शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन

०८ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


पाणी प्रश्नावर महाराष्ट्रात आजवर खूप काम झालंय. पण त्याच्याइतकाच महत्वाचा असणाऱ्या हवा प्रदूषणाच्या मुद्द्यावर आपण दूर्लक्ष केलं. आज भारतातलं सगळ्यात जास्त हवा प्रदूषण महाराष्ट्रात होतंय. यावर उपायोजना करण्यासाठी शुद्ध हवा हक हमारा या हॅशटॅगसह क्लीन कलेक्टीव्ह कॅम्पेन चालवण्यात येतंय. यांच्या प्रयत्नांमुळे आता थेट राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात हवा प्रदूषणाच्या मुद्दानं स्थान मिळवलं.

इंटरनेटवर एक इंटरेस्टींग वेबसाइट आहे. जागतिक वायु गुणवत्ता निर्देशांक प्रकल्प असं या वेबसाईचं नाव. या वेबसाईटवर संपूर्ण जगाचा नकाशा आहे. त्या नकाशावर प्रत्येक शहरानुसार काही रंगांचे झेंडे लावलेत. लाल, पिवळा, केशरी, हिरवा, चॉकलेटी, जांभळा असे हे रंग. त्या झेंड्यांवर माऊसचा कर्सर नेला की ३४, ११५, ८७, ७२ असे काही आकडे दिसतात.

या वेबसाईटकडे आपण खूप वेळ कुतूहलानं पाहत राहतो. आपण भारतीय असल्यानं सहाजिकच आपल्या माऊसचा कर्सर भारतातल्या शहरांवर फिरू लागतो. त्यातही मराठी म्हणल्यावर लगेचच हा कर्सर महाराष्ट्रातल्या शहरांकडे येतो. त्यातल्या मुंबई, पुणे आणि सोलापूर अशा तीन शहरांवर लाल झेंडा दाखवलाय. ६ ऑक्टोबरला ही साइट अपडेट झाल्याचं तिथं दिसतं.

महाराष्ट्र सगळ्यात प्रदुषित राज्य

जगभरातल्या शहरांच्या हवेचं मूल्यमापन या वेबसाइटवर नोंदवलं जातं. लाल झेंडा ज्या शहरावर असतो त्या शहरातल्या हवेची गुणवत्ता एकदम खराब असते. लाल झेंडा म्हणजे रोगट हवा, जांभळी म्हणजे अति रोगट तर चॉकलेटी म्हणजे धोकादायक. याउलट हिरवा झेंडा म्हणजे एकदम स्वच्छ शुद्ध हवा.

भारतातल्या हुबळी, कोईंबतूर, विशाखापट्टनम अशा शहरांवर या वेबसाइटनं हिरवा झेंडा फडवकलाय. पण विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या एकाही शहरावर हिरवा झेंडा नाही. एकतर लाल किंवा नारंगी झेंडाच महाराष्ट्राच्या नशिबी आलाय. याचा अर्थ असा की महाराष्ट्रातली हवा रोगट होण्याच्या मार्गावर आहे.

या वेबसाइटवर जी माहिती दिली आहे त्याचा अर्थ कदाचित पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातल्या एका सर्वेक्षणाशी लावता येईल. या अभियानासाठी सरकारने सर्वेक्षण घेतलं. त्य़ात संपूर्ण भारतात महाराष्ट्र हे सगळ्यात जास्त वायू प्रदूषण असणारं राज्य असल्याचं समोर आलं.

प्रदूषण करण्याची क्षमता वाढली

एखाद्या शहरात काय पातळीपर्यंत हवा प्रदूषण व्हावं याचे काही निकष असतात. हे निकष पूर्ण न करू शकणाऱ्या १०२ शहरांत महाराष्ट्र अव्वल आहे. महाराष्ट्रातली १८ शहरं प्रदुषणाच्या निकषांपलीकडे गेली. अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातुर, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, नवी मुंबई, ठाणे, सांगली, सोलापूर आणि उल्हासनगर ही ती अठरा शहरं. यातलं पुणे, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांमधे नायट्रोजनचं उत्सर्जन धोकादायकरीत्या वाढलंय.

गंमत म्हणजे, भारतात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सगळ्यात जास्त मोठी मानली जाते. त्यातही जीडीपी क्रमवारीतही महाराष्ट्राचा पहिला नंबर येतो. याचा अर्थ महाराष्ट्र विकसित होतोय. तसं राज्याची प्रदूषण करण्याची क्षमताही वाढत चाललीय.

हेही वाचा: आरेत झाडं तोडण्याचं समर्थन आणि विरोध का होतोय?

महाराष्ट्रावरचा कलंक पुसण्यासाठी

महाराष्ट्रात राहणारे आपण रोज हीच प्रदुषित हवा आत घेतो. ही प्रदुषित हवा आपल्या रक्तात मिसळते. रक्तातून सगळ्या शरीरात आणि मेंदूपर्यंतही पोचते. त्याचे भयंकर वाईट परिणाम आपल्या न कळत आपल्यावर होतात. म्हणूनच आता वायू प्रदूषण रोखण्यासाठी काही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे.

ही गरज ओळखून मुंबईतल्या आणि देशभरातल्या काही संस्था एकत्र आल्यात आणि या वायू प्रदूषणाविरूद्ध काम करण्यासाठी त्यांनी ‘शुद्ध हवा हक हमारा’ असा हॅशटॅग वापरून एक कॅम्पेन चालू केलंय. ‘क्लीन एअर मॅनीफेस्टो’ कॅम्पेन असं याचं नाव.

सगळ्यात जास्त हवा प्रदूषण करणारं राज्य असा कलंक महाराष्ट्राला लागलाय. हा कलंक पुसण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. महाराष्ट्रातलं हवा प्रदूषण कमी करण्यासाठी काय योजना राबवता येतील याचा एक जाहिरनामा आम्ही क्लीन एअर कलेक्टिवच्या मेंबर्सनी तयार केलाय, असं ‘वातावरण’ संस्थेचे संस्थापक भगवान केसभट यांनी कोलाजशी बोलताना सांगितलं.

हवा प्रदूषणाचा मुद्दा दुर्लक्षित

क्लीन एअर कलेक्टिव हे एक नेटवर्क आहे. ज्या माध्यमातून क्लीन एअर जाहिरनामा तयार केला जातो. या नेटवर्कमधे देशभरातल्या वेगवेगळ्या नागरी संस्था, एनजीओ, नागरी समूह, थिंक टॅंक्स म्हणजे संशोधन संस्था आणि भारतातल्या हवा प्रदूषणाच्या समस्येवर काम करणारे तज्ज्ञ सामील आहेत. या कलेक्टिवचे मेंबर्स देशभरात पसरलेत.

शक्य तेवढ्या लवकर भारतातल्या लोकांच्या सार्वजनिक आरोग्यावर आलेलं हे संकट दूर करू शकेल. आणि स्वच्छ हवेच्या दिशेने एक पाऊल टाकलं जाईल यासाठी प्रत्यक्ष कृती करून सुधारणा घडवणं हे या कलेक्टिवचं प्रमुख उद्दीष्ट.

महाराष्ट्रातल्या पाणी प्रश्नावर अनेक लोक काम करतायत. पण त्याइतकाच महत्वाचा असणारा हवा प्रदुषणाचा मुद्दा फार दुर्लक्षित राहतो. सध्या आपल्या आसपास असणारी हवा अतिशय प्रदूषित झाली आहे, असं भगावन केसभट म्हणाले.

हेही वाचा: `आरे, ऐका ना` हा हॅशटॅग ट्रेंड होण्यामागे अशी गडबड सुरूय

जाहिरनाम्यातही हवा प्रदूषण

कलेक्टिवच्या गेल्या दोन बैठका मुंबईत झाल्या. महाराष्ट्रात या महिन्यात निवडणुकाही होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्ष निवडणूक आल्यावर काय केलं जाईल याचे जाहिरनामे प्रसिद्ध होतील. या जाहिरनाम्यात हवा प्रदूषणाचा मुद्दा घातला जावा म्हणून काय करता येईल याची चर्चा क्लीन एअर कलेक्टिवच्या बैठकीत झाली.

हवा प्रदूषण कमी करण्याचा अजेंडा राजकीय पक्षांनी आपल्या जाहिरनाम्यात घालावा यासाठी एक शिफारस पत्र तयार करण्याचं ठरलं. या शिफारसीत राजकीय पक्ष काय काय योजना राबवतील याची एक यादीही लिहिली.

या यादीत एलपीजी गॅसचा वापर, अपारंपारिक अक्षय उर्जेच्या स्रोतांना प्राधान्य देणं, वीज वापराऐवजी सौर उर्जेचा वापर करण्यावर भर, घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ, आधुनिक आणि सुलभ सार्वजनिक वाहतुक सेवांची हमी अशा गोष्टींची मागणी केली.

तंबाखूपेक्षा प्रदुषित हवा धोकादायक

पक्षाच्या जाहिरनाम्याची आखणी करतात अशा सगळ्या नेत्यांना आम्ही हे पत्रक दिलं. त्यापैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं हवा प्रदूषणाचा मुद्दा आपल्या जाहिरनाम्यात घालू असं आश्वासन आम्हाला दिलं. तर शिवसेनेला हे पत्रक गेल्यावर आमच्या सांगण्यावरून हा मुद्दा त्यांनी त्यांच्या जाहिरनाम्यात घातला असल्याचं सांगितलं, ही माहिती केसभट यांनी दिली.

हे कॅम्पेन राज्यभरात पोचावं यासाठी ४ ऑक्टोबरला क्लीन कलेक्टिवच्या मेंबर्सने एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी, वायू प्रदूषणामुळे दगावणाऱ्यांची संख्या तंबाखू सेवनामुळे दगावणाऱ्यांच्या संख्येहून अधिक आहे. प्रदूषित हवेचे घातक परिणाम सर्वाधिक प्रमाणात लहान मुलांवर होतात. भारताच्या निरोगी भवितव्याला असलेला हा सर्वात मोठा धोका. आणि सर्व राजकीय पक्षांनी हे संकट दूर करण्यास प्राधान्य द्यावं अशी विनंती मी करतो, असं आवाहन मुंबईतल्या फ्रायडेज फॉर फ्युचर या संस्थेचे स्वयंसेवक निखिल कमलेघ यांनी केलं.

हेही वाचा: जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट

नव्या पिढीला हवं निरोगी भविष्य

या पत्रकार परिषदेत संयुक्त राष्ट्र समितीकडे बालहक्कांसाठी याचिका दाखल करणाऱ्या १६ मुलांपैकी एक असलेली रिधिमा पांडेही उपस्थित होती. ‘मी जागतिक हवामानवाढीसह भविष्यकाळाचा विचार करते, तेव्हा मला खूप निराश वाटतं. कारण, मी एका निरोगी दीर्घायुष्याची कल्पनाच करू शकत नाही. कोणालाच त्रास सहन करावा लागू नये असं मला व्यक्तीश: वाटतं. मला एक निरोगी भविष्य हवंय. स्वच्छ हवेच्या हक्काचा यात समावेश आहे. भारतातील वायू प्रदूषणाची समस्या सध्या ज्या वेगाने वाढतेय ते बघता मला खूप मोठा अडथळा दिसतोय. प्रत्येक व्यक्तीला निरोगी वातावरणात राहण्याचा हक्क आहे. आम्हा मुलांना अधिक चांगला भविष्यकाळ हवा आहे.’ असं रिधिमा या परिषदेत म्हणाली.

या मुलांना चांगला भविष्यकाळ मिळावा यासाठी क्लीन एअर कलेक्टिवचे सदस्य धोरणात्मक बदलांवर फोकस करतायत. त्यासाठी त्यांनी वापरलेला मार्ग हा इतर टिपीकल मार्गांपेक्षा वेगळाच आहे. अधल्या-मधल्या कोणात्यातरी सामान्य माणसाला धरून त्याच्याकडून हवा प्रदूषणावर काम करण्यापेक्षा सरळ सरकारी पातळीवर कोणती धोरणं राबवता येतील याचा विचार हे फोरम करतंय. यासाठी त्यांचं कौतुकच करायला हवं.

हेही वाचा: 

प्लॅस्टिकमुक्त भारताचं स्वप्न कसं शक्य होणार?

‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!

अमेझॉनचं जंगल कसं आहे? आणि तिथले आदिवासी कसे राहतात?