शिवरायांची बदनामी करणाऱ्या संघी मानसिकतेचा पंचनामा

१२ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


संघ-भाजप परिवारातल्या नेत्यांकडून सातत्याने छत्रपती शिवरायांची बदनामी केली जातेय. हे अनवधानानं होत नाहीय. कुजबुज तंत्राद्वारे प्रचार करणाऱ्या संघी मानसिकतेचा हा होलसेल धंदाच आहे. अशांपासून बहुजन-मराठा समाजाने दूर राहायला हवं. त्यांना साथ देणं म्हणजे बहुजनांच्या श्रद्धास्थानांची बदनामी करणार्‍यांना ताकद देण्यासारखं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक वाद निर्माण करणाऱ्या बाळ गंगाधर टिळकांचे 'बाप' शोभावेत, असा पराक्रम राज्य विधान परिषदमधले भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलाय! टिळकांनी शिवरायांच्या जन्मतिथी बरोबरच जन्मवर्षाच्या वादाचीही चूड लावली. वैशाख शुद्ध द्वितीया शके १५४९ म्हणजे ६ एप्रिल १६२७ की, फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० असा हा वाद होता. तो १०० वर्ष चालला.

दरम्यान, आधी 'फाल्गुन वद्य तृतीया' या तिथीवर एकमत झालं. त्यानंतर शिवजयंती तिथीने करायची की तारखेने करायची, यावर वाद सुरू झाला. तो २००१ पासून शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची, या शासकीय निर्णयाने संपला.

सनातनी हरामखोरीची चिरफाड

हा वादाचा घोळ केवळ तिथी-तारखेचा नव्हता! तर शिवरायांच्या जन्मदात्याबद्दल प्रश्न निर्माण करणारा तो कुटिल, नीच, सनातनी डाव होता. तो पुणेरी ब्राह्मणी टोळक्याचा 'डार्लिंग' असणारा विदेशी संशोधक- लेखक जेम्स लेन याने उघड्यावर आणला.  जी खाजगीत कुजबुज चालायची, ती त्याने  'शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकात आणली. जेम्स लेन हा वाहक होता. त्याच्या माध्यमातून जिजाऊ-शिवरायांच्या चरित्राला अफजुलखानी डंख अट्टल 'कोब्रा' नागांनी मारला होता.

त्यातून अस्सल मावळे जागे झाले. संभाजी ब्रिगेडच्या बॅनरखाली एकवटले आणि त्यांनी जेम्स लेनला तीन वर्ष पाहुणचार देणार्‍या पुण्यातल्या 'भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थे’वर हल्ला केला. हा हल्ला समर्थनीय नव्हता. पण तो का झाला, याची चिकित्सा होणं आवश्यक होतं. ती चिकित्सा मी तेव्हा आणि त्यानंतरही शिवचरित्राची छेडछाड करण्याचे प्रकार झाले.

त्या प्रत्येक वेळी या स्तंभातून आणि चित्रलेखातल्या इतर लेख-रिपोर्टमधून त्याची चिकित्सा केली आहे. त्यामुळे लोकजागृती झाली. सनातनी हरामखोरीची चिरफाड करणारं लेखन मोठ्या प्रमाणात प्रकाशित झालं. त्यामुळे छत्रपतींच्या गाद्या सांभाळणाऱ्यांनाही आपल्या जबाबदारीचं भान आलं, असं चित्र सध्या दिसू लागलंय.

हेही वाचा: शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी

बदनामीकारक वक्तव्यांची मालिका

'हर हर महादेव' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमांच्या 'सिनेमॅटिक लिबर्टी' आडून होण्याऱ्या इतिहासाच्या विकृतीकरणा विरोधात साताराचे छत्रपती उदयनराजे आणि कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे यांनी कठोर भूमि‌का घेतलीय. ती मराठेशाहीचा आब राखणारी आहे. अशीच कठोर-निश्चयी भूमिका घेत दोघांनीही छत्रपती शिवरायांना 'जुना-पुराना आयकॉन' ठरवणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांच्या राज्यपालपदाच्या खुर्चीखाली हकालपट्टीचे आग्रही सुरुंग लावलेत. शिवभक्त संतप्त आहेत. हा असंतोष भडकत असताना भाजप नेते राज्यपालांच्या बेतालपणा विरोधात निषेधाचं अवाक्षरही काढत नाहीत.

उलट, मुंबई शहराचे भाजप अध्यक्ष आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांच्या 'आग्र्याहून सुटका'ची तुलना शिवसेनेत फूट पाडून सत्ताबदल घडवणाऱ्या सुरत-गुवाहटी-गोवा वारीशी केली; तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी शिवरायांनी औरंगजेबला पाठवलेल्या तहनाम्यांची तुलना वि.दा. सावरकर यांनी अंदमानच्या जेलमधून सुटका करण्यासाठी बिटिश सरकारला पाठवलेल्या माफीनाम्याशी केलीय.

प्रसाद लाड यांनी तर 'शिवरायांचा जन्म रायगडावर झाला,' असं म्हणतात; तर दुसरे भाजप आमदार गोपीनाथ पडळकर 'अफजलखानाने शिवरायांचा कोथळा काढला,' असे अकलचे बिनडोक तारे तोडतात. हे अनवधानाने होतही असेल. पण ते संघ-भाजप परिवारातल्या नेत्यांकडूनच का होतं? आणि छत्रपती शिवरायांच्या बाबतच का होतं?

संघ संस्कारित भाजप

वि. दा. सावरकरांना मौर्याची सत्ता नष्ट करणारा पुष्यमित्र शुंग आणि पेशवे महान वाटले; तर 'शिवाजी कसला राजा; हा तर काकतालीय न्यायाने झालेला राजा’, असं म्हणावंसं वाटलं. रा.स्व.संघाचं बायबल असलेल्या विचारधनमधे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी संभाजीराजांना 'मदिरा आणि मदिराक्षीमधे बरबाद झालेला छत्रपती' म्हणून, अप्रत्यक्षपणे शिवरायांना अपात्र पिता ठरवलं आहे.

जेम्स लेनच्या पुस्तकावर वाद भडकला होता, तेव्हा अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते. त्यांनी जेम्स लेनमार्फत झालेल्या विकृतीला विचार ठरवून 'विचाराची लढाई विचाराने करावी; पुस्तकावर बंदी घालू नये,' असा उपदेश केला होता. त्यावर शिवप्रेमींनी उद्रेक व्यक्त करताच वाजपेयींनी घुमजाव केलं.

अशीच वेळ प्रमोद महाजन यांच्यावर केंद्रीय मंत्री असताना आली होती. 'आमची सत्ता संपूर्ण देशभर आहे. शिवाजीराजांचं राज्य फक्त साडेतीन जिल्ह्यांपुरतंच होतं,' असं ते म्हणाले होते. मतांसाठी छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं आणि सत्ता मिळाली की, छत्रपतींच्या चरित्राची विटंबना करायची, ही संघ संस्कारित भाजपची वृत्तीच आहे.

याच संस्कारातून अहमदनगरचा भाजपचा नगरसेवक श्रीपाद छिंदम याने महाराजांचा उल्लेख शिव्या देऊन केला होता. दिल्लीचा भाजप नेता जय भगवान गोयल याने नरेंद्र मोदींची तुलना 'आजच्या युगातले शिवाजी' अशी भलामण करून केली होती. विनोद तावडे  राज्याचे सांस्कृतिक मंत्री असताना शिवरायांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजवण्याचा उत्सव झाला.

हेही वाचा: महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही

संघी मानसिकतेचा होलसेल धंदा

जेम्स लेन आला आणि शिवचरित्राची नासधूस करून गेला असं झालेलं नाही. इतिहासाचार्य राजवाडे, ब.मो. पुरंदरे, निनाद बेडेकर यांच्या लेखनातून शहाजीराजांना सतत गैरहजर दाखवणं, रामदास-कोंडदेव हे 'गुरू' नसताना तसा उल्लेख करणं; कोंडदेवांना सतत शिवबा-जिजामाता भोवती दाखवणं, असे उद्योग केले आहेत.

पुरंदरेंनी तर त्यापुढे उडी मारून 'दादोजी, जिजामाता आणि शिवबा यांचं गोत्र एकच' अशी विकृत कल्पना विस्तारित शिवचरित्रात मांडलीय. त्याची चर्चा घडावी, याच हेतूने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होताच ब.मो.पुरंदरे यांना 'महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा घाट घातला आणि  त्याला महाराष्ट्रभरातून विरोध होऊनही तो तडीस नेला. त्यामुळेच 'रामदास नसते तर छत्रपतींना कोणी विचारलं नसतं,' अशी आगाऊ भाषा कोश्यारी यांनी केली.

याबद्दल त्यांना उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी काही सांगावं, अशी अपेक्षा ठेवायची, तर तेही 'नाशिकचे पोलीस आयुक्त छत्रपती आहेत का?' असं बोलून मोकळे झाले आहेत. हे प्रकार प्रसाद लाड यांनी शिवरायांचं जन्मस्थळ 'शिवनेरी’वरून रायगडाला हलवावं किंवा गोपीनाथ पडळकरांनी अफझलखानकरवी शिवरायांचा कोथळा काढणं, यासारखे अनवधानाने होण्यासारखे प्रकार नाहीत.

हा सगळा प्रकार म्हणजे बहुजनांचं श्रद्धास्थान असलेल्या शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजामाता, ताराराणी, महात्मा फुले, राजर्षि शाहू, डॉ. आंबेडकर या महामानवांबद्दल 'जोक्स' तयार करणं; त्याचा कुजबुज तंत्राद्वारे प्रचार करणाऱ्या संघी मानसिकता असणाऱ्यांचा होलसेल धंदाच आहे.

बहुजन-मराठ्यांनी जागं व्हावं

संघ-भाजपचे चालक शिवरायांचं नाव घेतात; पण प्रत्यक्षात त्यांच्या उलट विचाराचं काम करतात. त्यांना शिवाजीराजे मतांचं ध्रुवीकरण करणाऱ्या दंगलींसाठी आणि सामाजिक वर्चस्वासाठी पाहिजेत. शिवरायांचे शेतकरीहित, स्त्री सन्मान, सामाजिक समता, उदार धार्मिक धोरण याच्याशी त्यांचं काहीही देणं-घेणं नाही.

शिवरायांची नैतिकता आणि प्रगल्भता यांच्यात येणं शक्य नाही; कारण त्यांची ती वृत्तीच नाही; तसा संस्कारच नाही! याची साक्ष ज्ञानोबा- तुकोबांच्या मानवतावादी विचारांपेक्षा 'मनुस्मृती'ला श्रेष्ठ म्हणणारा मनोहर भिडे वरचेवर देत असतो. अशांपासून विशेषत: बहुजन-मराठा समाजाने दूर राहायला हवं. त्यांना साथ देणं म्हणजे शिवरायांची बदनामी करणार्‍यांना ताकद देण्यासारखं आहे; लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना मदत करण्यासारखं आहे.

हेही वाचा: 

शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश

राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड

तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा

(लेख साप्ताहिक ‘चित्रलेखा’मधून साभार)