कोलंबसने नेलेल्या साथरोगांनीच संपवली मूळ अमेरिकी संस्कृती

१७ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


ख्रिस्तोफर कोलंबस हा प्रसिद्ध खलाशी. आपल्या भारताचा शोध लावण्यासाठी निघालेल्या कोलंबसने अमेरिकेच्या धरतीवर पाऊल ठेवलं आणि त्यालाच भारत समजला. नंतर हे भारतीय नाहीत असं लक्षात आलं तेव्हा त्याने तिथल्या लोकांना रेड इंडियन्स हे नाव दिलं. हा सगळा इतिहास आपण शाळेत शिकलोय. पण याच कोलंबसमुळे ही रेड इंडियन्स संस्कृती संपली हे किती जणांना माहीत असतं?

ख्रिस्तोफर कोलंबस हा प्रसिद्ध खलाशी. स्पेनच्या राजाच्या सांगण्यावरून कोलंबस आशिया खंडाच्या विशेषतः भारताच्या शोधात निघाला. पण त्यावेळी गुगल मॅप नव्हता. त्यामुळे तो भारताऐवजी अमेरिकेत पोचला. १४९२ ला त्याने अमेरिकेतल्या कॅरेबियन बेटांवर पहिलं पाऊल ठेवलं. तो गेला म्हणजे एकटा गेला असा त्याचा अर्थ होत नाही. त्याच्यासोबत कित्येक खलाशी, व्यापारी होते.

अमेरिकेत येताना या सगळ्यांनी सोबत देवी, गोवर, प्लेग यासारखे रोगसुद्धा आणले होते. अमेरिकेच्या भूमीवर किंवा आसपासच्या बेटांवर त्यापूर्वी हे संसर्गजन्य रोग नव्हते. पण ही बाहेरची मंडळी तिथं आली आणि अमेरिकेत संसर्गजन्य रोगानं कित्येक स्थानिक रहिवाशांचा म्हणजेच नेटीव अमेरिकन्सचा जीव घेतला.

पहिल्यांदाच अशा रोगांच्या संपर्कात आल्याने या रहिवाशांची लोकसंख्या कमालीची घटली. इतकी की उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडातल ९० टक्के स्थानिक लोक मरण पावले. युरोपीय लोकांना हेच हवं होतं. तिथं वसाहती करण्याच्या उद्देशानेच तर ते अमेरिकेत आले होते. लोकसंख्या कमी झाल्यामुळे स्थानिकांचा अडथळा आपोआपच कमी झाला.

हेही वाचा : अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट

लोकसंख्या ६० हजार वरून केवळ ५००

अमेरिका शोधाची ही मोहिम राबवत असताना कोलंबस पहिल्यांदा पोचला तो हिस्पानिओला बेटांवर. म्हणजे आत्ताचं हैती आणि डॉमनिक रिपब्लिक इथं. तिथे त्याचा टायनो जमातीच्या लोकांशी संपर्क आला. त्यावेळी त्यांची लोकसंख्या ६० हजारांच्या आसपास होती. त्यांच्या लोकसंख्येचा आकडा पुढच्या ५६ वर्षांत म्हणजे १५४८ पर्यंत पाचशेच्याही खाली आला. असेच बदल अमेरिकेच्या परिसरातली बेटं आणि मुख्य भूमीत पाहायला मिळाले.

उत्तर अमेरिकेतील अझटेक साम्राज्याचंही हेच झालं. आता मेक्सिको आहे त्या भूमीत हे राज्य होतं. देवी म्हणजे स्मॉलपॉक्स रोगाच्या संसर्गामुळे या राज्यातले लोक मोठ्या संख्येने मृत्यूमुखी पडले. त्यांची संख्या इतकी घटली की ते आक्रमक स्पॅनिश वसाहतींच्या लोकांशी लढा देऊ शकले नाहीत. उरलेले शेतकरी लोकांसाठी पुरेसे पीकही काढू शकले नाहीत. परिणामी, हे प्राचीन साम्राज्य रसातळाला गेलं.

१६व्या आणि १७व्या शतकात तब्बल ५.६ कोटी स्थानिक अमेरिकन मृत्यूमुखी पडले असावेत असा शोध अलिकडेच संशोधकांनी लावलाय. त्यामागचं मुख्य कारण रोगराई हेच होतं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

फिजी बेटांवरची दुर्दैवी कहाणी

एकोणिसाव्या शतकातल्या फिजी बेटांवरच्या लोकांचं दुसरं काय झालं? फिजीमधल्या स्थानिक जमातींचे प्रमुख आणि ब्रिटिश यांच्यात करार झाला आणि १८७४ मधे हे बेट ब्रिटिशांकडे सोपवण्यात आलं. राणीच्या आदेशावरून फिजी बेटांवरच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ऑस्ट्रेलियाला भेट दिली. तिथे मीजल्स म्हणजे गोवर रोगाची साथ पसरली होती.

ऑस्ट्रेलियाला भेट दिलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हा रोग फिजी बेटांवर आणला. या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेले स्थानिक टोळ्यांचे प्रमुख आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या रोगाचा बेटांवर आणखी प्रसार झाला. हा रोग अगदी झपाट्याने पसरला. त्यात फिजी बेटांवंरील एक-तृतीयांश लोकसंख्या नष्ट झाली. तब्बल ४० हजार लोकांचा मृत्यू झाला.

या बेटांवरील दृश्य भयंकर होतं. सर्वत्र मृतदेहांचा खच, त्यांचा रानटी जनावरांकडून फडशा, गावातले सगळेच लोक मरण पावलेले. मग त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी गावंच्या गावं पेटवून दिली जात होती. त्यात काही अर्धमेले पेशंट होरपळून मेले होते.

अशाप्रकारे जगाचा इतिहास घडवण्यात आणि बिघडवण्यात या साथींच्या रोगांचा मोठा वाटा आहे. आत्ताचा कोरोनाचा वायरस जगाच्या इतिहासाचं काय करतो हे पहायचं आहेच.

हेही वाचा : 

अब आया वाधवान सातारा के पहाड के नीचे

आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?

ग्रेट लॉकडाउन: जागतिक महामंदीपेक्षा वाईट आर्थिक मंदी

जुने फोटो आणि रामायणः दोन पिढ्यांचा नॉस्टॅल्जिक ट्रेंड

महिन्याभराच्या लॉकडाऊन युरोपियन देशांनी घेतला मोकळा श्वास

प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट

( हा मूळ लेख भवताल मासिकाच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध झाला असून त्याचा संपादित भाग इथं दिलाय.)