कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

२१ मार्च २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोरोना वायरसविरोधातल्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय. तसंच जीव धोक्यात घालत कोरोनाविरोधात काम करणाऱ्यांसाठी कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलंय. टाळ्या वाजवणं हे मुंबई, महाराष्ट्रासाठी नवं असलं तरी जनता कर्फ्यूशी मराठी माणसाचं अनोखं कनेक्शन आहे. मग टाळ्या वाजवण्याचं कनेक्शन कुणाशी आहे?

कोरोनाविरोधातल्या लढ्यात जगभरातले पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष देशाला संबोधित करत आहेत. पत्रकार परिषदा घेत आहेत. कोरोनाचा उद्रेक होऊन दोन महिने लोटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पहिल्यांदाच काय बोलणार याकडे भारताचंच नाही तर साऱ्या जगाचं लक्ष लागलं होतं. पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाविरोधात हिमतीनं लढत असल्याबद्दल भारतीय जनतेचं कौतूक केलं.

हेही वाचाः लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक, मुंबई लॉकडाऊन होणार?

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

शुक्रवारी १९ मार्च २०२० ला रात्री आठ वाजता देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी कोरोनाविरोधाल्या जनता कर्फ्यूमधे लोकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन केलंय. जीव धोक्यात घालून कोरोनाविरोधात लढणाऱ्या राष्ट्र रक्षकांसाठी कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवूया, असं ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, ‘आजच्या पिढीला ही गोष्ट नीट माहीत नसेल. पण जुन्या काळात जेव्हा युद्धस्थिती उद्भवायची तेव्हा गावागावांत ब्लॅकआऊट केलं जायचं. घरांच्या काचांवर कागदं लावली जायची. लाईट बंद केली जायची. लोक स्वतःहून चौकाचौकात पहारा द्यायचे. मी आज प्रत्येक देशवासियाकडे एक आणि मागणं मागतोय.’

‘२२ मार्च २०२०, रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ या काळात जनता कर्फ्यूचं पालन करावं. जीवनावश्यक सेवांचा अपवाद वगळता इतरांनी घराबाहेर पडू नये. अशा जनआंदोलनांच्या यशातून आणि अनुभवातून आपण आगामी काळातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार होऊत. २२ मार्चचा आपला प्रयत्न हा आपला आत्म संयम आणि राष्ट्रीय हितासाठी कर्तव्य निभावण्याचा संकल्प यांचं एक प्रतीक बनेल,’ अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

१९ सप्टेंबर १९५० ला म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा जन्म झालाय. त्यामुळे पंतप्रधान कुठल्या जुन्या युद्धाबद्दल बोलताहेत, असं काहींना वाटलं. पण मोदी त्यांच्या काळातल्या एका युद्धाबद्दलचं बोलत आहेत. कोणत्या युद्धाबद्दल हे त्यांनी सांगितलं नाही. आपण ते शोधूत.

हेही वाचाः जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

मुंबई कुणाच्या बापाची?

तसं जनता कर्फ्यूचं कनेक्शन मराठी माणसासाठी जिव्हाळ्याचं प्रकरण असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापर्यंत जाऊन पोचतं. या लढ्याला यंदा ६० वर्ष होताहेत. जसं मराठी माणसं संयुक्त महाराष्ट्रासाठी लढत होते, तसं गुजराती माणूस महागुजरातसाठी आग्रही होतात. आणि दोघांनाही मुंबईसह महाराष्ट्र किंवा गुजरात अशी वेगळी राज्यं हवी होती. आणि या लढ्यातच एका गांधीवादी कार्यकर्त्याच्या डोक्यातून जनता कर्फ्यू ही अहिंसक आंदोलनाची कल्पना जन्माला आली.

इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल विकली या साप्ताहिकाच्या १ सप्टेंबर १९५६ च्या अंकात मुंबईत राहणाऱ्या द्विभाषी राज्याच्या एका अनामिक हितचिंतकाचं पत्र आलं होतं. या पत्रानुसार, ‘८ ऑगस्टला काही कॉलेजवयीन तरुणांनी मुंबईसह गुजरात झालाच पाहिजे या मागणीसाठी काँग्रेस भवनवर मोर्चा नेला. पण पोलिसांनी आंदोलकांवर अंदाधूंद गोळीबार केला. जवळपास २२ फैरी झाडल्या. यात ८ जणांचा जीव गेला. गुजरातमधे असंतोषाचा आगडोंब उडाला. मग जनतेला शांत करण्यासाठी जनता कर्फ्यूचं आवाहन करण्यात आलं.’

हे कोरोना स्पेशलही वाचाः

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, पत्रकार सांगतेय स्वानुभव

भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

पहिल्यांदा कुणी दिली जनता कर्फ्यूची हाक?

डीएनए या वेबपोर्टलवर २०१३ मधे पब्लिश झालेला सनत मेहता यांचा एक लेख उपलब्ध आहे. त्यानुसार, इंदुलाल याज्ञिक हे या लढ्याचे नेते होतो. लोक त्यांना इंदू चाचा म्हणून हाक मारायचे. मेहता यांनी इंदू चाचांसोबत मुंबईसह गुजरात हवं यासाठीच्या महागुजरात आंदोलनात सहभाग घेतलाय.

मेहता लिहितात, ‘पोलिसी गोळीबाराविरोधात अहमदाबादच्या लोकांतून संतप्त प्रतिक्रिया आली. हा जनउद्रेक रोखण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी उपोषणाला बसण्याची घोषणा केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचाराचा धोका निर्माण झाला. मग यातून इंदूचाचांनी एक मार्ग काढला.’ येरवडा तुरुंगात महात्मा गांधी यांच्या आत्मचरित्राचं डिक्टेशन घेणाऱ्या इंदू चाचांनी अहिंसेच्या मार्गानं आंदोलनाचं आवाहन केलं.

‘इंदू चाचांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं. लोकांना घरातच थांबून उपोषण करायला सांगितलं. असं केल्यानं पोलिसांशी संघर्ष होण्याचा प्रसंगच उद्भवणार नाही. त्यावेळी अनेकांनी या आवाहनाला एक पॉलिटिकल स्टंट म्हणून मोडीत काढलं. पण मोरारजीभाई उपोषणाला बसले तेव्हा आंदोलनस्थळी लोकांपेक्षा लाऊडस्पीकरचीच संख्या अधिक होती. दुसऱ्या दिवशी लोकांनी त्याचे फोटोही छापले.’

इंदूलाला याज्ञिक कोण?

एका गांधीवादी नेत्याच्या आवाहनानंतर लोकांनी उत्स्फुर्त सहभाग घेत जनता कर्फ्यू म्हणजे काय याचं उत्तरही दिलं. आणि या अहिंसक लढ्यातूनच जनता कर्फ्यूचा जन्म झाला. कर्फ्यू म्हटलं की आपल्या नजरेसमोर हत्यारं घेऊन फिरणारे पोलिस दिसतात. पण इथे पोलिसांशिवायचा आणि स्पष्ट सांगायचं झालं तर पोलिसांविरोधातच कर्फ्यू पाळला जात होता.

मजेशीर गोष्ट म्हणजे, १९४०-४१ मधे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युद्धविरोधी अभियान हाती घेतल्याबद्दल इंचू चाचांना कारावासही भोगावा लागला. २२ फेब्रुवारी १८९२ ला जन्मलेले इंदूचाचा गुजरात काँग्रेस कमिटीचे सचिवही होते. १९५७ मधे त्यांनी महागुजरात जनता परिषदेची स्थापना केली. या संघटनेच्या तिकीटवर ते अहमदाबादेतून दोनदा लोकसभेवरही निवडून गेले.

१९३६ मधे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भारतीय किसान सभा या संघटनेच्या स्थापनेहती त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. गुजरात किसान सभा नावाच्या संघटनेचीही त्यांनी स्थापना केली. 

हेही वाचाः 

'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो?

गुढीपाडव्याला साजरा करुया महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन

जनता कर्फ्यूशी मोदी कनेक्शन

आपण जसं संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करतो, तसं गुजरातमधे होत नाही. डीएनएच्या या लेखातच गुजरातचा ५३ वा स्थापना दिवस साजरा होतोय. पण यात महागुजरात आंदोलनाची योग्य ती दखलही घेतली गेली नाही. कारण हे आंदोलन लढणाऱ्या व्यक्ति सध्या हयात नाहीत. पिढी बदलली आणि हे आंदोलन कुठल्या एका पक्षाचंही नव्हतं, अशी खंत मेहता व्यक्त करतात. मेहता यांनी २०१३ मधे हा लेख लिहिलाय तेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.

१९५६ ते १९६० पर्यंत चाललेल्या महागुजरात आंदोलनात जनता कर्फ्यू हा एक महत्त्वाचा भाग राहिलाय. १९७३-७४ मधे आर्थिक तंगी आणि भ्रष्टाचाराविरोधातल्या नवनिर्माण आंदोलनातही जनता कर्फ्यूचा वापर झाला. अलीकडच्या काळात रथयात्रा निघाली की संघर्षाचा प्रसंग टाळण्यासाठी मुस्लिमांनी स्वतःहून जनता कर्फ्यू पुकारला होता. ‘नवनिर्माण आंदोलनात तर नरेंद्र मोदी यांचा सक्रिय सहभाग राहिलाय,’ अशी माहिती शिक्षण क्षेत्रातले कार्यकर्ते सुखदेव पटेल यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिलीय. त्यावेळी मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते.

हेही वाचाः संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले?

इटली, स्पेनमधे वाजताहेत कृतज्ञतेच्या टाळ्या

गांधीवादी इंदूचाचांच्या जनता कर्फ्यूसोबत आपल्या पंतप्रधानांनी एक जोड कार्यक्रम दिलाय. स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना वायरसच्या लढ्यात लढणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला सांगितलंय. ते म्हणतात, ‘संध्याकाळी पाचला सायरनचा आवाज होईल. तेव्हा आपण दारात, खिडकीत, बाल्कनीत उभं राहून या कठीण काळात देशसेवेत निष्ठेनं काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे, डॉक्टरांचे आभार मानूया. पाच मिनिटं टाळ्या वाजवून, घंटी वाजून आभार मानूया.’

गेल्या चारपाच दिवसांपासून सोशल मीडियावर काही विडिओ वायरल झालेत. इटली, स्पेनमधे कोरोनामुळे घरातच बसावं लागलेले लोक आपला वेळ कसा घालवतात, हे सांगणारे विडिओ आहेत. तसंच देशाला संकटातून काढण्यासाठी दिवसरात्र झटणारे आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी, अधिकाऱ्यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून एका ठराविक वेळी टाळ्या वाजवून आभार मानत आहेत.

स्पेनमधे डाव्या विचाराच्या स्पॅनिश सोशलिस्ट पक्षाच्या सरकारनं कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केलीय. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडता येत नाही. कोरोनाविरोधात लढणारे लोकच रस्त्यावर आहेत. बीबीसीनं एका बातमीत म्हटलंय, ‘स्पेन आणि इटलीतले रहिवासी कोरोनावायरशी लढणाऱ्या आरोग्य क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता म्हणून खिडकीत उभं राहून टाळ्या वाजवत आहेत. दोन्ही देशात सध्या लॉकडाऊनची स्थिती असून लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःहूनच अशा इवेंटचं आयोजन करत आहेत.’

इंदूचाचा आणि स्पेन, इटलीला थँक्यू म्हणायला पाहिजे

पंतप्रधान मोदी हे जनतेला, भाजप कार्यकर्त्यांना वेगवेगळे कृती कार्यक्रम देण्यासाठी ओळखले जातात. कोरोनाविरोधातल्या लढ्यातही त्यांनी असाच कृती कार्यक्रम दिलाय. मोदींनी महागुजरात आंदोलनातल्या जनता कर्फ्यू मॉडेलला स्पेन आणि इटलीतल्या इवेंटशी जोडून नवं कॉम्बिनेशन तयार केलंय. या कॉम्बिनेशनचा वापर करून कोरोनाविरोधात लढण्याचा मंत्र मोदींनी दिलीय.

या नव्या कॉम्बिनेशनच्या मदतीनं पंतप्रधानांनी कोरोनाविरोधातल्या लढ्याला एका जनआंदोलनाचं स्वरूप दिलंय. इंदू चाचा आणि स्पेन, इटलीतल्या नागरिकांनी या कल्पक आयडियांना जन्म दिलाय. या आयडिया आपल्याला संकटाच्या काळात मदतीला आल्यात. यासाठी आपण एकदा डाव्या गांधीवादी इंदूचाचांना आणि स्पेन, इटलीला थँक्यू म्हणायला हवं.

हेही वाचाः 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

सगळ्यांनाच मास्क वापरण्याची गरज आहे का?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार 

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?

१०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात धुमाकूळ घातलेल्या वायरसचा धडा काय?