तैवान कोरोना डायरी १: एक छोटा देश कोरोनाशी लढत होता

२९ मार्च २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


कोरोनाच्या विळख्यातून तैवाननं किती यशस्वीपणे आपली सुटका करून घेतली याची जगभर चर्चा होतेय. पण तैवानच्या या यशामागे त्यांची शिस्त आणि चोख नियोजन. त्याच काळात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबईतले प्रसिद्ध अवयव प्रत्यारोपण तज्ञ डॉ. कैलास जवादे एका कॉन्फरन्ससाठी तिथे गेले होते. त्यांनी सांगितलेला तैवानच्या कोरोनाविरोधी लढाईचा आँखो देखा हाल.

अमेरिकेसारख्या महासत्तेलाही कोरोनाचा जबरदस्त झटका बसलाय. अमेरिकेतली कोविड – १९ रूग्णांची संख्या १ लाखांवर पोचलीय. १ हजार लोकांचा मृत्यूही झालाय. याउलट चीनशेजारच्या छोट्याशा तैवाननं कोरोनावर यशस्वीपणे मात केलीय. तैवानच्या या यशाकडे पाहून सगळ्या जगानेच तोंडात बोटं घातली.

फेब्रुवारीच्या सुरवातीला तैवानवर कोरोनाचं संकट घोंगावत होतं. याच काळात मुंबईच्या डीवाय पाटील हॉस्पिटलमधे सर्जन म्हणून काम करणारे डॉ. कैलास जवादे एका कॉन्फरन्समधे भाग घेण्यासाठी तैवानला गेले होते. औरंगाबादमधून एमबीबीएस आणि एमएससचं शिक्षण घेतलंय. गेल्या २० वर्षांपासून ते डॉक्टरकी करतात. अवयव प्रत्यारोपण या विषयातले ते तज्ञ आहेत.

१० वर्षांपूर्वी फेलोशिपच्या माध्यमातून ते तैवानमधे ट्रान्सप्लांट सर्जरीचं शिक्षण घ्यायला गेले होते. तेव्हाचा तैवान आणि आत्ता कोरोनावेळचा तैवान असा दोन टोकांवरचा देश बघताना त्यांना अनेक बरे वाईट अनुभव आले. या दौऱ्यातले अनुभव डॉ. जवादे यांनी ‘तैवान कोरोना डायरी’ या तीन भागांत मांडलीय. त्यांच्या या अनुभवातून आपल्यालाही बरंच काही शिकता येईल.

हेही वाचा : कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

चोरपावलानं जगभर पसरणारा कोरोना

दहा वर्षानंतर तैवानला जायचं. . तसंच फेलोशिप चालू करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं कार्य करायचं. या सगळ्या विचारांनी मी आनंदी होतो आणि तैवानला जाण्याची तयारी करत होतो. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मला कॉन्फरन्स ऑर्गनायझरकडून मेसेज आला. कोरोना आउटब्रेकबद्दल माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर मी कोरोनाबद्दल वाचण्यास सुरवात केली. चोरपावलाने जगभर पसरणाऱ्या आणि मानवी संस्कृतीसमोर अस्तित्वाचं आव्हान निर्माण करणाऱ्या या संकटाची ती चाहूल होती.

खरंतर सुरवातीला मी वाचत असलेल्या माहितीमधून एवढं मोठं संकट उभं राहील असं वाटत नव्हतं. म्हणूनच मी त्या परिस्थितीत तैवानला जाण्याचा निर्णय घेतला. ४ फेब्रुवारी २०२० ला माझ्या प्रवासाला सुरवात झाली. भारत ते बँकॉक प्रवास चांगला झाला आणि तिथंच संकटाच्या पाऊलखुणा दिसायला लागल्या.

बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर मास्क ओढलेले होते, थर्मल स्कॅनरमधून होत असलेली सर्वांची पडताळणी, विमानतळात असलेली वैद्यकीय पथकं, कोरोना वायरसबद्दल माहिती देणारे बॅनर्स आणि त्याबाबत होत असलेली अनाउन्समेंट सारं काही वेगळं भासत होतं. मीही सर्वांप्रमाणे बॅगमधे ठेवलेला एन९५ मास्क काढला आणि चेहऱ्यावर लावला. बँकॉक ते कॅउशुंग तैवान प्रवास सुरू झाला.

मांसाहारी पदार्थांना प्रतिबंध

कॅउशुंगला विमान लँड होण्याअगोदर कॅबिन प्रेशरमधील बदलामुळे नेहमीसारखाच मला कानामधे त्रास झाला. मी कान गच्च बंद करून सारखा चोळत होतो. कदाचित त्यामुळे माझ्या कानाच्या भागातलं तापमान वाढलं होतं. थर्मल स्कॅनरमधून जाताना तिथं उभ्या असलेल्या लेडी डॉक्टरने मला कानाच्या समस्येविषयी विचारलं. लेझर थर्मामीटरने चक्क माझ्या कानाचं टेम्परेचर चेक केलं आणि तिचं समाधान झाल्यानंतर मला पुढे जाण्याची परवानगी दिली.

कस्टम क्लिअरन्ससाठी जात असताना तिथंही काहीतरी अनाउन्समेंट चालू होती आणि ती ऐकून बरेचसे प्रवासी त्यांच्याकडील अन्नपदार्थ एका कुंडीत टाकत होते. तैवान प्रशासनानं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाहेरच्या देशातून मांसाहारी पदार्थ तैवानमधे आणण्यास प्रतिबंध केला होता. तसं आढळून आल्यास त्या व्यक्तीस २५ मिलियन तैवान डॉलर शिक्षा म्हणून भरावे लागणार होते, असं मी एका सहप्रवाशाला विचारलं तेव्हा कळलं. माझ्याकडे शाकाहारी खाद्यपदार्थ होते. त्यामुळे तिथं उपस्थित अधिकाऱ्यांना मी माहिती दिली असता त्यांनी ‘नो प्रॉब्लेम’ म्हणत मला पुढे जाण्याची परवानगी दिली.

साधारणतः दुपारी तीनच्या सुमारास मी चांग गुंग मेमोरियल हॉस्पिटलमधे पोचलो. दहा वर्षांपूर्वीचा काळ सिनेमातल्या स्टोरीसारखा माझ्या  डोळ्यासमोरून जात होता. यकृत प्रत्यारोपण प्रशिक्षणाचा तो अविस्मरणीय काळ होता. आजही सगळं तसंच होतं. फक्त गेटवर लाऊडस्पीकरवरून कोरोनाबद्दल सतत माहिती देणं चालू होतं. प्रत्येकाचं थर्मल स्कॅनरद्वारे स्कॅनिंग करण्यात येत होतं. कोविड-19 म्हणजेच कोरोनाच्या संकटाची ती चाहूल होती.

हेही वाचा : लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक

रोजच बसतात भुकंपाचे धक्के

एअरपोर्टवरून रुग्णालयाच्या प्रवासात मला भूतकाळ आठवत होता. प्रत्यारोपण शल्यचिकित्सेचं म्हणजे ट्रान्सप्लांट सर्जरीचं शिक्षण घेण्यासाठी २००९ ते २०१० या एका वर्षासाठी फेलो म्हणून मी तैवानला आलो होतो. तेव्हा माझ्यासोबत माझी बायको डॉक्टर वैशालीसुद्धा होती.

खरंतर तैवान म्हणजे एक छोटंसं बेट. पण भारतापेक्षा कितीतरी जास्त प्रगत आहे. पर्शियन लोकांनी या बेटाचा शोध लावला, असं म्हटलं जातं. पुढे चीन आणि जपान या देशांनी तैवानवर सत्ता गाजवली. आजही तैवान वेगळं राष्ट्र असलं तरीही हा रिपब्लिक ऑफ चायना म्हणजे चीनचा भाग आहे, असं मानलं जातं.

बेट छोटं असलं तरीही इथले लोक प्रचंड मेहनती आणि शिस्तप्रिय आहेत. त्यामुळेच त्यांनी प्रगतीची शिखरं गाठलीयत. दररोज एक-दोन छोट्यामोठ्या भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या या देशात टाईपाई १०१ सारखी १०१ मजली इमारत, २४ आणि २८ किलोमीटर लांबीचे असे दोन भुयारी मार्ग तयार केलेत.

तैवाननं वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती केलीय. म्हणूनच अनेकजण अल्प खर्चात चांगलं वैद्यकीय प्रशिक्षण घेण्यासाठी तैवानलाच पसंती देतात. आम्हीही यकृत प्रत्यारोपणाचा म्हणजे लिवर ट्रान्सप्लांटच्या प्रशिक्षणासाठी तैवानला गेलो होतो.

प्रत्येक ठिकाणी स्कॅनिंगची सुविधा

हॉस्पिटलच्या गेटवर थर्मल स्कॅनिंग चालू होतं. माईकवरून सुचना दिल्या जात होत्या. प्रत्येकाच्या तोंडावर मास्क होते आणि लाईनमधूनच सर्वांची ये-जा चालू होती. तिथं लोकांना इंग्रजी येत नाही. त्यामुळे परभाषेतल्या लोकांना शांतपणे मोजक्या शब्दात आपलं म्हणणं सांगावं लागतं.

मी एअरपोर्टवरूनच नवीन मोबाईल सिम घेतलं होतं. त्यामुळे मला तैवानचा नंबर मिळाला. त्यामुळे मी मिस हीसाऊ वेन ताय हिच्याशी कॉन्टॅक्ट केला. हॉस्पिटलच्या गेटवर तिनं माझं स्वागत केलं आणि त्यांच्या हॉस्टेलकडे आम्ही निघालो. तिथं जाताना तिनं मला काही महत्त्वाची माहिती आणि सूचना दिल्या.

मास्कचा तुटवडा असल्यामुळे मला मास्क मिळणार नाहीत. हॉस्पिटलमधे येण्यासाठी फक्त दोन गेट उघडे असतील. तिथं स्कॅनिंग करूनच मला आत यावं लागेल. जीवनावश्यक गोष्टी जवळपासच्या मार्केटमधे मिळतील आणि बाहेर जास्त फिरू नका, असे महत्त्वाचे सल्ले तिने मला दिले.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

बंधनातही शोधली क्रिएटिविटी 

यकृत प्रत्यारोपण क्षेत्रातल्या तज्ञ अभ्यासकांची चौथी आंतरराष्ट्रीय परिषद तिथं आयोजित केली होती. मी तैवानमधूनच फेलोशिप केलेली असल्याने मला त्या परिषदेचं निमंत्रण होतं. हॉस्पिटलपासून साधारण २५ किलोमीटरवर असलेल्या फाँगसान इथं ही परिषद होती. तिथं जगातलं सर्वात मोठं बुद्धाचं स्मारक बांधण्यात आलंय. नेमक्या याच स्मारकात ही परिषद आयोजित करण्यात आली होती.  रुग्णालयातून तिथं जाण्यासाठी बसची व्यवस्था होती. पण त्यासाठी वेळेत रुग्णालयात येणं आवश्यक होतं.

पहिल्या दिवशी मला उशीर झाला आणि मग स्वतंत्रपणे जावं लागलं. सार्वजनिक वाहतूकीचा पर्याय निवडला. सतत आजूबाजूला लक्ष होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क होता. सर्वसाधारणपणे आम्ही मेडिकलवाले निळे, पांढरे किंवा कापडाचे असतील तर हिरवे मास्क वापरतो. तिथं मात्र लोकांनी मास्क घालायचा नियम पाळताना त्यात वेगवेगळे रंग आणले होते.

लहान मुलांसाठी कार्टुन वगैरे असणारे मास्क, महिलांसाठी ड्रेसला मॅचिंग रंग असणारे मास्क अशी बरीच क्रिएटिविटी करून नियमाचं पालन करतानाही त्यांनी आनंद शोधला होता. एरवी आपल्याकडे लोकांना कितीही सांगून मास्कचा वापर पूर्णपणे केलेला दिसत नाही. तैवानमधे मात्र नियम पाळताना केलेले आनंद निर्मितीसाठीचे क्रिएटिव बदल मला खूप भावले.

ज्या बुद्ध स्मारकामधे मिटींगचे आयोजन केलं होतं ती अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य जागा होती. ब्रॉंझपासून बनवलेली जगातली सर्वाधिक उंचीची ध्यानावस्थेतली बुद्धाची मूर्ती हे तिथलं सर्वात मोठं आकर्षण. मूर्तीच्या खाली दहा मजली इमारतीत हॉल, सभागृह प्रकाशनगृह, विविध प्रकारच्या गेस्टरूम इत्यादी सोयीसुविधा होत्या. मी सभागृहात पोचलो तेव्हा कार्यक्रम कसा पार पाडणार त्याची रंगीत तालीम चालू होती.

कोरोनामुळे चीन आणि दक्षिण कोरियातले तज्ञ आणि इतर काही जण सहभागी होऊ शकणार नव्हते. त्यामुळे त्या संदर्भात काय करायचं, काय बोलायचं हा विचार चालू होता. परिषदेदरम्यान कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी काय करायचं यावरही चर्चा चालू होती. तैवान प्रशासन काय सूचना देतंय त्यावरही एक जण लक्ष ठेऊन होता. हॉंगकॉंगमार्गे आलेल्या तज्ञांना फक्त परिषदेसाठी परवानगी होती. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या सर्जरी बघण्यासाठी त्यांना रुग्णालयात येण्यास परवानगी नाकारली होती.

हेही वाचा : कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

तरीही आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली!

ठरल्याप्रमाणे ८ फेब्रुवारी २०२० ला परिषद सुरू झाली. परिषदेसाठी प्रत्येकाचं गेटवर थर्मल स्कॅनिंग झालं. परिषद चालू असतानाही प्रत्येकाला मास्क घालणं कंपल्सरी होतं. कॉन्फरन्सच्या दरम्यान खोकला आला तर त्याने लगेच बाहेर जाऊन पाणी प्यायचं अशा अनेक बारीकसारीक सुचना प्रशासनानं देऊन ठेवल्या होत्या.

कोरोनामुळे अनेक डॉक्टर आणि वक्त्यांनी येणं टाळलं होतं. पण आयोजकांनी त्यांच्याकडून त्यांचं प्रेझेंटेशन वीडियो रेकॉर्डिंग करून मागवलं आणि त्यांना दिलेल्या नियोजित वेळेत ते सादर करून त्यावर चर्चा वगैरेही केली. नियमांचं पालन करत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कोरोनाच्या काळातही आंतरराष्ट्रीय दर्जाची परिषद यशस्वीपणे पार पाडली.

आपल्या देशात अशा परिस्थितीचा विचार करता अनेक परिषदा, कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. सुरक्षिततेच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं असलं तरी त्यामागे आपलं बेशिस्त वर्तन हेही एक कारण आहेच. तैवानकडून आपण बरंच काही शिकू शकतो.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तैवाननं लोकांना कोरोनाबद्दल माहिती वेळोवेळी कळवली. चीनमधे होत असलेल्या घडामोडींचा अभ्यास केला. शासन, प्रशासन, हॉस्पिटल, परिषदेचे आयोजक यांच्यामधे समन्वय होता. मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करून त्याबद्दल माहिती दिली, त्यांची अंमलबजावणी केली. थर्मल स्कॅनर आणि मास्कचा योग्य वापर यावर भर दिला आणि हाँगकाँगमार्गे आलेल्या डॉक्टरांना सेल्फ क्वारंटाईन करण्यास सांगितलं.

एकंदरीत या सगळ्यामुळेच कोरोनाच्या सावटाखाली असतानाही एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि यकृत प्रत्यारोपण क्षेत्रासारख्या जटील क्षेत्रातल्या अभ्यासकांचा वैचारिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडता आला. भारतासारख्या देशानं तैवानकडून शिस्त शिकली तर इथं बरेच बदल करता येतील.

हेही वाचा : 

रघुराम राजन सांगतात, कोरोना जगाला एकत्र आणू शकतो

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात?

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

कोरोनाला हरवण्यासाठी जग वेगवेगळे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?