भारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय?

२१ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ अशी गाणी सगळ्यांनाच आठवत असतील. दिवाळीची तयारी सुरू असेलच. यंदा दिवाळीचा बाजारही उशिरा लागलाय. आणि चायना मालावर बंदी आहे. निम्म्याहून अधिक आवक घटलीय. त्यामुळे यंदाची दिवाळी महाग असणार एवढं नक्की.

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलीय. सगळ्यांच्या घरात दिवाळीची लगबग सुरू आहे. आपला जॉब, काम सांभाळून सगळेजण शॉपिंग करतायत. घरातली साफ-सफाई, सजावट, फराळ बनवतायत. एकतर विधानसभा निवडणुकीमुळे दिवाळी आधीच फटाके फुटतायत. आधी प्रचाराचे मग निकालाचे आणि सगळ्यात शेवटी दिवाळीचे फटाके फुटतील. निवडणूक हासुद्धा दिवाळी सणाएवढाच मोठा इवेंट. म्हणूनच जिथे दिवाळीचा बाजार महिनाभर आधी सजतो. तो यावेळी मात्र निवडणुकीच्या धामधुमीत मागेच राहिला. अगदी नुकतंच बाजारात दिवाळीचं सामान येऊ लागलंय.

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात विकेंडला खूप गर्दी झाली. गेल्या दोन दिवसांपासून बाजारही फुलतोय. रंगीबेरंगी कंदील, लायटींग, पणत्या, डेकोरेशनचं सामान, रांगोळ्या आणि रांगोळ्यांची साधनं, कपडे, दागिने इत्यादी सगळं बाजारात दिसू लागलंय. आपल्याला बाजारात फिरल्यावर एक सगळ्यात मोठी गोष्ट जाणवते ती म्हणजे चायना माल खूप कमी झालाय. बाजारात चायना लायटींग, डेकोरेटीव वस्तू इत्यादी सर्वच सामान निम्म्याहून अधिक कमी झालंय. अगदी मागच्या वर्षीपर्यंत दिवाळीचा बाजार हा फक्त चायना मालनेच भरलेला असायचा. पण आता मात्र चित्र बदललं.

चायनासाठी भारत मोठी बाजारपेठ

दिवाळी सणाला सगळेजण आपलं दु:ख, अडचण विसरून जमेल तेवढी हौस मौज करतात. खर्च करतात. तसंही दिवळी सणापेक्षा जास्त इवेंटच बनलाय. विशेष म्हणजे या काळात आपण खूप जास्त खरेदी करत असल्यामुळे हा व्यापाऱ्यांच्या धंद्याचा काळ बनला. मग ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्वच प्रकारच्या वस्तू आणि सेवांवर डिस्काऊंट लागतात. प्रत्यक्ष आणि वर्च्युअल अशा दोन्ही दुकानांत सेल सुरू होतो. पण तरीही वाढत्या महागाईमुळे या सर्व गोष्टी किती परवडतात हे आपलं आपल्यालाच माहिती.

महागाईत जर आपल्याला वस्तू स्वस्त मिळत असतील तर नक्कीच आपण त्या खरेदी करतो. आणि आपण तर प्राईज कॉन्सिअस कन्ज्युमर आहोत. त्यामुळे आपल्याकडे गरिबांपासून ते अप्पर मिडल क्लासपर्यंत सगळेच लोक स्वस्तात मिळणाऱ्या वस्तू खरेदी करतातच. बाजारात ही स्वस्ताई चायना मालामुळे येते हे आपल्याला माहिती आहेच. पण आता बंदी आल्यामुळे दिवाळी महाग झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे कदाचित खरेदी करताना आपण हात आखडता घेऊ.

चायना मालची विक्री मोठ्या प्रमाणात होण्यामागे काही कारण आहेत. ज्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे माल स्वस्त असतो. तो इंडियन मेड किंवा इतर ब्रँडेड मालापेक्षा अगदी ३५ ते ५० टक्क्यांनी स्वस्त असतो. तसंच नव-नव्या डिझाइन्स, फिनिशिंग, वस्तू व्यवस्थित वापरल्यास किमान एक दोन वर्ष टिकतात. त्यामुळे चायनाच्या या लो ग्रेड पण स्वस्तात मस्त मालासाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे.

चायना मालावर बंदी का आणली?

मोदी सरकार आल्यापासून ‘मेक इन इंडिया’चा गवगवा होतोय. त्याला यश किती आलं आणि किती नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहितीय. पण चायना मालावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे युरी अटॅक. २०१६ झालेल्या उरी अटॅकमधे चीनने पाकिस्तानला सपोर्ट केल्यामुळे. दुसरं कारण म्हणजे चीनने अरुणाचल प्रदेशमधे वारंवार सैन्य पाठवून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे. आणि तिसरं कारण म्हणजे भारतीय कंपन्यांना होणारं नुकसान. २०१० ते २०१५ दरम्यान भारतीय उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पन्नात ४० टक्क्यांएवढी मोठी घट सहन करावी लागली.

यादरम्यान भारतीय उत्पादक कंपन्यांना बाहेरच्या देशातून फायदा होत होता. म्हणजेच उत्पादनांचं एक्स्पोर्ट साधारण २० टक्क्यांनी वाढलं. पण तरीही आपल्याच देशातली एवढी मोठी बाजारपेठ हातची कशी घालवायची. म्हणूनच बॅन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अजूनही पूर्णपणे याला यश आलं नाही. पण यंदाच्या दिवाळी बाजारात चक्क ५० ते ६० टक्क्यांनी चायना मालाची आवक घटली. ही माहिती रमणदीप कौर यांनी दिली. दिल्लीतल्या बिझनेस मॅपिंग सोल्युशन कंपनीच्या न्यूजलेटरमधे कौर यांनी लिहिलं.

हेही वाचा: शनिवारवाडा १८१८:  पेशवाई बुडाली त्याची गोष्ट

चायना माल वापरण्याचे दुष्परिणाम

चायना मालाची विक्री भारतात मोठ्या प्रमाणात होत होती. चायना मालावर बंदी आणताना कदाचित लोकांचा रोष सहन करावा लागला असता पण असं काहीच झालं नाही. कारण भारतीय म्हणून लोकांच्या भावना दुखावल्या होत्या. तसंही जो देश पाकिस्तानला सपोर्ट करतो तो भारतातल्या लोकांच्या दृष्टीने देशाचा दुष्मनच ठरतो. अशातच चीन प्रत्येक बाजूने आपल्या देशाची कोंडी करत होता. आणि दुसरीकडे चायना मालमुळे होणारं नुकसान लक्षात येऊ लागलं. त्या दृष्टीने खूप चांगली जनजागृतीही झाली.

चायना माल प्लॅस्टीकच्या अगदी लो कॉलिटीपासून बनलेला असतो त्यामुळे विघटन तर होत नाहीच. पण त्यातून मोठ्या प्रमाणात कार्बन बाहेर पडतं. ज्यामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होतं. तसंच त्वचेला त्रास होतो. खाज येते, रॅशेज येतात, लहान मुलांच्या हाती चायना खेळणी देऊ नका असंही मीडियातून सांगितलं गेलं.

दिवाळीत आपण हमखास चायनाच्याच इलेक्ट्रॉनिक लायटींग वापरतो. यामधल्या बल्बचा प्रकाश सौम्य असला तरी तो प्रकाश आपल्या डोळ्यांच्या रेटीनावर परिणाम करतो. तसंच त्याची वायर खूपच तकलादू असल्यामुळे बऱ्याचदा स्पार्क होतं. सतत स्पार्क झाल्यामुळे आपल्या स्विचबोर्डची क्षमता कमी होते, ही सर्व माहिती स्टीवन डेवीस यांनी आपल्या अभ्यासातून शोधलं. डेवीस हे युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधे अर्थ सिस्टीम सायंसचे प्रोफेसर म्हणून काम करतात. त्यांनी आपल्या संशोधनात ही माहिती दिलीय. जी २०१७ च्या बिझनेस टुडेच्या अंकात छापून आली.

लोकांनी चायना माल घेणं बंद केलं

चायना मालावर बंदी आल्यावर महागाई वाढेल असं सर्वच इकॉनॉमिस्टनी भाकीत केलं होतं. सध्या महागाई तर प्रचंड वाढलीय. पण त्यामागे वेगवेगळी कारणं असली तरी चायना मालाची आवाक कमी झाली हेसुद्धा आहे, असं कौर यांनी म्हटलं. भारताने चायना मालावरची ड्युटी कायच्या काय वाढवल्यामुळे आणि सतत त्यात बदल करत असल्यामुळे चायना मालाची किंमतही वाढलीय. तसंच मोबाईल आणि इतर गॅजेटही महाग झालेत. ऑनलाईन विशिष्ट वेबसाईटवरच स्वस्त फोन मिळतायत. पण दुकानांमधे कोणतेच गॅजेटस दिसत नाहीत.

यंदाच्या दिवाळीच्या बाजारातही चायना लायटीग दिसतायत. महाराष्ट्र आणि हरयाणात निवडणुकांमुळे दिवाळीचा बाजार उशिरा लागला. पण दिल्ली, बंगळुरू, हैद्राबाद, सुरत, इंदुर इत्यादी शहरांच्या बाजारपेठांमधे चायना माल दिसतोय. आणि तरीही गेल्या २ ते ३ वर्षांच्या तुलनेत ५० ते ६० टक्क्यांनी कमी आहे, असं बिझनेस सँडर्ड या इंग्रजी वर्तमानपत्राच्या नुकत्याच आलेल्या बातमीत सांगितलंय. चायना माल प्रत्यक्ष दुकानात कमी विकला जातोय. कारण किंमती जवळपास इंडियन मेड आणि बँडेड माला एवढ्या आहेत. त्यामुळे लोकांनी चायनाकडे पाठ फिरवली.

हेही वाचा: डॅडी भेटे बापूंना

स्वस्त चायना माल कुठे मिळतोय?

आपण एक गोष्ट मात्र विसरता कामा नये. ऑनलाईन चायना माल मोठ्या प्रमाणात मिळतोय. हा माल होलसेलमधेही उपलब्ध आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा माल फक्त वर्च्युअल दुकानात मिळत नाही तर मोठ्या प्रमाणात विकलाही जातोय.

स्वस्त माल मिळतोय म्हटल्यावर लोक तिथेच जाणार. मग ते दुकान प्रत्यक्षात असो किंवा वर्च्युअल. इकडे चायना लायटींग ४० ते ५० टक्क्यांनी स्वस्त मिळतंय. तसंच या लाईट वेगवेगळ्या प्रकारच्या, आकारातल्या, रंगाच्या आणि डेकोरेटीव आहेत. त्यामुळे विक्री वाढलीय. आणि स्वस्तातली एलईडी लायटींगही मिळतेय. एकूणच लोकांचा वर्च्युअल दुकानातल्या खरेदीकडे कल वाढल्याचं दिसतंय. आणि बंदी फक्त प्रत्यक्ष दुकानांपुरताच असल्याचं दिसतं.

हेही वाचा: 

कथाः प्रमोशन

तिची कविता, कवितेतली ती

नरेंद्र मोदींची शेवटची प्रचारसभा रंगली नाहीच

येत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल?

शरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार?