चिंचणी: झाडांच्या संगतीत, कोरोनापासून दूर

०५ जून २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज जागतिक पर्यावरण दिवस. पंढरपूरमधलं चिंचणी गाव आपल्या पर्यावरणपूरक भूमिकेमुळे आदर्श ठरतंय. निसर्गप्रेमी अशी या गावची ओळख बनलीय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गाव खेडी उद्ध्वस्त होत असताना या गावात कोरोनाचा एकही पेशंट सापडलेला नाही. गावकऱ्यांनाही ऑक्सिजनसाठी भटकावं लागत नाहीय. त्यामुळेच या गावाची दखल केंद्र सरकारलाही घ्यावी लागलीय.

कोरोना वायरसच्या पहिल्या लाटेनं गेल्यावर्षी शहरांमधे थैमान घातलं होतं. हॉटेल, दुकानं, शाळा, कॉलेज सगळं काही बंद होतं. व्यवहार ठप्प झाले होते. त्याचा लोकांच्या रोजीरोटीवर परिणाम झाला. लोक जीव मुठीत घेऊन जगत होते. मिळेल त्या मार्गाने अनेकांनी आपल्या गावचा रस्ता धरला. शहरं ओसाड पडली होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यावर्षी परिस्थिती उलटी झालीय. गावखेड्यांमधे कोरोनाचा संसर्ग वाढलाय. गावच्या वेशी बंद केल्या जातायत. काही ठिकाणी रोजचे व्यवहारही बंद पडलेत. लोकांना पुन्हा एकदा शहरं खुणावू लागलीत. अशावेळी सोलापूरच्या पंढरपूरमधलं चिंचणी गाव वेगळं ठरतंय ते आपल्या पर्यावरणपूरक भूमिकेमुळे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही चिंचणी गाव खंबीरपणे उभं आहे. कोरोनामुळे गाव, शहरं उद्ध्वस्त होत असताना गावकऱ्यांनी गावाचं गावपण जिवंत ठेवलंय. कोरोनाच्या दोन्ही लाटांमधे गावात एकही कोरोनाचा पेशंट सापडलेला नाही हे विशेष! तिथले रहिवासी मोहन अनपट यांच्यासोबतच्या संवादातून उलगडलेलं चिंचणी. कोरोनाला परतवून लावायचा परफेक्ट संदेश देणारं.

हेही वाचा: रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली

गावाचं पुनर्वसन, निसर्गाची ओढ कायम

चिंचणी हे गाव फार इंटरेस्टिंग आहे! हे सगळच्या सगळं गाव पूर्वी सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वरच्या पायथ्याशी वसलं होतं. महाबळेश्वरचा परिसर म्हणजे निसर्गसौंदर्याने, हिरवाईनं नटलेला. हे गावंही अगदी तसंच. गावचा तोच धागा पकडून पुढं घेऊन जाणारी माणसंही तशीच.

इथली माणसं, कुटुंबं आणि मागच्या कित्तीतरी पिढ्या अशा निसर्गसौंदर्यात वाढल्या. झाडांची गर्द सावली, नदीचं पाणी आणि हवेतला गारवा याची इथल्या नागरिकांना सवय. हे सगळं काही इथल्या लोकांमधे खोलवर रुजलं होतं. पण कण्हेरी धरणामुळे हे गाव बुडीत क्षेत्रात आलं.

नाईलाजानं गावातल्या लोकांना हिरवाई सोडून सरकारने दिलेल्या जागेवर पुनर्वसन करावं लागलं. आणि इतकी वर्ष निसर्गाच्या कुशीत वसलेलं अख्खच्या अख्ख गावं सोलापूरच्या ओसाड, खडकाळ आणि उंचवट्याच्या जागेवर जाऊन राहू लागलं. पुनर्वसन झाल्यावर गावात एकही झाड नव्हतं.

चिंचणीची लोकसंख्या ४०० आहे. तर कुटुंब संख्या इतकी ७५ ते ७६ आहे. पुनर्वसन झाल्यावरही इथल्या माणसांची निसर्गाविषयीची ओढ कणभरही कमी झाली नाही. ती कमी लोकांना जाणवत राहिली. त्यामुळेच दुष्काळी भाग असतानाही निव्वळ त्या ओढीनं लोकांनी हजारो झाडं लावली. आज चिंचणीत शेकडो फुलं, फळांची झाडं आहेत. इथल्या माणसांमुळे निसर्ग उभा राहिलाय.

कोरोनाचा एकही पेशंट नाही

कोरोना वायरसची पहिली लाट आली. जग काळजीत होतं. लॉकडाऊन लागलं होतं. कोरोनामुळे सगळं काही बिथरलेलं होतं. लस, औषधं शक्यच नव्हती. त्यावर केवळ चर्चा चालू होत्या. मीडिया, सोशल मीडियातून रोज नव्या बातम्या बाहेर यायच्या. त्या बातम्यांमुळे काळजीत भर पडायची. चिंचणी गावचं टेंशनही वाढलेलं होतं.

अशावेळी शक्य, अशक्य अशा सगळ्याचा विचार करून गावकऱ्यांनी प्रबोधनाची मोहीम हाती घेतली. अंगणवाडी सेविका, गावच्या शाळेतले शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते कामाला लागले. गावकऱ्यांमधली कोरोनाविषयीची भीती कमी झाली. त्याचवेळी बाहेरून कुणी आलं तर सॅनिटायझर, स्वच्छता खबरदारी घेणं, असे उपाय  हाती घेण्यात आले.

वेळीच पावलं उचलली तर कोरोनाला अटकाव घालता येतो याचा आदर्श चिंचणी गावानं उभा केला. शून्य लसीकरण असतानाही अद्यापपर्यंत कोरोनाचा एकही पेशंट गावात सापडलेला नाही. गावकऱ्यांनी घेतलेला पुढाकार आणि नियोजनबद्ध कारभार, लोकांमधल्या प्रबोधनामुळे हे शक्य झालं. 'एकत्र आल्यावर केवळ गावचा विकास करता येतो असं नाही तर कोरोनासारख्या साथीलाही रोखता येतं.' असं गावचे रहिवासी मोहन अनपट कोलाजशी बोलताना सांगतात.

हेही वाचा: पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

सगळं काही सुरळीत चालू

गावची तरुण मुलं, मोलमजुरी करणारी अनेक माणसं पुण्यासारख्या शहरांमधे कामाला होती. ती माघारी यायचे चान्सेस जास्त होते. त्यामुळे त्याबद्दलची खबरदारी आधीच घेतली गेली. त्यासाठी गावची आरोग्य व्यवस्था आधीच सज्ज होती. गावचे डॉक्टर आरोग्य केंद्र या सगळ्यावर नजर ठेवून होतं.

शेती मातीतली कामं आजही तिथं चालू आहेत. सगळी काळजी घेऊन व्यवहार सुरू आहेत. कोरोनाच्या या संकट काळात कुणी आर्थिक अडचणीत असेल तर गावच्या बचतगटांकडून कमी व्याजदरात कर्ज दिलं जातंय. बाहेरची मंदिरं कोरोनात बंद असताना चिंचणीतली मंदिरं चालू आहेत. सगळे नियम पाळून मंगळवारी एकत्रित प्रार्थनाही घेतली जाते.

गावातली काही तरुण मुलं पुण्यासारख्या मोठ्या शहरात कामाला आहेत. कोरोनात ही मुलं गावी आली. गावात शेतमजूर माणसंही आहेत. गावात दूध उत्पादित शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे सुरवातीच्या काळात त्यांच्या धंद्यावर परिणाम जाणवला. पण फार तोटा झाला नाही.

इकोसिस्टीमचा विचार करणारे चिंचणीकर

रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखा प्रकल्पही गावात यशस्वीपणे चालतोय. पावसाच्या पाण्याच्या एकही थेंब गावकरी वाया जाऊन देत नाहीत. दुष्काळासारख्या कसोटीच्या प्रसंगातही गाव आधी झाडांच्या पाण्याचा प्रश्न सोडवतं. मग उरलेलं पाणी गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी वापरलं जातं. इथं ५ रुपयाला २० लिटर इतकं स्वच्छ पिण्याचं पाणी पुरवलं जातं.

गाव हिरवाईने नटल्यामुळे परिसरातले पक्षी या गावात स्थायिक झालेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात निरव शांतता, थंडगार हिरवी सावली आणि पाखरांची किलबिल सतत असते. ग्रामस्थांनी या पाखरांसाठी पाणवठे तयार केलेत. झाडांवर तांदूळ, गव्हाच्या प्लेट्स लटकवलेल्या दिसतात.

एवढंच नाही तर पाखरांनी गाव सोडू नये म्हणून कोणत्याही कार्यक्रमासाठी फटाके फोडण्यावर गावकऱ्यांनी स्वतःच स्वतःवर निर्बंध घालून घेतलेत. एकंदर काय तर या पाखरांना तिथं मोकळा श्वास घेता येतोय. मनासारखा आसरा मिळतोय.

झाडं लावा आणि झाडं जगवा या संदेश खऱ्याअर्थाने चिंचणीकरांनी प्रत्यक्षात आणलाय. म्हणूनच तर झाडं लावून, ते जगवून त्यावर पक्षी रहायला यावेत इथपर्यंतच्या इकोसिस्टीमचा ते विचार करू शकतात. एका माणसामागे १ झाड असलं पाहिजे असं म्हटलं जातं. पण एका माणसामागे एक नाही, दोन नाही तर १५० झाडं लावली की मगच हे चिंचणीकर शांत बसणार आहेत.

हेही वाचा: प्लास्टिकमुक्त देशाचं स्वप्न जंतू साकार करणार?

केंद्र सरकारने घेतलीय दखल

केंद्रीय पंचायराज विभागाच्या सचिवांनी महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्यांची वीडियो कॉन्फरन्स घेतली होती. त्या त्या राज्यातल्या ५ ते ७ गावांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. महाराष्ट्रातून हिवरेबाजारसोबत चिंचणी हे गाव होतं. कोरोनाच्या काळात चिंचणीनं केलेलं नियोजन कौतुकाचा विषय ठरलं होतं.

चिंचणी हे हिरवंगार गाव असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. शिवाय गावचे फोटो मागवत पंचायतराजच्या ट्विटर हँडलवरून ते शेअरही केले. महाराष्ट्र पंचायराजच्या सचिवांनीही वीडियो कॉन्फरन्स घेत चिंचणी हे मॉडेल म्हणून कसं उभं करता येईल यावर चर्चा झालीय. हे मॉडेल राज्यभर कसं पोचेल यासाठी पुढच्या काळात प्रयत्न केले जातील.

चिंचणीचा संदेश जगभर पोचावा

अनेक गावांमधे कोरोनानं शिरकाव केला. पण चिंचणी गाव या सगळ्याला अपवाद ठरलं. नियोजनबद्ध कारभार, पर्यावरणाला साजेशी भूमिका आणि गावकऱ्यांचा समंजसपणा त्याला कारण ठरलाय. सध्याच्या काळात ऑक्सिजनसाठी वणवण करणारी माणसं आपण पाहिलीत. वेळेत ऑक्सिजन न मिळाल्यानं अनेकांचा जीव गेलाय. त्यांच्या स्टोऱ्या, फोटो, बातम्या आपण ऐकतोय. टीवीवरून पाहतोय.

मेट्रो कारशेडसाठी मुंबईतल्या आरेत रातोरात हजारो झाडांच्या कत्तली केल्या गेल्या. तेव्हा चिंचणी केवळ निषेधाचे सूर आळवत बसलं नाही. त्याला प्रत्युत्तर म्हणून चिंचणीत ११०० झाडं लावण्यात आली. विकासाच्या गोंडस नावाखाली निसर्गाची छेडछाड केली जातेय. पर्यावरणाची हानी करून शहरं उभी करणं हा विकास नाहीय याची जाणीव चिंचणीनं करून दिलीय. कोरोनाच्या या साथ काळात थेट गावातच निसर्ग असल्याचा संदेश चिंचणीनं दिलाय.

'शहरांची सूज वाढलीय. शहरं म्हणजेच विकास असा समज आहे. कोरोनानं ही सूज उतरवली. लोक शहरातून पुन्हा ग्रामीण भागात जायला लागले. त्यामुळे आता सरकारी यंत्रणांनी गावं स्वयंपूर्ण केली पाहिजेत. तसाच त्याचा आराखडा तयार करायला हवा. जेणेकरून गावं भकास होणार नाहीत आणि शहरं बकाल होणार नाहीत.' चिंचणीचे रहिवासी मोहन अनपट यांनी हा संदेश आपल्यापर्यंत पोचवलाय. तो सर्वदूर पोचावा.

हेही वाचा: 

एका झाडाची किंमत शोधली कशी?

‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

डळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)

रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली

एका शिक्षकाला बियरने चीनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं, त्याची गोष्ट