जगभर धुमाकूळ घालतोय कोरोनाचा 'भारतीय वेरियंट'

२५ मे २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


भारतातला बी १.६१७ हा कोरोना वायरसचा नवा वेरियंट जगातल्या ४४ देशांमधे पसरलाय. त्याचा संसर्गही वेगाने वाढतोय. हा धोका लक्षात घेऊन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं त्याला 'वायरस ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं. जगभरातला मीडिया त्याला 'भारतीय वेरियंट' म्हणत असताना भारताचं आरोग्य खातं मात्र त्यावर आक्षेप घेतंय. पण त्यामुळे वेरियंटचा धोका कमी होत नाही.

कोरोना वायरस सातत्याने आपल्या जनुकीय रचनेत बदल करतोय. यालाच म्युटेशन किंवा वेरियंट म्हटलं जातं. या म्युटेशन किंवा वेरियंटच्या बदललेल्या रुपाला स्ट्रेन म्हणतात. हा बदल नैसर्गिक असला तरी कधी कधी तो काळजीचं कारण ठरू शकतो. काहीवेळा हा म्युटेट झालेला वायरस वेगानं पसरतो आणि लसीकरण आणि कोरोनाच्या मूळ लक्षणांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कधीकधी हा बदल फार धोक्याचाही ठरतो.

वायरसचे मुख्यतः तीन प्रकारचे स्ट्रेन असतात. पहिला वेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच वायरसच्या ज्या स्ट्रेनमुळे संसर्ग वाढतो. दुसरा वेरियंट ऑफ कंसर्न म्हणजे काळजी करायला लावणारा. त्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊन मृत्यूची संख्या वाढते. तिसरा असतो वेरियंट ऑफ इन्वेस्टीगेशन. जो स्ट्रेन आरटीपीसीआर टेस्ट केल्यावरही हाती लागत नाहीय.

भारतातला बी १.६१७ नावाचा कोरोना वायरसचा नवा वेरियंट जगभरातल्या ४४ देशांमधे पसरल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं म्हटलंय. धोकादायक असल्यामुळे त्याला वेरियंट ऑफ कंसर्न म्हणून डब्ल्यूएचओनं घोषित केलंय. भारतातही या वेरियंटचा संसर्ग अधिक वेगाने वाढतोय.

हेही वाचा: तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

वायरसमधल्या वेरियंटचा धुमाकूळ

कोरोनाचे अनेक वेरियंट भारतातल्या वेगवेगळ्या भागांमधे आढळतायत. वायरसमधले हे वेरियंट जिनोम सिक्वेंन्सिंगमुळे समजतात. याच जिनोमच्या आकड्यांवरून केंद्रीय आरोग्य खात्याने बी ११७ हा वेरियंट दिल्ली आणि पंजाबमधल्या केसेसमधे अधिक मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचं म्हटलं होतं. मागच्या वर्षी सप्टेंबरमधे तो ब्रिटनमधे सापडल्यामुळे त्याला युके वेरियंट असं नाव पडलं. भारतात बी १.६१७ या वेरियंट पाठोपाठ याच्या केसेस सापडतायत.

पश्चिम बंगालमधे बी १.६१८ हा नवा वेरियंट समोर आला. याला 'बंगाल वेरियंट' असं म्हटलं जातंय. बी १.६२९ हा भारतातल्या तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि केरळ तर बी ३८२ एल हा वेरियंट महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटकमधे आढळल्याचं डॉ. राकेश मिश्रा यांनी 'द क्विंट' या वेबसाईटच्या मुलाखतीत म्हटलंय. डॉ. मिश्रा हे भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या हैदराबाद इथल्या 'पेशी आणि जीवशास्त्र केंद्रा'चे प्रमुख आहेत.

बी १.६१७ हा कोरोनाचा डबल वेरियंट आहे. यात ई ४८४ क्यू आणि एल ४५२ आर असे दोन स्ट्रेन आढळून आलेत. त्यामुळेच याला डबल वेरियंट किंवा म्युटेशन म्हटलं जातंय. ऑक्टोबरमधे हे वेरियंट पहिल्यांदा भारतात आढळल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं म्हटलं होतं. महाराष्ट्राला याच डबल वेरियंटचा सगळ्यात जास्त फटका बसलाय.

मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा वायरसमधला वेरियंट आढळला होता. बी १३५१ असं त्याचं नाव होतं. तर पी १ हा वेरियंट ब्राझीलमधल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं कारण ठरला. याच वर्षी ६ जानेवारी महिन्यात तो आढळून आला होता.

हेही वाचा: कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

संशोधन काय म्हणतंय?

भारतातला बी १.६१७ नावाचा कोरोनाचा नवा वेरियंट जगभरातल्या ४४ देशांमधे पसरल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं म्हटलंय. ब्रिटन, सिंगापूर या देशांचा यात समावेश आहे. वेगवेगळ्या देशांमधे हा म्युटेट वायरस वेगानं पसरत असल्यामुळे डब्ल्यूएचओच्या सार्स कोव - २ वायरस इवोल्यूशन वर्किंग ग्रुपने ११ मेला बी १.६१७ जगासाठी काळजीचा विषय असल्याचं जाहीर केलं होतं.

संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य विभागानेही वायरसमधलं हे वेरियंट कोरोना पेशंटच्या उपचारावर परिणाम करत असल्याचं जाहीर केलं होतं. गेल्यावर्षी ऑक्टोबरमधे भारतातल्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी'च्या शास्त्रज्ञांना कोरोना वायरसमधे ८ प्रकारचे वेरियंट आढळून आले. यावर ३ मेला 'बायो अर्काइव' या विज्ञानविषयक मॅगझीनमधे संशोधनपर पेपरही प्रकाशित करण्यात आला होता.

बी १.६१७ या म्युटेट वायरसशी लढण्यात शरीरातल्या अँटिबॉडी फार प्रभावी ठरत नसल्याचं या शास्त्रज्ञांच्या संशोधनातून पुढे आलंय. फेब्रुवारी २०२१ च्या मधे महाराष्ट्रात कोरोनाच्या ज्या काही केसेस समोर आल्यात त्यातल्या ६० टक्के केसेस या नव्या वेरियंटच्या आहेत. शास्त्रज्ञांच्या टीमने वॅक्सिनवर याचा काही परिणाम होतोय का याचाही अभ्यास केलाय. वॅक्सिनमुळे तयार होत असलेल्या अँटीबॉडीवर त्याचा परिणाम होत असल्याचं त्यांचं संशोधन सांगतंय.

हेही वाचा: कोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं?

वेरियंटच्या भारतीय म्हणण्याला आक्षेप

बी १.६१७ भारतात आढळल्यामुळे त्याला भारतीय वेरियंट म्हटलं जातंय. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्टमधे 'भारतीय वेरियंट' असे उल्लेख होते. त्यासाठी डब्ल्यूएचओचा दाखला दिला जात होता. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने मात्र यावर आक्षेप घेतलाय. डब्ल्यूएचओनं आपल्या रिपोर्टमधे 'भारतीय' शब्दाचा उल्लेख कुठेही केला नसल्याचं एक ट्विट १२ मेला आरोग्य खात्याने केलंय.

दुसरीकडे डब्ल्यूएचओचा दाखला देऊन वेगवेगळे मीडिया रिपोर्ट हा 'भारतीय वेरियंट' असल्याचा उल्लेख करतायत. यात बीबीसी, रॉयटर, अल जजीरा, इंडिया टुडे, इंडियन एक्सप्रेस यांचा समावेश आहे. डब्ल्यूएचओनं २७ एप्रिलला याआपल्या रिपोर्टमधे बी १.६१७ वेरियंट ऑक्टोबरमधे भारतात आढळल्याचं म्हटलं होतं.

डब्ल्यूएचओनं आपल्या रिपोर्टमधे कुठंही भारतीय वेरियंट असा उल्लेख केलेला नाही. फक्त तो भारतात आढळल्याचं म्हटलंय. कोणत्याही वेरियंटच्या नावाचा उल्लेख डब्ल्यूएचओकडून देशाच्या नाही तर वैज्ञानिक आधारावर केला जातो. त्यामुळे आरोग्य खात्याला शाब्दिक कोटी करून मूळ मुद्याकडून लक्ष दुसरीकडे वळवायचंय अशी टीका होतेय.

हेही वाचा: 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती का खावी वाटते?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?