देव कुठाय? याचं उत्तर ज्ञानोबा-तुकोबांनी कधीच देऊन ठेवलंय!

२४ जून २०२३

वाचन वेळ : ७ मिनिटं


आज देवाधर्माच्या दुकानदारांनी केलेल्या फसव्या मार्केटिंगला आपण बळी पडतो आहोत. या सगळ्या पिळवणुकीच्या, अन्यायाच्या मुळाशी हे आध्यात्माच्या नावानं रचलेलं षडयंत्र आहे. पण आमच्या विठ्ठलाकडे सोवळं ओवळं नाही. ज्ञानेश्वर माऊली तर प्रत्येक वारकऱ्याला हरिपाठात रोज म्हणायला लावतात, `योग याग विधी, येणे नोहे सिद्धी, वायाचि उपाधि दंभधर्म`. अशा या देवाचा घेतलेला हा शोध.

संतश्रेष्ठ सावता माळी म्हणजे आमच्या सावतोबांची एक म्हसोबाची कथा आहे. ती त्यांच्या चरित्राच्या पोथीत सापडले. पडद्यावरच्या सिनेमातही सापडले. संतांचा देव शोधायचा म्हटला की ही कथा आठवावी लागते, सावतोबांसाठी राबणं हे जगणं होतं आणि काम हाच राम. काळ्या आईची मशागत, ही काळ्या विठुरायाची पूजा. त्यांनी नव्याने विकत घेतलेल्या मळ्यात म्हसोबाची पूजा व्हायची. तिथे कोंबड्या बकर्‍या कापले जायचे. देवाच्या नावानं धुडगूस चालायचा. 

म्हसोबामुळं मळा उजाड होता. तो मळा सावतोबांनी कसायला घेतला. तेव्हा मळ्याच्या मधोमध असलेला म्हसोबा उखडून टाकला. शेतातल्या कोपऱ्यात भिरकावून दिला. सावतोबांच्या पहारीच्या एका फटक्यानं म्हसोबाचं देवपण संपलं. देवाचा बाजार थांबला. त्यामुळं सावतोबांवर आतापर्यंत कोपलेला खरोखरचा देव पावणार होता. कारण त्यांचा उजाड मळा फुलणार होता. कांदा, मुळा, भाजीत विठाई बहरणार होती. लसूण, मिरची, कोथिंबिरीत हरी डोलणार होता. 

कामावरचा फोकस ढळू नये, म्हणून देवाचं नाव

ही किमान साडेसातशे वर्ष तरी जुनी गोष्ट आहे. विशीतिशीतला एखाद्या शेतकर्‍यांनं असं करणं आजही अवघड. पण सावतोबा ते सहज करून गेले. देव म्हणजे काय, याविषयी जबदरस्त स्पष्टता असल्याशिवाय ते निव्वळ अशक्य आहे. देव मिळवण्याचा एक रस्ता सावतोबांना पक्का माहीत होता. तो त्यांनी लिहूनही ठेवलाय, ‘स्वकर्मात व्हावे रत. मोक्ष मिळे हातोहात.’ आपण आपल्या कामात रमायचं. 

देव मिळणारच. कुठं फोकस ढळू नये, म्हणून देवाचं नाव घेत राहायचं. याच रस्त्यानं जाऊन सावतोबांना देव कडकडून भेटला होता. त्यांना लख्ख कळलं होतं, देव सोपा आहे. भक्ती सोपी आहे. धर्म सोपा आहे. देवासाठी काम सोडून जपाची तपाची गरज नाही. कर्मकांडाची गरज तर नाहीच नाही. 

देवाधर्माच्या दुकानदारांनी केलेल्या फसव्या मार्केटिंगला आपण बळी पडतो आहोत. सगळ्या पिळवणुकीच्या, अन्यायाच्या मुळाशी हे आध्यात्माच्या नावानं रचलेलं षडयंत्र आहे. त्यांची पोटं भरावीत म्हणून आमच्या पिंडात लाचारी भिनवली जाते. म्हणून या धर्माच्या भामट्यांना उखडायलाच हवं. म्हसोबासारखं. तो म्हसोबा आजही सावतोबांच्या गावात अरणमधे देवळात एका कोपऱ्यात पडून आहे आणि त्यांचं तत्त्वज्ञानाचं गाणं बनून त्यांचे अभंग झाले आहेत. 

कोपतो, तो देवच कसा असू शकेल?

ही आमच्या सावतोबांच्या देवाची गोष्ट. सोवतोबांसारखीच बंडखोरी प्रत्येक संताच्या आयुष्यात आम्हाला दरवर्षी सापडत राहते. पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या साध्या माणसाचं शोषण करणाऱ्या रूढी परंपरांना त्यांनी आव्हान दिलं. स्वतःच्या नैतिकतेचं बळ वापरून नवी जनरीत घालून दिली. साध्या माणसाचं जगणं सोपं केलं. रूढ धर्मांच्या पलीकडचा माणुसकीचा धर्म सांगितला. ज्याच्याशी गप्पा मारता येतात असा मित्र बनू शकणारा देव सांगितला. 

नव्हे जाखाई जोखाई । मायराणी मेसाबाई ।। 
बळिया माझा पंढरीराव । जो ह्या देवांचाही देव ।। 

हा अभंग संत तुकोबारायांचा असला तरी सावतोबांनी म्हसोबाला उखडून टाकण्याच्या कथेचं तात्पर्य म्हणून सांगता येऊ शकणारा आहे. सर्वच संतांना अशी प्रसाद मागणारी, बळी मागणारी, भुताखेतांसारखी शेंदरात लडबडलेली दैवतं मान्य नव्हतीच. स्वतःचं पोट भरलं नाही म्हणून कोपणारा देवच कसा असू शकेल, असा त्यांचा सवाल होता. 

कर्मकांडांच्या ढोंगावर प्रहार करणारे संत

इथपर्यंत ठीक होतं. पण संतांनी वेदांमध्ये वर्णन केलेल्या `अग्निइंद्रसूर्यसोमाये` या देवतांची पूजा निरर्थक ठरवली. ज्ञानेश्वरीत माऊलींनीच तसं सांगून ठेवलंय. कारण त्यांना यज्ञातून मिळणारं पुण्यही नको आहे. त्याला ते पुण्यरूप पाप म्हणतात. यज्ञातून मिळवलेल्या स्वर्ग नरकाला चोरांच्या वाटा म्हणतात. यज्ञातून मिळणाऱ्या पापाला एक्स्पायरी डेट असते. 

स्वर्गातली सुखं भोगल्यावर पुण्य क्षीण होत जातं आणि मग स्वर्गातून हकालपट्टी होते. माऊली सांगतात, हे तर असं होतं की खिशातले पैसे संपल्यावर वेश्या हाकलून देते.
जैसा वेश्याभोगी कवडा वचे । मग दारही चेपूं न ये तियेचे । 
तैसे लाजिरवाणें दीक्षितांचे । काय सांगो ।। 

म्हणूनच तर माऊली प्रत्येक वारकऱ्याला हरिपाठात रोज म्हणायला लावतात, `योग याग विधी, येणे नोहे सिद्धी. वायाचि उपाधि दंभधर्म.` योग, यज्ञ आणि कर्मकांड यातून देव काही भेटणार नाही. फक्त विनाकारण ढोंग उरेल, असं माऊलींनी ठणकावून सांगितलं आहे. या ढोंगावर प्रत्येक संताने प्रहार केला आहे. 

देव भेटण्यासाठी देवळात जावंच लागत असं नाही

आमच्या विठ्ठलाकडे सोवळं ओवळं नाही. कुणीही जाऊन त्याच्या पायावर डोकं ठेवू शकतं. दोनशे वर्षांपूर्वी तर विठ्ठलाला आलिंगन देता यायचं, असं दाखले आहेत. धूळभेट नावाचा एक प्रकार आताआतापर्यंत रूढ होता. बाहेरगावाहून वारीसाठी पंढरपुरात आलं की हातपायही न धुता विठ्ठलाची धूळभेट घेऊन यायची. 

खरंतर वारीच्या काळात शेकडो किलोमीटर चालून आलेल्या पालखी सोहळ्यातल्या लाखो भक्तांनाही विठ्ठलाचं दर्शन घेता येत नाही. ते फक्त कळसाचं दर्शन घेतात, चंद्रभागेत आंघोळ करतात आणि पंढरपुराला प्रदक्षिणा घालतात. त्यात त्यांचं दर्शन होऊन जातं. वारीसाठी चालत असतानाच त्यांना नाचताना, गाताना, खेळताना देव भेटलेला असतो. वेगळ्या दर्शनाची गरजच उरत नाही. 

आमचा विठोबा इतका सोपा आहे. एकतर त्याच्या हातात कोणतंही शस्त्र नाही. माणसासारखे दोनच हात आहेत. तेही शांतपणे कमरेवर ठेवलेले. कुठलं सिंहासन नाही की वाहन नाही. तो साध्या विटेवर उभा आहे. तो कोणावर कोपत नाही. त्याची कुणाला भीती वाटत नाही. तो कुणाच्या नवसाने पावतो. तो फक्त प्रेम मागतो. तो प्रेमाचा भुकेला आहे. भक्तीचा भुकेला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी सांगतात तसं, 

सोन्यारूप्यात मढला मारवाड्याचा बालाजी 
शेतकऱ्याचा विठोबा पानाफुलामधी राजी 

माणसाला देव बनवणारी संतांची किमया

आमचा विठोबा सगळ्यांचा मित्र आहे. सखा आहे. आई वडील भाऊ चुलता आहे. अगदी खास नात्यागोत्यातला आहे. संतांच्या कथांनीच त्याला घडवलं आहे. पुराणांतल्या कथांनी रामकृष्णांसारख्या माणसांना देव बनवलं आणि आमच्या संतांनी विठ्ठल नावाच्या देवाला माणूसपण दिलं. 

तो संतांसोबत नाचतो गातो, रडतो हसतो, रूसतो फुगतो. संत त्याला डोक्यावर घेऊन नाचतात आणि शिव्याही देतात. संत जनाबाई माऊली सांगतात ना, `देव खाते, देव पिते, देवावरी मी निजते`. हे देवाचं माणूसपण अद्भूत आहे. तो सगळ्या संतांची हलकीसलकी कामं करतो. तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंगच आहे, उंच निंच कांहीं नेणे भगवंत। तिष्ठे भाव भक्त देखोनियां।।

देव काय करत नाही ते सांगा?

तुकोबारायांनी आपली सगळी वैचारिक परंपराच या अभंगांच्या तेरा चरणांमध्ये सांगितली आहे. भगवंताला उच्च नीच असे कोणतेही भेद मान्यच नाही आणि तो फक्त मनीची भावभक्ती बघतो, असा सिद्धांत मांडून तो सिद्ध करण्यासाठी विविध जातीच्या संतांची उदाहरणं दिली आहेत. आमच्या विठूरायाने काय काय केलं, याची यादीच तुकोबारायांनी दिली आहे. 

तो नामदेवरायांबरोबर निःसंकोच जेवला. ज्ञानदेवांसाठी त्याने निर्जीव भिंत चालवली. सावतोबा माळींसोबत शेती केली. गोरोबा कुंभारांसोबत मडकी बनवली. नरहरी सोनारांसोबत दागिने घडवले. कबीरांसोबत शेले विणले. मीराबाईंसाठी विष प्याला. यंकोबा म्हणजे एकनाथरायांचे विठ्ठलावर इतके उपकार होते की त्याने त्याच्याकडे घरगड्याचं काम केलं. दामाजीपंतांसाठी तो विठू महार बनला. 

त्याने जनाबाईंसाठी बायकी मानली जाणारी कामंही केली. अगदी शेणीही थापल्या. त्याच्याही पुढे जाऊन त्याने चोखोबारायांबरोबर मेलेली गुरंही ओढण्याचं जातव्यवस्थेने दलितांवर लादलेलं कामही केलं. तिथे न थांबता संत रोहिदासांबरोबर चपला बनवण्यासाठी चामडं कमावण्याचं तिरस्कृत मानलं गेलेलं काम केलं. हे सगळं ठीक होतं, पण आमच्या सावळ्या विठूरायाने सजन कसाई यांना मांस विकण्यातही मदत केली. ही सगळी छोटी मानली गेलेली कामं करण्यात विठ्ठलाचं मोठेपण होतं, असं तुकोबाराय सांगतात. 

संतांनी निवडलेल्या शब्दांचे थोरपण

तुकोबाराय इथे सगळ्या गृहितकांना धुडकावून लावतात. एका शाकाहाराचा आग्रह करणाऱ्या संप्रदायाला कळसस्थानी असणारे तुकोबाराय त्याचं आराध्यदैवत विठ्ठल मांस विकत असण्यात मोठेपण मानतात, हे विशेष. मांसाहाराला नाक मुरडण्यात आणि मांस विकणाऱ्यांना मारण्यात, हटवण्यात धर्म आहे, असं मानणाऱ्यांना आहाराच्या पुढचं अध्यात्म इथे सांगितलेलं आहे. त्यात सहिष्णुता आणि परस्पर आदरपूर्वक सहजीवनाचं महत्त्व आहे. 

इतर सगळ्या भाज्या सोडून कांदा लसणीत विठाई असल्याचं सावतोबांनी सांगितलं, तरी आपण अजून त्याला नाकारण्यात प्रतिष्ठा मानत आहोत. मुळात प्रतिष्ठा उच्चवर्णीयांच्या कामांनाच ही परंपरा फारसं महत्त्व देत नाही. इथे सेवेला महत्त्व आहे. सेवा ही वर्णव्यवस्थेने शूद्रांना सोपवलेलं काम आहे. तुकोबारायांनी मोजून दाखवलेली कामं सगळी एकजात शूद्रांची आहेत. 

बहुजनांच्या कामाला थोरपणा देऊन समाजव्यवस्थेचा पिरॅमिड उलटा करण्याचं काम संतपरंपरेने केलं. संतांच्या विठ्ठलाने केलं. ते महत्त्वाचं आहे. संतांना आपापल्या कामातच देव सापडला होता. `कर्मे इशू भजावा` हे संतांच्या जगण्याचं तत्त्वज्ञान आहे. देवापेक्षा काम महत्त्वाचं आहे, हे सांगणारे पुंडलिकराय आमचे आदर्श आहेत. एकदा कामात देव सापडला की मग सगळंच सोपं होत जातं. सगळं देव होऊन जातं.

देव सोपा आहे,  तो अवघड का करता?

`मीच माझा देव मीच माझा भक्त।` ही जाणीव संतांच्या तत्त्वज्ञानाने घडवली आहे.  जगी जगदीश आहे आणि विश्वी विश्वंभर भरला आहे, हे ते संतांचं तत्त्वज्ञान आहे. ब्रह्म हेच सत्य आहे जग हे मिथ्या आहे, अशी पारंपरिक घडण होती. त्याला ज्ञानेश्वर माऊलींनी सुरुंग लावला. 

जग हे देवाचाच विलास आहे. तोच सर्वत्र आहे. तो प्रत्येक जीवात तर आहेच पण चराचरातही आहे. हे माऊलींनी सांगताना समतेचा पाया रचला. या चिद्विलासवादामुळे कुणी श्रेष्ठकनिष्ठ उरलं नाही. सगळे समान झाले. मग रेड्यानेही वेद म्हटले आणि दगडमातीची भिंतही चालली. कुणी परकं उरलंच नाही. कारण इथे मीतूपणा मुळातूनच गळून पडला. 

वेगळ्या गुरूचीही गरज उरली नाही, `आपणची देव होय गुरू` हीच गुरुत्वाची शिकवण उभी राहिली. कोणताही मध्यस्थच उरला नाही. देव सोपा आहे, हे संतांनी सांगितलं. त्यामुळे सगळं सोपं झालं. देव कुठे शोधायचा, याचं सूत्र तुकोबारायांच्या अभंगात अवतरलं,  

जें कां रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुलें।। 
तो चि साधु ओळखावा। देव तेथें चि जाणावा।।