कुणाला काही कळायच्या आतच कोरोनानं चीनमधून साऱ्या जगात एंट्री केली. आपण जगाच्या या टोक्यापासून त्या टोकाला काही तासांत जाऊ शकतो. तसंच कोरोना वायरसही पसरला. ग्लोबलायजेशनमुळे साथरोग चटकन पसरतात, हे खरं असलं तरी डिग्लोबलाइज होणं हा काही त्यावरचा उपाय असू शकत नाही.
कोरोना वायरसनं वेगळेच दिवस जगाला दाखवलेत. सगळ्यांच्या तोंडात कोरोनानं घातलेल्या गोंधळाची वर्णनं आणि डोक्यात कोरोनाला थांबवण्यासाठी काय करायचं याचाच विचार चालूय. एक सामान्य माणूस म्हणून घरी थांबून राहणं एवढंच आपण करू शकतो. पण हा साथरोग थांबवण्यासाठी आपल्याला दोन पातळ्यांवर लढायला हवं, असं युवाल नोवा हरारी यांनी म्हटलंय.
युवाल नोवा हरारी हे इस्राईलमधल्या हिब्रु युनिवर्सिटीत इतिहासाचे प्रध्यापक म्हणून काम करतात. त्यांची सेपियन्स आणि होमो ड्युयस ही पुस्तकं अत्यंत प्रसिद्ध आहेत. सेपियन्स या पुस्तकात त्यांनी मानवाच्या उत्क्रांतीची माहिती दिलीय तर होमो ड्युयस या पुस्तकात माणसाच्या भविष्यातल्या उत्क्रांतीविषयी ते बोलतात. याचप्रमाणे त्यांचं ‘२१ लेसन्स फॉर २१ सेन्च्युरी’ हे २१ व्या शतकातल्या आव्हानांचा इथारा देणारं पुस्तकंही अतिशय गाजलंय.
एनपीआर म्हणजे अमेरिकेतल्या नॅशनल पब्लिक रेडियोवर प्रसारित झालेल्या एका मुलाखतीत हरारी यांनी देशांतर्गत काय गोष्टी करायला हव्यात याची माहिती दिली. तर साऊथ पोस्ट चायना या वेबपोर्टलवर छापून आलेल्या मुलाखतीत ते जागतिक पातळीवर काय केलं पाहिजे, त्याविषयी बोलले. या दोन मुलाखतीतल्या मूळ मुद्द्यांचं रेणुका कल्पना यांनी शब्दांकन केलंय. कोरोनाविरोधातल्या लढाईत हरारी यांचं हे म्हणणं नक्कीच दिशादर्शक ठरेल.
हेही वाचा : कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोतः युवाल नोवा हरारी
अनेक देशाच्या राजकारण्यांसाठी हा साथरोग म्हणजे आश्चर्याचा धक्का होता. कारण त्यासाठी लागणारी तयारी त्यांनी केली नव्हती. त्यांच्याकडे कसल्याच ब्लूप्रिंट्स नव्हत्या. अशा संकटाच्या काळात त्यांचं मन वळवून त्यांना काहीही करायला भाग पाडलं जाऊ शकतं. साधारण परिस्थितीत घेतले न जाणारे काही निर्णय या संकटाच्या काळात हमखास घेतले जातील. त्यामुळेच कोरोनानंतर आपली वाटचाल एकाधिकारशाही आणि मग हुकूमशाहीकडे जायची शक्यता आहे.
लोकांना त्यांच्या जिवाची भीती आहे आणि अर्थव्यवस्थाही कोलमडतेय. त्यामुळे या सगळ्याच संकटातून बाहेर काढण्यासाठी, आपली काळजी घेण्यासाठी एका खमक्या नेत्याची आपल्याला गरज आहे, असं लोकांना वाटू लागेल. हंगेरीसारख्या काही देशात असंच चित्र दिसून येतं. माझा देश, इस्राईलमधेही काही प्रमाणात असंच वातावरण आहे. सगळ्या लोकांवर, देशातल्या सगळ्या ठिकाणांवर पाळत ठेवण्याची गरज आहे, असं सगळ्यांना वाटू लागलंय. त्यातूनच आपण सगळेच हुकूमशाहीकडे जाणार आहोत. लोकशाहीतही अशा नव्या पाळत ठेवणाऱ्या संस्थांचा उद्य होणार आहे. या संस्था संकट गेलं तरी तशाच राहतील.
पाळत ठेवण्याच्या विरोधात मी नाही. पण पाळत कोण ठेवतंय ते पाहणं महत्त्वाचं आहे. ही पाळत आरोग्य विभागाकडून नाही तर गुप्तहेरांकडून ठेवली जाते. त्यामुळे पाळत ठेवायची असेल तर मिळालेली माहिती कुठे जाते, कुणाकडे जाते, त्याचं पुढे काय होतं हे पाहणं गरजेचं आहे.
पाळत ही दोन्हीकडून ठेवली जावी. सरकार नागरिकांवर पाळत ठेवतं त्याप्रमाणे नागरिकांनाही सरकारवर पाळत ठेवण्याची सोय असायला हवी. नागरिकांची सगळी खासगी माहिती सरकारकडे जमा होणार पण सरकाची कोणतीही निर्णय प्रक्रिया पारदर्शक असणार नाही हे समाजाचं चित्रण अतिशय भयावह आहे. कोरोनासारख्या संकटाच्या काळातही नागरिकांनी आणि माध्यमांनी सरकारला प्रश्न विचारत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
आपण मध्ययुगाचा विचार करू. १९ व्या शतकात प्लेगचा प्रसार झाला होता तेव्हा असं नेमकं कशामुळे होतंय याची कसलीही कल्पना लोकांना नव्हती. त्यामुळेच तो थांबवण्यासाठी काय करायचं हे देखील माहीत नव्हतं.
१४ व्या शतकात ब्लॅक डेथमुळे आशिया आणि युरोपात एक चतुर्थांश लोकांचा मृत्यू झाला होता. तो साथरोग कशामुळे पसरला हे आजवर कुणालाही माहीत नाही. १६ व्या शतकात स्मॉलपॉक्स आणि त्यासारख्या साथरोगांनी अमेरिकेतल्या मूळ रहिवाश्यांपैकी ९० टक्के लोकांचा जीव घेतला. त्या अझटेक्स, माया आणि इनका या नेटीव अमेरिकन जमातींना आपली माणसं इतक्या संख्येने का मरतायत हे कधीच कळालं नाही.
पण याउलट कोरोना वायरसचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा काय झालं? कोरोना साथरोग पसरला तेव्हा त्याविषयी संशोधन करून हा कोरोना कुटुंबातला नवीन वायरस आहे हे शोधून काढायला आणि त्याची तपासणी करण्यासाठी टेस्ट बनवायला शास्त्रज्ञांना फक्त दोन आठवडे लागले. देशातल्या एका भागातली माहिती दुसऱ्या भागात पोचली. टेलिफोन, इंटरनेट यामुळे देशातल्या कुठल्याकुठल्या कोपऱ्यात असणाऱ्या तज्ञांची मदत घेणं लगेच शक्य झालं. थोडक्यात, सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती सगळी साधनं होती. तरीही, रोगाचा प्रसार थांबला नाही.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
तैवान कोरोना डायरी ३ : भीतीच्या सावटातही शिस्त विस्कटली नाही
म्हणूनच कोरोना ही नैसर्गिक आपत्ती नाही. ती मानवनिर्मित आहे, असंही म्हणता येणार नाही. पण माणसाच्या चुकीमुळे या छोट्या संकटाचं जागतिक आपत्तीत रूपांतर झालंय, आणि याची जबाबदारी देशांच्या सरकाराची आहे.
नव्या रोगांचा प्रादुर्भाव आपण थांबवू शकत नाही. हे असे वायरस प्राण्यांकडून माणसांत नेहमी येत राहतात किंवा माणसात असतानाच उत्क्रांती करून आधीपेक्षा जास्त धोकादायक आणि जीवघेणे बनतात. त्यांना थांबवणं आपल्या हातात नाही. पण या रोगांना लगाम घालणं आणि या रोगांमुळे हजारो लोकांचा मृत्यू थांबवणं, अर्थव्यवस्थेचा ऱ्हास थांबवणं आपल्या हातात आहे.
माणसाकडे साथरोगाला रोखून धरण्याची ताकद आहे. पण त्या ताकदीचा वापर कसा करायचा याची अक्कल माणसाकडे नाही. ही माणसाची हार आहे. साथरोग थांबवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गरजेच्या गोष्टी माणसाकडे आहेत आणि तरीही साथरोग हाताबाहेर जात असेल तर ती सर्वस्वी माणसाची चूक आहे. देशातल्या बेजबाबदार सरकारांनी त्यांच्या आरोग्य सेवांकडे दुर्लक्ष केलं आणि योग्यवेळी कृती करण्यात कमी पडले, म्हणून साथरोग फोफावला.
त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर आपण साथरोगाचा प्रसार थांबवण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्यासाठी लोकांवर पाळत ठेवणं हा उपाय नाही. तर लोकांचं शिक्षण करणं हा उपाय आहे. बाथरूममधे कॅमेरा लावून लोकांना हात धुण्याची बळजबरी करता येत नाही. त्यासाठी हात धुण्याचं महत्त्व लोकांना पटवून सांगायला हवं.
पण एवढंच करून हे संकट थांबण्यासारखं नाही. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करायला हवेत. आपण सगळे एकाच संकटात एकाचवेळी सापडतो, हा महत्त्वाचा धडा या साथरोगाने आपल्याला दिलाय. हे फक्त चायनीज किंवा इटालियन संकट नाही. ही जागतिक आरोग्य आणीबाणी आहे. एका देशात वायरसचा प्रादुर्भाव झाला तरी त्याने सगळ्या देशांना धोका उत्पन्न होतो. त्यामुळेच त्याच्याशी लढण्यासाठी आपल्याला जागतिक आराखड्याची गरज आहे.
अनेकांना वाटतं की हा कोरोना साथरोग पसरण्याचं कारण ग्लोबलाझेशन म्हणजे जागतिकिकरण आहे. त्यामुळे असे साथरोग थांबवायचे असतील तर आपण परत डिग्लोबलाइज केलं पाहिजे. पण असं करणं ही आपली सर्वांत मोठी चूक ठरेल.
मध्ययुगात असे वायरस हे कासवाच्या वेगाने पसरत होते आणि बहुतेक वेळी छोट्या शहरांना आणि खेड्यांना त्याचा फटका बसत होता. पण त्याकाळचे ब्लॅक डेथ सारखे वायरस हे आत्तापेक्षा कित्तीतरी पटींनी जास्त जीवघेणे होते. आपल्याला विलगीकरणात जाऊन वायरसपासून स्वतःचं रक्षण करायचं असेल तर थेट अश्मयुगात जावं लागेल. कारण उत्क्रांतीच्या इतिहासात, तेव्हाच साथरोगाचा प्रादुर्भाव नव्हता.
हेही वाचा : लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी
साथरोग थांबवण्याचा खरा उपाय एकांतवास आणि विलगीकरण हा नाही तर माहिती आणि सहयोग हा आहे. आपण एकमेकांना मदत करू शकतो. म्हणूनच तर आपण या वायरसपेक्षा वेगळे आहोत. चीनमधला कोरोना वायरस आणि अमेरिकेतला कोरोना वायरस एकमेकांसोबत चर्चा करू शकत नाही. माणसाला मारायचे, त्याच्या औषधांविरोधात लढा द्यायचे उपाय एकमेकांना सांगू शकत नाही. पण आपण सांगू शकतो. चीन अमेरिकेला कित्येक उपयोगाच्या गोष्टी सांगू शकते, ज्यातून अमेरिकेला फायदा होईल. त्यापेक्षा जास्त चीन तंत्रज्ञान देऊ शकते. आपल्याला जागतिक नेतृत्वाची आवश्यकता आहे.
देशांनी एकमेकांना मदत करण्यासाठी ५ गोष्टी करायला हव्यात.
पहिलं म्हणजे, एकमेकांना माहिती देणं. ही माहिती विश्वसनीय असायला हवी. साथरोगाशी लढलेल्या देशांनी दुसऱ्या देशांना त्या वायरसबद्दल, त्यासाठी लागणाऱ्या औषधांबद्दल माहिती द्यायला हवी.
दुसरं, साथरोगाशी लढण्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय साधनांचं जागतिक स्तरावरही उत्पादन व्हायला हवं. उत्पादन केलेल्या वस्तूंचं योग्य वितरणही झालं पाहिजे. योग्य म्हणजे सगळ्यांना समान असा याचा अर्थ होत नाही. योग्य म्हणजे श्रीमंत देशांनी गरज असलेल्या गरीब देशांना आपली साधनं देणं.
तिसरं, साथरोगाचा फटका बसलेला नाही अशा देशांनी आपले डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय तज्ञ दुसऱ्या देशाच्या मदतीसाठी पाठवले पाहिजेत. त्यातून त्यांना मदत होईल आणि आपल्याला अनुभवही मिळेल. मुख्य म्हणजे, साथरोगाचं केंद्र बदलत रहातं. आधी चीनमधे साथरोगाचा प्रचंड प्रसार होत असेल तर आता युरोपमधे होतोय. त्यानंतर अमेरिका उद्ध्वस्त करून हा साथरोग ब्राझीलमधे पसरू लागेल. पण ब्राझीलने आत्ताच इटलीची मदत केली साथरोगाला तिथेच आळा बसेल. शिवाय, नंतर ब्राझीलला गरज पडली तर इटली त्याच्या मदतीसाठी उभा असेल.
चौथं म्हणजे, जागतिक स्तरावर आर्थिक सोय करायची गरज आहे. वायरसमुळे गरीब देशांची अर्थव्यवस्था भरडली जाणार आहे. अशा देशांना श्रीमंत देशांनी मदत केली पाहिजे.
आणि पाचवं, थर्मल स्क्रिनिंगचंही जागतिकीकरण व्हायला हवं. एअरपोर्टवर फक्त आपल्या आपल्या देशांपुरतं किंवा फक्त देशात येणाऱ्या लोकांचं स्क्रिनिंग करून चालणार नाही. आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याआधीच स्क्रिनिंग करून संशयित व्यक्तींचं विलगीकरण केलं तर वायरस पसरण्यापासून थांबेल.
‘देर इज नो अडल्ट्स इन द रूम.’ म्हणजेच, जग नावाच्या खोलीत कुणी प्रौढपणाने वागणारी व्यक्तीच शिल्लक राहिलेली नाहीय. सध्याच्या काळात जगाला एका ग्लोबल लिडरची अर्थात जागतिक नेत्याची आणि कोरोनाशी लढण्यासाठी जागतिक आराखड्याची गरज आहे.
हेही वाचा :
भविष्यात डेटा डिक्टेटरशिपचा धोकाः युवाल नोआ हरारी
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या स्त्रियाच खऱ्या वीरांगना!
कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळून वारकऱ्यांनी आदर्शच घातलाय
ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?