आता या क्रांतिकारकांच्या गटाला नावही मिळालं, ‘आझाद गोमंतक दल’. धाकणकर नेव्हीत होते. त्यामुळे नव्या योजना होत्या. पण पैसे नव्हते. तेव्हा गोव्यात एकच बँक होती, ‘बांको अल्त्रामारिन’. तीही पोर्तुगीजांची. तिच्या म्हापसा शाखेतून पणजीच्या शाखेत रोज पैसे जमा व्हायचे. आम्ही ते पैसे वाटेत लुटायचं ठरवलं.

४ डिसेबर १९४७. संध्याकाळची वेळ. पैसे नेण्यासाठी वेगळी कारही नसायची. प्रवासी बसमधूनच पैशांची ने आण व्हायची. पर्वरीच्या जवळ ड्रायव्हरला बंदूक दाखवून बस थांबवली. बँकेच्या कर्मचार्यां कडच्या दोन बॅगा हिसकावल्यादेखील. पळून जाण्यातही यश मिळालं. पण पैसे असलेल्या बॅगा बँकवाल्यांनी आधीच बायका बसलेल्या सीटखाली लपवल्या होत्या. काही चेक आणि कागदपत्रंच हाताला लागली. एवढी धाडसी योजना यशस्वी होऊनही वाया गेली होती.

पोलिसांकडून माणुसकीशून्य मारहाण

‘बसमधल्या एका प्रवाशाने आमच्यापैकी एकाला ओळखलं. पोलिसांनी त्याला पकडलं. आमच्या सगळ्यांची नावं उघड झाली. धरपकड सुरू झाली. बाबला सिंगबाळसोबत मी सायकलवर जाऊन लवंदेंना सावध केलं. ते पळाले. पण परत येताना पोलिसांनी आम्हाला चारही बाजूंनी वेढलं. आम्हाला पळून जाण्याचीही संधी मिळाली नाही,’ घरातल्यांना तोवर काहीच माहीत नव्हतं.

त्यांची प्रतिक्रिया काय होती, असं विचारल्यावर प्रभाकरराव एकदम शांत होतात. डोळे मिटून घेतात. त्यांच्या करारी चेहर्या वर आजही ठसठसत्या वेदनेचं दुःख दिसतं. उत्तर टाळतात आणि सांगतात, ‘पुढे मी तुरुंगातून पळालो, तेव्हा पोर्तुगीजांनी माझ्या भावांनाही तुरुंगात टाकलं. तीन वर्षं ते तुरुंगात होते. त्यांचा काहीही संबंध नव्हता. फक्त माझा सूड त्यांच्यावर उगवण्यात आला.’

नंतर सुरू झालं ते यातनापर्व. आधी पणजीच्या आणि नंतर म्हापशाच्या लॉकअपमध्ये. माणुसकीशून्य मारहाण. पाणघोड्याच्या कातडीचा एक पट्टा असायचा, कावालू मारून. त्याने मारलं की बैलाच्या अंगावर डागल्यामुळे होतात तशा जखमा होत. त्याने फोडून काढण्यात आलं. लॉकअप घाणेरडे असत. जेवण दिलं जात नसे. दोघांना एका बेडीत अडकवलेलं असे. त्यामुळे संडासला जातानाही दोघांना जावं लागायचं.

तिथे एक काद्रूस जोसेफ नावाचा सरकारी वकील होता. तो खूप त्रास देत. पुढे त्यालाही धडा शिकवला. त्याला एक ‘बूक बॉम्ब’ पाठवला. त्याचा स्फोट होऊन त्याचं नाक, बोटं कायमची थिटी झाली.

जेलच्या २५ फुटी भिंतीवरून उडी

पुढे आग्वादला रवानगी झाली. तिथे शंका आली म्हणून त्यातल्या काहीजणांना रेशमागूशच्या तुरुंगात. तिथे सिनारींना एकजण भेटला. प्रेयसीच्या खुनाच्या आरोपावरून शिक्षा भोगत असलेला सिमॉन. दोघांनी पळून जाण्याची योजना बनवली. कचरा टाकण्याच्या निमित्ताने बुरुजाच्या भिंतीपर्यंत जाण्याची संधी मिळायची. एक दिवस ठरला. दोघे कचर्या चा डबा घेऊन आले. उंच भिंतीवरून उडी मारली.

वाटलं होतं कचरा पडून पडून खाली दलदल निर्माण झाली असेल. पण तसं नव्हतं. किती उंच होती भिंत, विचारल्यावर ते समोरच्या इमारतीकडे बोट दाखवतात. किमान २५ फूट असेल. उडीमुळे कण्याला बसलेला मार आजही त्रास देतो. पण हे धाडसही वाया गेलं. कारण समोरच्या एका झरीत आंघोळीसाठी सैनिकांची तुकडी आली होती. त्यांनी बुरुजावरून होणारा गोळीबार ऐकला.

धावणाऱ्या या कैद्यांना पकडलं. मग पुन्हा मरेस्तोवर मार. पुन्हा पळशील तर याद राख, जेलर म्हणाला. ‘एकदा काय शंभरदा पळेन. मी मरायला घाबरत नाही. तुम्हाला संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,' असं बाणेदार उत्तर दिलं. पुन्हा मार.

स्पेशल जेलमधूनही पळायची योजना

यामुळे रवानगी झाली ती मडगावच्या खास तयार केलेल्या जेलमध्ये. तिथे हाल झाले. पुस्तकं बंद झाली. पण त्याला विरोध केला. देशपांडेंनी गीता उचलून छातीजवळ धऱली, सिनारींनी बायबल. पुस्तकं परत देणार नाही. पुन्हा मार. एकदा डॉक्टरला घाबरवलं म्हणून मारहाण सुरू झाली. फेलिक्स रॉड्रिगिज म्हणून जेलर होता. त्याने बेदम मारलं. 

‘मी बाहेर पडलो की पहिला तुलाच संपवेन’, प्रभाकररावांचा प्रचंड राग बोलत होता. फेलिक्स चिडला. पुन्हा मारलं. निपचित पडेपर्यंत मारलं. नाईलाजानं पणजीच्या मेडिकल कॉलेजात दाखल करावं लागलं. थोडं बरं वाटल्यावर पुन्हा पळायची योजना आखली.

पोलिसांचा पाण्यात गोळीबार

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त ठरला. ३० ऑक्टोबर १९५२. इतर कैद्यांनाही सोबत घेतलं. पहार्यारवर असलेल्या पोलिस तुकडीच्या प्रमुखाला दारू पाजली. संधी मिळताच उडी मारली. पण पोलिस मागे लागलेच. गोळीबार झाला. नाल्यात उडी मारली. नाल्यातून मांडवी नदीच्या दिशेने गेल्याचं दाखवलं.

तिथे पोलिस पाण्यात गोळीबार करू लागले. पण नाल्यातूनच कांपाल. तिथून पोहत, चालत ताळगाव. अशी पोलिसांच्या हातावर तुरी दिली. ताळगावच्या तळ्यात रात्र काढली. पुरेसं अन्न चार वर्षं नसल्यामुळे रातांधळेपणा आला होता. पाण्यात लपून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अंगाला काहीतरी टोचू लागलं म्हणून पाहिलं तर मोठमोठ्या ट्च्च फुगलेल्या जळवा. रात्रभर त्यांना अंगावरून काढून टाकत राहावं लागलं.
 
एक शेतकरी दिसला. त्याच्या घरी जाऊन भरपूर पाणी पिऊन घेतलं. त्याच्याकडून वाला घेऊन कमरेला बांधला. पाण्याची बाटली कमरेला लावली. दारू पिऊन कामावरून परतणार्याज कामगाराचा वेश घेतला. पोलिसही ओळखू शकले नाहीत. पायात चप्पल नव्हती. पायी चालत मेरशी, कालापूर, चिंबल असा प्रवास केला. एका ओळखीच्या दुर्गी गावडा या मजूर बाईने आधार दिला. आठ दिवस पेजेवर काढले. त्यानंतर शिरगावात सीताराम घाटवळ यांच्याकडे आठ दिवस. 

मातृभूमीला स्वतंत्र करण्याची शपथ

त्यानंतर पुन्हा चालत गोव्याच्या सीमेवर पोचता आलं. सीमेवर त्यांनी गोव्याची माती डोक्याला लावली. ‘मातृभू, तुला स्वतंत्र केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’, प्रतिज्ञा केली. आणि सगळा राग बाहेर काढला. येत होत्या नव्हत्या त्या सगळ्या पोर्तुगीजांना शिव्या दिल्या. भारतीय कस्टमची एक चौकी जवळ होती. ती माणसं ते ऐकून आली. काय चाललंय कळेना. जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी त्यांना आदरातिथ्य केलं.

आता यातनापर्व संपलं होतं. पण संघर्ष थांबला नव्हता. बांदा आणि बेळगाव इथे राहून मुक्तिलढा आणि शिक्षण दोन्ही सुरू झालं. जेव्हा भारतीय सेना गोव्यात शिरली तेव्हा त्यांची तयारी करून देण्याची जबाबदारी उचलणाऱ्यांमधे ते आघाडीवर होते. त्यानंतर गोव्यातले पहिले आयपीएस अधिकारी बनण्याचा मान त्यांना मिळाला. गोव्याचे इन्स्पेक्टर जनरल, पॉंडिचेरीचे इन्स्पेक्टर जनरल, तिहार जेलचे प्रमुख, आयबीचे असिस्टंट डायरेक्टर आणि रॉचे असिस्टंट डायरेक्टर अशी त्यांची पोलिस अधिकारी म्हणून कारकीर्द गाजली.

शेवटी एका गोष्टीचं समाधान

आजच्या गोव्याकडे कसं बघता? तुम्ही जो त्याग केलात त्याचं चीज झालं असं वाटतं का? या शेवटच्या प्रश्नांचं नकारार्थी उत्तर येणार असं अपेक्षित होतं. तक्रारींचा पाढा वाचला जाणार असंच वाटत होतं. प्रश्न  संपल्या संपल्या उत्तर होतं, ‘एक समाधान आहे. इथला बहुजन समाज गुलामाचं जीवन जगत होता. आज त्यांनी मोठी प्रगती केली आहे. आज विकासासाठी त्यांना आकाश खुलं आहे. हे स्वतंत्र गोव्याचं मोठंच योगदान आहे. गोव्याविषयी एक खंत आहे. की इथली नैतिकता आटलीय. रस्त्यावरचा नारळ मालकाच्या अंगणात टाकून देणारे इथले लोक आज असे का वागतात, कळत नाही.’