आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सहभागी व्हायला अमेरिकेनं विरोध केल्यानंतर चीननं स्वतःचं अवकाश स्टेशन उभं करायचं ठरवलं. यावर्षी चीनच्या महत्वाकांक्षी तिआन्हे अवकाश स्टेशनचं काम पूर्ण होईल. त्याच्या बांधकामावर देखरेख ठेवणारं शेन्झो १३ हे अवकाशयान आपली मोहीम फत्ते करून १६ एप्रिलला माघारी परतलंय. त्यामुळे अंतराळ क्षेत्रात यापुढच्या काळात महासत्तांमधे एक वेगळीच स्पर्धा पहायला मिळेल.
अंतराळ क्षेत्रातली स्पर्धा दिवसेंदिवस वाढतेय. मधे कोरोना काळात मंदावलेला कॉम्प्युटर चीपचा पुरवठा आणि रॉकेट इंधनाच्या तुटवड्यामुळे नासाच्या अवकाश मोहिमा थंडावल्या होत्या. रशिया आणि अमेरिकेनं यापूर्वीच आपल्या अवकाश मोहिमा यशस्वी करत या क्षेत्रात पाय रोवलेत. तर महासत्ता असलेल्या चीननं २००३ला या क्षेत्रात एण्ट्री केली. सध्या या स्पेस रेसमधे चिनी ड्रॅगन स्वतःची ताकद वाढवायचा प्रयत्न करतोय.
हेही वाचा: चीनी स्वप्नपूर्तीच्या नावाखाली चालतो इंटरनेटबंदीचा अजेंडा
चीननं १५ ऑक्टोबर २००३ला पहिला अंतराळवीर अंतराळात पाठवला होता. असं करणारा चीन हा अमेरिका आणि रशियानंतरचा तिसरा देश ठरला होता. २०१३ला चीननं चंद्रावर तर मागच्या वर्षी मंगळावर रोबोटीक अंतराळयान उतरवलं होतं. चीनला यापुढे जायचंय. गेल्यावर्षीची शेन्झो १३ ही अवकाश मोहीम त्यातला एक महत्वाचा भाग ठरलीय.
शेन्झो हा चीनचा महत्वाचा अंतराळ कार्यक्रम आहे. शेन्झो १३ हे या कार्यक्रमातलं १३वं उड्डाण आणि आतापर्यंतची सगळ्यात लांब पल्ल्याची मानवी अंतराळ मोहीम आहे. १५ ऑक्टोबर २०२२ला या अंतराळ मोहिमेचं उड्डाण झालं. तर २१ ऑक्टोबरला हे अंतराळयान तिआन्हे अंतराळ स्थानकात पोचलं होतं.
झाई झिगांग, वांग यापिंग, आणि ये गुआगफू या तीन चिनी अंतराळवीरांनी या मोहिमेदरम्यान तिआन्हे अंतराळ स्थानकात ६ महिन्यांचा मुक्काम करत या अंतराळ स्टेशनच्या बांधकामावर देखरेख ठेवली. वैज्ञानिक प्रयोगही केले. यातल्या झाई झिगांग आणि वांग यापिंग यांनी अंतराळ स्टेशनच्या बाहेर येत ६ तास ११ मिनिटं केलेला स्पेसवॉक खास चर्चेचा विषय ठरला होता. १६ एप्रिलला हे अंतराळयान आपली मोहीम फत्ते करून माघारी परतलंय.
पूर्व चीनमधल्या वांग यापिंग या चीनच्या दुसऱ्या महिला अंतराळवीर आहेत. तर शेन्झो १३ या कार्यक्रमावेळी स्पेसवॉक करणाऱ्या पहिल्या चिनी महिला ठरल्यात. चीनच्या हवाई दलात वैमानिक म्हणून त्या काम करत होत्या. यापूर्वी २०१२ला ली यांग या महिलेनं चीनची पहिली महिला अंतराळवीर होण्याचा मान पटकावलाय. त्यावेळीही वांग यापिंग यांच्या नावाची चर्चा होती. पण ती संधी ली यांग यांना मिळाली.
यावेळच्या अवकाश मोहिमेत वांग यापिंग यांची चर्चा होतेय. चीनची सरकारी न्यूज एजन्सी असलेल्या 'शिन्हुआ'नं एक बातमी दिली. त्यानुसार, वांग यापिंग या चीन उभं करत असलेल्या अंतराळ स्टेशनच्या बाहेर पडल्या. तिथं आसपास फेरफटका मारला. वांग यापिंग यांनी अवकाश स्टेशनच्या बाहेर भटकंती केल्याचं चीनच्या अंतराळ मोहिमांची जबाबदारी असलेल्या 'चायना मॅनेड स्पेस एजन्सी'नं म्हटलंय.
वांग यापिंग यांचा जन्म पूर्व चीनच्या शेंडोंग या किनारपट्टी भागातल्या एका शेतकरी कुटुंबात झाला. ऑक्टोबर २०२१ला त्यांची चीनच्या महत्वाकांक्षी शेन्झो १३ या अवकाश मोहिमेसाठी निवड झाली होती. या अवकाश मोहिमेच्या ऑपरेटर म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती.
हेही वाचा: कोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा!
चीनच्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सहभागी होण्यावर अमेरिकेनं आक्षेप घेतला होता. त्यामुळे चीनला स्वतःचे अवकाश कार्यक्रमही थांबवावे लागले होते. या विरोधामुळे चीननं थेट स्वतःचं अवकाश स्थानक उभं करायचा निर्धार केला. त्यादृष्टीने पावलंही टाकली. त्याचाच एक भाग म्हणून गेल्यावर्षी ६६ टन वजनाचं अंतराळ स्टेशन चीननं प्रक्षेपित केलं होतं.
आपलं स्वतःचं अंतराळ स्टेशन उभं करायचं हे चीननं २०११लाच ठरवलं होतं. त्यासाठी 'टीआनगाँग १' नावाचं एक छोटं अंतराळ स्टेशनही चीननं पृथ्वीच्या कक्षेत पाठवलं होतं. त्याला २०१२ला चीनची पहिली महिला अंतराळवीर ली यांग यांनी भेटही दिली होती. पण ते फार काळ टिकलं नाही. ट्रायल म्हणून चीननं पुन्हा एकदा 'टीआनगाँग २' हे अंतराळ स्टेशन पृथ्वीच्या कक्षेत पाठवलं होतं. आत्ताचं तिआन्हे हे या अवकाश स्टेशनमधलं मुख्य मॉड्युल आहे.
अंतराळ स्टेशन उभं रहावं म्हणून गेल्या दोन वर्षात चीननं पृथ्वीच्या कक्षेत ११ अंतराळयानं पाठवायची योजना केली. यात शेन्झो क्रू मिशन, दोन टियांझो कार्गो स्पेसक्राफ्ट आणि स्पेस स्टेशनच्या दोन अतिरिक्त मॉड्यूलचा समावेश होता. पृथ्वीच्या कक्षेत ३४० ते ४५० किलोमीटर उंचीवर प्रदक्षिणा घालणारं तिआन्हे अंतराळ स्टेशन २०२२पर्यंत बनवून पूर्ण करायची चीनची योजना आहे.
एकीकडे अमेरिका आणि रशिया आपलं अवकाश संशोधनातलं वर्चस्व वाढवत असताना तिसरीकडे चीनही त्यादृष्टीने प्रयत्न करतोय. जगातली सगळ्यात मोठी दुर्बीण बनवणं असुदे की स्वतःचं अवकाश स्टेशन बनवणं, यातून चीन अंतराळ क्षेत्रातल्या स्पर्धेत स्वतःची बाजू भक्कम करताना दिसतोय. स्वतःचं अवकाश स्टेशन उभं राहिल्यामुळे महासत्तांमधे अंतराळ क्षेत्रातही स्पर्धा पहायला मिळेल.
१९९७चं आंतरराष्ट्रीय अवकाश स्टेशन २०२४ला आपलं काम करणं बंद करेल. त्यावेळी चीनचं तिआन्हे हे एकमेव अवकाश स्टेशन पृथ्वीच्या कक्षेत राहून काम करत असेल. कोरोनामुळे नासाच्या अवकाश मोहिमांची संख्या घटली होती. त्याचा फायदा घेत आणि आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सहभागी व्हायला अमेरिकेनं केलेल्या विरोधाचा वचपा काढायची संधी यानिमित्ताने चीनला मिळालीय.
अंतराळ मोहिमेत अमेरिका, रशियाला टक्कर द्यायचं चीननं ठरवलंय. त्यादृष्टीने वेगवेगळ्या मोहिमा आखल्या गेल्यात. यावर्षी अंतराळात ४० प्रक्षेपणं करून अमेरिकेला टक्कर देणं ही चीनची सध्याची महत्वाकांक्षी योजना आहे. तशी घोषणा चिनी अंतराळ कार्यक्रमाची जबाबदारी असलेल्या 'चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन'नं केलीय. त्यामुळे महासत्तांमधली ही स्पर्धा पुढच्या काळात वाढत जाईल.
हेही वाचा:
कोविडनंतर जग कसं विभागलं गेलंय?
नाहीतर आपल्या अर्थव्यवस्थेचं खरं नाही!
आपल्याला अग्निवेश यांच्यासारखे 'स्वामी' का नको असतात?
बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज