नुकत्याच झालेल्या इंडिया वि. साऊथ आफ्रिकेच्या मॅचनंतर फक्त एकाच विषयावर चर्चा सुरु आहे. धोनीचं बलिदान बॅज. याऐवजी आपण आपल्या टीमच्या परफॉर्मन्सवर चर्चा करायला हवी का? हा बलिदान बॅज आपल्या भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. धोनीनेही हा बॅज चांगल्या भावनेने लावला असेल. पण नियम मोठा की अभिमान? आणि खरंच मुद्दा खेळापेक्षा मोठा आहे का? यामुळे आपल्या खेळाडूंच्या खेळावर काही परिणाम होईल का? महत्त्वाचं म्हणजे आपली टीम इंडिया आणि धोनी युद्धावर गेलेत की वर्ल्डकपसाठी?
वर्ल्डकपमधली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मॅच टीम इंडियाने सहज जिंकली. आणि आपल्या वर्ल्डकप विजयाच्या मिशनचं पहिलंच पाउल धडाक्यात टाकलं. खर तर या विजयानंतर चर्चा व्हायला हवी होती ती, फॉर्मात परतलेल्या रोहित शर्माची, आफ्रिकेच्या जवळपास अख्खा टीमला खाऊन टाकणाऱ्या युजवेंद्र चहलची आणि भारतीय विजयाचा पाया रचणाऱ्या बूम बूम बुमराहची. पण दुर्दैव असं की, सध्या सगळे धोनीच्या ‘बलिदान’ ग्लव्जबद्दल्या अनावश्यक चर्चेत बिझी आहेत.
धोनी आपल्या ग्लव्जवर वापरत असलेल्या बलिदान बॅजच्या वापरावर आयसीसीने आक्षेप घेतला, त्यानंतर देशभरातून या मुद्द्यावर संताप व्यक्त करण्यात आला. आयसीसीच्या आक्षेपानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींनी सोशल मिडियावरून आयसीसीला ट्रोल करायला सुरवात केली. ट्विटर तसंच फेसबुकवरून हॅशटॅग ‘धोनी किप द ग्लव्ज’ हा टॅग ट्रेंड करत क्रिकेटप्रेमी धोनीच्या समर्थनात उतरले. टीम इंडियाने वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याची मागणीही जोर धरायला लागली.
क्रीडामंत्री किरेन रीजुजू यांनी देखील हे प्रकरण बीसीसीआयने योग्य पद्धतीने हाताळावं, अशी प्रतिक्रिया देत या वादात उडी मारली. इलेक्ट्रॉनिक मीडिया नेहमी मसाल्याच्या शोधात असतो तो मसाला या बातमीत ठासून ठासून भरलेलाय. ग्लोरिफाय करायला भारतीय सैन्य होतं, क्रिकेट होतं, राष्ट्रवाद होता आणि बहुतेकांचा लाडका धोनी होता.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे खलनायक म्हणून आयसीसी होतं. मग आयसीसीला प्रो पाकिस्तानी ठरवण्यात कुणाचा फारसा काही तोटा नव्हता. सुरवातीला बीसीसीआय या मुद्द्यावर आक्रमक दिसत होतं. नंतर मात्र या प्रकरणात भारताकडून चूक झाल्याचं लक्षात आल्यावर मवाळ झालं आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमधे धोनीला ग्लव्ज वापराण्याची परवानगी आयसीसीने द्यावी, अशी विनंती बीसीसीआयने केली.
अर्थात नियमांचा भंग होत असल्याने आयसीसीने बीसीसीआयची ही विनंती धुडकावून लावली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमधे धोनीला आपल्या ग्लव्जवरचं बलिदान बॅज हटवावा लागणार हे जवळपास निश्चित झालंय.
आयसीसीच्या नियमानुसार ग्लव्जवर फक्त ते बनवणाऱ्या कंपनीचा लोगो लावण्याची परवानगी दिली आहे. शिवाय जर प्लेअर्सच्या जर्सीमधे किंवा त्यावरील लोगोमधे काही बदल करायचा असल्यास आयसीसीकडून त्याची पूर्वपरवानगी घेणं गरजेचं असतं.
आयसीसीच्या परवानगीनेच अशाप्रकारचा कुठलाही बदल प्रत्यक्षात आणला जाऊ शकतो. धोनीच्या ग्लव्ह्जच्या संदर्भात या प्रक्रियेचं पालन झालं नाही आणि त्यावरून पुढे जे काही महाभारत घडलं ते आपल्यासमोर आहेच.
सध्या देशात ‘राष्ट्रवाद’ हा कुठल्याही गोष्टीच्या मार्केटिंगसाठीचा युनिक सेलिंग पॉइंट आहे. प्रकरण कुठलंही असो ते राष्ट्रवादाशी आणि भारतीय सैन्याशी जोडलं की जनमत आपल्या बाजूनेच मिळणार. अशी पक्की धारणा सध्या देशाच्या सोशोपोलिटिकल डिबेट कल्चरमधे दिसतेय. धोनीच्या प्रकरणात आपली बाजू लाऊन धरण्यासाठी आणि आयसीसीला ट्रोल करण्यासाठी भारतीय क्रिकेटप्रेमींनी याच मुद्द्याचा आधार घेतला.
विवेकाशी फारकत घेतलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने देखील या प्रकरणात भारतीय सैन्याचा अपमान झाला असल्याचं नरेटीव्ह तयार करून डिबेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण भलं होवो इलेक्ट्रॉनिक मीडियावर क्रिकेट एक्स्पर्ट म्हणून फिरणाऱ्या सुनील गावस्करांसारख्या आणि इतरही वरिष्ठ क्रिकेटपटुंच्या आवाजांचं ज्यांनी स्पष्टपणे सांगितलं की,
धोनी कुठला ग्लव्ह्ज घालतो आणि त्याच्यावर कुठलं चिन्ह आहे, याच्यावर आपण वाद-विवाद करण्याचं काहीही कारण नाही. तो जोपर्यंत चांगल्या कॅचेस पकडतोय, चांगले स्टंपिंग करतोय आणि चांगले रन्स काढतोय तोपार्यंत तो भारतीय क्रिकेटच्या भल्याचं काम करतोय. आपण अनावश्यक विवादांवर चर्चा न करता टीम इंडियाच्या परफॉर्मन्सवर अधिक बोलायला हवं
आता आपण आयसीसीच्या आक्षेपावर थोडं लक्ष देऊयात. खरं तर आयसीसीचा आक्षेप धोनी वापरत असलेल्या ‘इंडियन पॅरा फोर्सेज’चं प्रतिक असलेल्या बलिदान बॅजच्या वापरावर आहे, असं म्हणणं तितकंसं बरोबर नाही. आयसीसीचा आक्षेप प्रामुख्याने आयसीसीच्या परवानगी शिवाय हा बॅज वापरण्यावर आहे.
हा बॅज वापरताना आयसीसीच्या नियमांचा भंग झालाय यावर आहे. त्यामुळे बलिदान बॅज ऐवजी दुसरा कुठला बॅज असता तरी आयसीसीने त्यावर आक्षेप घेतला असताच, हे इथं वेगळं सांगायला नकोच. मग आयसीसीच्या परवानगी नाकारण्याने भारतीय सेनेचा अपमान कसा होतो?
टीम इंडिया आणि महेंद्र सिंग धोनी इंग्लंडमधे देशासाठी वर्ल्डकप जिंकण्यासाठी गेलेत, युद्धावर गेलेले नाहीत, या गोष्टीचं क्रिकेटप्रेमी म्हणून आपण भान ठेवायला हवं. हे भान ठेवायला आपण शिकलो की मग नियमांचं पालन करणाऱ्या आयसीसीच्या नियमांचा आणि भारतीय सैन्याच्या अपमानाचा अर्थार्थी संबंध नाही, तसंच भारत-पाकिस्तान यांच्यातली मॅच ही देखील क्रिकेटची मॅच असते, काही धर्मयुद्ध नसतं हे अगदी सहजपणे लक्षात येऊ शकतं.
खेळाचं म्हणून एक मानसशास्त्र असतं आणि क्रिकेट हा देखील मैदानावर खेळला जाणारा एक माइंड गेम आहे. त्यामुळे खेळाडूंच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटनांचा चांगला आणि वाईट परिणाम नाही म्हंटल त्यांच्या परफॉर्मन्सवर होतोच होतो. उद्या वर्ल्डकपमधे भारताची महत्त्वाची ऑस्ट्रेलियाच्या विरोधातली मॅच आहे.
या सामन्यात टीम इंडियाच्या कामगिरीवर या संपूर्ण प्रकरणाचा विपरीत परिणाम तर होणार नाही, ना अशीही एक चिंता या प्रकरणाच्या निमित्ताने निर्माण झालीये. सध्या तरी असं काही होऊ नये आणि वर्ल्डकपमधलं भारताचं विजयी अभियान अखंडितपणे सुरु राहो, अशी आशा करायला काहीच हरकत नाही.