डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?

०९ मे २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोरोना वायरसनं साऱ्या मातब्बर देशांच्या आरोग्य व्यवस्थांना नागडं केलंय. आता डब्ल्यूएचओच्या नावानं ब्लेगगेम सुरू झालाय. डब्ल्यूएचओनं तर ३० जानेवारीलाच जागतिक आरोग्य आणीबाणीची घोषणा करून आपल्याला सर्वोच्च इशारा दिला होता. तोपर्यंत चीन शिवाय जगभरातल्या १८ देशांमधे ९८ कोरोना पेशंट होते. आरोग्य आणीबाणी हा जगासाठी इशारा होता. पण तो कुणीच गंभीरपणे घेतला नाही.

सध्या कोरोना वायरसचा वाढता प्रादुर्भाव जगाच्या चिंतेचा विषय बनलाय. या सगळ्या काळात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन अर्थात डब्ल्यूएचओची भूमिका महत्त्वाची ठरते. डब्ल्यूएचओ नवी कोणती अपडेट देतंय यावर जगाचं लक्ष असतं. सध्या या संघटनेवर कोरोना वायरसचं गांभीर्य लपवण्याचा आणि वेळीच योग्य ती पावलं न उचलल्याचे आरोप होताहेत. अमेरिका या सगळ्यात आघाडीवर आहे.

आपलं अपयश लपवण्यासाठीही काहीजणांनी या ब्लेमगेमधे भाग घेतलाय. त्यामुळे या साऱ्यांमागचं सत्य शोधायला हवं. या साऱ्या प्रकारावर एनडीटीवीचे व्यवस्थापकीय संपादक आणि रॅमन मॅगसेसे  पुरस्कार विजेते पत्रकार रवीश कुमार यांनी एक फेसबूक पोस्ट लिहिलीय. त्याच पोस्टचा अक्षय शारदा शरद यांनी केलेला अनुवाद इथे देत आहोत.

 

पँडेमिक म्हणजेच जागतिक साथरोग हा एक असा शब्द आहे ज्यानं कोविड १९ चा वेग सांगायला सुरवात केलीय. हिंदीत याला जागतिक महामारी म्हणतात. हा शब्द म्हणजे सगळ्यात मोठ्या इशाऱ्याचा संकेत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशननं ११ मार्चला जागतिक साथीची घोषणा करणं हा सगळ्यात मोठा अलर्ट होता. एव्हाना ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या डोक्यात बसलीय. हा जागतिक साथीच्या युद्धाविरोधातला उठाव होता असं म्हणणं बरोबर नाही.

भारतात कोरोनाची पहिली केस जानेवारीत

डब्ल्यूएचओनं ३० जानेवारीला जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. त्याचवेळी जागतिक धोक्याची घंटा वाजलेली होती. हा शेवटचा आणि मोठा गजर होता. ७० वर्षांच्या इतिहासात केवळ सहा वेळाच जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित झालीय. ३० जानेवारीपर्यंत चीन शिवाय जगभरातल्या १८ देशांमधे ९८ कोरोना पेशंट होते. तोपर्यंत एकही मृत्यू झाला नव्हता.

त्याच दिवशी भारतात केरळमधे एक केस सापडली. तो पेशंट चीनच्या वुहानमधून आलेला होता. ही तारीख यासाठी महत्वाची आहे कारण ३० जानेवारीला जागतिक साथीचा मोठा गजर वाजत असतानाही सरकारं झोपलेली होती. आता सरकारं ११ मार्चच्या जागतिक साथीच्या घोषणेला आधार बनवतायत. कारण ३० जानेवारी ही तारीख लक्षात घेतली तर त्यांचा हलगर्जीपणा हा गुन्हा ठरेल.

हेही वाचा: सरकारनं आपल्या मदतीला पाठवलेला 'आरोग्य सेतू' स्वतः सुरक्षित आहे का?

सरकारं यशस्वी आणि जनता संकटात

आता एक प्रश्न विचारावा लागेल की, ३० जानेवारी ते १३ मार्चपर्यंत भारत सरकार काय करत होतं? अशी कोणती तथ्यं होती ज्या आधारावर भारतानं कोविड १९ ही जागतिक साथ नसल्याचं सांगितलं? हेही विचारावं लागेल की, डब्ल्यूएचओनं ३० जानेवारीलाच धोक्याचा इशारा दिला होता तर मग फेब्रुवारीचा महिना हलगर्जीपणामधे का वाया घालवला? आपण सध्या ज्या पध्दतीने आर्थिक अराजकतेकडे चाललोय, त्यामुळे तरी आज ना उद्या आपल्याला ३० जानेवारीच्या तारखेकडे परतावं लागेलच.

मीडिया तारखा बदलेल. पण आर्थिक अराजकतेतून निर्माण झालेली अस्वस्थता गोदी मीडिया खोट्या गोष्टींनी दाबू शकत नाही. चूक सरकारांची नसून डब्ल्यूएचओची आहे हे लोकांमधे पसरावं यासाठी डब्ल्यूएचओवर हल्ले केले जातायत.

एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की ११ मार्चनंतर अनेक सरकारांना जाग आली. त्यांनी पावलं उचलली. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावर नियंत्रण आणि होणारं आर्थिक नुकसान कमी करण्यात त्यांना यश आलं. अनेक सरकारं निष्काळजीपणा, अहंकारावरच आपली तयारी असल्याचं भासवत राहिली. यात सरकारं यशस्वी झाली, पण जनता मात्र मोठ्या काळासाठी आर्थिक संकटात सापडली.

हेही वाचा: अत्त दीप भव हा तर बुद्ध होण्याचा पासवर्ड!

डब्ल्यूएचओनं जगाला आधीच अलर्ट केलं

११ जून २००९ ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशननं जगभरात नोवेल इन्फ्लुएन्झा ए हा वायरस धडकण्याची घोषणा केली होती. त्याला जागतिक साथ असं म्हटलं. एच १ एन १ हा वायरस माणसाच्या शरीरात याआधी दिसला नव्हता असं डब्ल्यूएचओनं म्हटलंय. हा वायरस नवीन होता. सहजपणे तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमधे पसरतो. त्यावेळी ७४ देशांमधे एच १ एन १ च्या तीस हजार केसेस समोर आल्या होत्या.

डब्ल्यूएचओच्या मते, त्यांच्याकडे पुरावे आहेत, तज्ञांची मतं आहेत त्या आधारावर त्यांच्या आपत्कालीन विभागानं हा आजार जगभरात पसरू शकतो, असं सांगितलं. २००९ ला एच१ एन१ वायसर पसरायच्या आधीच डब्ल्यूएचओनं जगाला अलर्ट केलं होतं. त्यांच्यासाठी कोरोना वायरसही नवा होता. जसा एच १ एन १ होता. डब्ल्यूएचओनं इन्फ्लुएन्जाचा धोका ओळखून जागतिक साथीची घोषणा केली होती.

जागतिक साथरोग या शब्दाचा वापर तेव्हाही झाला होता. पण ३० जानेवारीला कोविड १९ साठी सुरवातीलाच डब्ल्यूएचओनं जागतिक आरोग्य आणीबाणीची घोषणा केली.

लॉकडाऊन ही काही डब्ल्यूएचओची शिफारस नाही

डब्ल्यूएचओनं लॉकडाऊनचा प्रस्ताव दिला नव्हता. सुरवातीला चीननं ही आयडिया वापरली. चीननं वूहान हे शहर पूर्णपणे बंद केलं होतं. याचा अर्थ असा की, साथीच्या विरोधात लढण्यासाठी देशांनी काय करावं हे त्यांच्या त्यांच्या विवेकावर अवलंबून असतं. ११ मार्चला जागतिक साथीचं नाव दिलं गेलं तेव्हा डब्ल्यूएचओनं एक प्रसिद्धीपत्रक काढलं होतं. त्यात सात सूचना देण्यात आल्या होत्या.

पहिलं म्हणजे, तथ्यांच्या आधारावर तयारी आणि निर्णय व्हावेत. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि प्रवासात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. यावरची लस ही जलद गतीने शोधायला हवी. ज्या देशांमधे आरोग्य सेवा कमकुवत आहेत त्यांना मदत करायला हवी. अफवा आणि चुकीची माहिती थांबवायला हवी. आपण जी तयारी करतोय त्याचा आढावा घेतला पाहिजे. आकडेवारी आणि माहिती सार्वजनिक करायला हवी. हा विज्ञान आणि तथ्यांचा काळ आहे. 

२००५ मधे एक आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावली बनवण्यात आलीय. डब्ल्यूएचओच्या १९४ सदस्य देशांसोबत १९६ देशांनी यावर सह्या केल्या होत्या. तेव्हाच हे ठरलेलं होतं की साथीच्या काळात सगळे मिळून काम करतील. बंदरं, विमानतळं, रस्ते वाहतुकीबाबत काही पावलं उचलली जावीत जेणेकरून साथीचा रोग दुसऱ्या देशात पसरणार नाही. तसंच व्यापार, रहदारीमधे कमीत कमी अडथळा यावा. व्यापार आणि पर्यटन थांबवू नये, असं ही नियमावली सांगते.

हे कोरोना स्पेशलही वाचा: 

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट

कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

भारतातलं चित्र इतर देशांमधे नाही

३० जानेवारीला डब्ल्यूएचओनं जागतिक आरोग्य आणीबाणी संदर्भात इशारा दिला होता. उपलब्ध माहितीच्या आधारावर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि प्रवास थांबवू नये, असं डब्ल्यूएचओनं स्पष्ट केलं. डब्ल्यूएचओवर वेगवेगळ्या पद्धतीनं टीका होत असते. यावेळीही होतेय. खरा गुन्हेगार टीका टाळण्याचा प्रयत्न करत असतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन ही सल्ला देणारी संस्था आहे.

डब्ल्यूएचओ देशांच्या दृष्टीने तितकीच महत्वाची असती तर देशांची आरोग्य मंत्रालयं त्यांच्यासोबत बैठका करत बसली असती. डब्ल्यूएचओनं ३० जानेवारीलाच जगाला इशारा दिला होता. तैवान, न्यूजीलंड, दक्षिण कोरिया, जर्मनी या देशांनी हा इशारा नीट ऐकला. त्यामुळे इशारा न ऐकलेल्या देशांपेक्षा हे देश ठणठणीत आहेत. भारतासारखं चित्र इतर देशांमधे नाही. इथं भूक आणि तहानेनं व्याकूळ लाखो लोक रस्त्यांवर भटकत असताना सरकारची वाहवा होतेय.

सैन्याच्या तयारीशी सध्याची तुलना?

३ मेला भारतीय सैन्यानं कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना सॅल्युट करणं कुणाला आवडलं नाही? सैन्याची कोणतीही कामगिरी भव्यच असते. सैन्य सर्वांचे आभार मानते. आकाशात विमानं उडततायत. समुद्रात वेगवेगळी जहाजं सन्मानासाठी उभी आहेत  हे चित्र अद्भुत तर असणारच. पण आपण खरंच सैन्याशी नजर भिडवण्यालायक तयारी केलीय? सैन्यदलं जशी तयारी करतात त्याच्याशी आपण कोरोनाशी लढण्याच्या आपल्या तयारीची तुलना करू शकतो का?  

लॉकडाऊन तिसऱ्या वेळी वाढवण्यात आलंय. याचा अर्थ आपल्याला यश मिळालं नाही. अपयशावर पांघरून घालण्यासाठी लॉकडाऊन केलं गेलं. जेणेकरून या कठोर भयावहते समोर जनतेनं आश्चर्यचकीत व्हावं. झालीही. लॉकडाऊन भलेही फेल गेलं असेल पण मुळात जो हेतू नव्हता तो साध्य झाला. सैन्याला सामोरं जायच्या आधी आपल्याला खरंच खात्री होती का की, लॉकडाऊनच्या काळात आपण आरोग्याबद्दलची तयारी नीट केलीय?

हेही वाचा: पायपीट करत काश्मीरमधला कर्फ्यू टिपणाऱ्या या तिघांना पुलित्झर मिळाला

लॉकडाऊनमधेच लोकांनी नोकऱ्या गमावल्या

कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढतेय. भलेही ही साथ प्रति तास १०० किमीच्या वेगानं पसरत नसेल. त्याचा वेग प्रति तास ६० किमी असेल. पण तो आहे. भारतात एवढ्या लांबलचक लॉकडाऊनमधे कोरोनाची केस नोंदली नाही असा दिवस नाही. भारतानं सॅम्पल टेस्टची संख्या जरूर वाढवली असेल पण त्याचा वेग मात्र कमी आहे. आपण अद्यापही पुरेशा टेस्ट केलेल्या नाहीत.

वारंवार धोरणं बदलून टेस्ट न करण्याची गरज खरी ठरवली जातेय. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. कॅमेऱ्याची लेन्स बदलली म्हणून काही चंद्र बदलत नाही. लॉकडाऊनच्या काळात लाखो लोकांनी आपली नोकरी गमावलीय. पगार गमावला. टॅक्स आणि इएमआय भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांनाही या कपातीला तोंड द्यावं लागतंय. अर्थात आपली आर्थिक स्थिती बिकट आहे.

पैशात कपात केली जात असताना सैन्यानं केलं त्यावर किती पैसे खर्च केले? हा खर्च योग्य आहे? आयटी सेलच्या भीतीमुळे हे विचारण्याची हिंमत कुणी करू शकेल? आपण आपल्या तयारीनं जगाला आश्चर्यचकित करणं योग्य ठरलं नसतं का? न्यूझीलंड आणि तैवान सारखं आपणही पहिल्या टप्प्यातच कोरोनावर नियंत्रण मिळवलं असतं आणि त्यानंतर सैन्यासमोर जाऊन त्यांना अभिवादन करायला आणि स्वीकारायला हवं होतं. खोट्यावर पांघरून टाकून सैन्याचे हात त्याग आणि पराक्रमाच्या सलामीसाठी उंचावलेत. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, सैनिक केवळ सत्यासाठी आपला जीव देतो. सत्याचं रक्षण करतो.

हेही वाचा: 

महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

छत्रपती शाहूंचं निधन झालं, तिथे त्यांचं स्मारक उभं राहिलंच नाही

महाड ते वर्साय, फ्रेंच राज्यक्रांती ते भारतीय राज्यघटना, व्हाया ५ मे

भाव नसल्याने दूध सांडणारे शेतकरी लॉकडाऊनमधे दूध का सांडत नाहीत?

म्हणून तर मी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ लिहिलाः बाबासाहेब आंबेडकर

आपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं