कोरोना वायरसने चीनमधे धुमाकूळ घातलाय. माणसांच्या पेशी खाऊन जिवंत राहणारा हा वायरस जगभरातही पसरतोय. माणसं मारणाऱ्या या वायरसमुळे चीनने आपला शेअर बाजार तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता या वायरसने जगभरातल्या अर्थव्यवस्थांनाही पोखरायला सुरवात केलीय. कोरोना वायरसचे चीनच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठे परिणाम होताहेत.
डोळ्याला दिसतही नाही इतका छोटासा एक विषाणू सध्या जगभर धुमाकूळ घालतोय. आत्तापर्यंत चीनमधल्या १०० हून अधिक लोकांचा या वायरसने जीव घेतलाय आणि १० हजाराहून जास्त लोकांना याची लागण झालीय. अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, मकाऊ, विएतनाम, कॅनडा, तैवान, फ्रान्स, जपान, सिंगापूर, नेपाळसह १३ देशांमध्ये या रोगाचे रुग्ण आढळलेत.
भारतामधे सध्या १० रुग्णांवर कोरोनाबाधित असल्याचा संशय आहे. त्यांच्यावर खास देखरेख ठेवून उपचार केले जातायत. कालच ३० जानेवारीला केरळमधे एका कोरोनाबाधित रुग्ण असल्याचं समोर आलंय. आता या वायरसने जागतिक अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारही पोखरायला सुरवात केलीय. कोरोना वायरस ज्या वेगाने पसरतोय, त्याच्या दुपट वेगाने जगभरातले शेअर बाजार बदाबदा कोसळत आहेत.
अमेरिका आणि चीन यांच्यात गेल्या काही वर्षांपासून आर्थिक आणि राजकीय चढाओढ सुरू आहे. दोघांमधल्या ट्रेड वॉरमुळे तर जगभरातल्या गुंतवणूकदारांना काळजीत टाकलं होतं. पण गेल्या १५ जानेवारीला दोन देशांनी द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावर सह्या करून व्यापार युद्ध संपवण्याच्या दिशेने पावलं टाकलीत. या कराराने आर्थिक क्षेत्रातल्या अनेकांना दिलासा मिळाला. आता जगाचा आर्थिक वाढीचा दर म्हणजेच जीडीपी वाढेल अशी चिन्हं दिसत असतानाच चीनमधे कोरोना वायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केलीय. त्यामुळे अख्ख्या जगाची आर्थिक घडी पुन्हा एकदा फिस्कटण्याची चिन्हं दिसतायत.
स्वाईन फ्लू किंवा इबोला सारखाच कोरोना हासुद्धा प्राण्यांनी जन्माला घातलेला वायरस आहे. हा विषाणू स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही. त्यामुळे माणसाच्या शरीरात येऊन आपल्या पेशींमधली उर्जा वापरून तो जिवंत राहतो. या वायरसची लागण झाली तर ताप, सर्दी, खोकला अशी काही प्राथमिक लक्षणं दिसतात. पण हळूहळू श्वसनसंस्थेचे विकार किंवा न्यूमोनिया सारखा आजार होऊन माणसाचा मृत्यूही होऊ शकतो.
खूप वेगाने या विषाणूचा प्रसार होतोय. यासोबतच या विषाणूवर प्रतिबंधात्मक औषधंही सापडत नाहीय. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याची तयारी सुरू केलीय. फक्त आरोग्यावरच नाही तर आता वेगवेगळ्या क्षेत्रावर या विषाणूचे परिणाम दिसू लागलेत. या विषाणूमुळे जागतिक शेअर बाजारात पडझड सुरू झालीय.
अर्थविषयक पेपर लाइव मिंटच्या एका बातमीनुसार, सोमवारी २७ जानेवारीला या विषाणूमुळे शेअर बाजारासोबतच तेलाच्या किंमतीत आणि भारतीय रुपयात घसरण झाली. भारतात सेन्सेक्स १.१ टक्क्याने घसरला. तसंच डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामधे झालेली गेल्या तीन आठवड्यातली सगळ्यात मोठी घसरण असल्याचंही या बातमीत म्हटलंय.
हेही वाचा : जीवघेण्या चिनी कोरोना वायरसपासून आपण कसं सुरक्षित राहायचं?
कोरोना वायरसमुळे मुळात चीनमधलं गणित गडबडल्यामुळे हा गोंधळ होतोय. चीनमधे नवीन वर्ष २५ जानेवारीच्या आसपास सुरू होतं. त्याला लुनार न्यू इअर असं म्हणतात. त्यासाठी अनेक आशियाई देशांत सुट्ट्याही दिल्या जातात. सुट्ट्यांच्या निमित्ताने यंदाही चीनमधले अनेक लोक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करत होते. त्यामुळेच हा वायरस जोरात पसरू लागला.
कोरोना वायरस वेगाने पसरत असल्याने सावधानीचा उपाय म्हणून चीनने लोकांना प्रवास न करण्याचं आवाहन केलंय. शिवाय न्यू इअरच्या सुट्ट्या एक आठवड्याने वाढवल्यात. तीन फेब्रुवारीला आढावा घेऊन शेअर बाजारही पुन्हा उघडायचा की नाही याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. कोरोनाचा दुहेरी वार होतोय.
पहिला वार हा चीनच्या अर्थव्यवस्थेवर झाला. चीनची उत्पादन व्यवस्था बंद पडलीय. न्यू इअरच्या सुट्ट्या, त्यात कोरोनामुळे दिलेली आठवड्याभराची सुट्टी यामुळे अनेक दिवसांपासून चीनमधे नवं उत्पादन ठप्प झालंय. त्यामुळेच तिथली निर्यातही थांबलीय. चीनकडे जागतिक एक्सपोर्ट हब म्हणून बघितलं जातं. अशावेळी चीनमधून निर्यातच होत नसल्याने येत्या काळात जगभरात मागणी आणि पूरवठ्याचा मेळ घालताना अनेक देशांना नाकीनऊ येऊ शकतं.
कोरोनाचा प्रसार चीनमधल्या वुहान शहरापासून झाला. बीबीसी हिंदीच्या एका बातमीनुसार, वुहान हे शहर दळणवळणाचं महत्त्वाचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. पण आता हे शहर बंद करण्यात, वाळीत टाकण्यात आलंय. त्यामुळे वस्तूंची मागणी असली तरी त्या पुरवण्यासाठी चीनमधे दळणवळणाची सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत एकतर वस्तू उपलब्धच होत नाहीत आणि झाल्या तरी अत्यंत महागात विकल्या जातात.
आणीबाणीच्या परिस्थितीमुळे लोकांनी घराबाहेर पडणं बंद केलंय. सुट्ट्या असल्याने ग्राहक मोठ्या संख्येने बाजारपेठेत येतील, अशी आशा होती. पण कोरोना संसर्गजन्य रोग असल्याने लोक सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळतायत. त्याचा परिणाम चीनच्या मनोरंजन क्षेत्रावरही विपरित परिणाम होतोय.
चीनमधल्या तीन हजाराहून जास्त लोकांना विषाणूची बाधा झाल्याचं समजतं. रुग्णांची संख्या वाढल्यामुळे तिथे अनेक ठिकाणी युद्धपातळीवर नवी हॉस्पिटल्स उभारण्याचं कामंही सुरू आहे. चिनी सरकारी वृत्तसंस्थेने तर सहा दिवसांत हजार खाटांचा दवाखाना उभारल्याचं दावा केलाय. पण अनेक रुग्ण एकाचवेळी हॉस्पिटलमधे भरती झाल्यामुळे त्याचा विमा कंपन्यांना तोटा सोसावा लागतोय.
हेही वाचा : भारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या?
चिनी अर्थव्यवस्थेवर पहिला वार करणाऱ्या कोरोनाने जागतिक अर्थव्यवस्थेवर दुसरा वार केलाय. अनेक गोष्टींसाठी, वस्तूंसाठी चीन ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पण चीनमधे आणीबाणीची परिस्थिती आल्याने जागतिक बाजारपेठांनी आपला मोठा ग्राहक गमावलाय.
चीनमधला वायरस आसपासच्या इतर आशियाई देशांतही पसरला. याचा गुंतवणूकदारांनी धसका घेतल्याचं ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीत म्हटलंय. शेअर बाजारात रिस्क महत्त्वाची मानली जाते. रिस्क घेतल्याने अनेक नवीन व्यवहारांना चालना मिळते. पण सध्याची आणीबाणीची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार रिस्क घेण्याऐवजी सेफ गेम खेळताना दिसताहेत. सुरक्षित ठिकाणीच पैसा गुंतवण्याचा कल दिसून येतोय. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी आशियाई देशातली गुंतवणूक काढून घेतली. त्यामानाने युरोपातली गुंतवणूक नेहमीसारखीच राहिली. आणि म्हणून आशियाई शेअर बाजार गडगडला.
न्यू इअरच्या निमित्ताने जानेवारी महिन्यात हजारो पर्यटक एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करत असतात. कोरोनामुळे हा प्रवास ठप्प झालाय. जपानसारख्या देशात सगळ्यात जास्त प्रवासी चीनमधून येतात. कोरोना वायरसमुळे प्रवास बंद झाल्याने त्याचा मोठा फटका जपानला बसलाय.
‘२०१९ मधे जपानला भेट देणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी ३० टक्के प्रवासी चीनमधून आले होते. कोरोना वायरसमुळे प्रवाशांची ही संख्या कमी झालीय. कोरोनाचा परिणाम जपानच्या पर्यटनावर होतोय. लवकरच याचे पडसाद जपानच्या निर्यातीवर आणि कॉर्पोरेट क्षेत्रावरही दिसू शकतील,’ असं जपानचे अर्थमंत्री यासुतोषी निशीमुरा यांनी २७ जानेवारीला एका पत्रकार परिषदेत सांगितलं.
न्यूयॉर्क टाइम्सच्याच बातमीत आणखीही एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करण्यात आलीय. चीन हा तेलाचाही मोठा ग्राहक आहे. दरवर्षी चीनच्या तेलाच्या मागणीत ५.५ टक्क्यांनी वाढ होते. पण चीनमधे सध्या अक्षरशः संचारबंदीच लागू आहे. वुहानसह तिथली दोन शहरं वाळीत टाकण्यात आलीत. त्यामुळे चीनमधली तेलाची मागणी कमी झालीय. आता या संचारबंदीत आणखी वाढ झाली तर तेलाचे भाव अजून वाढू शकतात अशी भीती वर्तवण्यात येतेय.
या सगळ्यामुळे कुणाचा फायदा होत असेल तर तो आरोग्य क्षेत्र आणि औषधं तयार करणाऱ्या कंपन्या आणि त्यात पैसा टाकणाऱ्या गुंतवणुकदारांचा. हॉस्पिटलमधे वापरण्यासाठी रबरी हॅण्डग्लोव्ज आणि चेहऱ्यावरचे मास्क यांचीही मागणी वाढलीय.
कोरोनावर अजून कोणतंही प्रतिबंधात्मक औषध सापडलेलं नाही. पण त्याच्या सर्दी, ताप अशा लक्षणांवर मात करणारी छोटी औषधं बाजारात उपलब्ध आहेत. प्राथमिक उपचार म्हणून सध्या रुग्णांना हीच औषधं दिली जातायत. पण आरोग्य आणीबाणी पाहता लवकरच या आजारावर प्रतिबंधात्मक औषध तयार केलं जाईल. तेव्हाही त्याचा फायदा औषध कंपन्यांना होईल.
पण सध्यातरी चीनच्या अर्थव्यवस्थेलाही कोरोनाची लागण झालीय. अर्थव्यवस्थेची तब्येतही खालावत चाललीय. चीनचा अशा रोगांशी लढण्याचा मागचा अनुभव फार वाईट होता. २००३ मधेही चीनमधूनच सार्स नावाच्या रोगाचा प्रसार झाला. तेव्हाही चीनने सपाटून मार खाल्ला होता. त्यावेळी चीनचा जीडीपी तर ११ वरून सरळ २.५ टक्क्यांवर आपटला होता. यावेळीही तो धोका असल्याचा इशारा अर्थतज्ञांकडून व्यक्त केला जातोय.
चीन जगातली दुसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. अशा मोठ्या अर्थव्यवस्थेच्या जीडीपीतले चढ उतार जागतिक पातळीवर खूप मोठे परिणाम करतात. आधीच भारतात मंदी आल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेतही मंदीचं सावट होतं. त्यात चीनमधून निर्माण झालेलं हे नवं कोडं सर्वांच्याच डोकेदुखीचं कारण ठरतंय.
हेही वाचा :
विधान परिषद बरखास्त करण्यामागचं आंध्र पॉलिटिक्स
यंदाच्या बजेटमधे सरकार इन्कम टॅक्स सवलत वाढवून देणार?
आता तरी राज ठाकरेंचं नवनिर्माण स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित असेल का?
गांधीजींनी न लिहिलेली ही दोन भजनं गांधींच्या नावानं ओळखली जातात