मार्वलच्या सुपरहिरोंना मार्टिन स्कॉर्सेसी सिनेमा का मानत नाही?

०६ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


जगप्रसिद्ध फिल्म डायरेक्टर मार्टिन स्कॉर्सेसी यांच्या एका मुलाखतीवरून सध्या चर्चेचं वादळ उठलंय. मार्वलच्या सुपरहिरो सिनेमांवर केलेल्या टिप्पणीवरून वाद सुरू आहे. ‘मार्वलच्या सुपरहिरो सिनेमांना मी सिनेमा मानत नाही,’ असं ते म्हणाले होते. स्कॉर्सेसींनी सुपरहिरो मुवीजची तुलना एखाद्या आनंदनगरीशी केलीय.

प्रसिद्ध दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसी यांनी गेल्या महिन्यात एका मुलाखतीमधे मार्वलच्या सुपरहिरो सिनेमांवर केलेल्या टिप्पणीवरून वाद सुरू आहे. ‘मार्वलच्या सुपरहिरो सिनेमांना मी सिनेमा मानत नाही,’ असं ते म्हणाले होते. त्यात भर म्हणजे स्कॉर्सेसींनी सुपरहिरो मुव्हीजची तुलना एखाद्या थिम पार्क म्हणजेच आनंदनगरीशी केलीय.

स्कॉर्सेसींच्या मताला एवढं महत्त्व का?

अतिउत्साही चाहत्यांची ओरड वगळता अनेक जाणकारांनी याविषयी आपलं प्रामाणिक आणि चर्चेत भर घालणारं मत मांडलं. सिनेमा म्हणजे तरी काय? कशाला सिनेमा म्हणायचं आणि कशाला नाही हे कशावरून ठरवणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ठरवणार कोण? अशी चर्चा सुरू झाली. स्कॉर्सेसीचं मत खोडून काढणारे लेख आले. त्यांच्या समर्थनार्थसुद्धा अनेकजण उभे राहिले.

स्कॉर्सेसी म्हणजे काही ‘जुनं ते सोनं’ मानून जुन्या काळात रमणारा दिग्दर्शक नाही. सत्तरच्या दशकापासून आजतागायत या माणसाने सिनेमाचं तंत्र आणि व्यवसायातली अनेक स्थित्यंतरं बघितलीत. आणि त्यानुसार स्वतःमधे बदल केला.

१९७३ मधे 'मीन स्ट्रीट्स' सारख्या क्राईमपटापासून ते २०११ मधे आलेल्या 'ह्युगो' सारख्या थ्री-डी तंत्रज्ञान वापरून केलेला बिग बजेट फँटसी सिनेमापर्यंत स्कॉर्सेसीने स्वतःला कायम अपडेट आणि अडॅप्ट केलंय. त्यामुळे त्याच्या टीकेकडे ‘नॉस्टेल्जिया’ म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही.

हेही वाचाः जेम्स बॉण्डच्या जन्माचा ५७ वर्षांपूर्वी हलला पाळणा

नेमकं काय म्हणाले?

एम्पायर मॅगझिनच्या इंटरव्ह्यूमधे स्कॉर्सेसी यांना मार्वल सिनेमांविषयी विचारण्यात आलं. ते म्हणाले, ‘मी काही सिनेमा पाहण्याचा प्रयत्न केला. पण तो काही मला भावला नाही. मला तो आनंदनगरीसारखा वाटला. मी आयुष्यभर सिनेमे बघतोय, ते सिनेमे तसे नव्हते. त्यामुळे मी त्यांना सिनेमा मानत नाही.’

स्कॉर्सेसींचे हे म्हणणं अनेकांना पटणार नाही. सुपरहिरो सिनेमांचं असे अवमूल्यांकन अनेकांना जरा अतिच झालं किंवा तुच्छतेतून केलेलं वाटेल. तसं अनेकांनी बोलूनसुद्धा दाखवलं. याच पार्श्वभूमीवर स्कॉर्सेसींनी न्यूयॉर्क टाईम्समधे स्वतःची बाजू मांडणारा एक लेख लिहिलाय.

ते लिहितात, 'मी ज्या काळात वाढलो, मी मोठा होत असताना जे सिनेमा पाहिले त्यांचा माझ्यावर प्रभाव आहे. त्यातूनच माझी सिनेमांची आवड निर्माण झालीय. त्यामुळे कदाचित मला आजचे स्टुडियोनिर्मित सुपरहिरो सिनेमा पाहायला आवडत नाहीत किंवा ते पाहण्याची मला उत्सुकता लागत नाही. हा माझा वैयक्तिक भाग आहे. कदाचित मी हे सिनेमा बघतच मोठा झालो असतो तर काय सांगता मलासुद्धा ते आवडले असते. पण तसं झालं नाही.'

'माझ्यासाठी सिनेमा सौंदर्य, भावनांचा साक्षात्कार होता. असा सिनेमा ज्यामधे मानवी स्वभावाची प्रत्येक छटा असणारी पात्रं होती. प्रेमळ, दयाळू, निःस्वार्थी, कठोर, निष्ठूर, दुष्ट, कपटी अशा गुंतागुंतीच्या पात्रांचा तो सिनेमा होता. पडद्यावर काही तरी नवीन पाहतोय, जे कधी अनुभवलं नाही त्याचा साक्षात्कार होतोय, असं वाटायंच. कला आणि अभिव्यक्तीचा असा पण प्रयोग असू शकतो याची ती शिकवण होती.'

सिनेमांतल्या कृत्रिमपणावर बोट

आर्ट इज सब्जेक्टिव. त्यामुळे सुपरहिरो सिनेमांचं महत्त्व किंवा त्यातील कलात्मकता याबद्दल मतमतांतरं असणं स्वभाविक आहे. कोणतीही एक बाजू योग्य आणि दुसरी चूक असं म्हणता येणार नाही. सुपरहिरो सिनेमांचं वर्चस्व हे मान्यच. ते स्कॉर्सेसीसुद्धा नाकारत नाही. पण या सिनेमांतील कृत्रिमपणावर ते बोट ठेवतात.

या सिनेमांतला तोच तोचपणा, नाविन्यतेचा अभाव, बॉक्स ऑफिसचा विचार करून घेतलेले निर्णय या सिनेमांना मनोरंजनासाठी उत्कृष्टरित्या तयार केलेली दृकश्राव्य उत्पादनं बनवतात, असं त्यांना वाटतं. त्यामुळे त्यांनी थीम पार्कचा उल्लेख केला. आनंदनगरीत जशी संपूर्ण कुटुंबाच्या मनोरंजानाची व्यवस्था असते, झगमगाट असतो, थ्रील असतो. तोच अनुभव मार्वलचे सिनेमे पाहिल्यावर येतो.

हेही वाचाः अँग्री बर्ड्स मोबाईलवरच नाही, तर मोठ्या पडद्यावरही सुपरहिट

सुपरहिरो सिनेमांतला एकसुरीपणा

स्कॉर्सेसी पुढे लिहितात, ‘हिचकॉकच्या सिनेमांवरसुद्धा एकसारखेपणाचा आरोप होतो. आणि ते एका मर्यादेपर्यंत योग्यदेखील आहे. स्वतः हिचकॉकला तसं वाटायचं. पण आजच्या सुपरहिरो सिनेमांमधील एकसुरीपणा काही वेगळ्याच उंचीवरचा आहे.'

‘सिनेमा म्हणून जे तंत्र आणि घटक लागतात ते सर्व या सिनेमांमधे आहेत. तरीसुद्धा मला तो सिनेमा नाही वाटत. कारण त्यात मला साक्षात्कार होत नाही, त्यात रहस्य नाही, त्यातील पात्रांना खराखुरा भावनिक धोकाच नसतो. वरवरचं संकट वगळता कोणतीच जोखीम त्यात नसते. हे सिनेमे काही ठराविक ठोकताळे बांधून एकाच कथासूत्राच्या थोड्याफार फरकाने काढलेल्या आवृत्त्या असतात.'

सुपरहिरो बघायचाच असेल तर काय बघणार?

‘मागणी तसा पुरवठा’ या मुद्याचा प्रतिवाद करताना स्कॉर्सेसी म्हणतात ‘अंड आधी की कोंबडी’ असा हा वाद आहे. ते लिहितात, ‘प्रेक्षकांना जर केवळ एकाच प्रकारचे सिनेमे दाखवले जाऊ लागले, त्यांना दुसरा पर्यायच उपलब्ध नसेल तर ते तेच सिनेमे बघणार ना! मोठ्या पडद्यावर केवळ बिग बजेट, गगनभेदी अ‍ॅक्शन आणि डोळे दिपवणारे स्पेशल इफेक्ट असणारेच सिनेमा बघायचे असा गैरसमज प्रचलित होतोय. म्हणून नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉनसारख्या ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला चांगले दिवस येताहेत. मलासुद्धा जसा हवा तसा सिनेमा तयार करण्यासाठी नेटफ्लिक्सचाच आधार घ्यावा लागला.'

मार्वलचे सिनेमे खरंच सिनेमा आहेत की नाही याविषयी स्कॉर्सेसी काय म्हणाले यापेक्षा सिनेमाला 'प्रोडक्ट' म्हणून ट्रीट करण्याविषयी त्यांनी जी मतं मांडलीत ती जास्त कालसुसंगत वाटतात.

प्रेक्षकांना काय बघायचंय, मार्केटमधे काय मागणी आहे, काय चालतंय काय नाही याचा 'मार्केट रिसर्च' करून अगदी तसेच सिनेमे तयार करण्याचा जो प्रकार आहे तो नक्कीच न पटणारा आहे. म्हणून तर एमसीयू फॅक्टरीमधून तयार झालेले सिनेमे एकसारखेच वाटतात.

याला काही अपवाद आहेत. पण तेसुद्धा केवळ एका मर्यादेपर्यंतच रिस्क घेतात. हा जो 'सेफगेम' आहे, तो प्रॉब्लेमेटिक आहे. नोलन, स्पीलबर्ग, ल्युकस, जेजे, कुगलर, कॅमेरून यांनी बिग बजेट, स्पेशल इफेक्ट्स आणि फँटसी यांचा कसा, किती चांगला आणि वेगवेगळा वापर करता येतो हे दाखवलंच आहे.

हेही वाचाः अमिताभलाही न कळालेला अॅवेंजर समजून घेण्यासाठीचा क्रॅश कोर्स

कलाकाराची स्वतंत्र अभिव्यक्ती धोक्यात

सिनेमाकडे एखादं उत्पादन म्हणून बघितलं जातंय. या उत्पादिकरणाविषयी चिंता व्यक्त करताना स्कॉर्सेसी म्हणतात, 'जोखीम टाळण्याची सर्वात मोठी चूक निर्माते किंवा स्टुडियो यांच्याकडून होत असते. मार्केट रिसर्च आणि प्रेक्षक चाचणीच्या आधारे तांत्रिकदृष्ट्या उत्तम सिनेमा तयार करण्याकडे सध्या कल आहे. अत्यंत हुशार आणि गुणवाण लोक एकत्र येऊन प्रेक्षकांच्या मागणीला पूर्ण करतात.’

‘मागणी आणि पूरवठ्यात आपण एक गोष्ट हरवून बसलोय. ती म्हणजे कलाकाराची स्वतंत्र अभिव्यक्ती. सिनेमा ही कला एका व्यक्तीच्या अभिव्यक्तीचा भाग न राहता बाजारपेठेसाठी उत्पादन तयार करणाऱ्या फॅक्टरी होत चाललीय. पूर्वीदेखील स्टुडियो आणि दिग्दर्शकांमधे तणाव होताच. पण त्या तणावातूनच अनेक उत्तमोत्तम सिनेमे बनले. आज तो तणाव संपुष्टात आलाय. आता केवळ व्यवसायावर सिनेमांचं भवितव्य अवलंबून आहे. मनोरंजनाची दृकश्राव्य उत्पादनं आणि खरेखुरे सिनेमा असे दोन भाग सध्या बनलेत. त्यांच्यामधील रेषा अधुनमधून पुसली जाते पण तसं क्वचितच घडतं.'

डिस्ने स्टुडियोजचं वाढतं प्रस्थ

दुसरा मुद्दा म्हणजे डिस्ने स्टुडियोजचं वाढतं प्रस्थ. डिस्ने ज्याप्रकारे एक एक करीत फिल्म प्रॉपर्टीज स्वतःच्या अधिपत्याखाली घेतेय. त्यातून त्यांची एकाधिकारशाही तयार होतेय. मार्वल, स्टार वॉर्स, पिक्सार अ‍ॅनिमेशन, अवतार असे अत्यंत लोकप्रिय ब्रँड एकट्या डिस्नेकडे आहेत. त्याशिवाय जवळपास १०० वर्षांची लायब्ररी ती वेगळीच.

आता तर डिस्नेचा स्वतःचा 'डिस्ने प्लस' हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आलाय. त्यामुळे प्रेक्षकांना सगळीकडून एकाच स्टुडियोचे 'प्रोडक्ट' मिळताहेत. त्यामुळे डिस्ने स्डुडियो कमी आणि फॅक्टरी जास्त वाटतोय. सध्या चालू वर्षात डिस्नेच्या पाच सिनेमांनी १ बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केलीय.

पहिल्या नऊ महिन्यांच्या अमेरिकेतील बॉक्स ऑफिसमधे डिस्नेचा वाटा ४० टक्के आहे. यावरून लक्षात येईल की, या कंपनीची ताकद किती वाढलीय. अशा व्यवस्थेत स्वतंत्र अभिव्यक्तीचा आविष्कार दबून टाकला जातोय. कलाकारांना मार्केट डिमांडनुसार काम करावं लागतंय. आणि नेमकी हीच भीती स्कॉर्सेसींने व्यक्त केलीय.

'पर्सलनाईज्ड एक्सपेरिअन्स'वर जोर

आजकाल सगळ्यांचाच 'पर्सलनाईज्ड एक्सपेरिअन्स'वर जोर आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आपली आवडनिवड काय याचा अंदाज बांधून 'सजेशन'च्या नावाखाली एकाच प्रकारचे विडियो, गाणे युट्यूबवर दिसू लागतात. आपण आधी पाहिलेल्या सिनेमांवरून नेटफ्लिक्स मला त्याच प्रकारचे सिनेमे रेकमेंड करणार. एका ठराविक चौकटीत बांधण्याचं हे काम आहे.

प्रेक्षकांचा विचार न करता फिल्ममेकरला जे सांगायचंय ते मांडता येणं, तो ओरिजनल एक्सपेरियन्स कलेला जिवंत ठेवतो. इंटरनॅशनल फिल्ममेकर्स आणि अमेरिकेतील काही सन्मानीय अपवाद सोडले तर हा ओरिजनल एक्सपेरियन्स हॉलिवूडमधून लुप्त होतोय. काही निवडक सुपरहिरो सिनेमा आणि नेटफ्लिक्सचे नाव समोर करून हा मुद्दा खोडता येणार नाही. सिनेमा म्हणजे प्रोडक्ट नाही आणि प्रेक्षक म्हणजे ग्राहक नाही.

शेवटी थोड्या निराशावादी सुरात ते म्हणतात, 'नव्या फिल्ममेकर्ससाठी ही नक्कीच चांगली वेळ नाही. आणि हे लिहिताना माझं मन सुन्न झालंय.'

हेही वाचाः 

झाशीची राणी आता हॉलिवूडही गाजवणार

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट? 

बूक माय शो: ऑनलाईन तिकीट बुकिंगमधला असली किंग

कॅन म्हणजे आपल्या कान्स फेस्टिवलच्या ए टू झेड प्रश्नांची उत्तरं

सुपरहिरो खूप आहेत, पण ओबामांनाही आवडतो केवळ स्पायडर मॅनच!