महाराष्ट्र हा कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, असं महात्मा गांधी म्हणाले होते. या महाराष्ट्रातून चालताना राहुल गांधी यांनीही हा अनुभव घेतला. अक्षरशः हजारो सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक राहुल गांधीसोबत महाराष्ट्रातल्या टप्प्यात चालले. ते या यात्रेत का सहभागी झाले, ते नक्की काय बोलले, हे देशासाठी महत्त्वाचं आहे. या मान्यवरांनी मांडलेल्या मतांचं हे संकलन.
‘सिविल सोसायटी' हा शब्द गेल्या काही वर्षात भारताला चांगलाच परिचित झालाय. समाजावर प्रभाव पाडू शकणारे सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी यांच्यासारख्यांना 'सिविल सोसायटी' असं म्हणण्याचा प्रघात रुढ झालाय. राजकारणापेक्षा समाजकारणाचा विचार करणारा हा वर्ग सध्या राहुल गांधींच्या सोबत आहे. या सिविल सोसायटीतले अनेक जण स्वतःहून भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्यापेक्षा या सामाजिक कार्यकर्त्यांचं असणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांची मतेही समजून घेणं गरजेचं आहे.
हेही वाचा: नव्याने उभं राहण्यासाठी कॉंग्रेसने भाजपकडून शिकाव्यात अशा गोष्टी
- मेधा पाटकर, नर्मदा बचाव आंदोलन
आम्हाला ‘तुकडे गँग’ म्हणणारेच आता देशाचे तुकडे करायला निघालेत. देशात धार्मिक आधारावर राजकारण करून धर्म, पंथ आणि समाजामधे विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करतंय. देशात ही विषमता दूर करण्यासाठी आणि भारताचं संविधान वाचवण्यासाठी आम्ही या यात्रेत सहभागी झालोय. ही यात्रा भारताला जोडण्यासाठी, देशाचे तुकडे करणाऱ्यांना ऐक्याचे बळ दाखवण्यासाठी महत्त्वाची आहे. मेधा पाटकर यांच्यासोबत नंदुरबार जिल्ह्यातल्या सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या शेतकरी, आदिवासींनीही या यात्रेत सहभाग नोंदवून आपल्या मागण्या मांडल्या.
- योगेंद्र यादव, स्वराज अभियान
देशातल्या सत्ताधीशांच्या सर्वोच्च नेतृत्वानं इंग्रजांप्रमाणेच 'तोडा आणि राज्य करा', ही भूमिका स्वीकारलीय. लोकांमधे, समाजांमधे द्वेष पसरवला जातोय. या 'फॅसिस्ट' वृत्तीला विरोध दर्शवण्यासाठी देशातल्या अनेक संघटना पक्ष आणि वैचारिक भेद बाजूला सारून, भारत जोडो यात्रेला समर्थन देतायत. भारत जोडो यात्रेमुळे देशातलं वातावरण बदलतंय. सरसंघचालकांची मुस्लीम संघटनांसोबत बोलणी सुरु झालीय. हे या यात्रेचं फलित आहे. पुढे आणखी बदल दिसून येतील. देशातल्या मोठ्या संप्रदायांमधे वाद निर्माण करतात, त्यापेक्षा मोठे देशद्रोही कोणीही नाही. आपल्या देशात रोज हिंदू-मुस्लिम वाद पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना देशविघातक ठरवलं जावं, असं सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
हेही वाचा: विश्वसुंदरी ठरलेल्या महाराणी गायत्री देवींनी संसदही गाजवली
- तुषार गांधी, महात्मा गांधींचे पणतू
सावरकरांबद्दल राहुल गांधींनी जे सांगितलं ते सत्यच आहे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती. त्यांची माफी मागितली होती. इंग्रजांकडून पेन्शन घेतली होती. जर आपण सत्य सांगायला घाबरलो, तर आपण सत्याशी दगाबाजी करतो. सावरकर एकेकाळी क्रांतीकारी होते. त्यानंतर त्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि पूर्ण आयुष्य इंग्रजांशी ते इमानदार राहिले. हे सांगण्यात काहीच चुकीचं नाही. सत्य सांगायचं धाडस असायलाच हवं. ते कुणी सांगत नसतील, तर ते सत्याला घाबरतात हे स्पष्ट दिसतं. ज्यांना सत्य माहिती आहे, त्यांनी जर सत्य लपवलं, तर सत्याशी त्यांनी निष्ठा नाही, हे कळून येतं.
- चंद्रकांत वानखेडे, शेतकरी आंदोलक
मी आयुष्यभर काँग्रेस विरोधक होतो. असं म्हणण्यापेक्षा आयुष्यभर सत्तेच्या विरोधात राहिलोय, असं म्हणणं जास्त संयुक्तिक राहील. आणीबाणीचा विरोध केला म्हणून वर्षभर तुरुंगातही होतो. कॉंग्रेस सत्तेवर असतानाच त्या काळात विविध आंदोलनांत होतो. अंगावर विविध खटले ओढवून घेतले.कोर्टात खेटे मारत राहिलो. पण त्यांनी मला कधी 'देशद्रोही' म्हटलं नाही. मला कधी ट्रोल केलं नाही. इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान असताना या देशातला एका हायकोर्टाचा जज या देशाच्या पंतप्रधानाच्या विरोधात निकाल देवू शकतो. हे कॉंग्रेसच्या काळात घडू शकत होतं. कॉंग्रेसच्या काळातच एखादा 'शेषन' जन्माला येवू शकत होता. कारण स्वायत्त संस्था कॉंग्रेसने बऱ्यापैकी अबाधित ठेवण्याचा आपल्यापरीने प्रयत्न केला. आताच्या काळात आपण त्याची कल्पनाही करु शकत नाही.
हेही वाचा: नरेंद्र मोदींना इतकं मोठं यश मिळालं, याची सर्वात महत्त्वाची ५ कारणं
- सत्यपाल महाराज, सप्तखंजिरीवादक
जिथं गोरगरिबांचा, शेतकऱ्याचा विचार होत असेल, तिथं आपण असायलाच हवं. देशातल्या ७३३ शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करून शेतकरी विरोधातले काळे कायदे मागे घ्यायला सरकारला भाग पाडलं. या समाजासाठी राहुल गांधी पायी चालत आहेत. देशातला सर्व समाज हा जोडला गेला पाहिजे. गोरगरिबांवर होणारा अन्याय, अत्याचार दूर व्हायला हवा. त्यासाठी हिंदू-मुस्लिम-बौद्ध सर्वांनी आज बंधुभावनेने एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठीच आम्ही सर्व आज राहुल गांधीसोबत इथं सहभागी झालोय. गावागावातून जाणारी ही यात्रा देशाला जोडण्यासाठी फार महत्त्वाची आहे.
- गणेश देवी, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ
देशातल्या लोकशाहीची परिस्थिती भयानक आहे. राज्यघटनेत ही गोष्ट स्पष्टपणे म्हटलीय की, भारत हे संघराज्य आहे. विविध राज्यांचा देश अशी या संघराज्याची रचना आहे. या देशाची सत्ता फक्त दिल्लीमधे तीन माणसांच्या हातात केंद्रीत होणे हे राज्यघटनेसाठी धोकादायक आहे. या धोक्याला विरोध करण्यासाठी ज्याप्रमाणे १९४२मधे भारत छोडो आंदोलन झालं, त्याप्रमाणेच आता भारत जोडो आंदोलन करण्याची गरज होती. हे आंदोलन काँग्रेसने सुरु केलं असलं तरी ते फक्त काँग्रेसचं आंदोलन नाही. देशातल्या सिविल सोसायटीनं त्यात सहभागी होणं आज देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
हेही वाचा: जागतिक कासव दिनी लोकसभेच्या स्पर्धेत राहुलचं कासव जिंकलंच नाही
- लक्ष्मीकांत देशमुख, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष
धार्मिक उन्माद, ध्रुवीकरण, मुस्लिमांना कमी लेखणं ही केंद्र सरकारची आजची धोरणं न पटणारी आहेत. सांस्कृतिक क्षेत्राच्या स्वातंत्र्यावरही घाला घालण्याचा प्रयत्न आहे. पण भाजपच्या या हिंदुत्ववादी अजेंड्याचं उत्तर ‘सौम्य हिंदुत्व’ नाही, तर धर्मनिरपेक्षता हेच आहे. कारण धर्मनिरपेक्षता हाच भारताचा आत्मा आहे. राहुल गांधी यांना दिलेल्या निवेदनात आम्ही पाच मुद्दे प्रामुख्याने मांडले. काँग्रेस आणि सहयोगी पक्षांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर ठाम राहावं, रोजगारभिमुख योजनांचा आग्रह धरावा, शिक्षण आणि शेती या विषयांना प्राधान्यक्रम द्यावा आणि साहित्यिक, कलाकार तसंच प्रत्येक व्यक्तीच्या हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी प्रयत्न करावेत.
- बी.जी. कोळसे पाटील, माजी न्यायाधीश
आज देशात आर्थिक आरक्षणाच्या नावाखाली इतर तळागाळातल्या मागासवर्गीय, आदिवासी, भटक्या विमुक्त, अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण संपवण्याच्या प्रयत्न होतोय. देशात महागाईनं कळस गाठलाय. सगळीकडे खासगीकरण करून नागरिकांना बेरोजगारीच्या खाईत लोटलं जातंय. या पार्श्वभूमीवर भारताची राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता टिकवण्याकरता आज देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही. काँग्रेस पक्षाचा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिहांचा वाटा असून, गांधी घराण्यानं निःस्वार्थपणे देशासाठी बलिदान केलंय. त्यामुळे सत्य समोर आणण्याकरता राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सुरु असून त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मी या यात्रेत सहभागी झालोय.
हेही वाचा: येणार तर मोदीच हे कळाल्यावर उंचावलेला सेन्सेक्स खाली का गेला?
- श्याम मानव, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती
या देशामधे राज्यघटनेच्या माध्यमातून चार मूल्ये मिळाली आहेत. समता, बंधुता, स्वतंत्रता आणि न्याय ही ती चार मूल्ये आहोत. आपल्या देशात राज्यघटनेने दिलेली ही चार मुल्ये जेव्हा जनतेला मिळाली, तेव्हा ती क्रांती होती. कारण दोन हजार वर्षांनंतर ती देशातल्या जनतेला मिळत होती. आणीबाणीच्या वेळी आम्ही आंदोलन केलं, तुरुंगवास सोसला. आणीबाणीच्या वेळी फक्त स्वातंत्र्य धोक्यात आलं होतं. आज घटनेची चारही मूल्ये धोक्यात आली आहेत. त्यामुळे देशात काहीतरी घडायला हवं, असं आम्हाला वाटतं. त्यामुळे लोकशाहीवर, राज्यघटनेवर प्रेम असलेल्यांनी 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होणं, आम्हाला गरजेचं वाटतं.
- निरंजन टकले, ज्येष्ठ पत्रकार, लेखक
वृ्त्तपत्रात हजारो कोटींच्या जाहीराती न देता, राहुल गांधी हजारो किलोमीटर चालण्यासाठी रस्त्यावर उतरलेत. या देशातला गरीब हा विकासाचा बळी ठरू नये. तो विकासाचा भागीदार बनावा, ही त्यांची भूमिका त्यांनी स्पष्टपणे सांगितलीय. सामान्य माणसाशी भावनिक नातं जोडण्यासाठी त्यांनी उचललेल्या पावलांसोबत आज देशातली लाखो पावलं चालतायत. एकेकाळी काँग्रेसचे विरोधक म्हणवले गेलेले, आणीबाणीत काँग्रेसविरुद्ध उभे राहिलेले कार्यकर्तेही आज भारत जोडोमधे एकत्र येतायत. हे या यात्रेचं फार मोठं यश आहे.
हेही वाचा:
मोदी-राहुल यांची महाराष्ट्रातल्या प्रचाराची बोहनी काय सांगते?
डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का?
माणिकराव जाधवांनी शरद पवारांना ईडीच्या फेऱ्यात कसं अडकवलं?
काँग्रेसला न्याय, केजरीवालांना चुनौती देणाऱ्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल