पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय?

०२ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


४० वर्षांपूर्वी पाकिस्तानी हुकुमशहाला आव्हान देणारी ‘हम देखेंगे’ ही नज्म नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी आंदोलनाचं प्रोटेस्ट सॉन्ग बनलीय. या प्रोटेस्ट सॉन्गवर ‘हिंदूविरोधी’ असल्याचा आरोप झालाय. विद्यार्थ्यांच्या ओठांवर खेळणारी, सत्ताधीशांना घाबरवणारी फैज अहमद फैज यांची ही नज्म आणि तिच्याभोवतीचे तिच्याइतकेच इन्कलाबी किस्से बयान करणारा हा लेख.

'वो बात सारे फसाने में जिसका जिक्र न था
वो बात उनको बहुत ना-गवार गुजरी है'

एकाचवेळी 'रोमॅन्टिसिजम आणि रिवोल्यूशन'साठी ओळखले जाणारे शायर जनाब फैज अहमद फैज यांच्या या ओळी ऐंशीच्या दशकातल्या. जनरल झिया-उल-हक या पाकिस्तानी हुकुमशहाने फैज साहेबांना तुरुंगात डांबल्यानंतरची त्यांची ‘आपबीती’ कथन करणाऱ्या.

आणि आता आज जवळपास चार दशकांनंतर फैज साहेबांच्या ‘हम देखेंगे' या क्रांतिकारी नज्मवरून जो काही बिनडोकपणा भारतात सुरू आहे त्याचंही थोडक्यात वर्णन करण्यासाठी याच दोन ओळी पुरेशा.

हेही वाचाः तरुणांनो, आपण आईवडलांना वॉट्सअप युनिवर्सिटीतून बाहेर काढू शकतो?

सीएएविरोधी आंदोलनाचं पॉलिटिकल स्टेटमेंट

देशभरात विद्यार्थी 'नागरिकत्व दुरुस्ती कायद्या'विरोधात आंदोलन करताहेत. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं. दुसरीकडे हे आंदोलन मोडून काढण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करण्यात येताहेत. शांततापूर्ण पद्धतीने निषेध नोंदवत असलेल्या विद्यार्थ्यावर पोलिसांकडून अमानुष अत्याचार होताहेत.

देशातल्या अनेक राज्यांमधे आंदोलनं शांततेत पार पडत असताना भाजपशासित राज्यांमधे मात्र आंदोलक विद्यार्थ्यांना सरकारच्या रोषाला बळी पडावं लागतंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर 'बदला घेण्याची' भाषा केलीय. आणि तिच्याशी आपली एकवाक्यता दाखवणारीच कृतीही ते करताहेत. मात्र निषेधाचा हा आवाज दाबण्याचा प्रयत्न जितका अधिक होतोय, तितकंच विद्यार्थ्यांचं आंदोलन अधिक व्यापक होत चाललंय.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप यांच्यानिमित्ताने सरकारकडून देशाच्या संविधानावरच हल्ला करण्याचा प्रयत्न होतोय, तो सहन केला जाणार नाही, असं जणू 'पॉलिटिकल स्टेटमेंट'च रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी करत आहेत.

पाकिस्तानी हुकुमशहाला दिलं आव्हान

धुमसत्या वातावरणात पाकिस्तानी हुकुमशहाविरुद्ध आवाज बुलंद करणारे शायर म्हणून फैज अहमद फैज यांची ओळख आहे. राष्ट्रीयत्वासह काळाचाही उंबरा ओलांडून हा कवी भारतातल्या रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनादेखील क्रांतीच्या मशाली उंचावण्याची जिगर देतोय.

फैज साहेबांनी १९७९ मधे म्हणजेच तब्बल ४० वर्षांपूर्वी जनरल जिया-उल-हकच्या हुकुमशाहीविरोधात लिहलेली आणि विरोधाचा बुलंद आवाज म्हणून सुप्रसिद्ध असलेली क्रांतिकारी नज्म ‘हम देखेंगे, लाजिम है के हम भी देखेंगे' भारतातल्या आंदोलक विद्यार्थ्यांमधे प्रचंड पॉप्युलर होऊ लागलीय. 'सब तख्त गिराए जाऐंगे, सब ताज उछाले जाऐंगे' असा इशारा देणारी ही नज्म एक 'प्रोटेस्ट साँग' बनून अवतरलीय. नेमकी हीच गोष्ट सत्ताधाऱ्यांच्या नजरेत खुपतेय. त्यामुळे ही नज्मच ‘हिंदूविरोधी’ ठरवण्याचा घाट घातला जातोय.

हेही वाचाः लोकसभा सदस्यांची संख्या वाढवून प्रतिनिधित्व मिळणार की वाद होणार?

नेमकं काय घडलंय?

दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवरच्या पोलिसी अत्याचारांच्या कहाण्या समोर आल्या. त्यानंतर देशभरातून या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ अनेक उत्स्फूर्त आवाज उभे राहिले. ओसंडणारे मोर्चे काढले गेले. जामियातल्या विद्यार्थ्यांविषयी सहानुभूती व्यक्त करण्यासाठी असाच एक मोर्चा 'कानपूर आयआयटी'मधेही विद्यार्थ्यांनी काढला. या मोर्चापूर्वी तिथे आंदोलक विद्यार्थ्यांनी फैज साहेबांची ‘हम देखेंगे, लाजिम है के हम भी देखेंगे’ ही नज्म गायली.

खरं तर आंदोलक विद्यार्थ्यांनी या क्रांतीगीताचं गायन करण्यात गैर काहीही नव्हतं. पण वशी मंत शर्मा या कानपूर आयआयटीमधल्याच प्राध्यापक महोदयांना ‘हम देखेंगे’ ही नज्म ‘हिंदूविरोधी’ आणि म्हणून धार्मिक तेढ निर्माण करणारी असल्याचा साक्षात्कार झाला. त्यांनी लगेच ही नज्म गाणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात तक्रार नोंदवली.

विशेष म्हणजे कानपूर आयआयटीच्या प्रशासनानेदेखील बिनडोकपणाचा कळस करताना अतिशय तत्परतेने या तक्रारीची दखल घेतली. 'उच्चस्तरीय समिती'कडून प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय. आता ही 'उच्चस्तरीय समिती' ठरवणार आहे की फैज साहेबांची नज्म ‘हिंदूविरोधी’ आहे की नाही?

नज्म खरंच हिंदूविरोधी आहे?

'निसार मै तेरी गलियों के ऐ वतन के जहां 
चली है रस्म के कोई न सर उठाके चले'

फैज साहेबांची आणखी एक नज्म देशभक्तीच्या वर्खाखाली दडलेल्या हुकूमशाहीला अत्यंत उपरोधानं फटकारते. वर दिलेल्या दोन ओळी कवितेच्या सुरवातीच्या आहेत. ‘हम देखेंगे’ या क्रांतिगीताचा हिंदूंशी, हिंदू धर्माशी दूरदूरपर्यंत कसलाही संबंध नाही. फक्त हिंदू धर्माशीच नाही, तर या नज्मचा अगदी इस्लामशीदेखील काहीएक संबंध नाही. ‘हम देखेंगे’ ही क्रांतिकारी नज्म आहे, जी गेल्या चार दशकांपासून दडपशाही आणि दमनाविरोधातल्या आवाजाला लढण्याची प्रेरणा देत आलीय.

‘जब अर्जे खुदा के काबे से
सब बुत उठवाए जाएंगे,
हम अहले सफा मरदूदे हरम
मसनद पे बिठाए जाएंगे
सब ताज उछाले जाएंगे,
सब तख्त गिराये जाएंगे 
बस नाम रहेगा अल्लाह का,
जो गायब भी है, हाजिर भी’

संपूर्ण गीतामधल्या ‘सब बुत उठवाए जाएंगे’ आणि ‘बस नाम रहेगा अल्लाह का’ या ओळींवर आक्षेप घेण्यात आलाय. नज्ममधे ‘बुत’ आणि ‘अल्लाह’ ही दोन रूपकं वापरण्यात आलीत. ‘बुत’ म्हणजे शासक, सत्ताधारी आणि ‘अल्लाह’ म्हणजे जनता अशा अर्थाने हे शब्द या नज्ममधे येतात.

‘देवभूमीवरच्या क्रूर शासकांचं सिंहासन खाली करून शोषितांचं आणि सामान्यांचं राज्य येताना आम्ही बघू’ असा साधारणतः या ओळींचा मतितार्थ. यावरून तरी इथे कुठल्याही धर्माचा कसलाही संबंध नाही, हे कुठल्याही थोडीबहुत समज असलेल्या माणसाच्या  लक्षात येईलच.

हेही वाचाः महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे आठ सोप्पे अर्थ

थोडी किस्सागोई

फैज साहेबांची ही नज्म ‘क्रांतिगीत’ म्हणून प्रस्थापित करण्यात पाकिस्तानी गायिका इक्बाल बानो यांचाही मोठा वाटा राहिलाय. उर्दूचे आणि संगीताचे जाणकार तर असं म्हणतात, की इक्बाल बानो यांनी ‘हम देखेंगे’ला अजरामर करून ठेवलंय.

यामागचा मेलोड्रामॅटिक किस्सा असा, की आपल्या हुकुमशाही राजवटीत झिया-उल-हक यांनी नागरिकांवर अनेक बंधनं लादली होती. अगदी महिलांनी साडी घालणं आणि नागरिकांनी फैजच्या साहित्याचं वाचन, गायन करणं यावरही बंदी होती.

वर्ष १९८५. तो 'मार्शल लॉ'चा साखळदंडी काळ होता. प्रसिद्ध गायिका इक्बाल बानो यांनी मात्र जनरल झिया-उल-हकच्या तुघलकी फर्मानांना भीक न घालता हा हुकुम मोडण्याचं ठरवलं. त्यांनी सरकारला खुलं आव्हान देत ही बाब जाहीरसुद्धा केली. त्यासाठी जागा ठरली, ती म्हणजे लाहोर स्टेडियम. इक्बाल बानो यांना रोखण्यासाठी सरकारकडून हरप्रकारे प्रयत्न करण्यात आले. वाटेत अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. पण ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी काळ्या साडीमधे इक्बाल बानो स्टेडीयममधे हजर झाल्या! तब्बल ५० हजार रसिकांसमोर त्यांच्या जवारीदार गळ्यातून उमटलेले ‘हम देखेंगे’चे बोल निर्भयतेला अजूनच हसीन आणि जवां बनवून गेले!

झिया-उल-हक यांच्या जुलमी राजवटीला दिलेलं हे सुरेल पण कडवट आव्हान होतं.

इस गाने की आवाज थी मोहतरमा इक्बाल बानो की और बोल लिखे थे जनाब फैज अहमद फैजने! और क्या कहें? बस तेव्हापासून गेली चार दशकं विरोधाचा, असहमतीचा लोकमान्य आवाज बनत ‘हम देखेंगे’ करोडो ओठांवर अजरामर झालंय. आज जरी हे गाणं लाखो, करोडो लोकांच्या ओठांवर असलं तरी तसं होऊ नये म्हणून पाकिस्तानच्या हुकुमशहाने खूप प्रयत्न केले. गाण्याच्या रेकॉर्डिंग नष्ट करण्याचं फर्मान काढलं होतं. पण ते काही शक्य झालं नाही. आज युट्युबवर इक्बाल बानो यांच्या आवाजात ही नज्म ऐकता येऊ शकते.

आजघडीला भारतात ही नज्म नव्याने गाजत असताना फैज साहेब आणि इक्बाल बानो दोघंही लौकिकार्थाने आपल्यात नाहीत. फैज साहेबांचं १९८४ मधेच निधन झालंय. 

हयातीतसुद्धा जगण्या मरण्याची 'पोयटिक' कबूली दिली होती या जिंदादिल कवीनं, की

'मकाम फैज कोई राहमे जचा ही नहीं 
जो कू-ए-यार से निकले तो सू-ए-दार चले.'
(वाटेतला कुठला मुक्काम फारसा आवडलाच नाही मला, प्रेयसीच्या मोहल्ल्यातून बाहेर पडलो आणि थेट निघालो, ते सुळावर चढायलाच!)

आणि इक्बाल बानोदेखील २००९ ला हे जग सोडून गेल्यात.

का केलं जातंय हे सगळं नेमकं?

१९७९ मधे जनरल झिया-उल-हक या पाकिस्तानी, धर्माने मुस्लिम असणाऱ्या हुकुमशहाच्या दडपशाहीविरोधात लिहिली गेलेली नज्म आज ‘हिंदूविरोधी’ कशी असू शकेल, हा अतिशय साधासोप्पा प्रश्न आहे. अर्थात या वास्तवाची कल्पना या प्रकरणामागच्या कर्त्या-करवित्यांना किंवा कानपूर आयआयटीच्या प्रशासनाला नाही, असंही समजण्याचं काही कारण नाही. मात्र तरीही हे सगळं 'घडवलं' जातंय.

या ना त्या कारणाने आंदोलनाला धार्मिक रंग देण्याचा, देशातल्या बहुसंख्यांकांच्या मनात विद्यार्थ्यांचं हे आंदोलन इस्लामी म्हणजेच ‘हिंदूविरोधी’ असल्याचं चित्र निर्माण करण्याचा हा कुटील डाव. एकदा का ‘हिंदू-मुस्लिम’ असं ध्रुवीकरण करण्यात यश मिळालं की मग आंदोलन गुंडाळणं सरकारसाठी फारसं अवघड नाही.

मात्र तख्त-ताज मिरवत धूंद झालेल्यांना जमिनीवर आणत लोकशाहीचा 'कोरस' आभाळभर नेणं हे आपलंच काम! कारण पुन्हा फैज साहेबच सांगून गेलेत,

यूँं ही हमेशा उलझती रही है ज़ुल्म से ख़ल्क़
न उनकी रस्म नई है, न अपनी रीत नई,

यूँ ही हमेशा खिलाये हैं हमने आग में फूल
न उनकी हार नई है न अपनी जीत नई.

हेही वाचाः 

कोलाजचा पहिला बड्डेः अभिनंदन नहीं करोगे हमारा!

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला का विरोध केला पाहिजे?

लोकांना एकत्र येण्यापासून रोखणारं कलम १४४ नेमकं आहे तरी काय?

घरी येणाऱ्या भाजपवाल्यांना नागरिकत्व कायद्याबद्दल हे २० प्रश्न विचारुया

सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय?

(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत.)