'तुम्हीच आहात बलात्कारी' असं सांगणारं गाणं जगाचं बलात्कार विरोधी गीत झालंय!

११ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


‘बाईनं काय घातलं, बाई कुठं गेली, कुणाशी बोलली. बाईची काहीच चूक नाही. इथलं प्रशासन, इथले वकील, इथलं न्यायालयं पितृसत्तेचे पाईक आहेत. हेच बलात्कारी आहेत’ असं स्पॅनिश भाषेतलं गाणं म्हणत चिली देशातल्या महिलांनी रस्त्यावर उतरुन बलात्काराविरोधात निषेध नोंदवला. त्यांच्या निषेधाचा हा आवाज आंतरराष्ट्रीय बलात्कार विरोधी गीत म्हणून जगभर प्रसिद्ध झालाय.

निषेधाचा रंग आपण काळा मानतो. याच रंगाचे कपडे घातलेल्या हजारो, लाखो बायका शहराच्या चौकात जमल्यात. डोळ्यावर काळ्या रंगाची पट्टी बांधलीय. हातवारे करत, एकमेकींच्या सुरात सूर मिळवत त्या काहीतरी गाताहेत. त्यांचा आवाज शहरभर घुमतोय. त्या काय गाताहेत याचा अर्थ लागत नाही. भाषा ओळखीची नाही. पण ओळखीचा आहे तो सूर.

अमेरिका खंडातल्या चिली नावाच्या छोट्याशा देशातल्या या महिला आहेत. स्पॅनिश भाषेत त्या 'Un violador en tu camino' हे गाणं गाताहेत. या गाण्याच्या नावाचा अर्थ होतो ‘तुम्हीच आहात बलात्कारी’

चिलीमधलं वातावरण का तापलंय?

अमेरिका खंडाच्या दक्षिणेला एकदम टोकाला समुद्राजवळचा चिली हा छोटासा देश. पॅसिफिक महासागराचा जवळपास ६,००० किलोमीटरचा किनारा या देशाला लाभलाय. १८१० मधे स्पेनकडून स्वातंत्र्य मिळालेल्या या देशाची राष्ट्रीय भाषा आजही स्पॅनिशच आहे. चिलीमधे सध्या सामाजिक आणि राजकीय वातावरण फारच तापलंय.

हे वातावरण तापायची सुरवात झाली ती ऑक्टोबर महिन्यात. चिलीमधले बहुतांश लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. ऑक्टोबरमधे तिथल्या सरकारनं सबवे ट्रेनच्या तिकीटात वाढ केली. आणि कित्येक दिवस दाबून ठेवलेला ज्वालामुखी उफाळून बाहेर आला.

दिवसेंदिवस वाढणारी महागाई, समाजातल्या गरीब-श्रीमंत वर्गात वाढत जाणारी फूट, समाजातले लैंगिक भेदभाव, सरकारचा वाढलेला भ्रष्टाचार, वाढत जाणारं खासगीकरण या सगळ्यांविरोधात चिलीची जनता पेटून उठली. आणि १८ ऑक्टोबरपासून त्यांनी निषेध चालू केला. चळवळी, मोर्चे, गाणी गाणं असं या निषेधाचं स्वरूप आहे.

हेही वाचा : सुरक्षेची जबाबदारी महिलांवर ढकलून बलात्कार थांबणार का?

लैंगिक हिंसाचाराच्या दिवसाला ४२ घटना

देशात चाललेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टींबद्दल चिलीत निषेध व्यक्त केला जातोय. आणि म्हणूनच चिलीत होत असलेल्या लैंगिक हिंसाचाराच्या घटनांविरोधात आवाज उठवण्याची गरज इथल्या नागरिकांना वाटलीय या निषेधाचाच भाग म्हणून  चिलीच्या राजधानीत सॅन्टीएगोमधे महिला एकत्र आल्या आणि बलात्काराच्या विरोधातलं एक गाणं सादर केलं. यात सर्व वयोगटातल्या महिलांनी सहभाग घेतला होता. 

चिलियन नेटवर्क अगेन्स्ट वॉयलन्स अगेन्स्ट वूमन या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार चिलीमधे दर दिवशी लैंगिक हिंसाचाराच्या ४२ घटना नोंदवल्या जातात. म्हणजेच तासाला दोन घटना असं तिथल्या लैंगिक हिंसाचाराचं प्रमाण आहे. भारतात हा दर दिवसाला १३२ असा आहे.

चिलियन सामान्य माणसापासून तिथल्या न्यायव्यस्थेच्या मनामनात ठासून भरलेल्या लैंगिक भेदभावामुळे अनेकदा लैंगिक हिंसाचारातल्या पिडितांनाच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच तिथली न्यायव्यवस्था, तिथलं प्रशासन, वकील, डॉक्टर्स हे सगळेच पितृसत्तेचे पाईक आहेत. हेच बलात्कारी आहेत असं म्हणत चिलीमधल्या बायकांनी गाणं सादर केलं. तुम्हीच आहात बलात्कारी असं म्हणत डोळ्यांवर पट्टा बांधून डान्स करत हे गाणं गायलं.

‘लासटेसिस’ या थेअटर कंपनीनं हे गाणं लिहिलंय. लायटेसीस हा इथला स्त्रीवादी ग्रुप म्हणून ओळखला जातो. अर्जेंटिना देशातली अभ्यासक रीटा सेगाटो हिच्या कामावरुन प्रभावित होऊन हे गाणं लिहिलं असल्याचं सांगितलं जातं. लैंगिक हिंसाचार हा नैतिकतेचा मुद्दा नाही. ती एक राजकीय समस्या आहे, असं रीटाचं म्हणणं आहे.

हेही वाचा : #NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा?

पितृसत्तेविरोधातला आंतरराष्ट्रीय आवाज

चिलीमधे सादरीकरण झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून हळूहळू सगळ्या देशात हे गाणं पसरलं. त्यानंतर चिलीप्रमाणेच मॅक्सिको, जर्मनी, फ्रान्स, युके, स्पेन अशा अनेक देशातल्या महिलांनी रस्त्यावर येऊन नाचत हे गाणं सादर केलं. काही देशांनी तर हे गाणं सादर करण्यावर बंदीही घातली. पण ती बंदी झुगारत आज हे गाणं जगभरात आंतरराष्ट्रीय बलात्कार विरोधी गीत म्हणून ओळखलं जातंय.

मुळातलं गाणं आहे स्पेन भाषेतलं. पण अनेक भाषांमधे या गाण्याचा अनुवाद होतोय. जगभरातल्या सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत हे गाणं पोचण्यासाठी त्याचे आणखी अनुवाद व्हायला हवेत. याच गाण्याचा मराठी अनुवाद लेखिका आणि भाषांतरकार मुग्धा कर्णिक यांनी केलाय. त्यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर या बलात्कारविरोधी गीताचं मराठी स्वैर रुपांतर शेअर केलंय.

इथे करते न्याय आमचा बापसत्तेची नीती
जन्मा येताच ठरवून टाकतो पोरींची नियती
रोज रोज होते शिक्षा, दिसत नाहीत वळ, व्रण
मोकळे जगणे मुश्किल करते बापसत्तेची नीती

मारतात इथे बायांना, मारणाऱ्यांना कवच आहे
करतात गायब बायांना, त्यांनादेखील कवच आहे
बळजबरीचा भोग घेतात, त्यांना देखील कवच आहे
बाईचीच चूक, बाई कुठे होती,
बाईचीच चूक, बाई काय नेसली होती
बाईची चूक नसते काही हे बापसत्तेला मान्य नाही.
म्हणूनच सांगते आता बापसत्ताच बलात्कारी
तुम्हीच आहात बलात्कारी
तुम्हीच आहात बलात्कारी
तुम्हीच आहात बलात्कारी

बापसत्तेचे पाईक कोण-
पोलीसही आहेत त्यात
न्यायाधीशही असतात त्यात
वकील, डॉक्टर, पत्रकारही
सारे सरकार आहे त्यात
संस्कृतीवादी राष्ट्रप्रमुखही
संस्कारघोट्या संघटनाही
जुलमी सरकार बलात्कारी
जुलमी प्रशासन बलात्कारी
तुम्ही आहात बलात्कारी
तुम्ही सारे बलात्कारी

झोप बाळे झोप शांत
चोरडाकूची चिंता नको
-अंगांगावर लक्ष ठेवून
सारे प्रेमळ शौकीनबाप

हे गाणं चिलिलीयन प्रोटेस्ट सुरु होण्यापूर्वी फार आधी लिहिलं असलं तरी गाणं गाताना जो डान्स केला जातो त्यात चिलिलीयन निषेधाचं प्रतिबिंब दिसतं. गाणं गाताना त्यांनी डोळ्यांवर बांधलेली पट्टी ही पुरुषसत्तेची पट्टी आहे. एकदा ही पट्टी बांधली की बलात्कार करणारा आरोपी समोर असूनही दिसणार नाही अशी अवस्था होते. ही पट्टी काढून गाणं गाणाऱ्या महिलांचा, पितृसत्तेविरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाचा आवाज आता आपण ऐकायलाच बवा. कारण आता हा आवाज आंतरराष्ट्रीय गीत झालंय!

हेही वाचा : 

मुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना!

लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?

आणि डोक्यावरचे केस काढून मी खरंखुरं सौंदर्य मिळवलं!

१०० बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेणाऱ्या तरुणीचं म्हणणं ऐकायलाच हवं!

हैदराबादेतल्या पोलिस एन्काऊंटरवर टाळ्या वाजवणाऱ्यांनी एकदा हे वाचावं